रविवारीची पत्रे

0
132

अरक्षितं तिष्ठति दैव रक्षितं॥
तत्त्वज्ञ मंडळी म्हणते, ‘‘जगात शाश्‍वत सत्य जर कोणते असेल तर तो आहे मृत्यू!’’ त्याच्यावर कुणाची हुकूमत चालत नाही. तो बोलावल्याने येत नाही आणि नको असेल तेव्हा टाळताही येत नाही. त्याच्यापासून कितीही दूर पळतो म्हटले, तरी तो तुम्ही असाल तिथे येऊन तुम्हाला गाठतोच. कुठे बोहोल्यावर चढलेल्या सुखी संसाराची स्वप्नं पाहणार्‍या युवक-युवतीला तो अचानक टिपतो, तर कुठे रोगग्रस्त अवस्थेत दीर्घकालपर्यंत सडत पडलेल्या (अरुणा शानबागसारख्या) रुग्णाईताची प्रार्थना डावलून त्याला तसेच मरणासन्न अवस्थेत जगवतो.
पण, या काळाचाही कळीकाळ जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, त्रिलोकात वास्तव्य करणारा परब्रह्म परमात्मा कधीकधी संकटग्रस्त माणसाला मृत्यूच्या मगरमिठीतून सोडवून त्याला आणि त्याच्या परिजनांना सुखद आश्‍चर्याचा जबरदस्त धक्का देतो. अकल्पितपणे ती व्यक्ती यमपुरीच्या दारातून परत येते.
भगवंताच्या अतर्क्य महिम्याची प्रचीती नुकतीच मुझफ्फरपूरच्या (बिहारच्या) एका कुटुंबाला आली. दीडशेहून अधिक माणसांचा जीव घेणार्‍या इंदूर-पाटणा एक्सप्रेसला झालेल्या भीषण अपघातातून ही मंडळी अकल्पितपणे सहीसलामत बाहेर पहली. या गाडीचे चौदा डबे रुळावरून घसरले आणि अनधिकृत आकड्यानुसार फार मोठ्या संख्येत जीवितहानी होऊन मृतांशिवाय ३०० हून अधिक प्रवाशांना अतिगंभीर ते गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. अन्य सहा कुटुंबीयांसह प्रवास करीत असलेली ती व्यक्ती आहे- मनोज चौरासिया. त्या ट्रेनचे एका मागून एक चौदा डबे रुळावरून घसरल्यावर प्रचंड आवाज झाला आणि काही बोगी एकमेकीत घुसल्या. त्यांच्या बर्थच्या आतील प्रवाशांचा चेंदामेंदा झाला. पण, ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देत, आयत्या वेळी प्रसंगावधान सुचून मनोजने त्याच्या सहप्रवासी आईच्या काठीने बोगीच्या खिडकीच्या काचा फोडल्या आणि खिडकीतून ते सर्व कसेबसे बाहेर पडले. आपल्या आईच्या जीवनदायी काठीचा चमत्कार वर्णन करताना भावविभोर झालेला मनोज म्हणाला, ‘‘ही काठी आमच्यासाठी लाईफ सेव्हिंग लकी स्टिक ठरली.’’ या सत्यकथेवरून- ‘अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितं| सुरक्षितं दैवहतं विनश्यति| जीवति अनाथ: अपि वने विसर्जित:| कृत प्रयत्न: गृहे विनश्यति॥ हे वचन खरे असल्याची खात्री पटते. या वचनाची सत्यता महाभारतातील कुंतीपुत्र कर्ण आणि अभिमन्यूसुत परीक्षित राजा यांच्या उदाहरणावरून अधिक स्पष्ट होईल. कुंतीला कौर्मायावस्थेत सूर्यापासून झालेल्या कर्णाला तिने गंगेच्या प्रवाहात सोडून दिल्यावर, अधिरथ नावाच्या एका सारथ्याने त्याचे रक्षण केले आणि त्याच्या पत्नीच्या-राधेच्या स्वाधीन त्याला केले (हाच तो दैवरक्षित राधेय कर्ण). महाभारतातीलच दुसरे उदाहरण आहे परीक्षिताचे. त्याला शमीक ऋषीच्या शापाने सात दिवसांनी सर्पदंशाने मरण यायचे होते. ते टाळायला त्याने जलाशयाचा आश्रय घेतला. पण, तिथेही एका बोराच्या आत लपून बसलेल्या तक्षकाने पाण्यावर बांधलेल्या महालात प्रवेश मिळवून राजाला सातव्या दिवशी दंश करून मारले. अशा प्रकारे परीक्षित ठरला दैवहत!
