कोंडी

0
246

‘‘आई नाश्त्याला पोहे करू का? स्वयंपाकघरातून स्मिताचा आवाज आला. तेव्हा आईनं ओळखलं, ‘करू का?’ हा एक उपचार आहे. तिची पोह्यांची तयारी झाली असणार.
आई हॉलमधून उठून किचनमध्ये गेल्या तेव्हा तिने पोहे फोडणीला घातले होते. आईंनी टेबलवर चार प्लेट्‌स, चमचे, पाणी, शेवांचा डबा ठेवला व कोथिंबीर चिरून दिली. अजितला कोथिंबीर अगदी बारीक लागते अन् स्मिता अगदी जाडी मोठी ठेवते. ती मोठी पानं तोंडात आलेली अजितला मुळीच चालत नाहीत.
‘‘चला, पोहे तयार झालेत. अजित, इशिता लवकर या. नाहीतर गार पोहे खावे लागतील.’’ स्मिताने आवाज दिल्याबरोबर इशिता अजितचा हात धरून जवळजवळ ओढतच घेऊन आली. अजितने भराभरा चार-पाच चमचे पोहे खाल्ले आणि प्लेट ठेवली. पुरे आता, असे म्हणत पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. पाणी पिऊन तो खोलीत जाऊन बसला. ‘‘अरे, काय झालं तरी काय तुला आज? खाल्लं नाहीस ते! दुसरा चहादेखील घेतला नाहीस.’’ आईनं चहाचा कप त्याच्या हाती दिला व त्या तिथेच पलंगाच्या कडेला बसल्या. ‘‘बरंं वाटत नाहीये का?’’
‘‘नाही गं आई, काही नाही. डोकं दुखतंय बारीक बारीक.’’ ‘‘हो का. बरं चहा घे म्हणजे बरं वाटेल आणि थोडा पड डोळे मिटून.’’ एवढं बोलून आई बाहेर आली. तिने जाता जाता दार ओढून घेतलं.
बाहेर आई व स्मितामध्ये चाललेलं बोलणं अजितच्या कानावर येत होतं. ‘‘काय झालं याला कोणास ठाऊक. दोन-तीन दिवसांपासून मूड गेलाय खरा.’’ आई काळजीच्या स्वरात म्हणाल्या. ‘‘हं, बरोबर आहे. रविवारी ती बया भेटली नं… म्हणजे निमा हो. नक्कीच काहीतरी बोलली असणार.’’ स्मिता म्हणाली. ‘‘अगंबार्ई, हो. ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही म्हणून हा डिस्टर्ब आहे. आता कळलं. दोघांत काय काय बोलणं झालं कोणास ठाऊक. तशी ती तमासखोर आहेच म्हणा.’’ आईच्या म्हणण्यावर स्मिता उत्तरली.
स्मिता अंघोळीला गेली. आई तिथेच बसून भाजी निवडत होत्या. एवढी सोन्यासारखी मुलं माझी! मोठा प्रसाद सैन्यात गेला अन् कारगिलच्या युद्धात शहीद झाला. त्या वेळी स्मिताचा आकांत ऐकवत नव्हता. छोट्या इशिताला घेऊन ती घरी आली. शत्रूने केलेल्या बॉम्बस्फोटात सगळं खाक झालं, तेव्हा प्रसादची बॉडीदेखील बघायला मिळाली नव्हती. अजित धाकटा. त्याला सरकारी नोकरी होती. त्याच्या लग्नाचं बघणं सुरू होतं. वधूपिते चकरा मारत होते. असं स्थळ शोधून सापडलं नसतं.
