मोदींना घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न…

0
169

दिल्लीचे वार्तापत्र
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी संसदेत आणि संसदेबाहेर आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील जनतेचे आपणच तारणहार असल्याचा आव विरोधी पक्ष आणत आहे. पण, आपल्या या भूमिकेतून विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल आणि देशाचे नुकसान करत आहे.
आक्रमक भूमिका आणि आक्रस्ताळी भूमिका, यात खूप अंतर आहे. ज्या वेळी एखाद्या गोष्टीचा तर्कसंगत युक्तिवाद करण्याची, त्यातील उणिवा दाखवून देण्याची क्षमता संपते, तेव्हा नुसता आरडाओरडा आणि गोंधळ केला जातो. नोटबंदीच्या विरोधातील विरोधी पक्षांची भूमिका ही आक्रमक नाही, तर आक्रस्ताळी आहे, हे पदोपदी जाणवते.
सरकार एखादा चुकीचा निर्णय घेत असेल, तर त्यापासून त्याला परावृत्त करण्याचा विरोधी पक्षांना अधिकार आहे. त्यासाठी विरोधी पक्ष म्हणून त्यांना सांसदीय लोकशाहीत मिळालेल्या आयुधांचा ते प्रभावीपणे वापर करू शकतात. आवश्यकतेनुसार रस्त्यावर येउन आंदोलनही करू शकतात. अशा वेळी जनतेचाही विरोधकांना पाठिंबा मिळू शकतो.
विशेष म्हणजे ज्या जनतेचे आपण हितरक्षक असल्याचा आव आणत विरोधक हा गोंधळ घालत आहे, त्या जनतेलाही विरोधकांचा संसदेतील हा तमाशा मान्य नाही. मुळात नोटबंदीच्या मुद्यावर विरोधक गोंधळलेले आहेत, नेमकी कोणती भूमिका घ्यावी, हे त्यांना समजत नाही. नोटबंदीच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा की विरोध करावा, हे विरोधकांनाच काय, पण सरकारच्या मित्रपक्षांनाही समजत नाही! त्यामुळे राज्यसभेत नोटबंदीच्या मुद्यावर चर्चा सुरू करणारे विरोधी पक्ष अचानक दुसर्‍या दिवशी चर्चा पुढे चालू ठेवण्यास नकार देतात, हे अनाकलनीय आहे.
राजकारण करताना त्यात देशहिताचा बळी जाणार नाही, याचे भान विरोधी पक्षांनी ठेवले पाहिजे. ते नसल्यामुळेच नोटबंदीच्या निर्णयावर विरोधी पक्ष बेभान झाले आहेत. नोटबंदीचा निर्णय लागू करताना व्यवस्थेच्या दृष्टीने त्यात काही त्रुटी आहेत, त्यामुळे जनतेला त्रास होतो आहे, असे विरोधी पक्षांना वाटत असेल, तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी सांसदीय आयुधांच्या माध्यमातून म्हणजे सभागृहात चर्चा करून सरकारला बाध्य केले पाहिजे. पण, तसे न करता विरोधी पक्ष सभागृहात नुसता गोंधळ घालत आहेत, सभागृहाचे कामकाज ठप्प पाडत आहेत, हे योग्य नाही.
राज्यसभेत सोमवारी या मुद्यावरून विरोधी पक्षांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जी आक्षेपार्ह घोषणाबाजी केली, त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. मोदींनी पंतप्रधान बनणे हे विरोधी पक्षांना कदाचित मान्य नसेल, पण देशातील कोट्यवधी मतदारांनी प्रचंड बहुमताने त्यांना निवडून दिले, पंतप्रधान बनवले, या वस्तुस्थितीची जाणीव विरोधी पक्षांनी ठेवली पाहिजे. जनादेशाचा आदर करणे, हे विरोधी पक्षांचे कर्तव्य आहे.
मोदींनी घेतलेल्या काही निर्णयांना, त्यांच्या कार्यपद्धतीला विरोधकांचा आक्षेप राहू शकतो, त्यात काही गैर नाही, मात्र देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात केलेली आक्षेपार्ह घोषणाबाजी खपवून घेण्यासारखी नाही. माणसाचा मानसन्मान विरोधकांना राखता येत नसेल, तर किमान त्याच्या पदाचा मानसन्मान तरी राखला पाहिजे. विशेष म्हणजे ज्या सामान्य मतदारांना होत असलेल्या तथाकथित त्रासासाठी विरोधी पक्ष गोंधळ घालत आहे, त्या जनतेच्या भावनांची तरी विरोधी पक्षांनी जाणीव ठेवायला हवी होती.
