सिगिरीयाची नवलकथा-२

0
107

टेहळणी
ही कथा चक्क अतींद्रिय घटनेमध्ये मोडणारी आहे. त्यामुळे वाचकांनी आपल्या विवेकानुसार ती मानावी अथवा नाकारावी. आजकाल विवेक या शब्दातील विवेकच निघून गेला आहे. उठसूट कोणीही उठतो आणि स्वतःला विवेकवादी असल्याचे घोषित करतो. एकदा विवेकाचा असा स्वघोषित चेहेरा निर्मिला की समोर कोणीही असले तरी त्याच्या श्रद्धांची टिंगल उडवायला असले विवेकवादी मोकळे असतात. ते स्वतःला बुद्धिवादीसुद्धा म्हणवतात बरे का…!! त्यांचे विज्ञान वेगळे असते. ते आधी निष्कर्ष काढतात आणि नंतर प्रयोग केला असे म्हणतात. याचाच दुसरा अर्थ असा की जे अवैज्ञानिक लोक आहेत तेच सांप्रत काळात स्वतःला वैज्ञानिक दृष्टीचे म्हणवून घेत आहेत. माध्यमे त्यांच्या बाजूची असल्यामुळे त्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळत असते आणि त्या जोरावर ते कोणत्याही गोष्टीवर अधिकारवाणीने मतप्रदर्शन करतात. वरकरणी विवेकाची गोड भाषा वापरतात.
दुर्जनैरुच्यमानानि सस्मितानि प्रियाण्यपि
अकालकुसुमानीव भयं संजनयन्ति हि
(दुष्ट मनुष्य हसून गोडगोड बोलू लागला, तरी वेलीला अवेळी लागलेल्या फुलांप्रमाणे भीती उत्पन्न करतो. योग्य वेळेच्या आधी फुले आली, तर फळे धरत नाहीत. त्याप्रमाणे भाषण गोड असले तरी उपयोग होणार नाही; कदाचित त्राससुद्धा होऊ शकेल ही भीती असते.)
प्रा.अद्वयानंद गळतगे हे त्यांच्या विज्ञान आणि चमत्कार या ग्रंथात म्हणतात, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणार्‍यांचे पक्षपाती, मताग्रही आणि सत्याग्रही असे तीन गट पडतात. पक्षपाती गटानुसार भौत वस्तू हा विज्ञानाचा विषय असून, या क्षेत्राबाहेरील संशोधन हा विज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. यांच्या दृष्टीने विज्ञान व अध्यात्म ही वेगळी क्षेत्रे असून एकाचा दुसर्‍याशी कसलाही संबंध नाही. हे लोक विज्ञानाचे पक्षपाती असले तरी विज्ञान हे अंतिम सत्याचा मक्तेदार असल्याचे मानत नाहीत. त्यामुळे एकीकडे विज्ञाननिष्ठ असलेले हे लोक, दुसरीकडे परमेश्‍वराच्या अस्तित्वावर विश्‍वास ठेवत असल्याचेही आढळून येतात. न्यूटन व आईनस्टाईन ही काही यातील उदाहरणे आहेत.
दुसर्‍या मताग्रही गटातील लोक विज्ञानाचा विषय भौत वस्तू हाच असला, तरी त्याच्यापलीकडे संशोधनाचे आणि सत्यशोधनाचे क्षेत्र असूच शकत नाही असे मानत असल्याने त्यांच्या दृष्टीने विज्ञान हाच सत्याचा मक्तेदार ठरतो. म्हणून हे लोक अतींद्रिय शक्तीविषयीचे संशोधन व्यर्थ समजतात व त्यासंबंधीचे पुरावे खोटे मानतात. अतींद्रिय शक्तीसंबंधी प्रसिद्ध शास्त्रज्ञ जे. बी. र्‍हाईन यांच्या प्रयोगात्मक पुराव्यांना या लोकांनी फसवेगिरीच्या सदरात ढकलायला कमी केले नाही.
