तो जिवंत आहे

0
177

कथा
केवळ पंधराच मिनिटात पोलिस इन्स्पेक्टरांची गाडी चेरियन हार्ट हॉस्पिटलजवळ पोहोचली. दारातच उभे असलेले डॉक्टर पुढे आले. त्यांनी रमणीकांतच्या हातून ती हृदय असलेली पेटी घेतली…

‘मम्मा, आज कॉलेजला लवकर जायचंय.’’ जितेन्द्र हॉलमधून ओरडला. ‘‘आज तर एक्स्ट्रा पिरीयड नाहीत तुझे, आणि होतेच तर काल नाही का सांगायचं?’’
‘‘अग, मी सांगतो ना, काल घेतलेली हिरो होंडा त्याला आपल्या मित्र-मैत्रिणींना दाखवायची असेल. खरं ना जितेन्द्र?’’ रमणीकांत किचनमध्ये जात म्हणाले.
‘‘यू आर राईट पप्पा.’’ जितेन्द्रनी लहान मुलासारख्या दोन उड्या मारल्या. काल संध्याकाळी गाडी आल्यावर दहा-पाच मित्रांना दाखवून तो उशिराच घरी आला होता. तेव्हा कांचन म्हणाली होती, ‘‘सार्‍या मित्रांना गाडी दाखवलीस. तुझ्या आजीला दाखव ना गाडी!‘’
‘‘आजीला बसवून चक्कर मारून आणतो.’’
‘‘नको रे बाबा. त्या पडतील. अगोदरच त्यांचा एक पाय अखडला आहे.’’
‘‘असू दे, आजीला गाडी थोडीच चालवायची आहे. मी घेऊन जातो.’’
‘‘गाडी आणून चार तासच झालेत. अजून तुला प्रॅक्टिस नाही. ने मग दोन-चार दिवसांनी, शिवाय गाडी उंच आहे, बसताना त्रास होईल.’’
‘‘आजची नवीन गाडी, दोन दिवसांनी नवीन थोडीच राहणार आहे?’’
‘‘म्हणजे दोन दिवसांनीच ती जुनी होणार?’’ तो खळाळून हसला.
इंजिनीअरिंग कॉलेजला गेल्यावर तुला गाडी घेऊन देईन म्हटलं, तरी अनंत अडचणी आल्या होत्या. कॉलेजची फी, आईची बायपास सर्जरी, कांचनचं दुखणं हे सारं करताना गाडी मागे पडली होती. कधी बस, कधी ऑटो, कधी मित्रांच्या मागे बसून जाताना समंजस जितेन्द्र बोलला नव्हता. पण, कांचन आणि रमणीकांत मनातून दु:खी होते.
‘‘गाडी इस्टॉलमेंटनी नाही का घेता येणार?’’ कांचननी विचारलंच. ‘‘मलाही खूप खूप वाटतंय्.’’ नेहमीचेच रमणीकांत आणि कांचनचे हे संवाद. परंतु, या वेळी मात्र कांचन म्हणाली-
‘‘तुम्ही काहीही करा, पण त्याला ‘हिरो होंडा’ घेऊनच द्या.’
रमणीकांतनी काय केलं होतं कुणास ठाऊक, पण काल संध्याकाळी हिरो होंडा घरी आली होती. जितेन्द्रच्या चेहर्‍यावरचा कमालीचा आनंद पाहून कांचन आणि रमणीकांत सुखावले होते.
आजीला उठवून तिला कसंबसं बसवून त्याने तिला फिरवून आणलं. या सार्‍या प्रकारात झोपायला चांगलाच उशीर झाला होता आणि कधी नव्हे ती कांचनला अगदी सूर्यकिरण अंगावर येईपर्यंत झोप लागली होती. ती घाईने उठली. घड्याळात साडेसहा झाले होते. नऊला रमणीकांतचा डबा आणि जितेन्द्रचा नाश्ता तयार करायचा होता. रमणीकांत आपल्या आईला चहा नेऊन देत होते.
‘‘मला उठवायचं नाही का?’’
‘‘रोजच तू पहाटे उठतेस ना, एखाद् दिवशी झाला उशीर तर…’’
‘‘तर काय? वेळेवर तर व्हायला हवं ना?’’
‘‘मला डबा देऊ नकोस.’’
