कला वैश्‍विक असते, कलावंत नव्हे!

0
1723

विश्‍वसंचार
गेल्या आठवड्यातल्या ‘विश्‍वसंचार’च्या स्तंभातून मी पाकिस्तानी कलावंत आणि त्यांना भारतीय कलाक्षेत्रात दिला जाणारा वाव, प्रतिसाद याबद्दल लिहिलं होतं. बर्‍याच वाचकांनी दूरध्वनीवरून किंवा प्रत्यक्ष भेटून आपापली मतं सांगितली. सगळ्यांच्या बोलण्याचा गोषवारा असा की, मुळात हा विषय सुरू झाला, तो पाकिस्तानी नट किंवा नट्या यांना भारतीय निर्माते, दिग्दर्शक यांनी आपल्या चित्रपटात किंवा दूरदर्शन मालिकांमध्ये काम करायला बोलवावं का, यावरून. तर सर्वसाधारणपणे सर्वांना (म्हणजे माझ्याशी बोललेल्या) असं वाटतं की, आपल्याकडे एकाहून एक सरस असे नट आणि नट्या होत्या नि आहेत. मलिका-ए-तरन्नूम म्हणून मारे जिचा फार उदो उदो केला जातो, ती गायिका-अभिनेत्री नूरजहॉं पाकिस्तानात स्थलांतरित झाली, हे फार सभ्य भाषेतलं वाक्य झालं. ती मुंबईच्या म्हणजेच भारतातल्या अनेक निर्मात्यांचे पैसे बुडवून पाकिस्तानात पळून गेली, हे जास्त बरोबर वाक्य आहे आणि ती गेली म्हणून ना आमचं चित्रपट क्षेत्र ओस पडलं, ना संगीत क्षेत्र. तिच्यापेक्षा जास्त सुंदर आणि अभिनयसंपन्न अशा नट्यांची आमच्याकडे रांग लागलेली होती आणि पार्श्‍वगायनाच्या क्षेत्रात तर आमच्या लताबाई आणि आशाबाई तेव्हापासून आतापर्यंत सर्वांना व्यापून वर दशांगुळे उरलेल्या आहेत. म्हणजेच भारतीय चित्रपट उद्योगाचं पाकिस्तानी नट-नट्यांवाचून काहीही अडलेलं नाही. मग त्यांना मुद्दाम कशाला बोलवायचं?
शिवाय आत्तापर्यंत ज्या ज्या पाकिस्तानी नट-नट्या भारतीय पडद्यावर येऊन गेल्यात, त्यांची एकंदर कामगिरी ‘दे ऑल्सो रॅन’ एवढ्याच सदरात जमा होणारी आहे.
तरीही भारतीय निर्माते-दिग्दर्शक अधूनमधून पाकिस्तानी नट-नट्यांना बोलावतात. याची कारणं चक्क आर्थिक आहेत. फाळणीपूर्वी कोलकाता आणि मुंबई यांच्याप्रमाणेच लाहोर हे चित्रपट निर्मितीचं एक चांगलं केंद्र होतं. पाकिस्तानच्या जन्मापासून पुढे काही काळ लाहोरला बर्‍यापैकी चित्रपट निर्मिती होत होती. पण पाकिस्तानची शेती, कारखानदारी, अन्य उद्योगधंदे हे जसे हळूहळू डबघाईला आले, तीच गत चित्रपट धंद्याचीही झालेली आहे. त्या मानाने दूरदर्शन मालिका बर्‍याच निघतात. पण त्यात चित्रपटाइतका पैसा मिळत नाही. म्हणून मग हे नट-नट्या भारतीय चित्रपट निर्मात्यांकडे येतात.
आणखी एक गंमत पहा. पाकिस्तानात जीवनाच्या सर्व क्षेत्रांत पंजाबी भाषिक लोक दादागिरी करत असतात. पाकिस्तानी नट-नट्यांना आपल्या चित्रपटात घेणारे भारतीय निर्माते-दिग्दर्शक पंजाबी भाषिकच आहेत. याला म्हणतात पंजाब कनेक्शन! पण भारतीय चित्रपट रसिकांच्या हे लक्षात येऊ नये म्हणून हे निर्माते आपापल्या चमच्या पत्रकारांमार्फत अशी प्रसिद्धी घडवून आणतात की, जणू काही एखादी रंभा-मेनका किंवा साक्षात् नटेश्‍वर स्वर्गातून खाली उतरून भारतीय रसिकांना दर्शन देण्याची मेहेरबानी करत आहे.
