सहिष्णुतेच्या उचक्या संपल्या?

0
111

बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या. नरेंद्र मोदी-लाट देशात घोंघावत होती. या लाटेमुळे ज्यांच्या सत्तेच्या खुर्च्या गेल्या ते जेवढे अस्वस्थ होते, त्यापेक्षाही जास्त अस्वस्थ हिंदुत्वाचा द्वेष करणारे होते. साहित्य, कला, मनोरंजन या क्षेत्रात मान्यता मिळविणारे, पण मनात हिंदुत्वाचा द्वेष करणारे कथित डावे, स्वयंघोषित पुरोगामी अत्यंत अस्वस्थ होते. पोटात मळमळ वाढली होती. ‘कळवळतंय मी… वळवळतंय मी…’ अशी अवस्था झाली होती. त्याच काळात उत्तरप्रदेशात दादरीची ती बातमी आली. उत्तरप्रदेशात भाजपाचे सरकार नव्हते, तरीही सगळे खापर केंद्र सरकारवर आणि हिंदुत्ववादी संघटनांवर फोडत, ज्या सहिष्णुतेच्या उचक्या या देशातील स्वयंघोषित बुद्धिवादी डाव्यांना सुरू झाल्या की बस्स! एकामागून एक पुरस्कार परतीच्या घोषणा, त्यांना जाम प्रसिद्धी… जणू भारतात काहीतरी भयंकर घडते आहे.
मात्र, याच सहिष्णुतेच्या उचक्या काढणार्‍या लोकांना आमचा प्रश्‍न आहे की, केरळमध्ये रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकाच्या घरात घुसून कम्युनिस्टांनी त्याच्या आईवडिलांसमोर त्याला ठार मारले तेव्हा का तुम्हाला सहिष्णुता आठवली नाही? केरळमधील किंवा देशातील एकाही साहित्यिक, सहिष्णुतावाद्याला या खुनाबद्दल एक ब्र काढावा का वाटला नाही? नका पुरस्कार परत करू, नका मोर्चे काढू, पण या माणसे मारण्याच्या क्रूरपणाचा निषेध तरी कराल की नाही?
आता एक बातमी आली आहे. ढाका ट्रिब्यून नावाच्या बांगलादेशातील प्रमुख वर्तमानपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. ढाका विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अब्दुल बरकत यांनी म्हटले आहे की, गेल्या ४९ वर्षांपासून बांगलादेशातून ज्या प्रमाणात हिंदू पळून जात आहेत ते पाहता येत्या ३० वर्षांनंतर बांगलादेशात हिंदू औषधाला शिल्लक राहणार नाही! बांगलादेशातून दर दिवशी सरासरी ६३२ हिंदू लोक देश सोडून पळून चालले आहेत. या डॉ. अब्दुल बरकत यांनी ‘पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ रिफॉमिर्ंंग ऍग्रिकल्चर- लॅण्ड वॉटर बॉडीज इन बांगलादेश’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात ते म्हणतात की, तीन दशकांनंतर या देशात कुणी हिंदू शिल्लकच राहणार नाही! १९ नोव्हेंबर २०१६ रोजी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
सहिष्णुतेच्या नावाने एकच गलका करणार्‍या, गळे काढणार्‍या या देशातील तमाम लोकांना आम्ही विचारतो की बाबांनो, आता या बातमीवर तुम्हाला काही म्हणायचे आहे की नाही? आता तुमची संवेदनशीलता, सहिष्णुतेबाबतची आस्था कुठे चरायला गेली आहे? नका पुरस्कार परत करू, कारण ते काही बांगलादेशाच्या सरकारने दिलेले नाहीत. नका पदव्या नाकारू, कारण त्या काही बांगलादेशाने दिलेल्या नाहीत. पण, निदान बांगलादेशातून अतिशय अमानवी हल्ले आणि छळ चालल्यामुळे पळून चाललेल्या या हिंदूंबद्दल सहानुभूतीचा एक शब्द तरी काढाल की नाही? मानवता म्हणून तरी त्यांच्या वेदनांबाबत आपले मुखकमल उचकटाल की नाही? हे बांगलादेशातील छळ सहन करून रोज पळून जाणारे काही संघाचे कार्यकर्ते नाहीत! त्यामुळे अरे ढोंगी मानवतावाद्यांनो, निदान लाजेकाजेखातर तरी या छळवादाचा निषेध कराल की नाही?
