लष्कराला कमी लेखू नका

0
130

रविवारची पत्रे
भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केल्यानंतर त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईकचे वेगवेगळे अर्थ काढून फालतू राजकारणी, काही मस्तवाल कलावंत व काही अर्धवट शहाण्यांनी आपली अक्कल पाजळली आहे. या अक्कल पाजळण्याच्या कार्यक्रमात उरीमधील आपल्या मर्द व शहीद जवानांनाही ते विसरले. ही अत्यंत खेदाची व लाजिरवाणी बाब आहे. आता एका भारतीय सिनेमात काही पाकिस्तानी कलाकार असल्यामुळे तो चित्रपट भारतात दाखविण्यात यावा किंवा नाही यावर राजकीय नेते, काही भारतीय चित्रपट कलावंत आपले मत प्रदर्शित करीत आहेत. यात अप्रत्यक्षपणे भारतीय लष्कराचाही अपमान होत आहे. देशहितापुढे अशा फालतू सिनेमावर चर्चा करणे विघातक आहे. कलाकार कोणत्याही देशाचा असो त्याबद्दल आकस असू नये. परंतु देशापेक्षा कुणीच मोठा नाही याची जाण ठेवून हा चित्रपट भारतात दाखवू नये. ज्या निर्मात्यांनी यासाठी पैसा खर्च केला त्यांची अक्कल तेव्हा पाकिस्तानात गहाण होती असं समजून त्यांना भरपाईसुद्धा देऊ नये. या देशातील भगतसिंगांसारख्या शूरवीर व देशभक्तांनी यासाठीच बलिदान केले होते काय?
प्रसिद्धीसाठी हपापलेले काही राजनेते तर आता या सिनेमासाठी सौदेबाजी करीत आहेत. लष्करासाठी ५ कोटी रुपये मागून या देशातील सैनिकांचा अपमान करीत आहेत. भारतीय लष्कराचे बजेटच जेथे हजारो कोटी आहे तेथे ५ कोटीला किती किंमत असणार. अनेक वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी या गोष्टीचा धिक्कार करून नाराजी व्यक्त केली आहे. लष्कराच्या अनेक गोष्टी गोपनीय असतात. त्या उघड करणे व लष्कराला टीकेचे लक्ष करणे देशाच्या संरक्षणासाठी घातक सिद्ध होऊ शकते. अशा रीतीने कुणीही व्यक्ती मग तो कितीही मोठा असो, विक्षिप्त वक्तव्य करीत असेल, तर त्याला आता लष्करानेच समज देण्याची वेळ आली आहे.
साहेबराव घोगरे
८१४९८७४०४६

चंद्रशेखर टिळक यांचा लेख
‘बहुरूप्याचे राजेपण’ हा चंद्रशेखर टिळक यांचा २३ ऑक्टोबरच्या ‘आसमंत’ पुरवणीतील लेख वाचला. मनाला खूप भावला आहे. लेखावरून लक्षात आले की, ‘गजानन विजय ग्रंथाची तुम्ही (भक्तांनी) जेवढी पारायणे कराल तेवढा भक्तांना त्यातल्या ओव्यांचा वेगळाच प्रत्यय येतो. गजानन महाराजांच्या लीला त्यात आलेल्या आहेत.’ स्वत: महाराज फार मोजक्याच शब्दात बोलत, असा उल्लेख वाचण्यात आला आहे. ‘महाराजांच्या लीला’ लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य ‘दासगणू महाराजांनी’ केलेले आहे. संस्थानजवळ उपलब्ध असलेली माहिती त्यांनी दासगणू महाराजांना दिली. दासगणू महाराजांनासुद्धा अलौकिक शक्तीचा वरदहस्त होताच. दासगणू महाराजांनी हा ग्रंथ सुंदर, ओघवत्या भाषेत लिहलेला आहे. महाराजांच्या लीला पुढच्या सर्व पिढ्यांना पोहोचविण्याचे कार्य या ग्रंथानी केलेले आहे. रसाळ ओव्या आहेत. महाराजांच्या प्रत्येक लीला, कृतीचे वर्णन केलेले आहे. त्यांची शैली अवर्णनीय आहे. प्रत्येक ओवी, त्यातले शब्द कसे नेटके आहेत. शब्द सरळ वाटतात. पण हळूहळू त्यातला गूढार्थ कळतो. तो फार वेगळा आहे. अनेक पारायणे करावी लागतात. श्रद्धेनी केले पाहिजे. श्रद्धाच मनुष्याला बळ देत असते आणि हा ग्रंथ श्रद्धेने वाचला तर तुम्हाला नक्कीच बळ मिळते.
चंद्रशेखर टिळक यांनी त्यांना जो विषय त्यात गवसला त्यांच्याकरिता त्यांना योग्य वाटलेल्या ओव्या त्यांनी निवडल्या आहेत. योग्य आहेत. म्हणूनच म्हणता येईल.
‘मन सदा आशाळभूत| ते ना कदा स्थिर होते
नाना विकल्प मनांत| येऊ लागती वरच्यावरी’
हेच सत्य आहे.
अंजली पळणीटकर
नागपूर

