मंत्र्याशी हस्तांदोलन केल्याने मुलीची बदनामी

मुस्लिम धर्मगुरूविरुद्ध गुन्हा

0
317

वृत्तसंस्था
तिरुअनंतपुरम्, १२ सप्टेंबर
केरळचे अर्थमंत्री थॉमस इस्साक एका पुरस्कार वितरण समारंभासाठी महाविद्यालयात गेले असता त्यांच्याशी हस्तांदोलन करणार्‍या मुलीची बदनामी केल्याच्या आरोपाखाली एका मुस्लिम धर्मगुरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्र्याशी हस्तांदोलन करण्याचे मुलीचे कृत्य अत्यंत अयोग्य आणि शरिया कायद्याच्याविरुद्ध आहे, असे या धर्मगुरूचे मत आहे. मंत्र्यांशी हस्तांदोलन केले म्हणून या धर्मगुरूने जाहीरपणे आपल्याला अपमानित केले, अशी तक्रार मुलीने केल्यानंतर कोझिकोड पोलिसांनी नौशाद अहसानी यांच्याविरुद्ध केरळ पोलिस कायद्याच्या कलम ११९ (महिलांवरील अत्याचार प्रकरणी शिक्षा) नुसार गुन्हा दाखल केला.
१८ ऑगस्ट रोजीच्या या घटनेत थॉमस इस्साक यांनी मर्काझ विधि महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरित केले आणि काही पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन केले.
अहसानी यांनी सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम पुरुष आणि महिलांचे वर्तन कसे असावे, या विषयावर भाषण देत असताना ही मुलगी मंत्र्यासोबत हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र दाखविले. अविवाहित मुस्लिम महिलांनी असे करणे अत्यंत अयोग्य असल्याचेही ते म्हणाले. आपल्या परिसरात अशा वर्तनाला परवानगी दिल्याबद्दल अहसानी यांनी महाविद्यालय प्रशासनावरही टीका केली.
आपल्या भाषणानंतर अहसानी यांनी यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियवर टाकला, असे कायदा विषयाच्या द्वितीय वर्षात शिकणार्‍या या विद्यार्थिनीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आपली बदनामी करण्यासाठी एका पवित्र कामाला त्यांनी लैंगिक वळण दिले, असेही मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
आम्ही अहसान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलने सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या व्हिडीओ फुटेजचा अभ्यास केल्यानंतर आणखी काही कलमं लावली जाण्याची शक्यता आहे, असे पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी एम. टी. जेकब यांनी सांगितले. अनेक विद्यार्थी संघटनांनी अहसानी यांच्या भाषणावर जोरदार टीका केली असून, अशा जातीयवादी वक्तव्यांमुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे म्हटले आहे.