साप्ताहिक राशिभविष्य

0
661

सप्ताह विशेष

रविवार, २० नोव्हेंबर ते शनिवार, २६ नोव्हेंबर २०१६
•सोमवार, २१ नोव्हेंबर ः कालाष्टमी, कालभैरव जयंती, सायन रवी धनू राशीत २६.५४, मंगळवार, २२ नोव्हेंबर ः सौर मार्गशीर्ष (भारतीय अग्रहायण) मासारंभ, मनिरामबाबा पुण्यतिथी- बग्गी (अमरावती), आबाजी महाराज यात्रा- विरूर आबा (वर्धा), बुधवार, २३ नोव्हेंबर ः भद्रा १६.२८ ते २९.२३,

गुरुवार, २४ नोव्हेंबर : गुरू तेगबहादूर शहीद दिन, शुक्रवार, २५ नोव्हेंबर ः उत्पत्ती एकादशी, आळंदी यात्रा,
शनिवार, २६ नोव्हेंबर : शनिप्रदोष, जनार्दन स्वामी पुण्यतिथी, एकवीरादेवी (अमरावती)

मुहूर्त : साखरपुडा- २५ नोव्हेंबर, बारसे- २३ नोव्हेंबर, जावळे- २५ नोव्हेंबर, गृहप्रवेश- २३ नोव्हेंबर.

मेष : कर्तबगारीला वाव मिळेल
याही आठवड्यात राशिस्वामी मंगळ दशमात मकरेचा उच्च स्थितीत आहे, तर चंद्र सुखस्थानातून भ्रमण सुरू करणार आहे. आठवडाअखेर तो सप्तमात जाईल. या योगामुळे प्रामुख्याने हा आठवडा आपणांस यशवर्धक तसेच कौटुंबिक आनंद व व्यावसायिक लाभ पदरी पाडणारा राहील. कुटुंबातील युवावर्गाच्या संदर्भात काही अनुकूल घटना घडतील त्यामुळे आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. युवा वर्गाला नोकरी लागणे, नोकरीत स्थलांतर, विवाहाचे योग, संततियोग अशा शुभ घटना संभवतात. कर्तबगारीला वाव मिळेल. आर्थिकदृष्ट्यादेखील आठवडा उत्तम राहील. व्यवसायात काही धाडसी निर्णय उत्तम यश देणारे ठरू शकतात. शुभ दिनांक- २१, २२, २३.

वृषभ : तणाव, अस्वस्थता जाणवेल
राशिस्वामी शुक्र अष्टमात, चंद्र पराक्रमात, शनी-रवी सप्तमात अशा प्रतिकूल ग्रहस्थितीत आपला हा आठवडा प्रारंभ होत आहे. व्यवसायात अडचणी, कार्यक्षेत्रात तणाव, आर्थिक अडचणी आणि वारंवार उद्भवणार्‍या प्रकृतीविषयक तक्रारी असा हा काळ असणार आहे. भागीदारीच्या व्यवसायात असणार्‍यांनी परस्परात सामंजस्य ठेवण्याचा प्रयत्न करावा. सर्व प्रकारचे व्यवहार जपून करायला हवेत. संबंध टिकवण्यासाठी त्यात पारदर्शीपणा असावा. भाग्यातील उच्चीचा मंगळ आपणांस अडचणीच्या वेळी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करेल. स्वतःच्या व जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रवासात सतर्क असावे.
शुभ दिनांक- २३, २४, २५.

मिथून : सहकार्‍यांची मदत मिळेल
राशिस्वामी बुध षष्ठस्थानात रवी व शनीसोबत, सप्तमात शुक्र आणि धनस्थानात चंद्र अशा ग्रहस्थितीत आपला हा आठवडा सुरू होत आहे. बरेच दिवस अस्तंगत असलेला बुध आता उदित झाला आहे. त्यामुळे इतके दिवस रखडलेली आपली कामे आता वेग घ्यावयास लागतील. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारीदेखील आता दूर होतील. कार्यक्षेत्रात काही महत्त्वाचे निर्णय होतील. हाताखालील सहकार्‍यांची चांगली मदत मिळेल. अष्टमातील उच्चीचा मंगळ स्थावराची कामे, वारशाची प्रकरणे यात गुंतागुंत वाढवू शकतो. त्याच्या प्रभावाने कुटुंबात काही तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. वाहनापासून होणार्‍या अपघातांबाबत सतर्क असावे. शुभ दिनांक- २०, २५, २६.