शहीदांना मानवंदना
३० ऑक्टो.च्या तरुण भारतमध्ये अंजी येथे शहीदांना मानवंदना अशी बातमी वाचली. अंजी नृसिंह यवतमाळ जिल्ह्यातील दोन हजार वस्तीचे खेडे. परंतु पू. डॉक्टर हेडगेवार यांचे काळात सुरू झालेली रा. स्व. संघाची शाखा आणि त्यात सर्वच नागरिक संघ स्वयंसेवक प्रौढ, तरुण, बाल किशोर, शिशु भरगच्च, खेळ, कथा, गीत यातून तयार होणारे वातावरण याच मुशीतून तयार झालेले अंजीचे सुपुत्र सीआरपीएफ जवान शहीद गुलाब तिमाजी रणदिवे देशभक्त भारत मातेच्या संरक्षणासाठी सैन्यात दाखल झाला. अत्यंत चपळ, भीमकाय शरीराचा, व्यायाम करणारा, पौरुषसंपन्न, निधड्या छातीचा, नेहमी चेहर्‍यावर हास्य, सर्वांशी मस्ती करणारा, सर्वांचा आवडता. १९९७ मध्ये श्रीनगर येथे त्याचे शत्रूशी लढताना बलिदान झाले. अंजीला शिरताना त्याचे भव्य चित्र पाहून बर्‍याच आठवणी येतात. अशा पुत्रांना जन्म देणारी धन्य आहे भारत माता!
सुरेश चोपडे
लक्ष्मीनगर, यवतमाळ

लोकशाहीचा गैरवापर
नवी मुंबई महापालिकेतील उच्चशिक्षित प्रामाणिक, नियमाप्रमाणे काम करणारे, आपल्या अधिकाराचा योग्य वापर करणारे, प्रशासनाला शिस्त लावणारे, पैशाची उधळपट्टी थांबवणारे अशा प्रशासकीय आयुक्तांवर अविश्‍वासाचा ठराव लोकशाहीच्या नावाखाली बहुमताने मंजूर करून घेतला ही एक लोकशाहीतील जनतेवर अन्याय करणारी घटनाच म्हणावी लागेल. नगरसेवकांचे मनमानी कारभार चालवून घेणारे आयुक्त व भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करणारे प्रशासकीय आयुक्तच यांना हवे आहेत काय?
जनतेला जर नगरसेवकांविरुद्धच अविश्‍वास ठराव आणावयाचा असल्यास त्यांनी कुठल्या शासकीय महासभेत तो ठराव आणावा? कायद्यात तशी तरतूद आहे का? नागरिकांवर हा घोर अन्याय झालेला आहे. लोकशाहीतील ही पहिलीच जनतेवर अन्याय करणारी घटना म्हणावी लागेल. जनतेला पाच वर्षांत फक्त एकदाच त्यांना निवडून द्यायची संधी मिळते व त्यावेळेस उमेदवार प्रामाणिक आहे की भ्रष्टाचाराला बळी पडणारा आहे याचा जनतेला अनुभव नसतो. पाच वर्षानंतर त्याचं खरं रूप समोर येतं. एकदा निवडून आल्यावर मात्र नगरसेवकांना हिरव्यागार कुरणात पाच वर्षे मनसोक्त चरण्याची सुवर्णसंधी मिळते व त्याचा ते पुरेपूर लाभ करून घेतात. नगरसेवक हे जनतेचे सच्चे व प्रामाणिक प्रतिनिधी असतील, तर महापालिकेतील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, ठेकेदारांचे संबंधित अधिकार्‍यांशी असलेले साटेलोटे या कुठल्याही गोष्टी होऊच शकणार नाहीत. जनतेचे प्रतिनिधी असूनही जनतेला तक्रारी व आंदोलने करण्याची गरज का पडावी? त्यांच्या छुप्या सहकाराशिवाय असले प्रकार होऊ शकणार नाहीत. जनतेने जनतेकरिता निवडून दिलेल्या नगरसेवकच जर जनतेला लुटू लागले तर ही लोकशाहीची घोर विटंबनाच नाही का?
बहुमताच्या आधारावर असा ठराव पारित करून घेणे या गलिच्छ कृतीबद्दल या नगरसेवकांना धान्यातील खड्याप्रमाणे पुढील निवडणुकीत वेचून बाहेर फेकणे हा एकच पर्याय जनतेसमोर सध्यातरी उपलब्ध आहे.
श्री. रा. ज. महाबळ
९००४४७८०६२