बाबांनी बांधून ठेवलेलं स्वत:चं घर. आज जरी घर आईच्या नावावर असलं, तरी त्याचे बरोबर दोन भाग होत होते. स्मिताला बराच पैसा मिळाला. सरकारने चांगली नोकरी दिली. शिवाय घर होतंच. अजितचं लग्न झालं. गृहलक्ष्मी म्हणून निमा घरात आली. तिथेच नशिबानं घात केला. बिचार्‍या निमाला काय माहीत की, ग्रहण लागलेला चंद्र आपल्या हाती आलाय्.
‘‘आई, द्या ती भाजी फोडणीला घालते आणि आता अजितला आंघोळीला पाठवा.’’ स्मिता बोलत असतानाच अजित बाहेर आला. ‘‘आई, मी बाहेर जाऊन येतो गं.’’ म्हणत स्कूटरची चाबी घेऊन गेलासुद्धा!
‘‘नक्कीच निमाला भेटायला गेला असणार.’’ आईच्या म्हणण्यावर स्मिता म्हणाली, ‘‘ते नावसुद्धा उच्चारू नका या घरात. सुखाच्या घराला दृष्ट लावून गेलीय मेली!’’
दोन दिवस अजित ऑफिसला गेलाच नाही. काय झालं याला? आई चिंतातुर होत्या. आठवडा संपायला आला. अजित भेटला नाही म्हणून स्मिता अस्वस्थ होती. जसा विरह तिला जाळत होता. ‘‘अजित काय झालंय् ते नीट सविस्तरपणे सांगशील का? रजतची आठवण येतेय् का?’’
‘‘हो आई. आज मला हे असह्य होतंय. निमाने नवाच पेच उभा केलाय्.’’
‘‘तो आणि काय?’’
‘‘कोणता रे पेच अजित?’’ म्हणत स्मिता बाहेरच्या खोलीत आली. ‘‘अगं, ती म्हणते डिवोर्स पेपर्सवर सही करते, पण एक अट आहे अन् ती अट म्हणजे मी स्मिताबरोबर लग्न करावं. नाहीतरी तसेही तुमचे संबंध आहेतच, तर मग लग्न करून राजरोस राहा की. आपले सगळे नातलग, स्मिताच्या माहेरची सगळी मंडळी बोलवा, जाहीर रीत्या सांगा, अजित-स्मिता विवाहबद्ध होत आहेत. त्याच वेळी एकमेकांना अंगठी घालायचा कार्यक्रम होईल. रजिस्ट्रार येतील. डिवोर्सपेपर्सवर मी सही करते व त्याच मांडवात तुमच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन. एकाच मांडवात एक लग्न तुटेल अन् दुसरा विवाह संपन्न होईल.’’
‘‘काय बनेल बाई आहे ही.’’
‘‘अहो बाई, बदमाश म्हणा तिला. केवढं डोकं चालवतेय्.’’ ‘‘अरे पण असं करण्यामागचं कारण काय?’’ ‘‘हो, ती म्हणते, घटस्फोट देईन आणि तुम्ही दुसर्‍या मुलीशी लग्न कराल. माझ्या संसाराचा खेळखंडोबा झाला तसा आणिक एका निरपराध मुलीच्या संसाराचा व्हायला नकोय. मी कोणता अपराध केला होता? दुसर्‍या मुलीच्या बाबतीत हिला काय करायचय्. मुकाट्यानं सही कर अन् मोकळी हो.’’ स्मिता म्हणाली. यावर कोणी काहीच बोललं नाही. अजितच्या मनात निमाचे शब्द घोळत होते.
‘‘खरं म्हणजे तुमच्या व स्मितावहिनींच्या संबंधांना आईंनी तेव्हाच अटकाव करायला पाहिजे होता. सगळं माहीत असताना एका निष्पाप मुलीचं आयुष्य आपण उद्ध्वस्त करतोय, हा विचारदेखील शिवला नाही त्यांच्या मनाला. आश्‍चर्य आहे. खरं म्हणजे बाईचं दु:ख बाईच समजू शकते! ही कसली बाई! त्यात आई? त्यांच्या मुलीच्या बाबतीत असं झालं असतं तर? त्यांना मुलगी नाहीये. ही गोष्ट वेगळी. पण, घरात एक मुलगी आहे की इशिता नावाची. उद्या ती मोठी होईल अन् तिच्या बाबतीत असं घडलं तर?’’
