अज्ञात इसमांनी जाळल्या ५०० व हजाराच्या नोटा

0
178

पोलिसांची चौकशी सुरू
तभा वृत्तसेवा
अकोला, २६ नोव्हेंबर
५०० व १००० च्या नोटाबंदीनंतर वाममार्गाने कमविलेला पैसा जाळण्याची पहिली घटना शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास येथे घडली. येथील गोरक्षण रोडवरील विजय हाऊसिंग सोसायटीनजीक राजीव केडिया यांच्या घराच्या मागे सर्व्हिस लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या चलनातील ५०० व हजार रुपयांच्या नोटा जाळण्यात आल्या. यापैकी काही न जळालेल्या नोटा व अर्धवट जळालेल्या नोटा या कचरा वेचणार्‍या महिलांच्या दृष्टीस पडल्या. स्थानिकांना याची कुणकुण लागताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणी खदान पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. जळालेल्या नोटा या २० लाखांच्या वर असल्याची शक्यताही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.
वाममार्गाने कमविलेला पैसा आता निरुपयोगी आहे, याची खात्री पटल्यावर तो जाळण्याचा उद्योग काहींनी सुरू केला आहे, याचा प्रत्यय येथील नागरिकांना आला. विजय हाऊसिंग सोसायटीमध्ये नेमक्या कोणी या नोटा जाळल्या हे जरी माहीत नसले तरी मोठ्या प्रमाणात नोटा जाळल्याचे चित्र घटनास्थळी होते. अधर्वट जळालेल्या ५०० व १ हजाराच्या नोटा घटनास्थळी अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. अनेकांनी यातील काही नोटा पसार केल्याची चर्चाही घटनास्थळी होती.
या घटनेची माहिती वार्‍यासारखी शहरात पसरली. खदान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत तेथील अर्धवट जळालेल्या नोटा ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, तीन वेगवेगळ्या ठिकाणी नोटा जाळल्याची माहिती घटनास्थळावर मिळाली. याप्रकरणी ठाणेदार गजानन शेळके यांनी चौकशी सुरू केली आहे.