श्रीलंकेतील लोकनृत्य

0
126

एखाद्या देशाच्या संस्कृतीची झलक तेथील लोकनृत्य आणि लोकसंगीतावरून मिळते, असे म्हणतात. कँडीमधील मुक्कामात सायंकाळी आम्ही यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशनच्या सभागृहात, श्रीलंकेतील नृत्य आणि संगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो. भाषा अगम्य असली, तरी नृत्य आणि संगीतात त्यापेक्षा भावनांना जास्त महत्त्व असते. भाषा कळली नाही, तरी कला कळते. सभागृह छोटे होते आणि तिथे आमच्यासारखे विदेशी पर्यटक व लंकेतील स्थानिक बघेसुद्धा आले होते. आत खूप उकडत होते. तशात कर्कश संगीत चालू झाले.
लंकेतील नृत्यात भावनांची वानवा होती. तेथे विदेशी पर्यटकांसमोर जी कला म्हणून पेश होते, तीपेक्षा आपल्या ग्रामीण भागातील कला कैकपटीने अधिक उत्कृष्ट व समृद्ध असल्याचे जाणवले. त्यांच्या नृत्याचे ‘सिंहली अटम’ असे जोरदार नाव असले, तरी ते नृत्य ‘कथकली’ अथवा ‘भरतनाट्यम्’च्या आजूबाजूलासुद्धा पोचत नाही. नृत्यात जोश असला आणि हात-पाय अगदी तालासुरात हलत असले, तरी ते नृत्य मनाला आनंद देणारे वाटले नाही, एवढे खरे. नृत्याचे दहा प्रकार होते आणि अकरावा आगीवरून चालण्याचा थरारक भाग होता.
विजय जेव्हा तांबापाणी म्हणजे ताम्रपर्णीला उतरला, तेव्हा स्थानिक जमातीने त्याचे नृत्य करून स्वागत केल्याचे सांगितले जाते. पुढे अशोककन्या लंकेत आली, तेव्हा तिच्यासोबत जे पांच वादक आले होते, त्यांना पंचतुर्यनाद म्हणत. त्यांनी आणलेली अतत, वितत, बिगतात ही चर्मवाद्ये आणि शिशिराय म्हणजे बासरी व घन म्हणजे झांज ही वाद्ये आजही वापरत आहेत. पुढे बौद्धप्रभाव वाढल्यानंतर या कलेला राजाश्रय मिळणे घटत गेले. साहजिकच नृत्य नाटिकेला उतरती कळा लागली. बौद्धभिक्खूंची मने चाळवली जातील, या भीतिपोटी हे घडले. कलेला प्रोत्साहन मिळाले, तर ती टिकते आणि वाढते. अन्यथा तसे होणे कठीण असते. पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांना लंकन कलेबद्दल आत्मीयता कशी असेल, त्यामुळे त्यांनीसुद्धा तिकडे लक्ष दिले नाही.
श्रीलंकन नृत्याचे तीन प्रकार आहेत. त्या प्रत्येक नृत्याचे देव वेगवेगळे आहेत. काही नाच हे प्राण्यांवर बेतलेले आहेत. गजग वन्नाम हे हत्तीसारखे धिम्या गतीने तर तुरंग वन्नाम हे घोड्याच्या टापांसारख्या गतीने चालते. उकुस्स वन्नाम हे ससाणा ज्याप्रमाणे एका गतीने उडतो आणि खायला काही दिसताच तुफान वेगाने सूर मारतो, तसे आरंभी धिम्या लयीने चालणारे नृत्य नंतर खूप वेग धारण करते. काही नृत्ये ही कारणवश केली जातात. उदाहरणार्थ, रोग प्रतिकारासाठी केला जाणारा रुहुनू आणि साबरगामुआ नामक नाच होय. रुहुनू हे दक्षिणेकडचे, साबरगामुआ हे रत्नपूर भागातील तर कॅण्डीमधील नृत्य वेस, हे पहाडी भागातील नृत्यप्रकारात मोडते. नर्तक रंगीबेरंगी पण भडक पोशाख आणि शिरोभूषणे घालून तालाच्या ठेक्यावर नाचतात. गायन हा प्रकार मात्र अगदीच यथातथा वाटला.
