कलेचा अभिव्यक्तीचा सिद्धांत

0
147

सौंदर्यशास्त्राच्या इतिहासात अनुकरण व प्रातिनिधित्वाच्या सिद्धांतांनी आपला अंमल गाजविला. मात्र एकोणिसाव्या शतकात सौंदर्यशास्त्रज्ञांनी नवा विचार मांडला. याही विचाराला लोकमान्यता मिळाली. कलेच्या या नव्या सिद्धांताला अभिव्यक्तीचा सिद्धांत म्हणतात. या सिद्धांताची मांडणी सर्वप्रथम युनिनव्हेरॉन याने केली. पुढे लिओ टॉल्सटॉय, के.जे. डुकास, बेनेडेतो ग्रोस, कॉलिंगवुड, कॅरिट, फ्राईड, सुसान लँगर, हर्बर्ट रीड इत्यादी विचारवंतांनी या सिद्धांतात थोडेफार कार्य केले. अभिव्यक्तीचा अर्थ जे आत आहे, त्याला वाट मोकळी करून देणे असा होतो. कलेतील अभिव्यक्ती याचा अर्थ जे कलाकाराला आतून वाटत आहे, ते कलेच्या उपयोगाने समोर ठेवणे असा होतो. कलाकाराच्या मनोभावनांचे, कला माध्यमाद्वारे झालेले दर्शन म्हणजे अभिव्यक्तिवाद. कलेतून भावनांची अभिव्यक्ती होणे, ही काही नवीन गोष्ट नाही. ग्रीक विचारवंत प्लेटोने कवी हा रसिकांच्या भावनांशी खेळतो, असे म्हटले होते. मात्र, तेव्हा कलेचा उद्देश ‘अनुकरण’ करणे, असा होता, ‘अभिव्यक्त’ करणे असा नव्हता, कलाकार स्वत:ला कला माध्यमातून किती सशक्तपणे अभिव्यक्त करतो, यावर कलामूल्य ठरविण्यात आले.
युजिन व्हेरॉन व लिओ टॉल्सटॉय यांनी कलेला ‘भावनांची भाषा’ असे म्हटले. कला व भावना या संबंधित मूळ प्रश्‍न असा आहे की, भावनेला कलेची गरज आहे की, कलेला भावनेची गरज आहे. कलेलाच भावनांची गरज आहे, असे मत युजिन व्हेरॉन याने मांडले. मनुष्य निसर्गत:च भावनांचे प्रदशर्र्न करू शकतो. राग, लोभ, द्वेष, मत्सर इत्यादी सर्व प्रकारच्या भावना सहजपणे अभिव्यक्त करण्याचे तंत्र मुनष्याजवळ आहे. असे आहे, तर कला माध्यमातून भावनांची अभिव्यक्ती का करायची, असा प्रश्‍न उपस्थित होतो.
कलेला स्वत:च्या अभिव्यक्तीसाठी भावनांची गरज आहे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे कला अधिक सजीव बनते. खरे म्हणजे भावनेचा संबंध मनुष्याच्या मानसिकतेशी येतो. असे असले, तरी भावनेला सांस्कृतिक भूमिका देखील पार पाडायची असते. समाजात एक प्रकारचे सामंजस्य व ऐक्य निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य मनुष्याचे भावविश्‍व घडवून आणू शकते. या उलट समाजात वैमनस्य प्रस्थापित करण्याचेही कार्य भाव विश्‍वामुळे घडू शकते. इतिहास चाळला, तर ही गोष्ट लक्षात येईल. असे असले, तरी हे देखील खरे आहे की, आपण मानव आहोत व अशा मिश्रित भाव-भावनांमुळेच आपल्या जीवनात जिवंतपणा आहे. कला हा जिवंतपणा अबाधित ठेवण्यास मदत करते. म्हणूनच कलाकाराला या समाजाबद्दल व या जगाबद्दल आतून काय जाणवते, ही गोष्ट महत्त्वाची आहे. याची अभिव्यक्ती कलेतून झाली पाहिजे, असे युजिन व्हेरॉनचे म्हणणे आहे. मनुष्याच्या जीवनातून त्याचे भावविश्‍व वजा केले, तर त्यातील चैतन्य हरवून जाईल व मनुष्य रोबोट बनेल. केवळ एक मशीन म्हणूनच मनुष्याच्या या भावविश्‍वाचे कलामाध्यमातून आविष्करण होणे महत्त्वाचे आहे. भावनांचे वस्तुकरण करणे, हे कलावंताचे कार्य आहे. कला वस्तू स्वरूपात कलावंत अशा भावनांचे स्मरण करत असतो व त्यांना एक शिस्तबद्ध रूप देत असतो. वाल्मिकींच्या रामायणातील श्‍लोक भावनांचे शिस्तबद्ध रूपच होय. होमरच्या अविस्मरणीय रचनेतून हेच प्रकट होते. अशा महान कवींच्या रचना आजही आम्हाला उत्तेजित करतात. इतके सामर्थ्य कलेच्या अभिव्यक्तीत असते. काळ व अवकाशाच्या पलीकडचा अनुभव देण्याची क्षमता अशा प्रकटीकरणात असते, असे युजिन व्हेरॉनचे म्हणणे आहे.