रमणीकांत टॉवेल घेऊन बाथरूमकडे वळले एवढ्यात जितेन्द्र ओरडला होता, ‘‘मला लवकर जायचंय.’’
‘‘असं करते. मी प्रथम उपमा करते. मग स्वयंपाकाचं बघते.’’
रमणीकांत टॉवेल घेऊन बाथरूमकडे वळणार एवढ्यात जितेन्द्र बाथरूममध्ये गेला. रमणीकांत मनापासून हसले.
‘‘रोज तो सव्वा नऊला, दहादा म्हणावं तेव्हा जातो, आज पाहा ना…’’
‘‘खरं आहे कांचन, आज त्याचा आनंद पाहून मला माझे कॉलेजचे दिवस आठवलेत. माझ्या बाबांनी नव्वद रुपयांची सेकंडहँड सायकल घेतली तेव्हा मी असाच आनंदित झालो होतो. सायकलशिवाय मी शाळेतच जाणार नाही, अशी धमकीच मी माझ्या बाबांना दिली. परंतु, आम्ही पाच भावंडं, शिवाय आजी-आजोबा. एवढा सारा खर्च चालवून मला सायकल घेणं त्यांना शक्यच होणार नव्हत. शाळा दोन मैलावर होती. मीच काय, माझे मित्रही पायी जात येत होते.’’
‘‘मग घेतली सायकल तुमच्या वडिलांनी?’’
‘‘कुठे घेतली. मी चार दिवस शाळेत गेलो नाही. मी दोन दिवस अति आग्रह करून घेत जेवलो. दहा-बारा दिवस बाबांशी अबोला धरला. अखेर माझे बाबा मला जवळ घेत म्हणाले. ‘‘रमणी, तुला माहीत आहे, तुला समजतं सारं. तू सर्वांत मोठा आहेस. प्रत्येकच बापाला वाटतं, आपल्या मुलाची सारी हौस करावी. तू आता नववीत आहेस. चल माझ्या खोलीत.’’
‘‘खोलीत कशाला नेलं?’’
‘‘तेच सांगतोय मी. मला खोलीत नेऊन त्यांनी आपला पगार आणि खर्च दोन्हीच्या वर्षाच्या डायरीतला खर्च दाखवला. मी काय बोलणार? मी शहाणा झालो. मी बोलत नव्हतो, पण माझ्या मनात सायकल होती. स्वप्नात ती दिसायची. मी वार्‍याच्या वेगाने सायकल चालवतोय हे स्वप्न अगदी रोज पडायचं. प्रत्यक्ष जागेपणीही मी हे स्वप्न पाहत होतो आणि एक दिवस माझ्या बाबांनी मला नव्वद रुपयांची जुनी सायकल आणली.’’
‘‘तुम्हाला नवीन सायकल हवी होती ना?’’
‘‘मला सायकल मिळाली हेच खूप झालं. मी त्या सायकलीची पूजा केली आणि प्रत्येक भावंडाला आळीपाळीने सायकलवर फिरवत राहिलो. त्यानंतर कितीतरी कामं मी करत राहिलो. सायकलवर माझा जीव जडला होता.’’
‘‘मग बाईक कधी घेतलीत?’’
‘‘कुठे घेतली? आजही मी बसनेच तर जातोय.’’
‘‘अंतर लांब म्हणून जाता आहात.’’
‘‘मी बोललो नाही. पण आता बोलतो, मी माझ्या मुलाला छानशी बाईक घेऊन द्यायचं मात्र ठरवलंच होतं. आणि आता आपल्यासाठी मारुती कार. संपलं. माझ्या मध्यमवर्गीय माणसाच्या याहून काय अपेक्षा असणार? पहिले घर झालं, आता बाईक, मग गाडी. आपला एकुलता एक जितेन्द्र आणि पुढे त्याची नोकरी, संसार. दिवस कसे पाखरागत उडाले आणि पुढेही असेच दिवस उडून जातील.’’
‘‘बघा, आज मला उठायला उशीर झाला. त्यातच तुम्ही एवढं बोलत बसलात.’’ ‘‘जाऊ दे. कधीतरी मनात दडलेल्या जुन्या आठवणी दाटून येतात मग सांगितल्याविना राहवत नाही. बोलता बोलता उपमा झालाय ना? आज मी ऑफिसमध्येच लंच घेईन.’’