प्रारंभी शंख वादन झाले आणि मग मृदुंग व झांज वादन झाले. सोबतीला गाणे होते. आत जाताना सर्व नृत्य प्रकारांची एक यादी पर्यटकांना दिली जाते. ती जगातील वेगवेगळ्या भाषांमधून आहे. भारतीय पर्यटकांना मात्र इंग्रजी यादी दिली जाते. त्याबद्दल आम्ही तेथील चालकाकडे ‘‘हिंदी यादी का नाही?’’ अशी विचारणा करताच, ‘‘तुम्हीच अशी मागणी करणारे पहिले आहात, आजवर कोणा भारतीयाने तशी मागणी कधी केली नाही,’’ हे उत्तर ऐकावे लागले. याबाबतीत आपण किती कणा मोडलेले लोक आहोत, हे प्रकर्षाने जाणवले. जगातील अनेक भाषांमधून माहिती दिली जाते पण हिंदीतून नाही, कारण आपली भाषेबद्दलची उदासीनता नव्हे काय?
दुसरे नृत्य हे पूजा नृत्य होते. त्यातही एकूण सगळा कलेच्या नावाने आनंदच होता. मग थेलमे नाच सुरू झाला. पटीणा देवीच्या आराधनेचे ते नृत्य होते. ही देवी म्हणजे तामिळनाडूतील ‘सिल्लपदीकारम्’ या महाकाव्यातील नायिका कन्नगी होय. ती केरळमध्ये देवी म्हणून पुजली जाते. तेथील कम्बम गावाजवळ तिचे मंदिर आहे. ती कन्नगी लंकेत येऊन पटीणा देवी कशी बनली, ते कोणालाच ठाऊक नाही.
त्यानंतर पंथेरू नामक नाच होता. यात एक वादक एका छोट्या काठीवर एक ताटली गरगर फिरवत तोलतो. पुढे ताटल्यांची आणि काठ्यांची संख्या वाढत जाते. ते सर्व तो छान तोलतो. त्यात काही जिमन्यास्टिक्सच्या प्रकारासारख्या हवेतील उड्या झाल्या. यातही तोल सांभाळून पूर्ण उलटी आणि सुलटी उडी हवेतून मारणे, हे कौशल्याचे काम आहे. तो संपताच पिकॉक डान्स चालू झाला. मोराचा मुखवटा लावून हा नाच सादर केला जातो. कॅण्डीयन वन्नाम पद्धतीचा हा परंपरागत नाच होता. त्यानंतर क्रमशः सालुप्लीया, राबन, कुलू, वेस आणि समूह नृत्य पेश झाले. अखेरच्या नृत्यात केवळ वाद्ये वाजवली जातात आणि फक्त पुरुष ते सादर करतात. काही नृत्यात मुखवटे धारण केले जातात. ते मोठे असल्याने नर्तकाला ते अधूनमधून धरावे लागतात इतकेच.
सर्वात शेवटी सभागृहाबाहेर विटांवर रेती पसरून त्यावर कोळसे पेटवले गेले. दोन नर्तक हातात पेटते पलिते घेऊन वाद्यांच्या तालावर नाचत आले. त्यांनी आपल्या हाता-पायावरून आणि छातीवरून ते पलिते अगदी सावकाश फिरवले. त्यानंतर जिभेवरून फिरवले आणि सरतेशेवटी तोंडात घालून विझवले. हे सर्व बघताना अंगावर काटा येत होता. लोकांनी ते सर्व मोबाईल वा कॅमेरात टिपून घेतले. त्यानंतर थरारक प्रकार चालू झाला. पलित्यांचे काम होईपर्यंत कोळशांचे निखारे बनले होते. त्याची धग जाणवू लागली होती. आगीच्या छोट्या ज्वाळा दिसत होत्या.आठ फुट बाय चार फुटांची ती अग्निशय्या होती. तीवरून ते दोघे नर्तक आळीपाळीने चार-पाच वेळा चालत गेले. ते कृत्य पाहून प्रेक्षकांच्या छातीत धस्स होत होते. ते मात्र अगदी आरामात होते. त्यांना त्या आगीची काहीच बाधा होत नव्हती, हे पाहून नक्कीच आश्‍चर्य वाटले. आपल्याकडे कित्येक ठिकाणी अशी आगीवरून चालत जाण्याची प्रथा आहे, असे ऐकले आहे पण प्रत्यक्ष कधी पाहिले नाही. काही उत्सवात शेकडो भाविक आगीवरून चालतात, असेही ऐकले आहे.
नाच आणि संगीतातील सर्व कसर या थरारक प्रकाराने भरून काढली, असे म्हणायला हरकत नाही.
डॉ. सच्चिदानंद शेवडे