देवरीत विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

0
105

महावितरणच्या दुर्लक्षाने घेतला बळी
तभा वृत्तसेवा
देवरी (गोंदिया) ३१ ऑक्टोबर
येथील मनसेचे माजी तालुका अध्यक्ष हमीद मेमन यांचा मुलगा नाविद या १५ वर्षीय विद्यार्थ्याचे चिचगड रोडवरील गिट्टी खाणीजवळ सोमवार, ३१ रोजी सकाळी ९ च्या सुमारास विद्युत धक्क्याने मृत्यू झाला.
नाविद मेमन हा नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी आठच्या सुमारास देवरी येथील चिचगड रोडवरील गिट्टी खाणीजवळ शेळ्यांसाठी झाडांच्या फांद्या आणण्यासाठी काही मित्रांसोबत गेला होता. झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर एक फांदी वरतीच झाडाला अडकली. ती फांदी काढताना त्याच झाडाला लागून चिचगडकडे गेलेल्या विद्युत तारांना त्याचा स्पर्श झाल्यामुळे नाविद खाली जमिनीवर पडला. ही माहिती मित्रांनी नाविदच्या पालकांना सांगितल्यानंतर घटनास्थळी पालक पोहोचेपर्यंत एक तासाचा कालावधी गेला. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
नाविद हा देवरी येथील सीता पब्लिक शाळेतील इयत्ता ननवीचा विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूमुळे नगरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची दखल देवरी पोलिसांनी घेतली असून सदर घटनेला विद्युत महावितरण कंपनीसुद्धा जबाबदार असल्याची चर्चा आहे. नगरात तसेच ग्रामीण भागात विद्युत पुरवठ्यासाठी टाकलेल्या तारांजवळ अनेक झाडे वाढून काही जागी तारा या झाडातूनच टाकल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे, हे विशेष. या घटनेमुळे शहरात महावितरणाविषयी रोष व्याप्त आहे. दरम्यान नावीदच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याच्या कुटुंबीयांना मृतदेह सोपविण्यात आला.
पितळ उघडे
विद्युत तांराजवळून झाडाच्या फांद्या जात असल्यास ते कापून तारांना मोकळे करणे गरजेचे असते. विशेषत: वर्षभर हे नियोजन करण्यात येत असते. अशात फक्त महावितरणकडून पावसाळापूर्व नियोजन आखून विद्युत तारांजवळील झाडे, झुडपी कापण्याचे नियोजन केले जाते. मात्र प्रत्यक्षात असे काहीच होत नाही. मात्र नियोजनासाठी खर्चाचा आराखडा तयार करून तो खर्च गायब होत असल्याची ओरड नेहमीच पुढे येत असते. दरम्यान सोमवार, ३१ च्या घटनेने महावितरणाचे पितळ उघडे पडले असून प्रत्यक्षात नियोजन कसे आहे, हे दिसून आले.