अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार

0
235

पाळा येथील कोकरे आश्रमशाळेतील प्रकार
•शाळा समिती अध्यक्षासह
१२ जण ताब्यात
तभा वृत्तसेवा
खामगाव, ३ नोव्हेंबर
तालुक्यातील पाळा येथील स्व. निनाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेतील काही अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले असून, कृषिमंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर हे माहिती घेण्यासाठी पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
पाळा येथील कोकरे आश्रमशाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव येथील अल्पवयीन मुलीने तिच्यासह शाळेतील इतर काही मुलींवर अत्याचार होत असल्याची आपबिती दिवाळीच्या सुटीत घरी गेल्यानंतर आई-वडिलांना सांगितली. हा प्रकार सरंपचामार्फत माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्याही कानावर घालण्यात आला. आ. खडसे यांनी यामध्ये लक्ष घातल्याने मुक्ताईनगर पोस्टेला दोन मुलींकडून तक्रार देण्यात आली. मुक्ताईनगर पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोस्टेला वर्ग केले.
दरम्यान, हिवरखेड पोलिसांनी आरोपींना चौकशीसाठी खामगाव शहर पोलिस ठाण्यात आणले असता भाऊसाहेब फुंडकर यांनी तेथे भेट देऊन या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी हलखेडा गावातील पीडित मुलींच्या कुटुंबीयांसह गावकरी मोठ्या संख्येने शहर पोलिस ठाण्यात हजर झालेत.
पोलिसांनी शाळा समितीचे अध्यक्ष गजानन निनाजी कोकरे, नीतुसिंह पवार रा. उमरा, भारत लाहुडकार, रवि डांगरे, दीपक कोकरे यांच्यासह सुमारे १२ जणांना ताब्यात घेतले असून, कारवाई सुरू होती. या संदर्भात मुंबईत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेतल्याचे समजते. यासंदर्भात आश्रम शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.