साप्ताहिक राशिभविष्य

0
665

रविवार, १३ नोव्हेंबर ते शनिवार, १९ नोव्हेंबर २०१६
सप्ताह विशेष
• सोमवार, १४ नोव्हेंबर ः कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, भद्रा समाप्त ९.१८, कार्तिकस्वामी दर्शन १६.२७ ते १९.१९, कार्तिकस्नान समाप्ती, तुलसी विवाह समाप्ती, भीष्मपंचक व्रत समाप्ती, गुरुनानक जयंती, बालदिन- पं. जवाहरलाल नेहरू जयंती, मंगळवार, १५ नोव्हेंबर ः रवि वृश्‍चिक प्रवेश ३०.१४, महालयगौणकाल समाप्ती, पारशी तीर मासारंभ, बुधवार, १६ नोव्हेंबर ः भद्रा प्रारंभ २१.०१, पांडुरंग रथयात्रा- नागपूर, सदानंद ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथी- चांदुरबाजार (अमरावती), परशुराम महाराज पुण्यतिथी- सुलतानपूर (अकोला), गुरुवार, १७ नोव्हेंबर ः संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय २०.४१), भद्रा समाप्त ८.२०, पुरुषोत्तम महाराज जयंती- काटोल (नागपूर), नानाजी महाराज पुण्यतिथी- कापशी (वर्धा), लाला लजपतराय पुण्यतिथी, शुक्रवार, १८ नोव्हेंबर ः मुकुंदराज महाराज साधू पुण्यतिथी- नागपूर, पांडुरंगाची यात्रा- मंगरूळ दस्तगीर (अमरावती), शनिवार, १९ नोव्हेंबर ः रवि अनुराधा नक्षत्र-प्रवेश १३.३५, भद्रा प्रारंभ २६.१५, बळीराम महाराज पुण्यतिथी- पार्डी (अमरावती), रामाजीबाबा जयंती- बानावाकोडा (छिंदवाडा).

मेष : मेष- ताण कमी होणार
रासीत चंद्र व राशीस्वामी मंगळ दशमात अशा सुखावह ग्रहस्थितीने या आठवड्याचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नोकरी-व्यवसायातून आनंद व सुखाच्या वार्ता कळणार आहे. यासह जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा सुरू होऊ शकेल. शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा विविध आघाड्यांवर आपली सरशी होणार आहे. मुलांकडून सुवार्ता, संतती योग, गुंतवणूक, लॉटरी वा तत्सम बाबींतून लाभाचेही योग अनेकांना अनुभवास यावेत. प्रेमसंबंध, विवाह योग जुळून येण्याची शक्यता आहे.जबाबदारीचा ताण कमी होऊन मनातील योजना पूर्णत्वास नेण्यासाठीही मोकळीक मिळेल.
शुभ दिनांक- १३,१४,१५.
वृषभ : परिस्थिती ओळखा
राशीस्वामी शुक्र अष्टमस्थानात असून आठवड्याच्या प्रारंभीच व्ययात असणारा चंद्र आपल्या सुखावह स्थितीला वाढत्या खर्चाचे व प्रकृतीविषयक तक्रारींचे काहीसे गालबोट लागण्याची शक्यता दर्शवीत आहे. आर्थिक आवक चांगली राहण्याची शक्यता असतानाच अचानक मोठ्या खर्चाचे संकेतही मिळत आहेत. काहींना जवळच्या मित्रमंडळी वा नातलगांबाबत काळजीजनक वातावरण निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अनिश्‍चित व अस्थायी सुखावरील हे सावट दूर होण्यास काही काळ लागेल. त्यामुळे कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी परिस्थितीचा पुरेसा अंदाज घेणे लाभाचेच राहील.
शुभ दिनांक- १५,१६,१७.
मिथून : बाजू वरचढ होणार
राशीस्वामी बुध सहाव्या स्थानात असतानाच लाभ स्थानातून चंद्र या आठवड्याची सुरुवात करीत आहे. नोकरीत प्रशंसा, कामाचे कौतुक, वरिष्ठांची मर्जी देणारा हा आठवडा आहे. आपली बाजू वरचढ होत असतानाच मात्र हाताखालच्या सहकार्‍यांकडून मानहानीचे, असहकाराचे, मनास बोचतील असे वर्तन घडण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करणे अवघड जाईल, तथापि आपल्या कामाची दिशा, झपाटा बदलू न देता आगेकूच करण्यातच हित आहे. त्याचे दूरगामी लाभ मिळतील, हे मात्र निश्‍चित. विदेशात जाण्याच्या योजना कुणी आखत असेल तर त्याला मूर्त रूप लाभू शकेल. शुभ दिनांक- १७,१८,१९.
