पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

0
130

•१२ लाखांचे होते बक्षीस
तभा वृत्तसेवा
गडचिरोली, ३१ ऑक्टोबर
प्लाटून दलम सदस्यासह १२ लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांनी रविवार, २९ ऑक्टोबर रोजी येथील पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे रा. गोरगुट्टा, प्रवीण ऊर्फ विलास देवाजी कोल्हा रा. नैनगुडा, शारदा ऊर्फ रिना वत्ते पुंगाटी रा. गुडंजूर, दरजू कुल्ले उसेंडी रा. नैनगुडा, सर्व ता. एटापल्ली व रैजू नळगू कातवो . बेरईवाडा, ता. पाखांजूर (छ.ग.) अशी आत्मसमर्पण करणार्‍यांची नावे आहेत. हे सर्व युवक २० ते ३० वयोगटातील आहेत.
करण नरोटे हा जून २००८ मध्ये गट्टा दलममध्ये भरती झाला. नंतर त्याला प्लाटून क्रमांक १४ मध्ये पाठविण्यात आले. तेव्हापासून नोव्हेंबर २०१० पर्यंत तो तेथे कार्यरत होता. त्याचा दोबूर, कोरपल्ली, मिरकल फाटा चकमक तसेच रानु धुर्वा व चुकलूची हत्या आणि गुड्डीगुडम बिटाची जाळपोळ या गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. त्याला पकडण्यासाठी शासनाकडून ४ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
प्रवीण कोल्हा हा सन २०१२ पासून दलमची कामे करीत होता. तो ऑगस्ट २०१५ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती होऊन सप्टेंबर २०१६ पर्यंत दलम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याचा कुंडूक, दोबेगुडा चकमक, पैडी-कोटमी दरम्यान डांबरी रोड खोदणे, जारावंडी-कसनसूर रोडवरील जवेली फाट्यावर बॅनर लावणे या गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. त्याच्यावर शासनाने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
शारदा पुंगाटी ही नोव्हेंबर २०१२ मध्ये गट्टा दलममध्ये भरती झाली. नंतर तिला भामरागड दलममध्ये पाठविण्यात आले. ती जानेवारी २०१३ पर्यंत भामरागड दलममध्ये कार्यरत होती. कुचेर येथे घडलेल्या चकमकीत तिचा सहभाग होता. शासनाने तिच्यावर २ लाखांचे बक्षीस ठेवले होते.
दरजू उसेंडी हा सन २०१५ पासून सप्टेंबर २०१६ पर्यंत दलमची कामे करून पार्ट टाईम मेंबर, एआरडी/जीआरडी म्हणून कार्यरत होता. या कार्यकाळात एकाही गुन्ह्यात त्याचा सहभाग नव्हता. त्याच्यावर शासनाने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
रैजू कातवो हा सन २००२ ते २००७ पर्यंत काकणार दलमची कामे करून पार्ट टाईम मेंबर, एआरडी/जीआरडी म्हणून कार्यरत होता. यादरम्यान त्याचा वच्छाघाट चकमक, आगमेटा येथील तलाठी कार्यालयाची तोडफोड, गुड्डी नरोटीचा खून, बल्लूचा खून, निवडणूक प्रचार वाहनाची जाळपोळ व बॅलेट बॉक्स पळविणे, डांबरी रोड खोदणे, ख्रिश्‍चन ब्रदर्स स्कूल कुडली येथे काळा ध्वज फडकाविणे इत्यादी गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. त्याच्यावर शासनाने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
सदर पाच जहाल नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे.
यांच्या आत्मसमर्पणातून प्रेरणा घेऊन दलममध्ये कार्यरत इतरही सदस्य नक्कीच आत्मसमर्पण करतील, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.