साप्ताहिक राशिभविष्य

0
679

रविवार, २७ नोव्हेंबर ते शनिवार, ३ डिसेंबर २०१६
सप्ताह विशेष
• सोमवार, २८ नोव्हेंबर : श्री सखाराम महाराज श्राद्ध- लोणी (वाशीम), सोमवती अमावास्या प्रारंभ १५.१८, बुध धनू राशीत २२.१२, योगमूर्ती जनार्दनस्वामी जयंती- नागपूर, म. जोतिबा फुले पुण्यतिथी, मंगळवार, २९ नोव्हेंबर : कार्तिक /दर्श अमावास्या (समाप्त १७.४५), श्री सखाराम महाराज पुण्यतिथी व महापंगत- लोणी (वाशीम), बुधवार, ३० नोव्हेंबर : मार्गशीर्ष मासारंभ, मल्लारी षड्‌मासारंभ, कोकणास्थानां देवदीपावली, चंद्रदर्शन, गुरुवार, १ डिसेंबर : रबिलावल (मुस्लिम) मासारंभ, शुक्रवार, २ डिसेंबर : रवी ज्येष्ठा नक्षत्र प्रवेश- १७.४९, शुक्र मकर प्रवेश- १८.४१, श्री बाळकृष्ण महाराज पुण्यतिथी- वडगाव (जळगाव), शनिवार, ३ डिसेंबर : विनायक चतुर्थी, भद्रा १२.३८ ते २५.२१, जागतिक अपंग दिन.

मेष : प्रकृतीला जपावयास हवे
राशिस्वामी दशमात उच्च स्थितीत आणि सप्तमातून चंद्राचे पाठबळ मिळत हा आठवडा सुरू होत आहे. सर्वसामान्यपणे हा सुखकर आठवडा असू शकेल. कुटुंबात एखादे मंगलकार्य ठरावे. जमीन, घर खरेदीच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतील. आठवड्याच्या मध्यात प्रकृतीचे काही त्रास निर्माण होऊ शकतात. रवी आणि चंद्र अष्टमात आल्याने अमावास्येच्या सुमारास प्रकृतीला जपावयास हवे. औषधोपचार, पथ्ये सांभाळायला हवीत. वाहने सांभाळून चालवावीत. संततीच्या दृष्टीने हा काळ काहीसा त्रासदायक, निराशाजनक राहू शकतो. कार्यक्षेत्रातील आर्थिक व्यवहारात सतर्क राहायला हवे.
शुभ दिनांक- २७, १, २.
वृषभ : प्रगतिकारक संधी लाभतील
राशिस्वामी शुक्र अष्टमात, सप्तमात शनी आणि चंद्र षष्ठात अशा काहीशा विपरीत स्थितीत हा आठवडा सुरू होत आहे. पंचमातला गुरू आणि भाग्यातला मंगळ यांच्यावरच आपली सारी मदार राहील, असे वाटते. गुरू-मंगळामुळे प्रगतिकारक काही चांगल्या संधी लाभतील. आर्थिक प्राप्ती वाढून काही अडचणी दूर होतील. भागीदारीच्या व्यवहारात मात्र सतर्क राहण्याची गरज आहे. नोकरी-व्यवसायात काही कटकटी वाढू शकतात. रोखीचे व्यवहार करताना सावध असावे. व्यावसायिक प्रवासात दगदग वाढेल. त्याचप्रमाणे या आठवड्यात स्वतःची आणि आपल्या जोडीदाराची प्रकृती सांभाळावी लागणार आहे.
शुभ दिनांक- २८,२९,३०.
मिथून : कार्यक्षेत्रात चांगल्या घडामोडी
राशिस्वामी बुध षष्ठात रवी-शनीसोबत, सप्तमात शुक्र, पंचमातून चंद्राचे सुरू होणारे भ्रमण, चतुर्थात गुरू व अष्टमात मंगळ अशी संमिश्र स्थिती आपणांस लाभली आहे. शुक्र आणि चंद्र या आठवड्यात आपल्या काही हळुवार संबंधांना दृढ करण्यासाठी मजबूत प्रयत्न करू शकतात. युवावर्गास विवाहादी योग येऊ शकतात. कार्यक्षेत्रात काही चांगल्या घडामोडी घटतील. सहकार्‍यांचे उत्तम सहकार्य लाभेल व उद्दिष्ट पूर्ण करून वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. कलावंतांना, साहित्यिकांना मानसन्मानाचे योग यावेत. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील. प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही.
शुभ दिनांक- १, २, ३.