गेल्या अनेक दिवसांपासून या बातम्या येत आहेत. बांगलादेशात हिंदूंचे जिणे मुश्कील झाले आहे. कोणतेही लहान कारण सापडले की, येथील माथेफिरू जिहादी हिंदूंवर निर्घृण हल्ले करू लागतात. फेसबुकवर कुणीतरी इस्लामविरोधी पोस्ट टाकली आणि ते निमित्त करून गेले काही दिवस बांगलादेशात पंथवेडाचा अमानवी राक्षसी नंगानाच चालला आहे. बांगलादेशात ब्राह्मणबरिया जिल्ह्यात नासिरनगर येथे या जिहादी माथेफिरूंनी हिंदूंची घरे आणि मंदिरे यांना आग लावली. नासिरनगरचे पोलिसप्रमुख अब्दुल कादेर यांनी बीबीसीला सांगितले की, हिंदूंच्या जवळजवळ वीस घरांना आगी लावण्यात आल्या, तर एका स्थानिक पत्रकाराच्या सांगण्यानुसार, कमीतकमी दहा हिंदू मंदिरांना आग लावण्यात आली. हिंदू लोकांना मारहाण करण्यात आली. इस्लामिक संस्था अहल ए सुन्नत वल जमात या संघटनेने बंदचे आवाहन केले. त्या काळात आणखी उन्माद प्रकट करण्यात आला.
या घटनेचे निमित्त करून जाळपोळ, मारहाण अजून चालूच आहे. नासिरनगर येथे गेल्या रविवारी छोटलाल दास या मासेमारी करणार्‍या कोळ्याचे घर जाळण्यात आले. तेथे दोन लाख रुपये किमतीचे मासे पकडण्याचे जाळे आग लावून जाळण्यात आले.
बांगलादेशाची निर्मिती झाली ती भारताने हस्तक्षेप केल्यामुळे. पश्‍चिम पाकिस्तानातून बांगला प्रदेशात प्रचंड अत्याचार, अमानवी क्रूरता चालू होती. त्या वेळी भारताने त्यात हस्तक्षेप केला. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सैन्याबरोबर मैदानात दोन हात केले. भारतीय शूर सैनिकांनी बलिदान दिले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. मात्र, हे सगळे विसरून बांगलादेशात राहणार्‍या हिंदूंना लक्ष्य करत हिंसेचा नंगानाच चालू आहे. गेल्या निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात हिंदूंचे इतके नुकसान झाले आहे की, अजूनही हे हिंदू दहशतीच्या वातावरणात वावरत आहेत. बांगलादेशात त्यांना जतावले जात आहे की, तुम्ही हिंदू आहात त्यामुळे तुम्ही भारतात जा. १९७१ च्या बांगला स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतलेल्या हिंदूंकडे आज ना अस्तित्व, ना अधिकार, अशी स्थिती आहे.
२१ व्या शतकात प्रवेश केल्यापासून तर येथील हिंदूंची अवस्था वरचेवर बिघडतच गेली आहे. शिराजपूर येथे पूर्णिमा नावाच्या १५ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. बारीसाल, बागेरहाट, मानिकगंज, चिट्‌टागोग अशा दक्षिण आणि उत्तर बांगलादेशात अत्याचाराची मालिका चालली. घर, मंदिरे, पिके जाळण्यात आली. ढाका येथील निवृत्त प्राध्यापक अजय राय म्हणतात की, विशेषतः मुलीबरोबर अनाचार केला जातो. टिकली आणि कुंकू लावणार्‍या मुलींना लक्ष्य केले जाते. भारतात काही घटना घडली की, बांगलादेशात अशा घटना वाढतात. अल्पसंख्यकांच्या म्हणजे हिंदूंच्या जमिनीवर कब्जा केला जातो. भारतात अल्पसंख्यक सुरक्षित आहेत. त्यांना कुणी खरचटले तरी येथे कांगावखोर लोक ‘इस्लाम खतरे में है’ असे गळे काढायला सुरू करतात. अनेकांना अचानक सहिष्णुतेच्या उचक्या सुरू होतात. देशाची आणि सरकारची जगात भयंकर बदनामी केली जाते. बांगलादेशात हिंदूंचे असे हाल होत असताना मानवता म्हणूनही त्यावर ब्र काढण्याची कुणाची तयारी नाही.
