रविवारची पत्रे

0
117

मला काय त्याचे…
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी जी ग्रंथसंपदा निर्माण केली त्यातील एक आहे- ‘मला काय त्याचे!’ देशात आपल्या अवतीभवती काय घटना घडत आहेत, याबाबत अनभिज्ञ असणे किंवा अनभिज्ञता दाखविणे राष्ट्राला संकटात टाकू शकते, असा संदेश या ग्रंथातून स्वातंत्र्यवीरांनी दिला आहे.
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे, भारत सरकारचा ५०० व १००० रुपये मूल्यांच्या चलनी नोटा रद्द करण्याचा निर्णय! सरकारने याबाबत बराच खोलवर विचार करून उपाययोजना केल्या आहेत. परंतु, सर्व काही सरकारनेच करावे, असा आपला (गैर)समज असेल, तर आपणही आपले योगदान कशा पद्धतीने देऊ शकतो, याबाबत विचार करू शकतो.
केंद्र सरकारच्या भूपृष्ठ वाहतूक खात्याने ११ नोव्हेंबर रोजीच्या रात्री १२ पर्यंत टोलमाफीचा निर्णय घेऊन एक सकारात्मक पाऊल उचलले. गतिशील महाराष्ट्र सरकारनेही याच कालावधीकरिता टोलमाफी तर दिलीच, त्या शिवाय केंद्र सरकारसोबतच्या दृढ संबंधाचा वापर करीत, वीज कंपन्या व स्थानिक स्वराज्य संस्था यांचे देयक भरणा करण्याकरिता जुन्या नोटा चालतील, असे जाहीर करून दिलासा दिला. या निमित्ताने करसंकलन भरघोस होत आहे, हा अधिकचा फायदा आहे.
आता तुमच्या-माझ्यासारख्या नागरिकांनी नेमके काय करावे, याकडे वळू या. नोटा बदलविण्याकरिता ३० डिसेंबरपर्यंत मुदत असल्याने काही दिवस थांबून बँकेत जाणे रास्त राहील. आता या नोटा बदलून देण्यासाठी सरकारने कितीही प्रयत्न केले, तरी सर्व सुरळीत होण्यास किमान दोन आठवडे कालावधी लागू शकतो. आपण दिलासा देण्याचे काम करणे, हीच देशाला मदत ठरणार आहे. समजा तुम्ही अशा प्रकारे दहा हजार रुपयांपर्यंत मदत केली तर काही आयकर खात्याचे लोक तुमच्या घरी येणार नाहीत. यामुळे बँक, पोस्ट इ. ठिकाणी उसळणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तुम्ही साहाय्यभूत होणार आहात.
देशाच्या रक्षणाकरिता सीमेवरचा जवान अवजड बंदूक खांद्याला लटकवून आणि तळहाती शिर घेऊन देशसेवा करतो आहे. तुलनेने आपले काम खूपच सोपे आहे. मी माझी रक्कम काही दिवसांनी बँकेतून घेईन, तोपर्यंत इतरांना मदत करीन, या भावनेची आज जास्त गरज आहे.
हेमंत कद्रे
९४२२२१५३४३
आदिवासींना अच्छे दिन केव्हा येणार?
राज्यात आदिवासींच्या कल्याणासाठी सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करीत असते. पण, विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत न पोहोचणे ही शरमेची बाब आहे. आता तर आश्रमशाळांमधील मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. गेल्या दहा वर्षांत आदिवासी आश्रमशाळांमधील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. राजकीय कुरघोड्या आणि सत्तेच्या साठमारीत गुंतलेले राज्यकर्ते आणि बेलगाम झालेले प्रशासन यांच्या असंवेदनशीलतेमुळे आश्रमशाळांना वाईट दिवस आले आहेत. राज्यात जवळपास अकराशे आदिवासी आश्रमशाळा आहेत. यात अर्ध्याहून अधिक आश्रमशाळांमध्ये महिला अधीक्षकाची पदे रिक्त आहेत. या आश्रमशाळांमध्ये अत्यंत निकृष्ट वस्तूंचा पुरवठा होतो. आदिवासी विकास विभाग भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळखला जातो. हा विभाग मंत्री नव्हे, तर ठेकेदार चालवतात, हे वास्तव आहे. या सर्व बाबींची न्यायालयीन आयोग नेमून चौकशी व्हायला हवी.