या विचारासरशी अजित एकदम उठून उभा राहिला. त्याच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले. त्याला सुचेनासं झालं. डोकं गरगरायला लागलं. फ्रिजमधून बॉटल काढून थंड पाणी प्यायला अन् तीच बॉटल डोक्यावर ओतली. ‘‘अरे, अरे, हे काय?’’ म्हणत आई धावत आली. स्मिताही आली. ‘‘अजित डॉक्टरांकडे जाऊ या का? बहुतेक बीपी वाढलं असणार. काय मेली अवलक्षणी बाई आहे. दुसर्‍याचं सुख बघवत नाही.’’ तेव्हा अजित बोलला, ‘‘ती म्हणते कुणाच्या सुखाला चूड लावली तर आपल्याला सुख मिळत नाही.’’
अजितची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. आता त्याला मनातून निमाचं बोलणं पटत होतं. खरंच आपण निमावर अन्याय केला. तू चुकलास. माणसाच्या मनासारखा मोठा न्यायाधीश कोणी नसतो. आपल्याला तो आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करतो. आता पारडं निमाच्या बाजूने झुकू लागलं.
‘‘आई, निमा म्हणते स्मितावहिनींबरोबर लग्न करा. लग्नाचं प्रेझेंट म्हणून मी रजतलाच तुम्हाला देते. तसाही कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे दर महिन्याच्या दुसर्‍या रविवारी दिवसभर तुम्ही नेताच! आता तो सतत तुमच्या जवळ राहील. तो खुश, तुम्ही खुश! सगळा खुशीचा मामला. नाहीतरी त्याला काकी आवडतेच.’’
‘‘अगं बाई, भलतंच काय हे?’’ स्मिता तडकलीच. महिन्यातून थोड्या वेळाकरिता एकदाच येणार्‍या पाहुण्याचं कौतुक. रोजचं झालं तर… नाही रे बाबा. माझ्याने नाही होणार त्या पोराचं! सारखा आपला काकी काकी करून मागे मागे करणार. तेही दिवसाचे चोवीस तास आणि जन्मभराची कटकट नकोय माझ्या डोक्याला.’’
‘‘वहिनी, मुलगा आहे तो माझा. त्याला पाहुणा म्हणू नका आणि पोराला काय म्हणता. मुलगा म्हणा की नीटपणे.’’
‘‘अगं स्मिता, तोच खरा वारस आहे या घराचा.’’ मध्येच आई बोलल्या. ‘‘आणि त्याला तू कटकट म्हणतेस. एकुलता एक मुलगा आहे तो आमचा. मुलगी म्हटली की परक्याचं धन.’’
‘‘आई, आजच्या काळात तुमचे हे असे विचार? कमाल करता हं. मला वाटायचं आपलं घर म्हणजे अल्ट्रा मॉडर्न समजत होते. खरंच तो माझा भ्रम होता. त्याला इथे आणू नका हं. आधीच सांगते. नाही तर तिला जाऊन सांगा, मुलाचं करायला ये इथे. प्रायमरी शाळेतली साधी मास्तरीण, पण डोकं पाहा वकिलाच्या चार पावलं पुढे!’’
‘‘वहिनी, वहिनी अगं ती खरंच वकील आहे.’’ अजित म्हणाला. ‘‘काय?’’ आता स्मिता उडालीच…! ‘‘हो, ती वकील आहे. आपण तिच्यावर वेळ आणली. तिने कायद्याचं शिक्षण घेतलं, पदवी मिळवली. आज काळा कोट घालून जाते कोर्टात.’’ स्मिता आ वासून पाहतच राहिली. ‘‘गरीब गायसुद्धा शिंग उगारते! बरं का.’’ आई मध्येच बोलल्या. ‘‘रजत बाळ इथेच राहील.’’
