भारत जिंकला, मग पराभूत कोण?

0
150

देशावर संकट आले आणि आम्ही वेगवेगळ्या सुरात बोलू लागलो, तर यामुळे कुणाला बळ मिळेल? आमचा राजकीय स्वार्थ, विचारसरणीचे महत्त्व, व्यक्तिगत नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षा देशापेक्षा मोठ्या असू शकतात काय? आम्ही हे विसरलो की, इतिहासाच्या कालखंडातील सत्तर वर्षे एका थेंबापेक्षाही कमी आहेत आणि आमचे वडील व आजोबांच्या देखत देशाची फाळणी झाली होती आणि लक्षावधी लोक मारले गेले होते. आम्ही आपसात एकी टिकवून ठेवली नाही आणि एक रक्त, एक वंश, एक भाषा आणि एकच पूर्वज असूनही सांप्रदायिक उन्मादामुळे देशाची केवळ फाळणीच झाली नाही, तर एक नवीन शत्रू उदयास आला. याच दुर्दैवी शोकांतिकेची पुन्हा पुनरावृत्ती करायची काय?
काश्मीर जर हातचे गेले तर कुणाचे नुकसान होणार आहे? आणि काश्मिरातून दहशतवाद्यांचे उच्चाटन झाले तर कुणाला फायदा होणार आहे? तो सैनिक जो उणे ४० तापमानातही सियाचिनवर आणि ४८ अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानात, रणरणत्या व असह्य उन्हात जेसलमेर येथे उभा ठाकतो, जो केरळ, कर्नाटक अथवा नागालॅण्ड, अरुणाचल येथील असतो त्यात सर्वधर्मीय, जाती, संप्रदायाचे जवान असतात. पण सारेच एकदिलाने लढतात. त्यांचे आईवडील, मुले, पत्नी, बहिणी तितक्याच आत्मीय आणि प्रेमळ असतात जितक्या आमच्या बहिणी आहेत. ते जेव्हा सीमेवर लढतात, शत्रूला कंठस्नान घालतात, आपले बलिदान देतात तेव्हा कुणाचे मन अभिमान, मौन श्रद्धांजली आणि ते जग सोडून गेल्याच्या दु:खाने भरून येते? जर आपल्या मनात खरोखरच वरीलप्रमाणे भावना उत्पन्न झाल्या असतील, तरच तुम्ही आणि आम्ही भारतीय आहोत. नाहीतर पासपोर्टधारक इंडियन आणि पासपोर्टधारक अमेरिकन्समध्ये कुठला फरक आहे?
टीव्हीवरील कार्यक्रमात दाखवितात तशी आमची देशभक्ती क्षणिक आणि अतिरेकी उत्साहाने भारलेली असते. शहीद सैनिकाचा मृतदेह ज्या गावात, शहरात येतो तेथील लोक व्यग्र असतात. श्रद्धांजली म्हणून त्या शहीदाची जीवनगाथा मुलांना ऐकविण्यात आली आहे, असे दिसत नाही. जवानाचे पार्थिव नेताना मुलांना एका रांगेत उभे करून त्याला श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे, असे दिसत नाही. मुलांना तसे सांगितले जात नाही. देशातील विविध राज्यांचे सरकार आपापल्या राज्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकात स्थानिक सैनिक, शहीदांच्या वीरकथा, परमवीरचक्र विजेत्यांच्या साहसी कथांचा समावेश करीत नाही. अगदी अवांतर पाठ्यक्रम म्हणूनही या गोष्टींचा समावेश करण्यात येत नाही. तरीही आम्ही शहीदांच्या संदर्भात गदारोळ माजविणे, वितंडवाद घालणे, वादविवाद उत्पन्न करणे असले प्रकार करीत असतो. एवढेच नव्हे, तर काही जण वर्तमानपत्राच्या माध्यमातून वादग्रस्त विधाने करून आमच्या स्वदेशी नेत्यालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. त्यावर मात म्हणजे, या नतद्रष्ट लोकांच्या विधानांचा शत्रू देशाच्या लोकांनाच फायदा होतो आणि या लोकांची वक्तव्ये संदर्भ म्हणून आम्हालाच ऐकविली जातात. हेच आजपर्यंत चालत आले आहे.
भारतानंतर जे जे देश स्वतंत्र झाले ते सकल देशांतर्गत उत्पादन, प्रतिव्यक्ती समृद्धी, शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सोयींच्या मापदंडावर आमच्यापेक्षा कितीतरी पट पुढे निघून गेले. महान संस्कृती, परंपरा, सभ्यता आणि लोकशाही राज्यव्यवस्था असूनही आम्ही ना स्त्री स्वातंत्र्य व सशक्तीकरणात पुढे जाऊ शकलो, ना आमच्या विद्यापीठांचा जागतिक स्तरावरील प्रथम १०० विद्यापीठांत समावेश होऊ शकला, ना आम्ही संशोधन आणि क्रीडाक्षेत्रात असे काही भव्यदिव्य करू शकलो, की ज्यामुळे आमचा जागतिक स्तरावर दबदबा निर्माण व्हावा. अनेकांचे आयुष्य केवळ फुटपाथवरच निघून जाते, चाळीस टक्के लोकांना दोनवेळचे पोटभर जेवणही मिळत नाही, अनुसूचित जातीच्या लोकांवरील अत्याचारांचा बातम्या तर वर्तमानपत्रात रोजच येत असतात. एवढे असूनही आम्ही गल्लीछाप राजकारण करण्यातच व्यग्र असतो आणि विरोधकांचा अपमान करणे, हाच जणू आमच्या जीवनाचा एकमेव उद्देश बनून राहतो.