नोटबंदीच्या निर्णयामुळे जनतेला सुरुवातीला काही प्रमाणात त्रास झाला नाही, असे नाही, पण काळ्या पैशाच्या विरोधात तसेच देशाच्या दीर्घकालीन हितासाठी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हा त्रास जनतेने आनंदाने सहन केला. यामुळेच पैसे बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेसमोर रांगेत असलेल्या लोकांना भेटण्यासाठी विशेषत: सरकारविरोधातील त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आलेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर रांगेतील लोकांनी मोदी… मोदीच्या घोषणा दिल्या नसत्या! मात्र, अजूनही ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांना शहाणपण येत नाही, याचे आश्‍चर्य वाटते.
झोपलेल्याला उठवणे सोपे असते, पण झोपेचे सोंग घेेतलेल्याला उठवणे कठीण असते. नोटबंदीच्या मुद्यावर विरोधी पक्षांची स्थिती झोपेचे सोंग घेतल्यासारखी झाली आहे. नोटबंदीच्या निर्णयाचे फायदे त्यांनाही दिसतात, पण ते जाहीरपणे मान्य केले तर त्याचा फायदा मोदी आणि भाजपाला मिळेल, अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे या निर्णयाच्या विरोेधात आकांडतांडव करणे, त्यांची राजकीय अपरिहार्यता झाली आहे.
देशाच्या कोणत्याच भागात मोदींच्या निर्णयाबद्दल जनतेत नाराजी नाही. आक्षेप फक्त विरोेधी पक्षांनाच आहे! त्यामुळे जनतेने आता हात जोडून, आमच्या नावाने संसदेत तुम्ही घालत असलेला गोंधळ थांबवण्याची विनंती विरोधी पक्षांना करण्याची वेळ आली आहे, असे म्हणावेसे वाटते. गेल्या आठवड्यापासून विरोधी पक्षांनी या मुद्यावरून संसदेचे कामकाज ठप्प पाडले आहे. विरोधक सभागृहात नुसता गोंधळ घालत आहेत. नोटबंदीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी बुधवारी संसदभवन परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे दिले. महात्मा गांधींनी तरी आता या नेत्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे!
जनतेने आपल्याला सभागृहात गोंधळ घालण्यासाठी नाही, तर जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे, याची जाणीव विरोधी पक्षांच्या सदस्यांनी ठेवणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या मुद्यावरून लोक रस्त्यावर येतील, आंदोलन करतील, जाळपोळ करतील, असे विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाटत होते. सर्वोच्च न्यायालयानेही या मुद्यावरून दंगली भडकण्याची भीती व्यक्त केली होती. विशेष म्हणजे सत्ता पक्षाच्या खासदारांनाही अशीच भीती वाटत होती. पण, भारतातील संयमी जनतेने ती फोल ठरवली! कारण, नोटबंदीच्या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम जनतेला अपेक्षित आहे. त्यासाठी कितीही त्रास झाला तरी तो सहन करण्याची भारतीय जनतेची तयारी आहे. मंगळवारी भाजपा सांसदीय पक्षाच्या बैठकीत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. त्यांना आपल्या भावना आवरणे कठीण झाले, त्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
देशातील जनतेला अर्थशास्त्रातील फार काही कळत असेल असे नाही, पण नोटबंदीच्या निर्णयाचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार्‍या फायद्याबाबत त्यांना कुणी सांगण्याची गरज आहे, असे वाटत नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास नसेल, पण देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या प्रत्येक निर्णयावर विश्‍वास आहे. मोदी जे निर्णय घेतील, ते देशाच्या हिताचेच असतील, त्यात त्यांचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नाही, याबाबत देशातील जनतेेच्या मनात कोणताही संशय नाही. मोदींच्या विरोधात काहीही ऐकून घेण्याची जनतेची तयारी नाही. हीच मोदींच्या कामाला मिळालेली पावती आहे! बँकांसमोर लागलेल्या रांगांतूनही ते दिसून आले आहे.
महाभारत युद्धात कौरवांनी अभिमन्यूला चक्रव्यूहात घेरले, तसे नोटबंदीच्या मुद्यावर मोदींना घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न दिसतो आहे. अभिमन्यूला चक्रव्यूहात घुसण्यापर्यंतचे ज्ञान होते, मोदींना मात्र चक्रव्यूहात घुसून विरोधकांना नेस्तनाबूत करून सुखरूप बाहेर येण्याचेही ज्ञान आहे, याचा विसर विरोधकांनी पडू देऊ नये!!!
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७