चुकलेली शिकार डेव्हिट हंट

0
1987

स्कॉटलंड यार्ड या नावाला अतोनात प्रतिष्ठा आहे. पण, खरं म्हणजे ते लंडन पोलिस दलाचं अधिकृत नाव नाही. अधिकृत नाव आहे- ‘मेट्रोपोलिटन पोलिस सर्व्हिस.’
अलीकडे ‘शॉर्टफॉर्म’चा जमाना आहे. कोणत्याही नावाचं संक्षिप्त लघुरूप करून वापरायला लोकांना आवडतं. अगदी नेहमीच्या पाहण्यातलं उदाहरण सांगायचं तर ‘कॅफे कॉफी डे’ या नावाची कॉफी हाऊस दुकानांची साखळी शहरोशहरी गल्लोगल्ली बोकाळलची आहे. पण, ‘कॅफे कॉफी डे’ एवढेही शब्द उच्चारायची तसदी कुणी घेत नाहीत. ‘सीसीडी’ म्हणतात नि मोकळे होतात. ही अमेरिकन फॅशन आहे नि त्यामुळे जगात सर्वत्र तिचं अनुकरण केलं जातं.
‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ ही संस्था अमेरिकेत अंतर्गत सुरक्षा व्यवस्था पाहते. तिचं लघुरूप ‘एफ. बी. आय.’ हे खरं म्हणजे सर्वांना परिचित आहे. त्या नावाचा एक दबदबाही आहे. पण, अमेरिकनांना तेवढे शब्द उच्चारायलाही कष्ट पडू लागले. त्यामुळे त्यांनी ‘एफ. बी. आय.’ चं आणखी लघुरूप केलं ‘फेड.’ फेडरल ब्युरोमधली फक्त पहिली दोन अक्षरं आणि हे अगदी अधिकृत आहे, बरं का! एफ. बी. आय.च्या कर्मचार्‍यांना गणवेष नसतो. पण, त्यांच्या अंगातले टी-शर्टस् किंवा विंड चीटर्स यांच्या पाठीवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं ‘फेड.’
अगदी याच धर्तीवर लंडनचे नागरिक आपल्या पोलिसांना म्हणतात- ‘मेट.’ मेट्रोपोलिटन पोलिस सर्व्हिस एवढं लांबलचक नाव कोण लेकाचा म्हणत बसतो! पण, अख्खं जग मात्र या ‘मेट’ला स्कॉटलंड यार्ड याच नावाने ओळखतं.
सन १८२९ मध्ये ब्रिटनचा तत्कालीन पंतप्रधान रॉबर्ट पील याने राजधानी लंडनच्या पोलिसदलाचं पुनर्गठन केलं. ब्रिटन या काळात वैभवाच्या शिखरावर पोहचलं होतं. जगाच्या पाचही खंडात ब्रिटिश साम्राज्य फैलावलं होतं. मुख्य म्हणजे संपूर्ण जगाचा मुकुटमणी जो भारत देश तो ब्रिटनच्या ताब्यात आला होता. ब्रिटन महासत्ता बनली होती. युरोपची, किंबहुना जगाची राजनैतिक राजधानी बनली होती लंडन! लंडन आता साधं शहर या स्वरूपाकडून महानगर बनत होतं. वस्ती, उपनगरं झपाट्याने वाढत होती. त्याच प्रमाणात गुन्हेगारीही वाढत होती. तिला आळा घालण्यासाठी रॉबर्ट पीलने, मेट्रोपोलिटन पोलिस सर्व्हिस निर्माण केली. या संस्थेचं कार्यालय होतं लंडनच्या चेरिंग क्रॉस या भागाजवळ व्हाईटहॉल प्लेस नावाच्या इमारतीत.
व्हाईटहॉल प्लेसच्या मागच्या बाजूला एक गल्ली होती. तिला म्हणत असत स्कॉटलंड यार्ड. हे असं नाव का? त्याचाही एक मजेदार इतिहास आहे. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि अर्धा आयर्लंड या चार प्रांतांचा मिळून आजचा ग्रेट ब्रिटन हा देश बनतो. पण मुळात हे वेगळे देश होते. त्यांची आपसात भरपूर मारामारी चालत असे. युद्ध, तह, मग थोडे दिवस लाडीगोडी, मग पुन्हा कुरबुरी आणि शेवटी पुन्हा युद्ध; असा सगळा क्रम दरोबस्त चालत असे. आता लंडन ही इंग्लंडची राजधानी. तिथे स्कॉटलंडचे राजे, सरदार वगैरे मंडळी जेव्हा वाटाघाटी करण्यासाठी येत, तेव्हा त्यांना उतरायला एक भव्य वाडा बांधण्यात आला होता. स्कॉटलंडवासींचा तो कायमचा मुक्कामाचा वाडा म्हणून त्याला नाव पडलं स्कॉटलंड यार्ड. पुढे इंग्लंड-स्कॉटलंड एक झाले. वाडा इतिहासजमा झाला. वाढत्या वस्तीत त्या जागी नव्या इमारती झाल्या, पण गल्लीचं नाव तेच राहिलं- स्कॉटलंड यार्ड.