योगानंद काळे यांचा कृषी विषयावरील लेख
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ६९ वर्षांत शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. ग्रामीण अर्थव्यवस्था जोवर सबळ होत नाही, तोवर देशाच्या प्रगतीत पूर्णत्व आले असे म्हणता येणार नाही. गेल्या ६९ वर्षांत एका कुटुंबात असलेले शेतीचे क्षेत्रफळ त्यांच्यातील झालेल्या वाटण्यांमुळे फारच कमी झाले म्हणजे दोन ते अडीच-तीन एकरापर्यंत आले व अशांची संख्या अंदाजे ७० टक्यांच्या वर आहे. अशा शेतकर्‍यांना त्यांचे दैनंदिन खर्चच भागविणे शक्य होत नाही, यामुळे घेतलेली कर्जे ते फेडू शकत नाहीत, परिणामी माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुलेंच्या काळात कर्जमाफीला सुरुवात झाली व आता ‘कर्ज घ्या पण फेडण्याची गरज नाही’ अशी मानसिकता झाली. जिल्हा सहकारी बँका ३५ पैकी ३० बंद पडल्यात. मूळ अडचण, एकत्र कुटुंबाला त्याच्याकडे असलेल्या अल्पशा शेतीवर त्याचे नीजी खर्चच भागविता येत नाहीत, ही आहे. शेतकरी प्रामाणिक असूनही त्याचा नाइलाज आहे. हा मुद्दा लक्षात घेऊनच विचार करणे आवश्यक आहे.
शेतकर्‍याला खर्चावर आधारित भाव नाही व त्याला लागणारे खतापासून तर फवारणीपर्यंत सर्वच महाग आहेत. पूर्वी घरचेच बी-बियाणे, खते असत, आता ते नाही. शेतीकरिता लागणार्‍या मजुरांचे भाव वाढले आहेत. अशा परिस्थितीत शासनाची जी रोजगार हमी योजना १०० दिवसांची आहे ती १५० दिवसांची करून शेतकर्‍यांच्या शेतीत राबवावी व त्याची शेतमजुरी, संबंधित शेतकरी व ग्रामपंचायतच्या दाखल्यावर देण्याची व्यवस्था व्हावी, म्हणजे शेतकर्‍याचा मजुरीचा खर्च वाचेल व रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे वाटते.
१५० दिवसांची रोजगार हमी योजना केल्यास शेतकर्‍यांचा मजुरीवरील जवळजवळ सर्वच खर्च वाचेल. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाचा दूरदृष्टीचा अभाव असल्यामुळे, जनतेत अत्यल्प काम नि जास्तीत जास्त मोबदला, ही प्रवृत्ती निर्माण झाली असून आळशी झालेत, म्हणून अति कष्टाचे शेतीतील कामाकडे न वळता, शासकीय हलक्याफुलक्या कामाकडे मजूर वळलेत, त्याला आळा बसेल. यावर अवश्य विचार व्हावा, असे वाटते.
सामूहिक शेती हासुद्धा एक पर्याय आहे, जो सांगली जिल्ह्यात कांबळे यांनी अथक परिश्रमाने राबविला असून, शेतकर्‍याला त्याच्या मालकीहक्कानुसार वाटा दिला जातो, तो शेतकर्‍याला वैयक्तिक शेती करीत होता, त्याच्या दुप्पट मिळतो. ही माहिती सहकार भारतीद्वारे आहे.
डॉ. श्रीधर ह. जोशी
८२७५०४५१५४