राज्य सरकारने आपल्या दोन वर्षांच्या कारभाराचा ताळेबंद मांडला पाहिजे. आदिवासी, आरोग्य, महिला-बालकल्याण, सामाजिक न्याय, ग्रामविकास, पाणीपुरवठा, कृषी-अन्न आणि नागरी पुरवठा, शिक्षण आदी खाती नगर विकास, उद्योग आदी खात्यांप्रमाणेच महत्त्वाची आहेत किंबहुना सामान्य माणसांचा या विभागाशी सर्वाधिक संबंध येतो आणि ही खातीच सरकारची प्रतिमा तयार करत असतात. त्यामुळे सरकारने या खात्यांचे विशेष सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. याकरिता गरीब आदिवासींच्या समस्यांकडे सरकारने अधिक गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
प्रा मधुकर चुटे
नागपूर
अवघा उ.प्र. यादव कुटुंबाच्या वेठीला!
उत्तरप्रदेश भारतातील सर्वात मोठे राज्य. याच राज्यात सर्वाधिक आमदार, खासदार आहेत. आतापावेतो सर्वात जास्त व अत्यंत कर्तबगार प्रधानमंत्रीसुद्धा याच प्रदेशाने दिले. प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी, चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर त्यापैकीच. सध्या उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षात दुफळी माजली आहे. किंबहुना या पक्षात म्हण्ण्यापेक्षा एका राज्यकर्त्या घराण्यातील हे सगळे नाटक आहे. आज भांडायचे, उद्या एक व्हायचे व संपूर्ण प्रदेशातील जनसामान्यांना मूर्ख बनवायचे, असा हा धंदा आहे. समाजवादी पक्षाचे व सरकारचेही सध्याचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव हे स्वतःला गुरुस्थानी समजतात. मुलायमसिंह खरेतर लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे भरवशाचे अनुयायी. यापूर्वी त्यांनी लोकनायकांना इमानेइतबारे साथ केली. आज मात्र ते सत्तांध झाले आहेत.
एका सर्वेनुसार त्यांच्या कुटुंबातील अत्यंत निकटच्या नातेवाईकातील किमान १५ पेक्षा जास्त लोक आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांसारख्या उच्चपदी विराजमान आहेत. यात स्वतः मुलायमसिंह, त्यांचे पुत्र, सख्खे बंधू, चुलतबंधू, स्नुषा इत्यादींचा समावेश आहे. त्यांचे राजकारणातील घरगुती भांडण मीडियाने एवढे डोक्यावर घेतले आहे की, जसे उत्तरप्रदेशातील सर्वच प्रश्‍न व समस्या निकाली निघाल्यात! आता तेथे कोणतीही करण्यासारखी गोष्ट उरली नाही. तसेच त्या पूर्ण प्रदेशात दुसरेतिसरे कुणी नसून एकच यादव कुटुंब राहते. त्या संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक जण काहीतरी वेडगळ बोलतो आणि ते प्रसारित केले जाते. ज्या प्रदेशात विद्वान, विचारवंत, त्यागी माणसं जन्माला आली तेथे आता दादागिरीचे, जातिपातीचे राजकारण सुरू आहे. ही बाब केवळ उत्तरप्रदेशासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी घातक व लाजिरवाणी आहे. याचा सारासार विचार करून उत्तरप्रदेशवासीयांनी येणार्‍या निवडणुकांमध्ये सुजाण व सुज्ञ लोकप्रतिनिधींना निवडून दिले पाहिजे.
साहेबराव घोगरे
८१४९८७४०४६
मुलांचे मासिक दिवाळी अंक
‘मुलांचे मासिक’ यंदा नव्वदाव्या वर्षात पर्दापण करीत आहे आणि त्या निमित्ताने यंदाचा दिवाळी अंक बालवाचकांसाठी आगळावेगळा सादर केला आहे. अंकाच्या मुखपृष्ठावर ‘आजीपासून नातवांपर्यंत सतत ९० वर्षे संस्काराचा अमूल्य ठेवा’ असे संपादकांनी लिहिले असले, तरी पणजोबा-पणजीपासून तो पणती-पणतूपर्यंत हे मासिक वाचनात आले आहे, असे नागपुरातील ज्येष्ठ मंडळी सांगत असतात.
यंदा दिवाळी अंकासाठी ‘मी असा घडलो’ हा विषय घेण्यात आला आहे. त्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, निवृत्त महासंचालक प्रवीण दीक्षित, एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर आणि अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी त्यांच्या मुलाखतीतून अनुभव, इच्छाशक्ती, परिश्रम, आत्मविश्‍वास आणि मातृभूमीवरील प्रेम हे गुण अंगी असल्यास जीवनात कुठल्याही क्षेत्रात यश मिळते, हा प्रेरणादायी संदेश मुलांना दिला आहे. मुलाखती वाचनीय आहेत.