मेट्रोपोलिटन पोलिस सर्व्हिसचे पहिले दोन पोलिस आयुक्त चार्लस् रोवन आणि रिचर्ड मायन हे दोघे फार कर्तबगार होते. गुन्हा घडल्यावर नंतर त्याची उस्तवारी, निपटानिपटी करत बसण्यापेक्षा गुन्हा घडण्यापूर्वीच त्याला आळा घातला जावा, असा त्या दोघांचाही फार कटाक्ष होता. साहजिकच त्यांच्या दलात गणवेषधारी पोलिसांपेक्षा साध्या कपड्यात राहून, समाजात कुठेही सहजपणे वावरू शकणार्‍या, कोणत्याही स्तरात मिसळू शकणार्‍या गुप्त पोलिसांचा भरणा जास्त होता. त्यांनी आणलेल्या मौल्यवान खबरांमुळे बरेचदा पुन्हा घडण्यापूर्वीच रोखता येत असे. ही मंडळी ‘४, व्हाईटहॉल प्लेस’ असं नाव लिहिलेल्या मुख्य दरवाजापेक्षा, पाठच्या दरवाजाने म्हणजे स्कॉटलंड यार्ड रस्त्यावरच्या दाराने कार्यालयात येत.
पुढे लंडन पोलिस दलाने फार मोठमोठे गुन्हे शोधून काढले. कित्येक मोठे गुन्हे घडताघडताच पकडले. या सगळ्याचे वृत्तान्त तत्कालीन वृत्तपत्रांतून प्रसिद्ध व्हायचे. त्यात पोलिस दलालाच उद्देशून ‘स्कॉटलंड यार्ड’ असा प्रतिशब्द वापरलेला असायचा. लोकांनाही तो फार आवडला. पुढे सर आर्थर कॉनन डॉयल, ऍगाथा ख्रिस्ती अशा जगप्रसिद्ध रहस्यकथा लेखकांनीही तो आपल्या साहित्यात वापरला. तो जगप्रसिद्ध झाला. पण, तरीही तो अधिकृत मात्र नाही.
या अधिकृत-अनधिकृतची मोठी गंमतच आहे. स्कॉटलंड यार्ड हे नाव अधिकृत नाही. मेट्रोपोलिटन पोलिस सर्व्हिस हेच नाव अधिकृत आहे, असं एकीकडे सरकार सांगतं. पण, सरकार म्हणजे शेवटी माणसंच असतात. स्कॉटलंड यार्ड या नावाची मोहिनी त्यांच्याही मनावर आहेच. त्यामुळे आता लंडनच्या व्हिक्टोरिया भागात असलेल्या पोलिस मुख्यालयाच्या भव्य, अत्याधुनिक, बहुमजली, चकाचक इमारतीवर मोठ्या अक्षरात निऑन साईनची फिरती पाटी लावलेली आहे. ‘न्यू स्कॉटलंड यार्ड’ आणि तरीही ते अधिकृत नाव नाहीच! संपत्तीची अनिवार लालसा, हा मानवी स्वभाव विशेष फार प्राचीन काळापासूनच आहे. ‘द्रव्येण सर्वे वश:’ किंवा ‘पैशाला दगडसुद्धा तोंड उघडतो.’ अशा प्रकारचे वाक्‌प्रचार सर्व भाषांमध्ये शतकानुशतकं रूढ आहेत. पैशासाठी बेईमान होणं, भ्रष्टाचार, लाचखोरी करणं हा प्रकार सर्व काळात घडतच असतो. पण, विसाव्या शतकापासून पुढच्या काळात या धनलालसेने जगभर सर्वत्र नुसता धुमाकूळ घातला आहे. पैशासाठी माणसं अक्षरश: वाट्टेल ते, म्हणाल ते करायला तयार आहेत. वैचारिक मूल्ये, नीतिमूल्ये वगैरे शब्द कुणाच्या खिजगणतीत न राहिल्यासारखेच आहेत. जगभर सर्व देशांत, सर्व समाजात ही स्थिती आहे.