कर्क : कामाचे कौतुक होईल
राशीस्वामी चंद्र दशमात आणि सप्तमात मंगळ अशी सुखद ग्रहस्थिती घेऊन या आठवड्याची सुरुवात होत आहे. विशेषतः नोकरी-व्यवसायासाठी हा उत्तम काळ ठरणार आहे. आपण आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमाचे चीज होेईल. कामाचे कौतुक, नवीन जवाबदारी, पदोन्नती, पगारवाढ, आकर्षक इन्सेंटिव्ह अशा स्वरूपात लाभ पदरी पडण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांची मर्जी आणि सहकार्‍यांची साथ लाभणार आहे. घरात काही शुभकार्ये ठरण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या आनंदात भरच पडेल. आर्थिक आवक वाढेल. जुनी आवक, वारशाची प्रलंबित प्रकरणे मार्गी लागू शकतात.
शुभ दिनांक- १५,१६,१९.
सिंह : आर्थिक उन्नती व समाधान
राशीस्वामी रवि पराक्रमस्थानी भाग्यात चंद्र अशा भाग्यवर्धक स्थितीसह हा आठवडा सुरू होत आहे. तो आपणांस विशेषतः आर्थिक उन्नतीकारक व कुटुंबात वृद्धी व समाधान दर्शविणारा ठरतो. वाढीव पैसै येईल तेव्हा त्याला अधिकचे पाय फुटण्याची देखील शक्यता राहील. मोठी खरेदी, अचानक लांबचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. दरम्यान नोकरी- व्यवसायातील विरोधकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज राहील. तरुणांना नोकरीच्या उत्तम संधी लाभू शकतात. काहींना परदेश गमनाची संधी देखील मिळावी. किमान त्यादिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना वेग मिळेल. काहींना प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
शुभ दिनांक- १३,१४,१७
कन्या : मानापमान, मन:स्ताप
राशीस्वामी बुध अस्तंगत होत तृतियात व चंद्र अष्टमात असा काहीशा तापदायक ग्रहस्थितीत हा आठवडा सुरू होत आहे. मानापमानाच्या कात्रीत अडकवणारा, मन:स्तापाचे प्रसंग अनुभवास आणणारा हा काळ आहे. बरीच दगदग, धावपळ करावी लागण्याची व अपेक्षाभंग पदरी पडण्याची शक्यता आहे. आपल्या मनातील योजनांना, हाती घेतलेल्या उपक्रमांना चालना देणारे मानसिक बळ उभारणे आपणांस कठीण होणार आहे. या काळात आपले मन काहीसे हळवे बनेल. भलत्यावेळी तोंडघशी पडण्याची वेळ योऊ शकते, त्यामुळे नेमक्या क्षणी नाचक्की होणार नाही, याची काळजी घ्यावी.
शुभ दिनांक- १५,१६,१९.
तूळ : व्यक्तिमत्त्व उजळेल
राशीस्वामी शुक्र पराक्रम स्थानात व सप्तमात चंद्र खुश आहे. तर राशीस्थानात रवी मुक्कामाला आहे. ही ग्रहस्थिती पाहता विशेषतः आठवड्याच्या उत्तरार्धात आपले व्यक्तिमत्त्व उजळेल. नोकरी-व्यवसायात आपणांस उत्तम संधी, लाभदायक क्षण पदरी पडण्याचे संकेत मिळतील. मेहनतीला योग्य फळ मिळेल. तरुण वर्गाला भवितव्य घडविण्यासाठी या काळात अधिकाधिक परिश्रम घ्यायला हवेत. विशेषतः उत्तरार्धात महत्त्वाच्या कामांना गती द्यायला हवी. ओळखीतून तसेच वरिष्ठांच्या सहवासातून लाभ होण्याची जास्त शक्यता आहे. वडीलधार्‍या मंडळीचा सल्ला आपल्या योजना कार्यान्वित करताना अवश्य घ्या.
शुभ दिनांक- १३,१४,१८.
वृश्‍चिक : विश्‍वासघात, भमनिरास
राशीस्वामी मंगळ पराक्रमात व चंद्र षष्ठात अशा स्थितीत हा आठवडा सुरू होत आहे. साडेसातीचा शनि राशीस्थानी असल्याने तो संघर्षाचा काळ दर्शवितो आहे. विशेषतः नोकरी-व्यवसायात असलेल्या मंडळींना विश्‍वासघात, भमनिरास असे अनुभव येण्याची श्‍नयता आहे. त्यामुळे कोणावरही विश्‍वास टाकतांना पुरेपूर खातरजमा करून घेणे फायद्याचे ठरेल. तथापि, असे असले तरी कोणतेही मोठे नुकसान होण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. आपली उमेद टिकून राहणार. लाभस्थानात असलेला गुरू मानसन्मान व मोठे लाभ देण्याची शक्यता आहे. यश, कौतुक, प्रसिद्धी मिळेल. समाजात प्रतिष्ठा उंचावेल.