नुकतीच प्रियांका चोपडा नावाच्या नटीने या संदर्भात, ‘कला आणि कलावंत यांना देशाची बंधनं नसतात’, अशा आशयाची मुक्ताफळं उधळली. पहा, पुन्हा प्रियांका चोपडा पंजाबीच आहे. अर्थात आपल्याकडचे सगळेच कथित विचारवंत ही ठरावीक पोपटपंची वर्षानुवर्षे करीत असतात. मुसलमानांनी दंगा केला नि टिपून-निवडून हिंदूंची दुकानं, घरं जाळली की, लगेच हे तत्त्वज्ञान सांगणार की, ‘गुंड हे गुंड असतात. त्यांना जात धर्म नसतो.’ प्रियांका चोपडा ही अलीकडच्या काळातली बर्‍यापैकी नटी आहे. हल्ली ती अमेरिकेतच जास्त असते. तिथल्या एका दूरदर्शन मालिकेतली तिची महिला जेम्स बॉंड छापाची भूमिका बरीच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे अर्थातच ती तरंगायला लागलेली आहे. त्यामुळेच तिने वर दिलेली आपल्या मताची एक पिंक थुंकलेली आहे.
ते कसंही असो. पण मला भेटून मत व्यक्त केलेल्या काही अस्सल संगीत रसिकांचं मत विचारात घेण्यासारखं आहे. त्यांचं म्हणणं असं की, ‘पाकिस्तान आपल्याशी वैर करतो म्हणून आपण मेहंदी हसन किंवा गुलाम अली यांचं संगीत न ऐकणं, त्यांच्यावर बहिष्कार घालणं हे अ-सांगीतिक आहे. कलाबाह्य आहे. कला आणि त्यातूनही विशेषत: संगीत कला ही वैश्‍विक आहे. म्हणून कला आणि कलावंत यांच्यावर जात, धर्म, देश राष्ट्र अशी कोणतीही बंधनं घालू नयेत. पाकिस्तान आपल्याशी शत्रुत्व करतो म्हणून आपण गुलाम अलींच्या सुंदर गझला नं ऐकणं हा त्यांच्यावर तर अन्याय आहेच; पण खुद्द आपल्या स्वत:च्या रसिकतेवरही अन्याय आहे.’
मला या संगीत रसिकांचं खरोखरच कौतुक वाटतं. मला असंही वाटतं की जात, धर्म, देश, राष्ट्र या सर्वांच्या पलीकडे जाऊन कलेचं सौंदर्य पहाणं, कलेचा आस्वाद घेणं, हे काम माझे हे मित्र सहजपणे करू शकतात. कारण ते हिंदू आहेत. निखळ कलेचा आस्वाद घेणं हे निरोगी मनच करू शकतं आणि हे निरोगी मन या माझ्या मित्रांना त्यांच्या हिंदू संस्कारांनी, हिंदू परंपरेने जन्मत:च (सध्याच्या भाषेत बाय डीफॉल्ट) दिलेलं आहे. पहा ना! लताबाई अगदी सहजतेने आणि मनापासून नूरजहॉंची जाहीरपणे तारीफ करतात. आशाबाई सहजपणे गुलाम अलींच्या रचना गातात. याच्या उलट घडलेलं कधी ऐकलंय्?