रा. ना. कुळकर्णी
मोदींचा धाडसी निर्णय!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जो नवीन नोटांचा उपक्रम सुरू केला तो स्तुत्य आहे. आपल्या देशात प्रचंड काळा पैसा आहे व भ्रष्टाचार वाढला आहे. त्याला पायबंद घालणे देशहिताचे आहे. त्यासाठी त्यांनी केलेल्या जालीम उपायाबद्दल त्यांचे अभिनंदन! देशातील प्रचंड काळ्या पैशामुळे महागाई भयंकर वाढली व सरकारचे त्यातही प्रचंड नुकसान झाले. देशाची प्रगती करण्याकरिता व महागाईला पायबंद घालण्यासाठी हा धाडसी निर्णय घेणे देशाच्या हिताचे आहे. अर्थात, सामान्य माणसाला यामुळे त्रास सोसावा लागत आहे, पण देशाच्या हितासाठी तो त्रास सहन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अर्थात विरोधक यावर आरडाओरड करून त्याला विरोध करीत आहेत, पण हा त्यांचा राजकीय स्टंट आहे. सरकारला विरोध करून त्याची प्रतिमा खराब करण्याचा उद्देश आहे, हे उघड आहे. जनमानसामध्ये सरकारबद्दल रोष उत्पन्न करण्याचा हा डाव आहे व त्यामुळे राजकारणात त्यांना विरोध करण्यामुळे त्यांचा राजकीय फायदा होईल, असे त्यांचे गणित आहे. अशा वेळी सर्व जनतेने सरकारला पाठिंबा देणे हे त्यांच्या हिताचेच आहे!
ना. म. तायडे
९८९०३९५६१६
देशप्रेमी, साहसी नेते नरेंद्र मोदी!
देशात अतोनात काळा पैसा वाढला होता. त्यासाठी काहीतरी क्रांतिकारी उपाययोजना करणे अनिवार्य झाले होते. ते अत्यावश्यक व महत्त्वाचे काम करण्याचे आव्हान स्वीकारून नरेंद्र मोदी यांनी, काहीही पूर्वानुभव नसताना हे कठीण काम अंगावर घेतले व तेही जनतेला होऊ शकणार्‍या हालअपेष्टांची कल्पना ध्यानात ठेवून. हे त्यांनी फक्त देशासाठी, येथील जनतेच्या भल्यासाठी केले ही गोष्ट जनतेने समजून घ्यायला हवी. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील जनतेला अनेक व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकांना होणार्‍या मनस्तापासाठी, हालअपेष्टांसाठी सर्व थरांतून लोकांनी मोदींना दोष दिला. आपला हा विशाल देश व येथील हा अथांग जनसमुदाय पाहता हे काम अति कठीणच म्हणायला पाहिजे. ते पेलण्याची हिंमत मोदींनी दाखवली, यासाठी त्यांना दाद द्यायला हवी. अशा कठीण समयी मोदींना साथ होती ती फक्त त्यांच्या सहकार्‍यांची. दोष देणारे, शिव्याशाप देणारे विरोधी पक्ष त्यांच्या या कार्यात मदत करण्याऐवजी त्यात अडथळे आणण्याचेच काम करीत आहेत.
थोड्याच दिवसांत हे कष्टकारक दिवस संपतील व नव्या नोटांना लोक आनंदाने स्वीकारतील. काळ्या पैशाच्या राक्षसाचा अंत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्य देशांच्या नेत्यांनी मोदींच्या या साहसाची मुक्त कंठाने स्तुती केली, यातच मोदींचे यश सामावलेले आहे. असा स्वच्छ साहसी नेता आम्हाला लाभला, ही आमच्यासाठी आनंदाची व भाग्याची गोष्ट आहे. इथेच मोदी थांबणार नाहीत. अशाच लोकोपयोगी अनेक गोष्टी मोदींच्या डोक्यात घोळत आहेत व नि:स्वार्थीपणे ते त्या नक्कीच साध्य करतील. अशा या असामान्य नेत्याच्या पासंगालाही हे दीड दमडीचे केजरीवाल, राहुल, गुलाम नबी आझाद यांच्यासारखे कमी समज असणारे क्षुद्र लोक पुरणार नाहीत. त्यांची कोल्हेकुई तर ते थांबवणार नाहीतच, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच इष्ट ठरेल!