तिने टेबलावर उपमा भरून दोन प्लेट ठेवल्या आणि दोन ग्लास दूध ठेवलं. जितेन्द्र घाईने स्नान करून आला. नेहमीप्रमाणे त्याने हे नको ते नको म्हटलं नाही. त्याने उपमा भराभर खाऊन संपवला.
‘‘आता लवकर निघाला आहेस. परतणार कधी साहेब?’’
‘‘येईन ना गं!’’
‘‘अरे पण कधी? कॉलेज साडेतीनलाच संपतं.’’
‘‘येतो ना गं.’’
‘‘आणि जेवणाचं काय?’’
‘‘आई, उपमाच जेवलोय मी. ताटभर उपमा खाल्लाय मी. शिवाय दूधही पितो आहे ना! तू काय मला राक्षस समजलीस?’’
‘‘तुझ्या पोटात नेहमीच राक्षस असतो.’’ कांचन खळखळून हसत पुढे म्हणाली, ‘‘तो राक्षस रसिक आहे. त्याला असं तसं आणि रोज रोज तेच ते नको असतं. त्याला हवे असतात सकाळ-संध्याकाळ चमचमीत पदार्थ.’’
जितेन्द्रही मनापासून हसला. आईच्या खांद्याला धक्का देत म्हणाला,
‘‘तू पण अशी आहेस ना आई.’’
‘‘कशी रे बाबा, मी कशी आहे?’’
‘‘आल्यावर सांगतो आई. आल्यावर तुला एक गंमत सांगणार आहे.’’
‘‘सांगून जा.’’ दुधाचा ग्लास रिकामा करून तो बाहेर हॉलमध्ये गेला होता.
‘‘अरे सांग तर…’’ ती त्याच्या मागे येत म्हणाली.
‘‘नाही सांगत आता. मग सांगेन ना…’’ त्याने भराभर पुस्तकं बॅगमध्ये कोंबली आणि बाईकची किल्ली घेऊन निघाला. तसं ती म्हणाली,
‘‘दहा मिनिटं थांबला असतास तर…!’’
‘‘आई, गंमत सुजाताची आहे.’’ गेटबाहेर पडल्यावर तो ओरडला. तशी कांचन हसली, कालपरवाच तिने विचारलं होतं.
‘‘कोण रे ही सुजाता, वारंवार तिचं नाव तुझ्या बोलण्यात असतं!’’
‘‘आमच्या कॉलेजमधली सर्वांत सुंदर आणि हुशार मुलगी सुजाता असल्यामुळे तिचं नाव प्रत्येकाच्याच तोंडात असणार ना?’’
‘‘परंतु तुझ्या उजळत्या चेहर्‍यावरून वाटतंय् ती तुला बरीच आवडत असावी.’’
‘‘प्रत्येकालाच ती आवडते. आहेच तशी ती.’’
‘‘तरी तुला ती अधिकच ना?’’
‘‘आई, तू ना उगाच…’’
‘‘खरं काय ते सांगशील?’’
‘‘सांगेनच, सांगावंच लागेल ना मला? परंतु वाट पाहा आई.’’
आणि त्या दिवशी तो विषय अर्धवट सोडून निघून गेला. आजही तेच केलं होतं. ‘‘कधी पूर्ण काम केलंय् असं नाहीच.’’ मनाशी म्हणत ती आत आली.
रमणीकांत तयार होऊन निघाले तसं ती म्हणाली,
‘‘दहा मिनिटं थांब म्हटलं तर जितेन्द्रनी ऐकलं नाही. हवाच शिरलीय पोरात.’’
‘‘असू दे गं. जाईन मी बसने. त्याला आनंद घेऊ दे.’’
‘‘बरं, मोबाईल घेतलाय ना?’’
‘‘हो. घेतलाय.’’
‘‘आज जेवण राहिलं माझ्याचमुळे.’’
‘‘तुम्ही बायका ना, एकच एक घोकत असता, उपमा खाल्लाय ना पोटभर.’’
रमणीकांत पायर्‍या उतरून गेटजवळ गेले. नेहमीप्रमाणे मागे वळून हाताने निरोप घेतला आणि ते मेनरोडला लागले तसं कांचन आत आली.
‘‘गेला का गं रमण?’’
‘‘तेही गेले आणि जितेन्द्रही त्यापूर्वीच पळाला, थांब म्हटलं तरी ऐकलं नाही.’’
