आंध्राने गाठले शंभर टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य

गुजरातनंतर दुसरे राज्य

0
298

वृत्तसंस्था
विजयवाडा, १३ सप्टेंबर
प्रत्येक घरात वीज उपलब्ध करून आंध्रप्रदेशने शंभर टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट गाठले आहे. अशा प्रकारचे लक्ष्य पूर्ण करणारे आंध्रप्रदेश हे गुजरातनंतर देशातील दुसरे राज्य ठरले आहे.
जे. एम. फायनान्सियल या संस्थेने एका ताज्या अहवालातून या बाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. विविध राज्यांमधील विद्युतीकरणावर ही संस्था अभ्यास करीत असते. ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी टेले-कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज मंगळवारी संवाद साधताना मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले की, जूनच्या अखेरीस आम्ही शंभर टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट गाठले आहे. आता आम्ही राज्यातील प्रत्येक घरात वीज पुरवठा निरंतर सुरू राहील, तो कधीच खंडित होणार नाही, यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सामाजिक-आर्थिक विकासासाठी घराघरात वीज असणे आवश्यक असते. पण, देशाचा अनेक भाग अजूनही अंधारात आहे.
उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, ओडिशा आणि आसाम यासारख्या राज्यांतील ३५ टक्के घरांमध्ये अजूनही अंधार आहे, असा दावाही नायडू यांनी केला. गेल्या दोन वर्षांत आम्ही या क्षेत्रात जे काही प्राप्त केले, ते अभूतपूर्व असेच आहे. पण, एवढ्यावर समाधान करून घ्यायचे नाही, असे ते म्हणाले.
ऊर्जा क्षेत्रात आंध्रप्रदेश स्वावलंबी होईल आणि राज्यातील वीज पुरवठा कधीच खंडित होणार नाही, यासाठी अधिकार्‍यांनी ठोस कृती आराखडा तयार करावा, असे आवाहनही नायडू यांनी केले.