राजधानीत चिकनगुनियाचे आतापर्यंत चार बळी

केजरीवालांनी केंद्रावर खापर फोडत हात केले वर

0
225

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १३ सप्टेंबर
दिल्ली सरकारचे सर्व अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आपल्या हातात घेतले आहे, त्यामुळे राजधानीतील चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या वाढत्या साथीबाबत त्यांनाच विचारा, असे अतिशय बेजबाबदारीचे उत्तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.
राजधानीत यावर्षी चिकनगुनिया आणि डेंग्यूने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. राजधानीतील सर्वात महागड्या अशा गंगाराम रुग्णालयात चिकनगुनियाने तीन रुग्णांचा बळी गेला आहे. शहरातील सर्व रुग्णालयात चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची प्रचंड गर्दी झाली आहे. सरकारीच नाही तर खाजगी रुग्णालयातही खाटा कमी पडत असल्यामुळे रुग्णांना खाली झोपवावे लाागत आहे. मात्र अशा आणिबाणीच्या परिस्थितीत कपील मिश्रा वगळता दिल्ली सरकारचा एकही मंत्री राजधानीत नाही. आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनीही दिल्लीच्या जनतेला वार्‍यावर सोडले आहे. याबाबत एका नागरिकाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे ट्विटरवर विचारणा केली असता त्यांनी नेहमीप्रमाणे याचे खापरही केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांकडे काहीच अधिकार राहिले नाही, साधा पेन विकत घेण्याचे अधिकारही आमच्याकडे राहिले नाही. पंतप्रधान मोदी आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांनी सर्व अधिकार आपल्या हातात घेतले आहे. त्यामुळे चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या वाढत्या साथीबाबत त्यांनाच विचारा, असे उत्तर देत केजरीवाल यांनी आपले हात वर केले आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभाग दिल्ली सरकारच्याच अंतर्गत आहे.
राजधानीत आतापर्यत चिकनगुनियाचे १७२४ रुग्ण समोर आले आहेत. एम्समध्ये एका रुग्णाचा चिकनगुनियाने बळी गेल्यामुळे चिकनगुनियाने मृत्युमुखी पडणार्‍या रुग्णांची संख्या चार झाली असल्याचे समजते.