कला म्हणजे भावनांच्या माध्यमातून संवाद साधण्याचे साधन आहे, असे लिओ टॉल्सटॉयला वाटते. आपल्या ‘व्हॉट इज आर्ट’ या ग्रंथातून त्याने आपले कलेविषयीचे मत प्रकट केले आहे. त्यांच्या मते, कला मानवीय कृती असून, या कृतीत एक जाणीवपूर्वक चिन्ह, प्रतीक आणि प्रतिमांच्या सहाय्याने दुसर्‍यापर्यंत आपल्या भावना पोहचवितो व दुसरा त्या भावनांचा अनुभव घेतो. कला, रंग, ध्वनी, शब्द, हालचाल यांच्या सहाय्याने मनोरंजन करण्याचे साधन नाही. तसेच ती मनोविकार व वासना यांपासून निर्मित होणारी संवेदनांना सुख प्राप्त करून देणारी गोष्ट नाही. केवळ एखादी नवीन वस्तू तयार करण्यासाठीसुद्धा कला-सृजन होत नाही तर टॉल्सटॉयच्या मते, कला कलाकार व रसिकाला एकाच भावनिक पातळीवर आणणारी गोष्ट आहे. कलाकृती रसिकाशी भावनिक पातळीवर संबंध प्रस्थापित करते. रसिकाशी भावनिक संवाद साधण्याचे महत्त्वाचे कार्य करते. त्यामुळे कलेचे कार्य कलाकाराच्या मनातील भावना रसिकांपर्यंत पोहचविणे अशाच प्रकारचे आहे, हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे टॉल्सटॉयला वाटते.
ज्याप्रकारे संभाषणामुळे एकाचे विचार दुसर्‍याला कळतात, त्याच प्रमाणे कलेमुळे एकाच्या भावना इतरांपर्यंत पोहचतात. अर्थातच, भावनेसोबतच कलाकाराचे विचार देखील रसिकांपर्यंत पोहचतात. कलाकाराच्या मनातील भाव रसिकाला आनंदीत करते. कलाकाराच्या क्षमतेमुळे त्याच्या कला सृजनातून सर्वच प्रकारच्या भावना रसिकात संक्रमित होतात. अशा प्रकारे समाज-मन आलोकित करण्याचे तसेच ते प्रदर्शित करण्याची क्षमता कलेत असते. कलाकाराच्या भावना या आपल्याच आहेत, असे रसिकाला वाटायला लावणे हेच कलेचे कार्य आहे. यासाठी कलाकार आहेत, असे रसिकाला वाटायला लावणे हेच कलेचे कार्य आहे. यासाठी कलाकार शब्द, रंग, ध्वनी यांचा उपयोग कौशल्यपूर्ण रीतीने करतो. कलेचा हा संसर्गजन्यपणा हेच खर्‍या कलेचे निश्‍चयात्मक लक्षण आहे. इथेच खरी कला बनावट कलेपासून वेगळी ठरते. बनावट कलेचा अर्थ अशी कला जी फक्त समाजात सुख संवेदना व उत्सुकता पोचविते. मात्र, जी रसिकांशी भावनिक पातळीवर संवाद करीत नाही. भावनिक दृष्ट्या रसिकाला एकाच पातळीवर आणत नाही. कला संसर्गजन्य असली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन टॉल्सटॉय करतो. कलेचे श्रेष्ठत्व संसर्गजन्यतेच्या पातळीवर अवलंबून असते. कलाकाराच्या सच्चेपणावर कलेची संसर्गजन्यता अवलंबून असते. कलाकाराचा सच्चेपणा त्याच्या अभिनय व्यक्त करण्याच्या आंतरिक जाणिवेवर आधारित असतो. ही आंतरिक जाणीव अंधुक नसावी.
डॉ. विनोद इंदूरकर /९३२६१७३९८२