खॉंसाहेब बडे गुलाम अली लाहोरचे पंजाबी मुसलमान होते खरे. पण त्यांच्यावरचे सगळे संस्कार भारतीय रागदारी संगीताचे म्हणजेच हिंदू संगीत परंपरेचे होते म्हणून तर, ‘हा पाकिस्तान आहे. इथे, कौन गली गयो श्याम, म्हणू नका’ हे ऐकल्यावर ते भारतात आले. मेहंदी हसन हे मूळचे राजस्थानी मुसलमान. झुनझुनू जिल्ह्यातल्या लुना गावातलं त्यांचं घराणं. तब्बल सोळा पिढ्यांपासून धृपदिये कलावंत म्हणून प्रसिद्ध होते. मेहंदी हसन पाकिस्तानात गेल्यावर त्यांना फार हालात दिवस काढावे लागले. १९६४ साली एका चित्रपटगीताने त्यांचं नशीब पालटलं. शहेनशाह-ए-गझल म्हणून त्यांना अतोनात प्रसिद्धी मिळाली. गुलाम अली हे पंजाबमधल्या सियालकोट जिल्ह्यातल्या कालेनी गावचे. खॉंसाहेब बडे गुलाम अलींची तालीम त्यांना काही काळ मिळाली. त्यामुळे आजही ते स्वत:ला कुसूर-पतियाळा घराण्याचे गायक म्हणवतात. मेहंदी हसन २०१२ साली मरण पावले. गुलाम अली आजही कार्यरत आहेत. खॉंसाहेब बडे गुलाम अली, ‘कौन गली गयो श्याम’, नि:शंकपणे म्हणू शकत होते ते कुठे? तर भारतात! प्रख्यात पार्श्‍वगायक मोहंमद रफी ‘मुझे अपनी शरण में ले लो राम’ हे भावोत्कट गीत तल्लीनतेने गाऊ शकत होता ते कुठे? तर भारतात! मेहंदी हसन किंवा गुलाम अली यांच्या गाण्यात चुकूनही असे उल्लेख येत नाहीत. येऊ शकतही नाहीत. बडे गुलाम अलींप्रमाणे कायमचं भारतात येण्याची हिंमत त्यांच्यात नाही. मग, कला आणि कलावंत यांना देश, राष्ट्र अशी बंधनं नसतात, हे फक्त शब्दांचे बुडबुडे नाहीत का?
आधुनिक काळात राष्ट्र, राष्ट्रवाद इत्यादी संकल्पना युरोपात निर्माण झाल्या असं हल्लीचे राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणतात. ठीक आहे. मग आता युरोपात काय घडलं ते पहा.
पॅरिस ही युरोपची सांस्कृतिक राजधानी होती नि आजही आहे. संगीत, नाट्य, नृत्य, चित्र, साहित्य यांच्याशी संबंधित असे असंख्य कार्यक्रम पॅरिसमध्ये एकाच वेळी चालू असतात. मोझार्ट, बीथोव्हन, बाख, शूमान आणि वॅग्नर हे सगळे जण १८ व्या नि १९ व्या शतकातले महान संगीतकार होते. त्यांच्या संगीताची मोहिनी युरोपीय जनमानसावर अगदी आजही आहे. हे सगळेच्या सगळे जर्मन होते. पण पॅरिसच्या संगीत विश्‍वावर त्यांचंच राज्य होतं.
१९१४ साली जर्मनीने फ्रान्सवर आक्रमण केलं. महायुद्ध पेटलं. जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात तुंबळ युद्ध पेटलं आणि फ्रेंच जनतेचं, विद्वान टीकाकर, रसिक, स्तंभलेखक यांचं मन बदलू लागलं. युद्धाच्या सुरवातीला, ‘वॅग्नर जर्मन होता म्हणून त्याच्या रचनांवर बहिष्कार टाकणं हे कलाबाह्य आहे,’ असं म्हणणारे स्तंभलेखक नंतर आग्रहाने म्हणू लागले की, ‘कलेला एकच एक मातृभूमी नसेल कदाचित; पण कलावंतांना असते!’ रणांगणावर फ्रान्स जर्मनीकडून मार खाऊ लागल्यावर तर हे लेखक म्हणू लागले, ‘‘आम्ही फ्रान्सचे रहिवासी आहोत. आम्हाला सारं काही फ्रेंचच हवं. जे जे ‘मेड इन जर्मनी’ असेल ते फेकून द्या.’’ मला वाटतं, ‘समझनेवाले को इशारा काफी है!’
– मल्हार कृष्ण गोखले