गुदमरत असाल तर आघाडीतून बाहेर पडा

0
339

वृत्तसंस्था
पाटणा, १३ सप्टेंबर
राजदचा कुख्यात नेता मोहम्मद शहाबुद्दिनच्या सुटकेवरून जदयू आणि राजदमध्ये वाद उफाळून आला असतानाच, महाआघाडीतील तिसरा घटक असलेल्या कॉंगे्रसने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे समर्थन केले आणि महाआघाडीत तुमचा दम गुदमरत असेल, तर खुशाल बाहेर पडा, असा खोचक सल्ला राजदला दिला. यामुळे आघाडीत उभी फूट पडण्याची शक्यता आहे.
तुमचा दम आघाडीत गुदमरत असेल, तर तुम्ही बाहेर का पडत नाही. कुणी रोखले आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी सांगितले. काही राजद नेत्यांनी नितीशकुमार यांच्याविरुद्ध अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर या वादात आता कॉंगे्रसनेही उडी घेतली आहे.
एकीकडे तुम्हीच म्हणता की, महाआघाडी अतिशय मजबूत दगडासारखी आहे आणि दुसरीकडे तुम्ही सरकारच्या मुखियाविरोधात वाट्टेल तसे बोलत आहात. आघाडीतील घटक असतानाही तुम्ही एकमेकांविरुद्ध वक्तव्य करीत आहात. यामुळे जनसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण तीन पक्षांनीच मिळून नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले होते. आता आपण त्यांच्याविरोधात बोलत आहोत आणि त्यांना अपमानित करीत आहोत. हा प्रकार मान्य होण्यासारखा नाही, असे त्यांनी सांगितले.
नितीशकुमारच नेते : लालू
महाआघाडीत फूट पडण्याची शक्यता लक्षात घेऊन राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी स्थिती सावरण्याचा प्रयत्न करताना, नितीशकुमार हेच महाआघाडीचे नेते असल्याचे स्पष्ट केले. याचवेळी त्यांनी मोहम्मद शहाबुद्दिनचीही पाठराखण केली. शहाबुद्दिनने नितीशकुमारांविरोधात कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. आघाडीबाबत जो काही वाद निर्माण झाला, त्यामागे देशातील प्रसारमाध्यमेच आहेत, असा दावाही लालूंनी केला. आमची महाआघाडी मजबूत असून, तिला कुठलाही धोका नाही, असेही ते म्हणाले.
शहाबुद्दिनला जामीन कसा मिळाला : भाजपा
दरम्यान, भाजपाने शहाबुद्दिनला जामीन कसा मिळाला, असा सवाल उपस्थित केला. तिघांची ऍसिडने कू्ररपणे हत्या करणार्‍या एका बाहुबलीला ११ वर्षांनंतर जामीन मिळावा, याचे आश्‍चर्य वाटते. यामागची पार्श्‍वभूमी नितीशकुमार यांनी स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.
शहाबुद्दिनने कारागृहाबाहेर आल्यानंतर नितीशकुमारांबाबत कोणते वक्तव्य केले आणि त्यावरून महाआघाडीत कोणता वाद निर्माण झाला, याचा आमच्याशी काहीच संबंध नाही. तो सुटलाच कसा, एवढेच उत्तर आम्हाला हवे आहे, भाजपाचे वरिष्ट नेते सुशीलकुमार मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.