श्रीधर हरकरे
७३८७२३२०२५
राष्ट्रप्रेम
नोटाबंदीमुळे भारतीय जनमानसाचे राष्ट्रप्रेम किती दिखाऊपणाचे आहे, हे स्पष्ट झाले. एकीकडे काळा पैसा बाहेर काढण्याची मागणी करायची, तर दुसरीकडे त्या दृष्टीने पावले उचलल्यास होणार्‍या त्रासाबद्दल गाजावाजा करायचा, असा दुतोंडीपणाचा कांगावा करायचा. राष्ट्राचे हित घडवायचे असेल, तर जनतेला हातात हात घालून संकटाचा सामना करावा लागेल.
दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने, इंग्लडला साखर घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडविले. त्यामुळे इंग्लंडमध्ये साखरेची चणचण भासू लागली. लोकांनी त्यावेळेस दुकानांसमोर रांगा लावल्या. त्या वेळी विस्टन चर्चिल पंतप्रधान होते. त्यांना, त्या रांगा बघून लोक प्रक्षुब्ध होतील असे वाटले. त्यांनी तेथील रांगा कशासाठी लागल्या याची माहिती घेतली, तेव्हा ते आपल्या नागरिकांच्या राष्ट्रप्रेमामुळे भारावून गेले. त्या रांगा अशा लोकंानी लावल्या होत्या की, ज्यांच्याजवळ अतिरिक्त साखर होती ती परत करण्यासाठी होत्या. याला म्हणतात राष्ट्रप्रेम!
उलट, आपल्या देशात लोकांच्या अडचणींचा फायदा घेऊन आपले खिसे भरण्याची होड लागली आहे. लोक रोजंदारीवर माणसे लावून आपला काळा पैसा पांढरा करण्यात गुंतले आहेत. विरोधी पक्षातले लोक जनतेच्या अडचणींचा फायदा घेऊन, सरकारला अडचणीत आणण्याचा व आपला राजकीय फायदा करून घेण्यात गुंतले आहेत; तर सत्ताधारी पक्षातले मित्र मोदींना समर्थपणे पाठिंबा देण्याचे सोडून मूग गिळून बसले आहेत.
१५० वर्षे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. इतक्या दूर येऊन एवढ्या मोठ्या देशावर राज्य करण्याचे कसब कसे आले, याचा अभ्यास करण्याची ना जनतेला गरज वाटली, ना पुढार्‍यांना! आज देशावर आर्थिक संकट ओढवले, ते मूठभर धनदांडग्यांच्या स्वार्थापोटी आणि त्यांना साथ मिळतेय् ती इथल्या राजकारण्यांची! सार्वजनिक जीवनात काम करणारा सत्ताधारी असो वा विरोधक, त्या व्यक्तीची राजकारणात येण्यापूर्वी जेवढी संपत्ती असेल तेवढ्यावरच तिचा अधिकार असावा. तशा प्रकारची संविधानात तरतूद करावयास हवी, तरच या देशातील भ्रष्टाचार समाप्त होऊ शकतो. मूठभर धनवान व्यक्ती, नोकरशाहीतील परमिट लायसन्सचे अधिकारी व राजकारणी यांनी या देशातील नागरिकांना छळण्याचेच काम केले आहे. यांना जेरबंद केल्यास नोटा बंद करण्याची कुठल्याच सरकारवर पाळी येणार नाही! राजकारणातून भ्रष्ट राजकारणी आपोआप हद्दपार होतील. राजकारण जो धंदा बनला आहे, त्याला आळा बसेल…
जयंत बापट
०७२३२-२५०७६७
पोस्ट ऑफिस-बँकांची महत्त्वाची भूमिका
एका संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतातील पोस्ट ऑफिसची संख्या सुमारे दीड लाखापेक्षा जास्त आहे. यातील ७० टक्के ऑफिसमध्ये बँकिंग सुविधा आहे असे मानले, तरी या एक लाखाहून जास्त बँका विशेषतः ग्रामीण भागात कार्यरत आहेत. आणि म्हणूनच नोव्हेंबर ९ नंतर सुरू झालेल्या नवीन चलन वितरणाच्या कार्यक्रमात या लाखाहून जास्त पोस्टल सेव्हिंग्स बँका आणि तेथील कर्मचारी यांचे योगदान प्रशंसनीय आहे.