कर्क : कार्यसिद्धीचे समाधान मिळणार
राशिस्वामी चंद्र सुखस्थानात, सप्तमात उच्च मंगळ, पंचमात शनी-रवी, षष्ठात शुक्र अशा ग्रहस्थितीसह हा आठवडा सुरू होत आहे. आपल्या प्रयत्नांना यश मिळून कार्यसिद्धीचे समाधान देणारा हा आठवडा राहील. सुखस्थानातील चंद्र घरात, कुटुंबात समाधानाचे व शांततेचे वातावरण राहावे, असे सूचित करतोय. आपल्या कार्यक्षेत्रातदेखील तो प्रगतीचे वारे वाहावयास लावू शकतो. योगकारक मंगळ युवांना नोकरी-व्यवसाय या संबंधात चांगल्या संधी उपलब्ध करून देऊ शकेल, तसेच काहींना जीवनाचा जोडीदार मिळवून देऊ शकतो. षष्ठातला शुक्र भ्रमंतीच्या, विदेश गमनाच्या संदर्भात मदतगार ठरावा.
शुभ दिनांक- २८, २९, ३०.
सिंह : समाधान व उत्साहवर्धक स्थिती
राशिस्वामी रवी सुखस्थानात शनीसोबत, धनस्थानात गुरू, षष्ठात उच्च मंगळ, पंचमात शुक्र आणि पराक्रमातून चंद्र सुरू करीत असलेला सुखकर प्रवास अशी आनंद-समाधान व उत्साहवर्धक स्थिती लाभलेली आहे. नोकरीच्या वा व्यवसायाच्या प्रयत्नात असलेल्या युवावर्गाला आता त्यांची कामे वेग घेताना दिसू लागतील. विशेषतः महिलावर्गाकडून काही महत्त्वाची कामे पूर्णत्वास नेणे लाभदायक ठरू शकते. आर्थिक क्षेत्रातील तंगीचे वातावरण निवळताना दिसेल. चतुर्थातला शनी स्थावराचे व्यवहार प्रलंबित करू शकतो. वाहने सांभाळून चालवायला हवीत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. मंगलकार्याचे योग यावेत.
शुभ दिनांक- २७, १, २.
कन्या : मनाला उभारी देणारे योग
राशिस्वामी बुध पराक्रमात शनी व रवीसोबत, राशीत गुरू, सुखस्थानात शुक्र आणि पंचमात मंगळ अशी ग्रहस्थिती या आठवड्यात आपणांस लाभली आहे. धनस्थानातून प्रवासास सुरुवात करणारा चंद्र आपणांस आर्थिक लाभाचे योग देत आहे. सुखस्थानातील शनी आपल्या कार्यक्षेत्रातील विरोधकांना बळ देऊ शकतो, मात्र राशीतील प्रबळ गुरू कोणत्याही विपरीत स्थितीतून तारून नेण्यास समर्थ असल्याने चिंतेचे कारण नाही. पंचमातील मंगळ काही तडकाफडकी किंवा अचानक निर्णय घ्यावयास लावून विवाहादी योग आणू शकतो. पाहुण्यांची वर्दळ, मित्रमंडळींसह सहली, प्रवास असे मनाला उभारी देणारे योग संभवतात.
शुभ दिनांक- २७, २९, २.
तूळ : नोकरी-व्यवसायात आगेकूच
राशिस्वामी शुक्र पराक्रमात आणि राशिस्थानी चंद्र, धनस्थानात रवी-शनी, सुखस्थानी मंगळ आणि व्ययात गुरू या प्रमुख ग्रहस्थितीसह आपला हा आठवडा सुरू होत आहे. धनस्थानातील पाप ग्रहांची जमघट आपणांस आर्थिकदृष्ट्या बेजार करू शकते. कुटुंबात काही तणाव, मतभेदाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. चतुर्थातील उच्च मंगळ मात्र आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती घडवून आणू शकतो. नोकरी-व्यवसायात आपली आगेकूच सुरू होईल. युवावर्गाला नोकरी-व्यवसायासाठी उत्तम संधी मिळतील. संततीच्या संदर्भात चांगल्या घटना कानावर पडतील. जोडीदाराच्या प्रकृतीबाबात मात्र आपणांस काळजी घ्यावी लागू शकते.
शुभ दिनांक- २७,२७,३०.
वृश्‍चिक : खर्चावर नियंत्रण असावे
राशिस्वामी मंगळ पराक्रमात उच्चीचा, राशिस्थानात शनी-रवी, लाभात गुरू व व्ययात चंद्र अशी ग्रहस्थिती या आठवड्याच्या सुरुवातीला आपणांस लाभली आहे. मंगळाने शनीसोबत साधलेल्या शुभयोगामुळे गेल्या काही काळापासून आपण सहन करीत असलेले साडेसातीचे चटके सध्या बरेच सुसह्य झालेले जाणवावेत. तथापि, व्ययातला चंद्र आठवड्याची सुरुवात आकस्मिक उद्भवणार्‍या एखाद्या मोठ्या खर्चाने करण्याची शक्यता आहे. गुरू आपले प्रयत्न वाया जाऊ देणार नाही. संततीच्या संदर्भात काही अपेक्षित घटनाक्रम आनंददायी ठरावा. खर्चावर नियंत्रण असावे. कुटुंबात किरकोळ मतभेद निर्माण होऊ शकतात.