कुणी मुख्यमंत्री अथवा मंत्री कधी कुठल्या विद्यापीठात तेथील प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांशी कसलेही अवडंबर न माजविता सहज चर्चा करण्यासाठी गेले आहेत, असे कधी दिसले आहे काय? आपल्या समस्या मी सोडवू शकतो, असा दिलासा त्यांनी दिला आहे काय? एखाद्या नेत्याला बाजारात पत्नीसमवेत भाजी, कपडे खरेदी करताना किंवा मुलांना सहज फिरायला म्हणून कुठे घेऊन जाताना कधी पाहिले आहे काय? या (नेते, राजकारणी) लोकांना आम्ही मोठे असल्याचा एवढा प्रचंड अभिमान असतो, की एखाद् वेळी लाज वाटून ते जमिनीत स्वत:ला गाडून घेतील, पण सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे बाजारात जाणार नाहीत अथवा आपली स्वत:ची खाजगी कार घेऊन कुटुंबीयांना फिरायला नेले आहे, असे कधीच दिसणार नाही. असे लोक देशाची सुरक्षा, सैनिकांसाठी साधनसामुग्री, शस्त्रास्त्रांची उत्तम खरेदी, दहशतवाद समूळ नष्ट करणे यासारख्या विषयांवर एकजूटता दाखवून देशाचे मनोबल कसे वाढवू शकतील?
सुरक्षा रक्षकांच्या घेर्‍यात, उंच इमारतीत, प्रशस्त बंगल्यात समाजापासून अलिप्त राहून, लोकांकडे किड्यामुंग्यांप्रमाणे पाहणार्‍या या लोकांना विचारलेच पाहिजे की, जर भारत जिंकत असेल तर पराभूत कोण होतो? आणि जर भारताला जखम होत असेल, तर वेदना कुणाला होतात?
भारताला चारही बाजूंनी ज्या शक्तींनी घेरले आहे त्यांना अर्थातच आमची प्रगती आणि विकास व्हावा असे वाटत नाही. आतापर्यंत खैबरखिंडीतून आमच्यावर हल्ले होत आहेत, पण भविष्यात सर्वात मोठे सामरिक आव्हान सागरी क्षेत्रातून उभे ठाकणार आहे. भारताची साडेसात हजार किलोमीटरची सागरी सीमा आणि जवळजवळ तितकीच जमीन- डोंगरावरील सीमेमुळे आमच्यासमोर राष्ट्रीय एकता आणि एकजूटता दाखविण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. देशांतर्गत नक्षलवादी आणि माओवादी, बाहेरून पाकिस्तान व चीनचे आव्हान, याबरोबरच जिहादी आणि आयएसआयएसचा दहशतवाद यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवणे काळाची गरज आहे, नव्हे, आजच्या भारताची हीच मागणी आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद या विषयावर सर्व सहमती होणे आवश्यक आहे. यासाठी सेना आणि सैनिकांचा सन्मान आम्ही करायलाच हवा. आमच्या हृदयात, वाणीत जवानांविषयी आत्मीयता असलीच पाहिजे. आम्ही प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात कमीत कमी परमवीरचक्र विजेता, वीर सैनिकाचे चित्र लावण्यास सुरुवात करू शकतो काय? भलेही नेत्यांची छायाचित्रे हटविली तरी चालतील, मात्र सैनिकांची छायाचित्रे लावलीच पाहिजेत.
ज्या देशात सैनिकांचा सन्मान होतो त्या देशाचे भवितव्यही उज्ज्वल असते. जेथे सैनिकांना सर्वसाधारण कर्मचार्‍यांप्रमाणेच वेतनभोगी मानण्यात येते, जेथे नागरी सेवांमध्ये तैनात अधिकार्‍यांचा रुबाब आणि वेतन व अन्य सुविधा लष्करी अधिकार्‍यांपेक्षा अधिक असतात, जेथे समाज आणि राजकीय क्षेत्रात सैनिकांना योग्य तो मानसन्मान मिळत नाही त्याचे भविष्य तक्षशिला आणि नालंदाप्रमाणे असते. यामुळेच रावळपिंडी आणि कराचीसारखी शहरे आम्हाला गमवावी लागली. बुद्धिजीवींकडून देशाला दिशा अवश्य मिळते, पण जर बुद्धिजीवींऐवजी बुद्धिराक्षसांनी देशाचा कणा कमजोर करण्याचे काम सुरू केले, तसे वातावरण देशात निर्माण केले, तर पहिल्यांदा या लोकांना पराभूत करावे लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. यांच्यापेक्षा सीमेपलीकडील शत्रूचा पराभव करणे अधिक सोपे आहे.

तरुण विजय