कर्क : कामांना वेग मिळणार
राशिस्वामी चंद्र स्वराशीत आणि सप्तमात उच्चीचा मंगळ आणि भाग्यावर गुरूची दृष्टी अशा प्रमुख आणि उत्साहवर्धक ग्रहस्थितीत हा आठवडा सुरू होत आहे. या उपयुक्त ग्रहस्थितीमुळे आपली अडलेली कामे आता मार्गी लागू शकतील. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल आणि त्यामुळे कठीण वाटणारे कामदेखील आपण यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. शत्रूंच्या कारवाया वेळीच लक्षात येऊ शकतील व त्याचा बंदोबस्त करू शकाल. पंचमातील शनी व रवीच्या सहवासामुळे संततीविषयक काही असमाधान जाणवू शकते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीतदेखील अडथळे संभवतात. मित्र व आप्तेष्टांच्या सहवासात आठवडा आनंदमय राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा.
शुभ दिनांक- २०, २१, २३

सिंह : मोठ्यांचा सल्ला घ्या
राशिस्वामी रवी चतुर्थात शत्रू शनीसोबत, राशीत राहू व षष्ठात उच्च मंगळ अशा काहीशा विपरीत स्थितीत हा आठवडा सुरू होत आहे. धनातील गुरू व पंचमातील शुक्र हेच काय ते आपल्या मदतीला आहेत. आपल्या सहवासातील व्यक्ती कशा आहेत, हे नीट पारखून घेण्याची गरज आहे. कुसंगती, व्यसने, प्रलोभने, जुगार यातून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जमीन-जुमल्याचे व्यवहार तूर्त करू नयेत. कुटुंबात मतभेदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. ते सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत सुधार होऊ शकेल. महत्त्वाचा निर्णय घेताना मोठ्यांचा व अनुभवी लोकांचा सल्ला अवश्य घ्या.
शुभ दिनांक- २१, २२, २३.

कन्या : सकारात्मक वातावरण राहील
राशिस्वामी बुध पराक्रमात शनी व रवीसोबत, राशीत गुरू आणि पंचमात उच्च मंगळ अशा ग्रहस्थितीत हा आठवडा सुरू होत आहे. ही ग्रहस्थिती साधारण अनुकूल आहे. राशिस्वामी बुध नुकताच उदित झाल्याने तो बरेच सकारात्मक वातावरण निर्माण करू शकेल. गुरूची आपल्या प्रयत्नांना उत्तम साथ मिळेल. महत्त्वाच्या भेटीगाठीतून व्यावासायिक यश संभवते. कुटुंबात मंगलकार्य ठरण्याचीही शक्यता आहे. युवावर्गाला काही चांगले योग चालून यावेत, यामुळे नोकरी-व्यवसायात यश मिळू शकेल. पराक्रमातील शनी सहजसाध्य यश देणार नसला, तरी आपले परिश्रम वाया जाणार नाहीत, याची खात्री बाळगा. कुटुंबातून उत्तम सहकार्य मिळावे.
शुभ दिनांक- २३, २४, २५.

तूळ : उत्तरार्धात उत्तम संधी
राशिस्वामी शुक्र पराक्रमात, दशमात चंद्र आणि धनात रवीसोबत योगकारक शनी अशा ग्रहस्थितीत हा आठवडा सुरू होत आहे. या संमिश्र स्थितीत आठवड्याचा पूर्वार्ध काहीशा प्रतिकूल घटनांचा राहू शकतो. उत्तरार्धात मात्र चांगले अनुभव लाभावेत. या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रातील वातावरण काहीसे नरम गरम राहील. कुटुंबात काही अकल्पित घटना अनुभवास येऊ शकतात. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. उत्तरार्धात मात्र कुटुंबात एखादे मंगलकार्य घडावे. युवावर्गाला नोकरी, विवाह या अनुषंगाने उत्तम योग यावेत. कुटुंबात सहकार्याचे वातावरण राहील. काहीसा खर्च वाढेल. जमिनीशी संबंधित व्यवहार संभव.
शुभ दिनांक- २१, २२, २६.

वृश्‍चिक : कामाचा व्याप वाढेल
राशिस्वामी मंगळ पराक्रमात उच्चीचा व राशिस्थानी रवी व शनी हे विरोधी तत्त्वाचे ग्रह एकत्र असतानाच लाभ स्थानात गुरू व भाग्यात चंद्र अशा ग्रहस्थितीत हा आठवडा सुरू होत आहे. रवी-शनी त्रासदायक आहेत. अप्रामाणिक लोकांपासून त्रास संभवतो. आपल्या कार्यक्षेत्रात, नोकरी-व्यवसायात अशा लोकांना काहीसे दूरच ठेवायला हवे. धनस्थानातील शुक्र वाढीव खर्च करावयास लावू शकतो, मात्र त्यायोगे कुटुंबात आनंद व समाधानाचे वातावरण राहील. आपल्या कामाचा व्याप वाढू शकतो. मात्र, त्याचा लाभ मिळेल. जबाबदारी वाढेल. आर्थिक लाभही होईल. प्रतिष्ठा वाढेल. संततीचा उत्कर्ष घडून येईल. प्रकृती मात्र सांभाळावयास हवी.
शुभ दिनांक- २१, २३, २५.