शुभ दिनांक- २८, २९, ३०.
धनू : धार्मिक कार्याकडे ओढा
राशिस्थानी शुक्र, धनात उच्च मंगळ, व्ययात शनी-रवी, लाभात चंद्र, भाग्यात राहू अशी एकूण ग्रहस्थिती या आठवड्यात आपल्या वाट्याला आलेली आहे. शनी-गुरू-राहू या ग्रहांची योजना काही धार्मिक व आध्यात्मिक कार्याकडे आपला ओढा वाढविणारी आहे. तीर्थाटन, धार्मिक स्वरूपाच्या सहली, घरात एखादा धार्मिक कार्यक्रम या काळात घडू शकतो. राशीतला शुक्र त्यासाठीची सारी तयारी, तडजोड लीलया घडवून आणू शकेल. दुसरीकडे या राशीच्या युवावर्गास विवाहादी योगासाठी चांगल्या संधी लाभतील. नोकरी-व्यवसायात आपला जम बसावा. कुटुंबात, समाजात प्रतिष्ठा वाढेल. सन्मानप्राप्तीचे योग यावेत. शुभ दिनांक- १, २, ३.
मकर : नवीन प्रकल्पांना संधी
राशिस्वामी शनी लाभात, राशिस्थानात उच्च मंगळ, भाग्यात गुरू, दशमात चंद्र, व्ययात शुक्र अशा उत्तम ग्रहस्थितीसह आपला हा आठवडा सुरू होत आहे. कार्यक्षेत्रात आपला वरचष्मा निर्माण व्हावा. आपल्या प्रयत्नांना, निर्णयांना यश मिळून उत्तम लाभ पदरी पडू शकतो. महत्त्वाची कामे, नवीन प्रकल्प, मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी हा आठवडा अनुकूल ठरेल. मोठ्या व्यक्तींच्या भेटीगाठी संभवतात. कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील. अष्टमातील राहू आपल्या कामात, निर्णयात सचोटी निर्माण करतो. धार्मिक कार्याकडे ओढा वाढेल. कुटुंबात विवाहादी मंगलकार्यामुळे आनंदाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक- २८, २९, ३०.
कुंभ : कुटुंबात आनंदाचे वातावरण
राशिस्वामी शनी दशमात रवीसोबत, व्ययात उच्च मंगळ, लाभात शुक्र, अष्टमात गुरू आणि भाग्यात चंद्र अशा ग्रहस्थितीत हा आठवडा सुरू होत आहे. गुरूची धनस्थानावरील दृष्टी आपली आर्थिक आवक वाढविणारी आहे. नोकरी-व्यवसायात काही चांगल्या संधी चालून येतील व त्यातून आर्थिक लाभ मिळेल. व्यवसाय विस्तारासाठीदेखील हा काळ उत्तम ठरू शकतो. कलाक्षेत्रात असणार्‍यांना यश, प्रसिद्धी मिळेल. काहींना सरकार, समाजाकडून मानसन्मानाचे योग यावेत. संततीला लाभणार्‍या चांगल्या योगांमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मोठी खरेदी व्हावी. व्यसनांपासून दूर राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. शुभ दिनांक- ३०, १, २.
मीन : क्षमता सिद्ध होणार
राशिस्वामी गुरूची सप्तमातून राशिस्थानावर पूर्ण दृष्टी, लाभात उच्च मंगळ, भाग्यात रवी-शनी, दशमात शुक्र अशा छानशी ग्रहस्थिती लाभलेल्या या आठवड्याचा उत्तरार्ध आपणांस उत्तम लाभदायी ठरावा. अष्टमातील चंद्र सुरुवातीला काहीसे निराशेचे, असहयोगाचे, नाउमेदीचे वातावरण निर्माण करू शकतो. प्रकृतीचीदेखील काहीशी कुरबूर राहू शकते. मात्र, उत्तरार्ध या उलट असेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित संधी लाभून आपली क्षमता, कर्तृत्व सिद्ध करू शकाल. प्रतिष्ठा लाभेल. हितशत्रू व विरोधकांवर वचक बसेल. भागीदाराची उत्तम साथ मिळून व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबात मंगलकार्य घडावे. मोठ्या खरेदीचे योग यावेत. शुभ दिनांक- १, २, ३.
मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६