‘‘म्हणजे मी अजितबरोबर लग्न करायचं का?’’ हो. काय वावगं आहे त्यात. इतके दिवस मला हे पटत नव्हतं. आता अजितला मुलगा हवा आहे. बाप जिवंत असताना अनाथासारखा लोकांच्या दारात राहतोय रजत. मला नाही पटत हे.’’
स्मिता काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. धुमसत्या वातावरणात आठ-दहा दिवस संपले. विरह स्मिताच्या अंगावर येत होता. वासनेच्या लाव्ह्यात तिचं शरीर जसं होरपळून निघत होतं. रात्री ती अजितच्या खोलीत गेली. तेव्हा अजित म्हणाला, ‘‘प्लीज, मूड नाहीये माझा. नको जबरदस्ती करूस.’’ तशी स्मिता म्हणाली, ‘‘अरे सुखाचं भरलं ताट आपणहून समोर आलं असताना नको म्हणायची काय अवदसा आठवते तुला. चल जवळ आलास की एकदम फ्रेश वाटेल.’’ ‘‘नको खरंच नको… सारखी तिची आठवण…’’
‘‘अच्छा, म्हणजे निमाची आठवण येतीये तर! ती घरात असताना तिला गाढ झोप लागली की, गुपचूप येत होतास ना? ठीक आहे.’’ म्हणत स्मिता आपल्या बेडरूममध्ये गेली. त्या वेळी त्याला वाटलं, आपण एका नागिणीच्या शेपटीवर पाय ठेवलाय. ती डूख धरेल. अजितला प्रसाददादा शहीद झाल्यानंतरच्या एक एक घटना आठवत होत्या. हरवल्यासारखी झालेली स्मिता. छोट्या इशिताला काही कळत नव्हतं. नुसतं बाबा बाबा करायची. स्मिताच्या नोकरीसाठी केलेला पत्रव्यवहार. सगळी सर्टिफिकेटस्. हे ऑफिस ते ऑफिस. सह्या… एक ना दोन, हजार गोष्टी. प्रत्येक वेळी स्मिताला स्कूटरवर मागे बसवून नेणं-आणणं केलं ते एक कर्तव्य म्हणून. आता ती नियमितपणे ऑफिसला जाऊ लागली. मग पोहोचवण्याचं काम आलं. हळूहळू स्मिता दु:ख विसरू लागली. हसून बोलू लागली. आधीच रूप सुंदर. त्यात एका आर्मी ऑफिसरची बायको. वागणं, बोलणं इंप्रेसिव्ह. स्कूटरवर बसली की अजितला खेटून बसणं. काही सांगताना त्याच्या अंगावर रेलून बोलणं. अजितला हे पटत नव्हतं, आवडत नव्हतं. त्याची आई समोर नसली की स्पर्श करणं अन् मग सॉरी म्हणणं. सुरुवातीला त्याला हे विचित्र वाटायचं. भावाची बायको आपली वहिनी. तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं म्हणजे पाप आहे. स्मिताची धिटाई वाढू लागली. तिच्या वागण्या, बोलण्यात, स्पर्शात, देहबोलीत आमंत्रण दिसू लागलं. त्याच्यातला नर जागृत झाला.
आईंना कळल्यानंतर त्यांना वाटलं, तरुण वयातलं आकर्षण आहे. अजितचं लग्न झालं की संपेल हे सगळं. हा विचार करून त्या गप्प बसल्या. स्मिताने पुरताच त्याला आपल्या जाळ्यात ओढला.