या शिवाय मुक्ता केणेकर, धनश्री हळबे, भालचंद्र देशपांडे, अशोक मोटे, अशोक पाटील, मंगला दिघे इत्यादी लेखकांच्या कथा, कविता, ज्ञानरंजन, विविधा, ‘डुकडुक बाजा उतरला राजा’तील गमतीदार विनोद आणि जयवंत काकडे यांची व्यंग्यचित्रे इत्यादी साहित्याने नटलेला संपूर्ण रंगीत छपाईचा हा पहिला दिवाळी अंक प्रत्येक आजोबा-आजीने आपल्या नातवांचा भेट म्हणून द्यावा असाच आहे.
सई आनंद देशपांडे
नागपूर
राजकारणातील दुर्गंध
भारतीय जनता पक्षाशी, भगवंतरूपी विराट जनतेने हात मिळवून मधले ८-१० वर्षे सोडल्यास, जवळजवळ ५७ वर्ष सत्तेवर लोळत पडलेल्या दूरदृष्टिहीन कॉंग्रेसला सत्तेबाहेर फेकले. त्यामुळे सत्तेची सवय जडलेले दिशाहीन झालेत व पाण्यावीन मासोळी जशी तडफडते तशी त्यांची अवस्था झाली. राजकारणात कसे वागावे ते या सत्तेच्या आश्रयाने बनलेल्या अब्जाधीशांना समजेनासे झाले.
स्वातंत्र्यपूर्व आंदोलनात सर्वच विचारांनी जनता सहभागी होती, हे विसरून तेव्हा तुम्ही कुठे होता? हा प्रश्‍न कॉंग्रेस इतरांना विचारू लागली, पण आपणही त्यात नव्हतो, हे विद्यमान पुढारी विसरलेत, जे होते त्यातील नगण्यच हयात आहेत- ज्यांची कदर नाही, केली जात नाही. चर्चिलने स्वातंत्र्य मिळते वेळी, हे लोक राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत, असे म्हटले होते, ते खरे ठरले. मिळालेले भूमी क्षेत्रफळसुद्धा घटले नि जनतेला या देशातील फक्त ‘हवाच’ आपल्याकरिता भ्रष्टमुक्त वाटली. जो आज भारत दिसतो तो सरदार वल्लभभाई पटेलांच्या दूरदृष्टीमुळेच, यात संशय नाही.
रावणाला दहा तोंडे होती, पैकी डावीकडील पाच तमोगुणयुक्त (राग, लोभ, मद, मोह, मत्सर अहंकार) नि उजवीकडील सप्तगुणयुक्त होती तरी प्रभाव तमोगुणांचाच त्याचेवर होता, म्हणून तो संपला. देशातील कॉंग्रेस, समाजवादी, संयुक्त समाजवादी, साम्यवादी, बहुजन समाजवादी पक्ष म्हणजे रावणाची डावीकडील पाच तोंडे आहेत. रावणाचा जसा अंत झाला तसाच जनतारूपी परमेश्‍वर विराट रूप धारण करून यांचा अंत करेल.
बुडत्याचे पाय डोहाकडे म्हणतात तसेच या पक्षांच्या विचारांची पातळी ‘चित भी मेरी पट भी मेरी’ अशी झाली असून, चांगले समजण्याची पातळीच उरली नाही. निकृष्ट अशा तामसी वृत्तीचे असल्याने त्यांची अधोगती आता अटळ आहे.
डॉ. श्री. ह. जोशी
८२७५०४५१५४
‘फसवे फोन कॉल्स’ : माझा अनुभव
३-११ च्या तरुण भारतमध्ये फसव्या फोन कॉल्सबद्दल वाचले. या दिवाळीत माझ्यासोबत घडलेली घटना- बोलणारा स्वच्छ हिंदीत बोलत होता. मी स्टेट बँकेमधून मिश्रा बोलत आहे. बर्‍याच बँक खात्यांसंबंधी हेराफेरी झाली आहे. तुम्ही पेपरमध्ये वाचले असेलच. तुम्हाला सूचित करीत आहो की, कुणी तुमचा पिन नं. किंवा खाते नं. विचारल्यास अजीबात सांगू नका. सध्या आम्ही एटीएम कार्डचे व्हेरिफिकेशन करीत आहोत, त्यासाठी तुम्ही बँकेत या. तत्पूर्वी तुमचा एटीएम नं. जो कार्डवर आहे सांगा. यात गुपित काहीच नाही. तो कुणीही पाहू शकतो म्हणजे मी आपले कार्ड तपासून पाहू शकतो.