धनू : मोठे परिवर्तन संभव
राशिस्वामी गुरू दशमात, राशीत शुक्र, धनात उच्च मंगळ आणि अष्टमात चंद्र अशा स्थितीत हा आठवडा सुरू होत आहे. चंद्र अष्टमात असल्याने सुरुवात काहीशी निराशाजनक असली, तरी चंद्र भाग्यात जाताच परिस्थितीत मोठे परिवर्तन अनुभवू शकाल. व्ययातील शनीमुळे काहीसा संघर्ष करावा लागू शकतो, मात्र यशाची खात्री बाळगता येईल. गुरू कार्यक्षेत्रात तसेच कुटुंबात समाधान व सहकार्याचे वातावरण निर्माण करीत आहे. नोकरी-व्यवसायात पदोन्नती व अधिकारपद मिळावे. सहकार्‍यांशी मिळून मिसळून वागल्यास अनेक अडचणी दूर होऊ शकतील. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. शुभ दिनांक- २१, २२, २३.

मकर : कामाची छाप पडेल
राशिस्वामी शनी लाभात असला, तरी तो शत्रू रवीच्या सान्निध्याने जरा दुखावला आहे. मात्र, राशीतील मंगळ, भाग्यातील गुरू व सप्तमातून या आठवड्यातील भ्रमणास सुरुवात करणारा चंद्र आपणांस उत्तम योग आणून दिलासा देऊ शकतात. या आठवड्यात आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपल्या कामाची उत्तम छाप आपल्या कार्यक्षेत्रावर पडू शकेल. त्यामुळे आपला दर्जा, प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती, पगारवाढ मिळेल. महत्त्वाची कामे, नवीन योजना आदी या आठवड्यात सुरू करता येऊ शकतील. कुटुंबातील वातावरण सामंजस्याचे व सहकार्याचे राहील. कुटुंबात मंगलकार्ये ठरतील. युवावर्गास विवाह-संततीसंबंधाने उत्तम येऊ शकतात.
शुभ दिनांक- २०, २३, २५.
कुंभ : आर्थिक ओढाताण राहील
राशिस्वामी शनी दशमात शत्रू रवीच्या सान्निध्यात आहे. धनेश गुरू अष्टमात आहे. उच्चीचा मंगळ व्ययस्थानात व षष्ठात चंद्र अशा ग्रहयोगासह आपला हा आठवडा सुरू होणार आहे. नोकरी-व्यवसायात संमिश्र वातावरण राहील. धनेश अष्टमात असल्याने काहीशा आर्थिक ओढाताणीतूनच आपल्याला या आठवड्यात मार्गक्रमण करावे लागणार आहे. अशातच व्ययातील मंगळ काही अचानक खर्च निर्माण करू शकतो. युवावर्गाला मात्र हा मंगळ नोकरी-व्यवसायाच्या उत्तम संधी निर्माण करू शकतो. कार्यक्षेत्रात यश व प्रतिष्ठा लाभेल. नवीन खरेदीमुळे कुटुंबात आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकेल. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक- २१, २२, २३.

मीन : यश, प्रतिष्ठा मिळेल
राशिस्वामी गुरू सप्तमात आणि पंचमात चंद्र या अतिशय उपयुक्त ग्रहस्थितीसह आपला हा आठवडा सुरू होत आहे. भाग्यात रवी-शनी, दशमात शुक्र आणि लाभात उच्च मंगळ अशीही ग्रहस्थिती लाभलेली आहे. उत्तम यश आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा हा आठवडा आहे. नोकरी-व्यवसायात अपेक्षित संधी लाभतील. अधिकारीवर्गाचे साहाय्य मिळेल. विरोधकांना योग्य उत्तर देऊन नामोहरम करू शकाल. भागीदारीच्या व्यवहारातून लाभ व्हावा. काहींना विदेशगमनाच्या दृष्टीने चांगल्या संधी लाभू शकतील. आठवड्याच्या शेवटी मात्र खर्चावर काहीसे नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शुभ दिनांक- २३, २४, २५.
• मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६