निमाशी लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच तिला हे कळलं. मग रजत झाला. सात-आठ महिन्यांच्या रजतला घेऊनच तिने घर सोडलं. खरं म्हणजे आपणच तिला म्हटलं होतं, आहे हे असंच चालणार. पटत असेल तर राहा, नाहीतर बाहेर जायचे दरवाजे उघडे आहेत. आपण तिला गेटआऊट म्हटलं. केवढी मोठी चूक करून बसलो आपण ही! खरं तर निमा फार चांगली होती. गरीब स्वभाव, शांत, सोज्ज्वळ. कोणत्या बाईला सवत आवडेल? शीतलता हा गुण असलेलं चंदनदेखील पेट घेतं, हे आपण विसरलो होतो. तिने शिक्षण पूर्ण केलं. आज ती वकील झाली आणि हा पेच उभा केला.
तो रविवार होता. आई मैत्रिणींबरोबर आवळीभोजनाला बागेत गेल्या होत्या. संध्याकाळी चार-पाच वाजता येणार होत्या. इशिता कार्टून पाहण्यात दंग झाली होती.
‘‘अजित, आजपासून रात्री मुकाट्याने खोलीत ये. हं, आणि एक, मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये.’’
‘‘अगं पण वहिनी, या विवाह बाह्यसंबंधातून प्रेग्…!’’ ती काळजी करू नकोस. मी कधीचीच गोळ्या घेतेय आणि हे वहिनी वहिनी काय लावलं आहेस. सरळ स्मिता म्हण की, माझा शहाणा अज्यू!’’
स्मितानं अजितचं ठेेवलेलं लाडकं नाव. एरवी ते त्याला आवडायचंही. हल्ली नको वाटायचं ते सगळं.
‘‘नाही वहिनी, मी येणार नाही. लग्नाला हो म्हटलं तरचं मी…’’ ‘‘अस्स आहे का! थांब, आता मी दाखवतेच तुला माझा हिसका. एक धाकटा दीर रोज बलात्कार करतो आणि या प्रकाराला सासूची संमती आहे. स्वत:च्या बायकोबरोबर भांडण करून तिला घरातून घालवली. अन् माझ्यावर नजर, अशी बोंबाबोंब करते. समाजातल्या सुशिक्षित व्हाईट कॉलर लोकांकडे असेही प्रकार चालतात. मी बिचारी एका सैनिकाची विधवा दिराच्या आश्रयाला म्हणून आले आणि हा असा गैरफायदा घेतोय्. किती किती अत्याचार मी सहन करतेय. अजित, मी पोलिसकेस करीन. मग तुला तीन महिने जेलची हवा, सरकारी नोकरी सुटेल ते आणि वेगळंच. समाजात तुझी, आईंची, घराची नाचक्की होईल. बघ विचार कर.’’
‘‘वहिनी, अगं इशिताचा तरी विचार कर. ती मोठी होते आहे.’’
‘‘अरे, संभाव्य धोके मी केव्हाच ओळखलेत आणि या जूनपासून इशिता पाचगणीला जाईल शिकायला.
अजित, अरे कायदे बायकांच्या बाजूने आहेत. त्यातून मी देशासाठी शहीद झालेल्या सैनिकाची विधवा. मला तर ताबडतोब न्याय मिळेल. सगळा समाज, सगळा देश माझ्या पाठीशी उभा राहील. तुझं कितीही खरं असलं, तरी त्यावर कोण रे विश्‍वास ठेवणार?’’
स्मिता लग्न करणार नाही अन् निमा डिवोर्स देणार नाही. सर्व बाजूंनी अजितची कोंडी झाली होती. आपल्या विधवा असण्याचं स्मितानं असं भांडवल केलं होतं. त्याच्याकडे एक विजयी कटाक्ष टाकून ती तिच्या खोलीत निघून गेली. अजित दिङ्‌मूढ होऊन ती गेली त्या दिशेला पाहत राहिला. ही कोंडी कशी सोडवावी, हा विचार त्याला सतावत होता…
सुभाषिणी मधुकर कुकडे,नागपूर