नोटा आणि भक्तगण
पैशांनी ईश्‍वरी कृपा एखाद्या ‘कमोडिटी’ सारखी विकत घेता येते याचा वरील प्रकार एक झकास नमुना आहे. असे खुळचट समज समाजात पद्धतशीरपणे रुजवण्याचे विकृत प्रयत्न धनवंतांकडून पद्धतशीरपणे होणं हे आपल्याकडचं एक भयाण अर्थशास्त्रीय वास्तव आहे! विशेष म्हणजे धनिकांनी ते प्रयत्नपूर्वक रूढावलं आहे. काळाच्या ओघात ते समाजाच्या तळागाळापर्यंत झरून लहान-मोठ्या सार्‍या देवळांना पुण्याच्या दुकानाचं स्वरूप आल्याचं आपण अनुभवतोय्! चार का होईना नाणी व नोटा सरकारी कचेरीप्रमाणे सरकवल्याशिवाय देवदर्शन होऊच नये अशी ही चलाख करामत आहे! तिरुपतीसारख्या श्रीमंती देवळात तर म्हणे अधिक पैसे दिल्यास लांब रांग मोडून लगेच दर्शन मिळण्याची खाशी अशी अधिकृत सोय आहे! आपल्याकडे तर राजकारणातही हे लोण पोचलेलं आहे. जबर दक्षिणेचं आश्‍वासन देऊन निवडणूक जिंकण्यासाठी नवस बोलले जातात. यात ती जिंकल्यास लक्ष्मी प्रसन्न होते हा बहुतेकांचा अनुभव आहे. यातून पुढं ज्यांच्या अंगावर धड कपडे नाहीत अशा नेत्यांच्या पाची बोटांत अंगठ्या आणि गळ्यात सोनसाखळ्या झळकताना दिसतात, ही वस्तुस्थितीही आहे. म्हणूनच जिथं सरस्वती-पूजनाला चार लोक मिळत नाहीत तिथे लक्ष्मीपूजन सर्वाधिक धडाक्यानं होणं हा केवळ योगायोग मानता येत नाही!
वरील विकृतीचं मूळ कारण म्हणजे धार्मिकतेसारख्या पवित्र भावनेवर दांभिकतेनं केलेलं आक्रमण. मानवी इतिहास पाहता दिसून येतं की साधेपणा आणि संयम या नैतिक पायावरच सर्व धर्मांची उभारणी झाली आहे. याचा पुरावा म्हणजे कुठल्याही धर्माचे प्रेषित, साधू संत आणि आध्यात्मिक विचारवंत लक्ष्मीपती नव्हते. गौतम तर सत्ता, संपत्ती आदींचा त्याग करण्यातून इतिहासात बुद्ध म्हणून अमर झाले. पुन्हा केवळ गर्भश्रीमंत म्हणून कुणाची इतिहासात नोंद झाल्याचं उदाहरणही नाही! असे असताना संपत्तीला ‘माया’ म्हणजे मित्थ्या वा भास मानणार्‍या हिंदू धर्माचे बहुसंख्य चाहते वास्तवात पराकोटीचे पैशाचे लोभी व स्वार्थी असावेत हा चक्क विनोद आहे! तसं पाहता स्वतःला महान मानणार्‍या प्रत्येक धर्मात राजकारणाप्रमाणे सिद्धांत आणि व्यवहार यांच्यात महान विसंगती आढळतात. सारे मानव ईश्‍वराची लेकरं आहेत म्हणणार्‍या ख्रिस्ती धर्मात काळ्या गोर्‍यांसाठी वेगळी चर्चेस असावीत, आणि ‘सर्वा भूती परमेश्‍वर’ हे परमोच्च अध्यात्म सांगणार्‍या हिंदूंना गाईसारख्या पशूत आणि तिच्या शेणात देव दिसावा पण तो बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवात दिसू नये, याला काय म्हणावे?
मनोहर सप्रे
चंद्रपूर

मळमळ बाहेर पडलीच
महाराष्ट्रात शेटजी-भटजीचे राज्य आले. भाजपातील भटजी सत्तेत, बहुजन अडगळीत अशा प्रकारे वक्तव्य करून अजित पवार यांनी आपली मळमळ बाहेर काढलीच. काही थोडा कालावधी वगळता महाराष्ट्रात मराठ्यांचेच राज्य होते. बहुतेक मुख्यमंत्री मराठा किंवा बहुजन समाजाचे होते. त्यामुळे महाराष्ट्रावर सत्ता गाजवण्याचा अधिकार फक्त त्यांनाच असून इतर समाजातील लोकांना तो असू नये, अशी बहुधा धारणा असावी. पुरोगामी महाराष्ट्रात आणि लोकशाही व्यवस्थेत ही भाषा पवारांना शोभत नाही. इतरांना जातीयवादी म्हणायचे आणि स्वत: जातीचे राजकारण करायचे ही परंपरा कॉंग्रेसवाले पाळत आले आहेत. लोकशाहीत जातीयवाद फारच बोकाळला आहे. कारण निवडणुका जातिवादावरच अवलंबून असतात. एकसंध भारत देश फक्त बोलण्याची भाषा असून सर्व राजकारण जाती-जमातीवर चालत असते. यावेळी भटजी मुख्यमंत्री झाले ते लोकशाही मार्गानेच; जनतेने निवडून दिलेले ते लोकप्रतिनिधी आहेत. स्वच्छ, प्रामाणिक कर्तव्यदक्ष अशी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभली त्याचे कौतुक सोडून केवळ जातीचा आधार घेऊन त्यांना अपमानित करणे हे योग्य नाही. ज्यांनी अनेक वर्षे राज्य केले त्यांनी भ्रष्टाचाराशिवाय महाराष्ट्राचे कोणते भले केले याचे आत्मपरीक्षण करावे. महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्माचा आदर करावा एवढेच.
पु. प्र. चन्ने
९८८१३९९८२३