‘‘असू दे गं. त्याला खूप आनंद झालाय् ना. जाऊ दे त्याला. फक्त गाडी वेगात नेऊ नकोस, असं सांगायला हवं होतंस.’’
‘‘माझं ऐकणार होता का तो?’’
‘‘तेही खरंच म्हणा.’’
कांचन आता आपल्या कामाला लागली. दुपारी ती आणि तिच्या सासूबाई जेवायला बसणार तोच फोनची रिंग वाजली. फोन रमणीकांतचा होता. तिने हसत विचारलं-
‘‘आम्ही जेवायला बसतच होतो. मला वाटतं, घरच्या पदार्थांचा वास तुमच्यापर्यंत आलेला दिसतोय. फोन कशाला केलात?’’
‘‘हेच की, चुकूनच लागला. जेवा तुम्ही.’’
‘‘तुमचा आवाज असा का?’’
‘‘काही नाही, ठीक आहे. जेवा तुम्ही.’’
दोघी जेवायला बसल्या. रमणीकांतची आई थकलेली होती. फारसं चालणं नव्हतं. घरातल्या घरात ती फिरायची. जेवायला मात्र ती खाली पाटावर बसायची. उठताना, बसताना त्रास व्हायचा. कांचन तिला मदत करायची. आजही दोघी बोलत जेवत होत्या. तेवढ्यात पुन्हा रिंग वाजली. कांचन अर्धी जेवण सोडून उठली.
‘‘जेवण झालं?’’
‘‘आईचं झालं, माझं होत आलंय, पण पुन्हा फोन कशाला केलात आणि तुमचा आवाज असा का?’’
‘‘कांचन, आपल्या जितेन्द्रला ऍक्सिडेंट झालाय्. त्याला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये आलोय. म्हणजे नुकताच आलोय. आईला न सांगता तू लवकर ये.’’
कांचनच्या शरीरातील शक्तीच गेली. हातापायाला कंप सुटला. तिने फोन कसाबसा खाली ठेवला आणि ती किचनमध्ये आली. मनातला गोंधळ लपवून सासूबाईंना काय सांगावं, असा तिला प्रश्‍न पडला. दुसर्‍याच क्षणी कांचन म्हणाली-
‘‘आई, माझी मैत्रीण कल्याणी इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्यांचाच फोन होता. इथे त्यांच्या ओळखीचं कोणी नाही म्हणून….’’
‘‘जा ना तू. जेऊन घे. मी आवरीन सारं.’’
‘‘नको. आता नाही इच्छा होत. आवराल ना तुम्ही? मी शेजारी सांगून जाते. कारण मला वेळ होईल.’’
तिने शेजारी सांगितलं आणि मनाचा बांध आवरत, हृदयाची कालवाकालव लपवत तिने ऑटो केला. हॉस्पिटलमध्ये पोहचून रमणीकांत ना पाहीपर्यंत तिच्या जिवात जीव नव्हता.
‘‘काय झालं?’ तिने व्याकुळतेनं विचारलं.
‘‘जितेन्द्र गाडी घेऊन भर वेगात निघाला आणि त्याला त्याचा वेग कंट्रोल करता आली. झाडावर आदळला आणि… आणि तो प्रचंड जखमी झाला.’’
‘‘तुम्हाला कसं कळलं?’’
‘‘मी बसमधून उतरलो आणि ऑफिसकडे वळणार तोच कुणीतरी ओरडलं आणि आवाजही आला. मी उत्सुकतेपोटी मागे वळून बघितलं. तेव्हा रोडच्या पलीकडे असणार्‍या झाडाजवळ गर्दी दिसली. म्हणून मीही उत्सुकतेने निघालो. तर आपला जितेन्द्र.’’ बोलता बोलता त्यांचा कंठ भरून आला होता. ‘‘कशी आहे त्याची तब्येत?’’ तिने व्याकुळतेनं विचारलं.
ते काहीच बोलले नाहीत. चेंदामेंदा झालेली बाईक आणि छिन्नविछिन्न, रक्ताने माखलेला त्याचा देह कसाबसा त्यांनी एका मारुती व़्हॅनमध्ये ठेवला तेव्हा त्याच्या मृत्यूची जवळ येत जाणारी पावलं त्यांना स्पष्ट दिसली होती. उपचार म्हणूनच डॉक्टरांनी आत नेलं असावं, असं त्यांना वाटलं. ते शांतपणे म्हणाले.
