आणखी तीन अतिरेक्यांचा खात्मा

ईदेला मोठ्या घातपाताची योजना होती काश्मिरात चकमक सुरूच

0
213

वृत्तसंस्था
श्रीनगर, १२ सप्टेंबर
दक्षिण काश्मिरात दहशतवादी आणि लष्करी जवानांमध्ये आज सोमवारी पुन्हा एकदा चकमक झडली. या चकमकीत तीन दशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिली. या ठार झालेल्या अतिरेक्यांजवळून एक नकाशा आणि काही कागदपत्र मिळाली असून, हिंसाचाराच्या आगीत गेल्या दोन महिन्यांपासून धगधगत असलेल्या काश्मीर खोर्‍यात ईदेच्या दिवशी मोठा घातपात करण्याची त्यांची योजना होती, हे स्पष्ट झाले आहे.
रविवारी दिवसभरच चकमक झाली. यात सात अतिरेक्यांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर जवानांनी आज सकाळी या भागांमध्ये शोधमोहीम हाती घेतली असता, नियंत्रण रेषेजवळच एका ठिकाणी लपलेल्या अतिरेक्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही त्याला ठोस प्रत्युत्तर दिले. यावेळी झडलेल्या भीषण चकमकीत तीन अतिरेकी ठार झाल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
पूंछमधील मिनी सचिवालयात अजूनही काही अतिरेकी लपले असून, त्यांची नेमकी संख्या नेमकी किती आहे आणि तिथे त्यांनी नागरिकांना ओलिस धरले आहे काय, याबाबत माहिती नसल्याने जवानांनी सावध भूमिका घेतली आहे. पूंछमधील लष्कराचे ९३ ब्रिगेडचे मुख्यालय अतिरेक्यांच्या निशाण्यावर होते, अशी माहिती आहे.
सायंकाळी उशिरापर्यंत अतिरेकी आणि जवानांमध्ये गोळीबार सुरू होता. सचिवालयाच्या इमारतीत लपलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी जवानांनी बॉम्बने इमारत उडविण्याची तयारीही पूर्ण केली आहे. पण, नागरिक तिथे ओलिस असण्याची शक्यता लक्षात घेऊन जवान सावध पावले उचलत असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.