मीही दुपारच्या अर्धवट झोपेत होतो किंवा माझा मूर्खपणा म्हणा. त्याच्या जाळ्यात अडकत गेलो. कारण याआधी आलेल्या फोनला मी कधीच प्रतिसाद दिला नाही. तेवढ्यात माझी मुलगी तिथे आली आणि माझा फोन तिने घेतला आणि त्यानंतर काहीच सांगू नका म्हणून बजावले. लगेच आम्ही स्टेट बँक मनीषनगर शाखेत गेलो. तेथील व्यवस्थापकाने हा प्रकार फसवा असल्याचे सांगितले. आम्ही त्वरित एटीएम कार्ड निष्क्रिय केले. घरून बँकेत जाईपर्यंत संबंधित व्यक्ती ओटीपीनंबरसाठी सारखी तगादा लावत राहिली. पण, तो न सांगितल्याने आम्ही बचावलो. बँक व्यवस्थापकाने आम्हाला पूर्ण सहकार्य केले. आम्ही बँकेत जाण्याअगोदर एक जण ७००० रु. गमावून बसला होता. आलेला फोन ०७३६०९७६४८३ होता. त्याचे मूळ पाहिल्यावर तो फक्त ‘बिहार’ नावानेच आवंटित केलेला आढळला. नंतर फोन केल्यावर तो बंद असल्याचे आढळले. यासंबंधी संबंधित यंत्रणेने फोनच्या मुळाचा शोध घेतल्यास बर्‍याच जणांचे होणारे नुकसान टळू शकते. संबंधित व्यक्तीने ९५६५ रु.ची खरेदी केली होती आणि ते पैसे माझ्या खात्यातून जाणार होते.
बँक व्यवस्थापकाने स्पष्ट सांगितले की, आम्ही किंवा कोणतीही बँक तुम्हाला फोनवरून कोणतीच माहिती मागत नाही. काही असल्यास फक्त तुम्हाला बँकेत येण्यासंबंधी सांगू शकतो. त्वरित असा कोणताच व्यवहार नसतो.
अशोक वि. मुलमुले
मनीषनगर, नागपूर
करून टाका राज्याभिषेक एकदाचा!
राहुलबाबाला गादीवर बसविण्याला पुन्हा जोर आला आहे. बसवायचे मनात आले तेव्हाच चटकन हे काम उरकायची मातेची हिंमत होत नव्हती. यावरून पप्पूची लायकी सर्वांनी ओळखलीच आहे. पण, जेव्हा सोनिया मनमोहनसिंगांकरवी १० वर्षे तुफान राज्य करीत होत्या, घोटाळे जोरात चालू होते, कुणाचाच विरोध असा नव्हताच. कुबेर घरी पाणी भरत होता, गांधी परिवार संपत्तीत लोळत होता, तेव्हाच पोराचा राज्याभिषेक व तोही डायरेक्ट पंतप्रधानपदी उरकून घ्यायला हवा होता व ते सहज शक्यही होते. मनमोहनसिंग जागा खाली करायला एका पायावर तयार होते, तेव्हा पोराचे फाजील लाड केले. माझा सोनुल्या अजून लहान आहे, छकुल्या शहाणा व्हायचा आहे. या सबबीखाली ते टाळले, हिंमतच झाली नाही. खरं तर ही चोपडी चवन्नी तेव्हाच मार्केटमध्ये कदाचित खपूनही गेली असती, पण ती नाही चालली तर काय, या भीतिपोटी चालढकल केली गेली व तीच बाईंची घोडचूक ठरली!
आता परिस्थिती बदलली. हातचं राज्य गेलं. म्हणता म्हणता पोरगा वयस्क झाला, जाण आली, पण आता पक्षाच्या अध्यक्षपदावरच समाधान मानावे लागेल. पण, तिथेही कॉंग्रेसचा युवावर्ग तयार, तर पोक्त नेते विरुद्ध आहेत. अशा त्रांगड्यात वर्षअखेरपर्यंत म्हणे युवराज बाशिंग बांधणार आहेत. न्हाऊ द्या एकदाचं गंगेत. नेहरू-गांधी घराण्याच्या वडिलोपार्जित हक्कानुसार आता कॉंग्रेस अध्यक्षपदाची गादी मिळणारच आहे, ती तरी पदरी पाडून घ्या. उद्याचा काय भरवसा? कारण पोरगं हे असं वाचाळ! कुठे काय बोलावं, कधी बोलावं, याचा अंदाज नाही, जाण नाही, धोरण नाही. तरीही देऊन पाहा एकदा जबाबदारी. पाहू काय दिवे लावतो ते! एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका व नसेल जमत तर त्याला दुसर्‍या एखाद्या कामधंद्यात लावून त्याचे दोनाचे चार करून टाका. अध्यक्षपदाचा निर्णय पुढे पुढे ढकलून आजचे मरण उद्यावर टाकून कसे चालेल? परीक्षा तर द्यावीच लागेल ना. कल करे सो आज कर हेच योग्य व आता घराणेशाही संपली, असे जाहीर करून टाका.
श्रीधर हरकरे
७३८७२३२०२५