‘‘कांचन, मघाशी तू त्याला कॉलेजात जाताना हसत निरोप दिलास ना? तसाच प्रसंगच आला तर आताही त्याला हसत निरोप द्यायचाय.’’
‘‘म्हणजे?’’ तिचा कंठ दाटून आला होता.
‘‘म्हणजे डॉक्टर प्रयत्न करतीलच परंतु…’’
ती काही बोलणार तोच डॉक्टर बाहेर आले.
‘‘आय ऍम एक्स्ट्रीमली सॉरी टू से दॅट, ही इज नो मोअर. मि. रमणीकांत.’’
‘‘मला त्याची कल्पना होतीच.’’
कांचनच्या जिवाचा आकांत झाला. अवघं शरीर गदगदलं, तोंडावर पदर ठेवून तिने अश्रूंनाही थोपवलं.
‘‘डॉक्टर प्लीज एक कराल का?’’
‘‘सांगा, मी काय करू शकतो तुमच्यासाठी?’’
‘‘माझ्या मुलाचे नेत्र चांगले असतील तर ते नेत्रपेढीला द्यावेत आणि किडनी डॅमेज नसेल तर तीही एखाद्याच्या कामी यावी.’’
डॉक्टर क्षणभर गोंधळले. आपल्या समोर इंद्रियांना जिंकणारा जितेन्द्र प्रत्यक्ष उभा आहे, असं त्यांना वाटलं.
‘‘ओ. के.’’ डॉक्टर पुन्हा आत गेले आणि परत येऊन सांगितलं,
‘‘तुमच्या इच्छेप्रमाणे नेत्र, नेत्रपेढीला आणि किडनीही किडनी बँकेला देण्याची व्यवस्था केलीय. तुम्ही फक्त फार्मवर सही करा. खरंच आय ऍम प्राऊड ऑफ यू!’’
‘‘डॉक्टर, आणखी एक काम कराल?’’
‘‘काय करू?’’
‘‘मघाशी तुम्ही म्हणालात, ‘देअर इज नो होप, क्लिनिकली ही इज डेड. हिज ब्रेन हॅज लॉस्ट ऑल द सेन्सेस.’’
‘‘हो. तशीच कंडिशन होती आणि तो तुम्ही मृत घोषित केलात. डॉक्टर त्याचा मेंदू मृत झाला. तरीदेखील डोळे आणि किडनी चांगली होती.’’
‘‘हो. ते काढून घेण्याची व्यवस्था तातडीने केली आहे.’’
‘‘डॉक्टर, प्लीज त्याचं हृदय काम करत असेल तर…’’
‘‘हृदय?’’ डॉक्टरांच्या मनातही तसा विचार नव्हता. आपल्या एकुलत्या एका मुलाचा असा भीषण अपघात स्वत: पाहून आणि त्याला मृत घोषित केल्यावरही त्याच्या डोळ्यांचं, किडनीचं दान करणारा हा पिता त्यांना दानशूर कर्णापेक्षाही मोठा वाटला होता. त्यात ‘हृदय’ म्हटल्यावर तर डॉक्टरांचेच डोळे भरून आले. ते परत ऑपरेशन रूममध्ये गेले आणि काहीच सेकंदात ते धावतच बाहेर आले.
‘‘मि. रमणीकांत. हृदय एकदम ठीक आहे.’’
‘‘मग ते काढून कोणाला देता येईल ना?’’
‘‘देता येईल. परंतु, केवळ अर्धा तासच ते जिवंत राहू शकेल आणि इथे या हॉस्पिटलमध्ये हृदय बँक नाही. तुम्हाला चेरियन हार्ट हॉस्पिटलमध्ये जावं लागेल.’’
‘‘चालेल. जाईन मी.’’
‘‘इथून अपोलो वीस मिनिटांच्या अंतरावर आहे. शिवाय रस्त्यात प्रचंड रहदारी आहे. अशक्य आहे ते.’’
‘‘डॉक्टर मी प्रयत्न करतो. तुम्ही ते हृदय काढून मला द्या आणि अपोलो हॉस्पिटलला फोन करा. कराल ना डॉक्टर एवढं?’’
डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यावर आश्‍वासक थोपटलं आणि ते आत गेले. एकेक सेकंद महत्त्वाचा होता. हॉस्पिटलच्या तीन ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये नव्हत्या. डॉक्टर विचार करत होते. वीस मिनिटांतच रमणीकोतने पोहचणं आवश्यक आहे. त्यांचे हात भराभर काम करत होते. त्यांनी धडधडत्या हृदयाने त्याचं इवलंस हृृदय काढलं आणि बर्फाच्या पेटीत ठेवलं. ते घेऊन ते बाहेर आले. रमणीकांतच्या हाती ते हृदय दिलं.
कांचनला आता मात्र अश्रू आवरता आले नाहीत. तिच्या खांद्यावर हात देऊन रमणीकांत म्हणाले,
‘‘देवाला प्रार्थना कर. मी तिथे वेळेत पोहचेन. तू इथेच थांब.’’
ती काही बोलली नाही. बोलण्यासारखं होतं तरी काय?
‘‘मी फोन केला आहे. हवं तर मी ही तुमच्याबरोबर येतो.’’
‘‘तुम्ही आलात तर फारच उपकार होतील. म्हणजे वेळात सारं नीट होईल.’’
ते दोघं निघाले. डॉक्टरांनी मोबाईलवर अपोलोत जात असल्याचं हॉस्पिटलमध्ये सांगितलं तसंच ‘अपोलो’ला येत असल्याचं तिकडे पुन्हा कळवलं. कांचन बेंचवर बसली. एवढ्यात कॉलेजच्या मुलांचा एक घोळका आला.
‘‘तुम्हाला कसं कळलं?’’
‘‘काय झालं, ही सुजाता पाच मिनिटापूर्वी रस्त्यातल्या एका दुकानात काही कामासाठी म्हणून त्याच्या बाईकवरून उतरली आणि तो बाईक घेऊन पुढे गेला. का आणि कशासाठी कुणास ठाऊक. पण बहुधा वेगातच त्याने गाडी टर्न केली असावी. त्यात झाडावर आपटली. दुकानातलं सामान घेऊन सुजाता रोडवर आली तेवढ्यातच आवाज आला आणि ती त्याला हॉस्पिटलमध्ये नेत असल्याचं पाहून घरी आली. आम्हाला फोन केले.’’
कांचन सुजाताकडे पाहत होती. अति दु:खाने म्लान झालेल्या सुजाताकडे पाहून कांचनच्या नेत्रात पाणी आलं. वाटलं हिला सांगावं, ‘‘तुझ्यावर जीव जडला होता गं माझ्या जितेंद्रचा.’’ परंतु, कांचन मनातल्या मनातसुद्धा हे वाक्य बोलायला घाबरली. ती सुजाताकडे केवळ पाहत होती. अप्सरेचं रूप घेऊन आलेली ही विद्यावती आपली नाही, याची जाण तिला होती.
‘‘मम्मा…’’ सुजाता कशीबशी बोलली अणि कांचनला बिलगली. त्याही स्थितीत कांचनला समाधान झालं. कांचन तिला कुरवाळत राहिली.
डॉक्टर आणि रमणीकांत बाहेर आले. हॉस्पिटलसमोर पेशंट, गाड्या आणि भेटायला येणार्‍यांची गर्दी होती. एखादा ऑटो किंवा टॅक्सी करावी म्हणून ते घाईने ऑटोकडे वळणार, तेवढ्यात एक पोलिस व्हॅन त्यंाच्यासमोर ब्रेक दाबून थांबली.
‘‘अरे भई, मरना है क्या?’’ ड्रायव्हर म्हणाला. गाडी थांबल्यावर त्यातून पोलिस इन्स्पेक्टर खाली उतरले. ड्रायव्हर उतरून हॉस्पिटलमध्ये गेला. पाहून चालत जा. एवढी मोठी गाडी दिसली नाही?’’
‘‘दिसली. परंतु, तरीही मनच थार्‍यावर नव्हतं.’’ रमणीकांत म्हणाले.
‘‘काय झालं?’ त्यांनी आत्मीयतेने चौकशी केली. तसं डॉक्टर म्हणाले, ‘‘चेरियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मुलाचं हृदय केवळ पंधरा-वीस मिनिटात पोहचवायचं आहे.’’ हे डॉक्टर बोलेपर्यंत रमणीकांत एका ऑटोला विचारत होते.