काही आकडेवारी ढाका विद्यापीठाचे डॉ. अब्दुल बरकत यांनी मांडली आहे. १९६४ ते २०१३ दरम्यान जवळजवळ १.१३ कोटी हिंदूंनी छळ आणि भेदभाव यामुळे बांगलादेश सोडून पळ काढला. म्हणजे प्रतिदिन हे प्रमाण ६३२ इतके असून, दरवर्षी दोन लाख ३० हजार ६१२ हिंदू बांगलादेशातून पळून जातात. हे पलायन १९७१ नंतर मुख्यतः लष्करप्रमुख राज्य करत असल्याच्या काळात झाले आहे. पलायनाचे प्रमाण १९७१-१९८१ दरम्यान ५१२ होते आणि १९८१-९१ या दरम्यान ४३८ होते. १९९१-२००१ दरम्यान ही संख्या वाढून ७६७ व्यक्ती प्रतिदिन झाली, तर २००१-२०१२ या काळात सरासरी रोज ७७४ लोकांनी देशातून पलायन केले. हिंदूंची संपत्ती शत्रूची संपत्ती, असे शिक्का मारत त्यावर कब्जा करण्यात आला आहे. यामुळे साठ टक्के हिंदू भूमिहीन झाले आहेत. १९५१ च्या जनगणनेत हिंदूंची बांगलादेशातील संख्या २२ टक्के होती. १९७४ मध्ये ती कमी होऊन १४ टक्के झाली आणि २०११ च्या जनगणनेनुसार ही संख्या केवळ ८.४ इतकी शिल्लक राहिली आहे. अशाच गतीने ही संख्या शून्यावर यायला वेळ लागणार नाही!
अलीकडे बांगलादेशात हिंदू मंदिरांवर आणि पुजार्‍यांवरचे हल्ले वाढले आहेत. अनेक मंदिरातील पुजार्‍यांची हत्या झाली आहे. हिंसा- ती कुठेही आणि कुणीही केली- तरी ती निषेधार्हच मानली गेली पाहिजे. भारतात दादरीमधील एका व्यक्तीवर एका जमावाने हल्ला केला. त्यात कोणताही राजकीय किंवा सामाजिक हेतू नव्हता, तरी मोदी सरकारला लक्ष्य करत राजीनामे, पुरस्कार परतीची नौटंकी केली गेली. देशात केरळमध्ये, बांगलादेशात, पूर्वांचलातील भागात अनेक हिंदू कार्यकर्ते, सामान्य नागरिक यांच्यावर डाव्यांनी, माओवाद्यांनी, पंथवेड्या लोकांनी खुनी हल्ले केले आहेत. कुठे घरात घुसून ठार मारले आहे, तर कुठे गळे चिरून मारले आहे. या घटनांबाबत या देशातील तमाम पुरोगामी, सहिष्णुतावादी, धर्मनिरपेक्षतेबाबत गळे काढणारे का गप्प आहेत? त्यांचे परत करण्याचे पुरस्कार कुठे लपले आहेत? त्यांच्या गळ्यातून एकही निषेधाचा स्वर का बाहेर येत नाही? यांच्या तोंडाला कसले राजकीय स्वार्थाचे कुलूप लागले आहे?
बांगलादेशातील हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार होत आहेत, जे खून पडत आहेत, जी जाळपोळ चालली आहे, हिंदूंना जीव मुठीत धरून पळून जाण्याची वेळ आली आहे, त्यावर या तथाकथित सहिष्णुतावाद्यांच्या तोंडातून सहानुभूतीचा, निषेधाचा एक साधा स्वरही का उमटत नाही? जगात हिंदू कुठेही असोत, त्यांचा छळ करण्याला, त्यांना पळवून लावण्याला, त्यांना ठार मारण्याला यांची परवानगी आहे की काय? भारतातील तमाम समाजवादी, मानवतावादी, डावे, पुरोगामी हे पहिल्या क्रमांकाचे जातीयवादी आहेत. मल्टीकम्युनल आहेत. हिंदूविरोधी आहेत. जगात कुणी कोणत्याही कारणाने मरण पावले, तर हे कळवळून किंचाळत उठतील, मात्र हिंदू, हिंदुत्ववादी जर मारले गेले, तर यांना जराही वाईट वाटत नाही. उलट, यांच्या तोंडावर विकट हास्य उमटते. यांच्या या दुहेरी आणि दुतोंडीपणामुळे यांचा वरचेवर पराभव होत चालला आहे, तसे तसे हे अस्वस्थ होऊन जास्तच कांगावखोरपणा करू लागले आहेत.
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत सगळ्यांनी आवाज उठविला पाहिजे. त्यांना सहानुभूती प्रकट केली पाहिजे. मानवतेच्या दृष्टीने त्यांच्या बाजुने उभे राहिले पाहिजे. एका समुदायाला नाहीसे करण्याचे दुष्ट, राक्षसी कारस्थान हाणून पाडले पाहिजे. हे करत असताना भारतातील ढोंगी मानवतावादी, दुहेरी सहिष्णुतावादी यांचे बुरखेही टराटरा फाडले पाहिजेत. आता कुठे गेल्या तुमच्या सहिष्णुतेच्या उचक्या? असे यांना विचारले पाहिजे!

बाळ अगस्ती