शुभ दिनांक- १५,१६,१९.
धनू : प्रतिष्ठा उंचावेल
राशीस्वामी गुरू दशमात व पंचमात चंद्र अशा अतिशय उत्तम ग्रहमान या आठवड्याच्या प्रारंभी आपल्याला लाभले आहे. ही भाग्यवर्धक स्थिती आपल्याल मिळाली असल्याचे म्हणावयास हरकत नाही. नोकरी- व्यवसायात प्रगती, समाजात मान-सन्मान वाढणे, प्रतिष्ठा उंचावणे असले योग निर्माण होत आहेत. या राशीचे जे लोक सरकारी नोकरीत असतील त्यांना तर आठवड्याचा उत्तरार्ध निश्‍चितच सुखावह व महत्त्वाच्या संधी देणारा असेल. सामाजिक कार्यातूनही लाभ मिळू शकणार असल्याने समाजकार्य, राजकारण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी देखील या योगांचा लाभ पदरी पाडून घेतला पाहिजे.
शुभ दिनांक- १३,१४,१७.
मकर : संघर्ष, अस्वस्थता, असमाधान
राशीस्वामी शनी लाभस्थानात आणि सुखस्थानात चंद्र अशा योगात हा आठवडा सुरू होत आहे. चंद्र व शनीचा हा केंद्रयोग व राशीतला मंगळ बघता सध्याचा काळ आपणांस बराचसा संघर्ष, मानसिक अस्वस्थता, प्रकृतीविषयक चिंता व असमाधान दर्शविणारा आहे. मात्र तो अंतिमतः आपल्या पदरात यशाचे दानही घालणारा आहे. त्यामुळे सध्या शांतपणे परिस्थितीला सामोरे जाण्याचे धोरण स्वीकारावास हवे. कुटुंबात काही मतभेद, भांडणे होऊ शकतात. ती विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या. काही विचित्र अपघात, दुखापत, आजारपण येण्याची शक्यता आहे. वात व उष्णताजन्य त्रास बळावतील.
शुभ दिनांक- १५,१६,१९.

कुंभ : स्पर्धा-विरोधाचे वातावरण
राशीस्वामी शनि मंगळाच्या घरात दशमस्थानी व चंद्र पराक्रमात अशा षडाष्टक योगात हा आठवडा सुरू होत आहे. मानसिकदृष्ट्या ताण-तणाव व असमाधान दर्शविणारा हा आठवडा आहे. या काळात काही विचित्र व चमत्कारिक घटना घडण्याची श्‍नयता आहे. घरात अकारण भांडणे, भाऊबंदकीतून- वारसाच्या मुद्यावरून विकोपाला जाणारे वाद, आर्थिक देवाण-घेवाणीत फसगत, नोकरी-व्यवसायात स्पर्धा, वरिष्ठांची अवकृपा, नको तेथे नमते घ्यावे लागणे असल्या मनाचा त्रागा करविणार्‍या घटना अनुभवास येण्याची शक्यता आहे. स्पर्धा-विरोधाचे वातावरण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यायला हवी.
शुभ दिनांक- १७,१८,१९.
मीन : योजनांना गती मिळेल
राशीस्वामी गुरू सप्तमात व धनस्थानात चंद्र अशा अनुकूल स्थितीत हा आठवडा सुरू होत आहे. आपल्या योजनांना गती देणारा हा आठवडा आहे. आर्थिक स्थिती उत्तम व प्रगतीपथावर राहील. कुटुंबात तसेच कार्यस्थळी विशेषतः महिलावर्गाचे सहाय्य मिळेल. हितशत्रूंच्या कारवाया मोडीत निघतील. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल. युवा वर्गाचे व्यक्तिमत्त्व उजळेल. त्यांना नोकरी- व्यवसायात उत्तम संधी मिळतील. आठवड्याच्या उत्तरार्धात काही अपेक्षित घटनाक्रम अनुभवास येईल. काही कौटुंबिक प्रश्‍न सुटावेत. मुलांची प्रगती व्हावी. विवाहेच्छू युवक-युवतींना अनुरूप स्थळे लाभावीत.
शुभ दिनांक- १३,१५,१७.
• मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६