वर्धेतील सौंदर्यीकरणासाठी सचिनकडून २५ लाख

0
94

जिप सदस्य अविनाश देव यांना यश
तभा वृत्तसेवा
वर्धा, ८ नोव्हेंबर
वर्धेच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने हात सैल केले असताना स्थानिक लोकप्रतिनिधीही त्यात मागे नाहीत. शहरानजीक असलेल्या पिपरी (मेघे) जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य अविनाश देव यांनी प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना हनुमान टेकडी परिसराच्या सौंंदर्यीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी मागितला होता. सचिन तेंडुलकर यांनी आपल्या खासदार निधीतून २५ लाखांचा निधी जाहीर केला आहे. त्या संदर्भातले पत्र जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सोमवार ७ रोजी प्राप्त झाले.
राज्य सरकारने सेवाग्राम विकास आराखडा तयार केला. त्यात वर्धेचा विकास अपेक्षित आहे. परंतु, शहराला लागून असलेल्या ग्रामपंचायतचा विकास करण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे कर्तव्य समजून जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश देव यांनी आपल्या पिपरी (मेघे) मतदार संघातील हनुमान टेकडीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार केला. दरम्यान, कर्नाटकात आणि औरंगाबाद येथे आपल्या खासदार निधीतून सुविधा निर्माण करून देत असलेले सचिन तेंडुलकर यांच्यासोबत एप्रिल महिन्यात पिपरी (मेघे) येथील हनुमान टेकडीचे सौंंदर्यीकरण करण्यासाठी ५० लाख रुपयांचा खासदार निधी देण्यात यावा, यासाठी पत्रव्यवहार केला. त्यानंतर मे महिन्यात खा. सचिन तेंडुलकर यांचे स्वीय सहायक नारायणम् यांच्यासोबत अविनाश देव यांची चर्चा झाली. त्यानंतर सोमवार, ७ रोजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना पिपरी (मेघे) येथील हनुमान टेकडीच्या सौंंदर्यीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याचे पत्र खुद्द सचिन तेंडुलकर यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाले आहे.
या संदर्भात अविनाश देव यांच्यासोबत चर्चा केली असता ते म्हणाले की, हनुमानटेकडीचे सौंदर्यीकरण हा आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हनुमान टेकडीचे केवळ सौंंदर्यीकरणच होणार नसून त्या ठिकाणी उद्यान, मेडिटेशन सेंटर, योगकेंद्र, ओपन एअर जिम, आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी २ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून मोठ्या रकमेचे काम असल्याने खा. तेंडुलकर यांच्याकडे ५० लाख रुपयांचा निधी मागितला होता. त्यातील पहिला टप्पा त्यांनी २५ लाखांचा दिला असून उर्वरित निधीही ते देतील, असा
विश्‍वास अविनाश देव यांनी व्यक्त केला.