किंबहुना राष्ट्रीयीकृत बँकांना ग्रामीण भागात नवीन शाखांना परवानगी देण्याआधी तेथील पोस्ट ऑफिस बँका जास्तीतजास्त सुविधांनी सज्ज करणे श्रेयस्कर ठरेल. खर्चही कमी येईल आणि अनुत्पादक खर्च कमी दिसेल. पोस्टल बँक मजबूत होणे हे ग्रामविकासासाठी गरजेचे आहे.
प्रमोद बापट
९८२३२७७४३९
मनमोहनसिंगांचा बोलविता धनी कोण?
गुरुवारी दिवसभरात बर्‍याच दखलपात्र घटना घडल्या, त्यातील महत्त्वाची घटना म्हणजे, माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांचे राज्यसभेतले वक्तव्य! त्यांनी नोटाबंदी या विषयावर काही विचार मांडले. डॉ. मनमोहनसिंग हे जागतिक स्तरावरचे अर्थतज्ज्ञ आहेत हे मान्य करूनही, त्यांच्या काळात
(१० वर्षे) काळ्या पैशासंबंधात कोणतीही उपाययोजना न करता, आता मात्र मोदींच्या निर्णयाविरुद्ध विचार मांडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या १० वर्षांच्या काळात त्यांचा बोलविता धनी कोण होता, हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर आजही त्या जोखडातच ते अडकून पडले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये गोरगरिबांना खूप त्रास होत आहे हे खरे असले, तरी सर्वसामान्य जनता मोदींच्या निर्णयाशी सहमत आहे, हे कालच सिद्ध झाले आहे. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे, सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उडालेला गोंधळ- जो गेल्या तीन-चार दिवसांत स्पष्ट झाला आहे. त्यांचा होत असलेला जळफळाट स्वाभाविक आहे. गेली २५ वर्षे मोठ्या भावाच्या भूमिकेएवजी सध्या त्यांना धाकट्या भावाच्या भूमिकेत वावरावे लागत आहे. शिवाय, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काय होणार, याची चाहूल लागल्याने ते सैरभैर झाले आहेत. पण, त्यावर काही उपाय करायचा, तर गप्प बसून परिस्थिती काबूत आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले पाहिजे. मोदींवर टीका-टिप्पणी करत न बसता हे करावे.
श्रीनिवास जोशी
डोंबिवली (पूर्व)
विनाशकाले विपरीत बुद्धी!
केजरीवाल, तुमची मुक्ताफळे थांबवा, नाहीतर भारतीय नागरिक अशी धोबीपछाड देईल की, तुमचे हाल बेहाल व्हायला वेळ लागणार नाही! तुमचे गुरू अण्णा हजारेंसकट सार्‍या देशवासीयांनी, देश भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचे स्वागत केले. तुम्ही मात्र दिवाळे निघालेली बुद्धी पाजळून सरळ मोदींवरच विरोधात्मक टीका शरसंधान करताना दिसत आहात. आज आपल्या पंतप्रधान मोदींना केवळ देशात नव्हे, तर जागतिक स्तरावर एक उत्तम प्रशासक म्हणून मान्यता मिळाली असताना, तुम्ही मात्र म्हणता की नोटा नाही, तर पंतप्रधानच बदलायला हवा?
आता वेळ आली आहे की, अण्णा हजारेंनी तुमचे कान उपटून सांगितले पाहिजे की, अरविंद, तुम्ही केवळ एका लहानशा स्टेटचे अर्धवट मुख्यमंत्री आहात. तिथे तर उजेड पडत नाही, तेव्हा प्रथम एक सक्षम मुख्यमंत्री बनून दाखवा व नंतर देशाच्या चिंतेचा विचार करावा. केजरीवाल, तुम्ही यापुढे आपली लायकी जोखाळूनच विधान करावे, तेच तुमच्या हिताचे आहे आणि देशहिताचेदेखील! देशापेक्षा तुम्ही श्रेष्ठ नाही, हे लक्षात ठेवा. अन्यथा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी!’ ही उक्ती तुम्हाला चपखल बसते!
किशोर पोहेकर
हनुमाननगर, नागपूर