‘‘बसा चटकन गाडीत. बोलवा त्यांना.’’ डॉक्टरांनी रमणीकांतला हाक मारली. गाडीत बसायला सांगितलं तेव्हा रमणीकांत म्हणाले, ‘‘फार फार उपकार झालेत तुमचे.’’ रमणीकांतचे डोळे भरून आले. पोलिस इन्स्पेक्टर आनंद गाडी चालवू लागले. सतत हॉर्न वाजवत होते. त्यामुळे रस्ता मोकळा होत होता. त्यातच त्यांनी चौकाचौकात असलेल्या ट्रॅफिक नियंत्रण कक्षाला फोन करून चौकातही गाडी थांबणार नाही, एवढंच नव्हे, तर रहदारी अडवून ठेवण्याच्या सूचना दिल्या. गाडी एकशे वीसच्या स्पीडने भर रहदारीतूनही पळत होती. चार चौकात रहदारी त्या गाडीची वाट पाहत थांबली होती.
केवळ पंधराच मिनिटात पोलिस इन्स्पेक्टरांनी गाडी चेरयिन हार्ट हॉस्पिटलजवळ थांबवली. हॉस्पिटलच्या दारातच उभे असलेले डॉक्टर पुढे आले. त्यांनी रमणीकांतच्या हातून ती ़हृदय असलेली पेटी घेतली आणि डॉक्टरांनी त्यांचे आभार मानले.
‘‘सहा वर्षाच्या एका मुलाचं हृदय बदलवायचं आहे. त्यासाठी आम्ही हृदयाच्या शोधात होतो. अगदी वेळेवर आलात तुम्ही. यू आर ग्रेट! व्हेरी व्हेरी ग्रेट!’’ डॉक्टर म्हणाले. तसं रमणीकांत म्हणाले,
‘‘त्या मुलाला मी पाहू शकतो?’’
‘‘व्हाय नॉट? प्लीज कम विथ अस.’’ डॉक्टरांच्या मागे पोलिस इन्स्पेक्टर, डॉक्टर आणि रमणीकांत निघाले.
आय सी युमध्ये मंद मंद श्‍वास घेत असलेल्या त्या मुलाला पाहताच रमणीकांत पुढे झाले. त्याच्या मस्तकावरून हात फिरवताना त्यांच्या नेत्रांतून अश्रू ओघळले.
‘‘माझा जितेन्द्र आता या बाळाच्या हृदयातून बोलेल, हसेल. माझा जितेन्द्र सजीव झाला आहे. या बाळाच्या रूपाने.’
पुढे त्यांना काहीच बोलता आलं नाही आणि इतरही कोणी बोलू शकलं नाही. रमणीकांतच्या खांद्यावर इन्स्पेक्टर आनंदनी हात ठेवला आणि न बोलता ते अपोलो हॉस्पिटलमध्ये परतले.
कांचन त्यांना पाहताच पुढे गेली.
‘‘आपला जितेन्द्र नव्या डोळ्यांनी पाहिलं. कोणाला तरी किडनीमुळे जीवदान मिळेल. चेरियन हॉस्पिटलमधल्या मुलाला जितेन्द्रचं हृदय मिळेल. आपला जितेन्द्र जिवंत आहे कांचन, तो जिवंत आहे. आता अजीबात रडायचं नाही. मनातून दु:ख वाटून घ्यायचं नाही. अगं फुलाफुलात हसावं तसं तो अनेकांतून हसणार आहे. त्याचे अवयव जिवंतच असणार आहेत.’’
त्यांनी कांचनच्या खांद्यावर हात ठेवला. कांचनला आपले अश्रू आवरता येत नव्हते. जितेन्द्रचा मित्रपरिवारच नव्हे, तर हॉस्पिटलमधले लोकही हे महादान पाहून भारावले होते.
मृतदेह काहीच वेळाने मिळणार होता. त्यांनी कांचनला म्हटलं, ‘‘कांचन, घरी आईला सांग, दु:ख होऊ न देता सांग, तो आता फक्त एकदाच आणि एकदाच आपल्या घरात येणार आहे. त्याचं स्वागत कर. कॉलेजला जाताना त्याचा आनंदी चेहरा आठव. दु:खी होऊ नकोस. आणि कांचन, त्याच्या मित्रांना फोन करायला सांग, आपल्या नातेवाईकांना, तो एकदाच… फक्त एकदाच भेटणार आहे आपल्याला.’’ आणि रमणीकांत अनावर होऊ रडू लागले…
शुभांगी भडभडे/९३७३१२१४३७