तिसरा गट हा सत्याग्रही लोकांचा आहे. त्यांच्यानुसार विज्ञानाचे नियम वेगळे आणि अध्यात्माचे वेगळे. असा पक्षपात निसर्गाला मान्य नाही. निसर्ग हा नि:ष्पक्ष असून त्याला विश्‍वात कप्पे मंजूर नाहीत. परमेश्‍वराने निर्माण केलेले नियम सर्व विश्‍वाला सारखेच लागू झाले पाहिजेत व ते नियम परमेश्‍वर हस्तक्षेप करून मोडणे संभवनीय नाही. या मतानुसार चमत्कार हे वास्तविक चमत्कार नसून विशिष्ट नियमानुसार घडून येणार्‍या त्या निसर्ग घटनाच आहेत. फक्त आज त्यांचे नियम आपणास माहीत नसल्याने ते चमत्कार वाटतात. म्हणून अशा घटनांचा सत्यशोधनांच्या दृष्टीने वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास आणि संशोधन होणे अगत्याचे आहे. (पृ.७२ व ७३)
हे विवेचन देणे आवश्यक वाटले कारण कॅण्डी येथील सरकारी दवाखान्याचे निवृत्त प्रशासक डॉ. मार्क्स फर्नांडो यांनी २ मे १९८२ च्या ‘विकेंड’ या इंग्रजी साप्ताहिकात एक लेख लिहिला. त्यात त्यांनी रामायणकालीन राक्षसांच्या आत्म्यासोबत संपर्क स्थापन केल्याचा दावा केला आहे. एक सप्ताहभर त्यांनी या आत्म्यांसोबत संभाषण केले. त्यात त्यांना रामायण काळात एक अत्यंत पुढारलेली प्रगत अशी संस्कृती असल्याचे आढळून आले. रक्ष, नाग, देव आणि यक्ष असे चार प्रकारचे गण लंकेत होते. त्यांना एकत्र करून रावणाने एक बलाढ्य गणराज्य उभे केले आणि नंतर तो दक्षिण भारताकडे वळला. दिग्गण, मकर, जनतु आणि दंत अशी या चार राक्षसांची नावे त्यांनी दिली आहेत. जनतु हा अभियांत्रिकी कामात निष्णात होता आणि लंकेतील पहाडांमध्ये अनेक बोगदे बांधण्याचे काम त्याने केले. रावणाच्या सेनेची जलद हालचाल त्या बोगद्यातून होत असे.
जनतुने त्यांना सांगितले की, सिंहगिरी, सिंहपूर अथवा सिगीर विमान ही एकाच ठिकाणाची नावे आहेत. आज याचे नाव सिगिरीया आहे. तिथे रावणाचा मुख्य किल्ला आणि राजवाडा होता. त्यात शिरण्याची कोणाची हिम्मत नव्हती. रावणाचे जे सेवक त्या काळात होते ते आजही यक्षरूपाने किल्ल्याचे रक्षण करतात. किल्ल्याचे प्रवेशद्वार एका प्रचंड सिंहाच्या मुखासारखे होते. ते सिंहद्वार पार करणे शत्रूला अशक्य होते.
यावर त्याला अडवत डॉ. फर्नांडो म्हणाले, हे कसे शक्य आहे? सिंहली इतिहासाप्रमाणे कश्यप राजाने हा किल्ला दीड हजार वर्षांपूर्वी बांधला असे सांगितले जाते. त्यावर जनतु म्हणाला, तो तुमचा लिखित इतिहास झाला. मी अलिखित असलेल्या आणि अतिप्राचीन काळाबद्दल सांगतो आहे. राजकुमार विजय येण्याआधीपासून या लंकेत सहस्रावधी वर्षांपासून एक महान संस्कृती होती. रावण हा थोर शिवभक्त असल्याने त्याने या संयुक्त गणराज्याचे नाव ‘शिवहल’ असे ठेवले. त्याचेच पुढे सिंहल झाले. त्या किल्ल्यात जाताना मार्गातील एका जागी खुद्द रावणाने काढलेली स्त्रियांची चित्रे पाह्यला मिळतील. या रावणराज्याच्या केंद्रस्थानी महाकाली मंदिर होते आणि चार दिशांना चार शिवमंदिरे होती. त्यांना त्याकाळी रकुविमान किंवा राक्षसनिवास असे म्हणत. आजही ही मंदिरे आहेत पण ती अन्य नावाने ओळखली जातात.
डॉ. फर्नांडो यांना या राक्षस आत्म्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्याबद्दलचे संशोधन चालू आहे. त्यापैकी अनेक गोष्टी पुढे सत्य निघाल्या. तत्कालीन बौद्ध कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की, कश्यप जेव्हा श्रीगिरीया येथे आला तेव्हा त्याला भिंतींवरील स्त्रियांची चित्रे रंगहीन होत असल्याचे आढळले. तसे असेल तर ती चित्रे कश्यपाने पुन्हा रंगवून घेतली असण्याचा संभव दाट आहे.
अशा अनेक गोष्टी श्रीलंकेत पाहायला आणि ऐकायला मिळतात. अर्थात या सर्व गोष्टींचे व शोधांचे वैज्ञानिक परीक्षण करून घेणे आवश्यक आहे, हे नक्की…!!
– डॉ. सच्चिदानंद शेवडे