स्कॉटलंड यार्डमध्ये काम करणारे लोक शेवटी माणसंच आहेत. डेव्हिड हंट नावाच्या एका माणसाने स्कॉटलंड यार्डच्या माणसांना विकत घेऊन आपले काळे धंदे राजरोसपणे चालू ठेवल्याचं प्रकरण नुकतंच उजेडात आलं आहे. हा डेेव्हिड हंट मुख्यत: अमली पदार्थांचा व्यापार करतो. जगभर सर्वत्र लोक पूर्वापार धूम्रपान, मद्यपान इत्यादी व्यसनं करीत आलेले आहेत. अफू, गांजा, चरस, गर्द, एल. एस. डी. अशा जुन्या आणि नव्या अमली पदार्थांच्या सेवनाला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली. गरीब माणूस दु:ख विसरण्यासाठी हातभट्टीची पितो नि श्रीमंत माणूस चारचौघात मिरवण्यासाठी स्कॉच पितो. त्याची पोरं पराक्रम म्हणून चरस किंवा गर्द फुंकतात. अतिश्रीमंतांची पोरं चढत्या किमतीच्या नोटेमध्ये चरस घालून फुंकतात. म्हणजे क्रमाक्रमाने दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे आणि एक हजार रुपये किमतीच्या चलनी नोटेची गुंडाळी करायची. तिच्यात गांजा किंवा चरस घालायचा आणि ती पेटवून फुंकायची. केवढा पराक्रम! अशी पोरं पुढे नेते, नट वगैरेसुद्धा होतात!
तर जगभरचं हे प्रमाण अतोनात वाढल्यामुळे डेव्हिड हंटसारख्या लोकांचा धंदा फळफळतो. अमली पदार्थ मुख्यत: पाकिस्तान, अफगाणिस्तान, आफ्रिकन देश आणि दक्षिण अमेरिकन देश इथे बनतात. तिथून ते गुपचूप आणायचे आणि प्रचंड किमतीला विकायचे. या धंद्यात अफाट नफा आहे. तो अफाट पैसा अर्थातच काळा असतो. मग रुग्णालयं, हॉटेलं, रेस्तरॉं, चित्रपटगृहं, कॉलेज असे सन्मान्य उद्योग काढायचे. त्यात तो पैसा गुंतवायचा आणि पांढरा करायचा, असा हा धंदा आहे. इंग्रजीत याला ‘ड्रग ट्रॅफिक’ आणि ‘फ्रॉड’ असं म्हणतात. हे करताना जे कुणी आडवे येतात त्यांचे खून पाडले जातात.
इटलीमध्ये सिसिली नावाचं एक बेट आहे. बरेचसे इटालियन सिसिलीयन लोक १८ व्या शतकात अमेरिकेत स्थलांतरित झाले. १९ व्या शतकापासून त्यांनी अमेरिकेत अतिशय संघटिपणे ड्रग ट्रॅफिकिंग सुरू केलं. त्यांनाच म्हणतात माफिया. मारिया पुझो या लेखकाच्या ‘गॉडफादर’ या कादंबरीने अमेरिकेतल्या माफिया टोळ्यांचं अंतरंग जगासमोर आणलं.
पण, हे माफिया फक्त अमेरिकेतच आहेत असं नाही, प्रत्येक देशात आहेत. डेव्हिड हंट हा त्यातलाच ब्रिटिश नमुना. लंडन उच्च न्यायालयाने नुकत्याच एका खटल्याच्या निकालात, ‘डेव्हिड हंट हा अमली पदार्थ तस्करी, आर्थिक गुन्हेगारी आणि खून यांच्या संघटित गुन्हेगारीत गुंतलेला एक खतरनाक इसम’ असल्याचा निर्वाळा दिला.
विशेष बाब ही की, स्कॉटलंड यार्डमधल्या अत्यंत मोक्याच्या जागेवरच्या माणसांना मोठमोठ्या रकमांनी फितवून गेली तब्बल ३० वर्षे तो आपलं हे गुन्हेगारी जाळं निवांतपणे चालवतो आहे. २०१२ मधल्या ऑलिम्पिक स्पर्धादरम्यान, स्कॉटलंड यार्डच्याच तीन अतिशय हुशार अधिकार्‍यांनी फार कौशल्याने सापळा रचून, डेव्हिड हंटची शिकार जवळजवळ केलीच होती. पण, अखेरच्या क्षणी पक्षी निसटला आणि उलट त्यानेच या तिघांना ठार मारण्याची सुपारी दिली. हे असं कसं झालं, याचा तपास करताना या तीन प्रामाणिक अधिकार्‍यांना असं आढळलं की, आपल्याच सहकार्‍यांपैकी काहींनी आपल्याला दगा दिला आहे. कुंपणानेच शेत खाल्लं आहे!
आपल्याला यात काहीच विशेष वाटत नाही. पण, ते इंग्लंड आहे आणि स्कॉटलंड यार्डच्या संदर्भात इतक्या मोठ्या भानगडीची तिथल्या लोकांना सवय नाही. त्यामुळे अंमळ खळबळ उडाली आहे.

मल्हार कृष्ण गोखले