नोटशूळ

0
168

८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्या आणि अनेक रुदाल्या छाती पिटून घ्यायला पुढे आल्या. त्यात भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणे स्थापन झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आपने बाजी मारली. सातत्याने ट्विटर आणि अन्य सोशल माध्यमातून पंतप्रधानांविरुद्ध गरळ ओकण्याचे त्यांचे काम अव्याहतपणे चालू आहे. फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे, पण हे महाशय थांबण्याचे नाव घेत नाही. दुसरे महाशय म्हणजे राहुल गांधी होय. ते बिचारे काय बोलतात ते त्यांना तरी कळते की नाही, अशी शंका यावी. एकाच पत्रकार परिषदेत ते, मोदींनी काही जणांना सांगून हा निर्णय घेतला असे म्हणतात, तर लगेच अर्थमंत्री असलेल्या अरुण जेटलींनासुद्धा हा निर्णय मोदींनी कळू दिला नाही, असे म्हणतात. कधी ते चार सहस्र काढायला बँकेत जातात, तर कधी भल्या पहाटे एटीएमच्या रांगेत उभ्या राहिलेल्या माणसांशी संवाद साधतात आणि निघून जातात, पण त्यांना पर्याय सांगत नाहीत. या सर्व गोष्टी केवळ राजकारणासाठी चालू आहेत हे न समजण्याइतकी जनता मूर्ख नाही.
ईर्षुर्घृणी न संतुष्टःक्रोधनो नित्यशतिः|
परभाग्योपजीवी च षडेतेनित्यदुःखिताः॥
ईर्ष्या करणारा, घृणा करणारा, असंतुष्ट, क्रोधी, शंकाखोर आणि दुसर्‍याच्या जिवावर जगणारा, हे सहा नेहमी दुःखी असतात.
प्रसार माध्यमांचा तर आनंदच आहे. त्यांना नेमकी कोणती भूमिका घ्यावी, तेच समजत नाही असे वाटते. काही वाहिन्या सकारात्मक तर काही नकारात्मक भूमिका घेऊन पत्रकारिता करीत आहेत. आता डिझाईन पत्रकारिता लोकांना समजू लागली आहे. मल्ल्या आणि मोठ्या उद्योगपतींची कर्जे माफ झाली, असा दुष्प्रचार करणार्‍यांना बँक समजते की नाही, अशी शंका येते. ज्यांना बँकिंग समजते ते असे कधीच म्हणणार नाहीत. हा सर्व प्रचार विरोधक व विकाऊ मीडिया करीत आहे.
स्टेट बँकेने आपली बँलन्सशिट साफ करण्यासाठी केलेली ही नुसती बुक एन्ट्री आहे. यामुळे बँकेचा फायदा कमी होणार आहे. तोटा बुक केला आहे. पण, रिकव्हरी डिपार्टमेंटमध्ये हे अकाऊंट सुरू राहणार आहे. याच्यावरचे व्याज अन ऍपलाईड इन्टरेस्ट (खात्यात लागू न होणारे व्याज व तसे करायचा आदेश रिझर्व्ह बँकेचे असून प्रत्येक उअङङएऊ इअउघ खात्यांना हीच पद्धत बँका वापरतात. तेव्हा स्टेट बँकेने वेगळे काही केले नाही, रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे केले आहे. अन्यथा कोणताच चार्टर्ड अकाउंटंट त्या बँलन्सशिटवर सही करणार नाही) म्हणून नोंद होत राहणार आहे. मल्ल्यावर दाखल केलेले वसुलीचे दावे तसेच सुरू राहतील आणि जेव्हा मल्ल्याचे पैसे वसूल होतील ते व्याजासकट, अगदी अन ऍपलाईड व्याजासकट वसूल होतील तेव्हा मिळालेला प्रत्येक रुपया हा बँकेचा फायदा असणार आहे. आता तर सरकारने मल्ल्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
भारतीय बँका या अमेरिकेला तब्बल एक लक्ष अडुसष्ट सहस्र कोटी रुपये देणे लागतात. ही रक्कम डिसेंबरपर्यंत द्यायची आहे. पण, पूर्व रिझर्व्ह बँक गव्हर्नर रघुराम राजन यांनी रोखीचा असा तुटवडा करून ठेवला की, ही रक्कम देता न आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची पत पार घसरावी. याच रघुराम यांनी मोदींना पाच व दहा सहस्रांच्या नोटा बाजारात आणण्याचा सल्ला दिला होता. सोनिया गटातील या इसमाची हवा मोदींनी सहज काढून टाकली. नोटाबंदीमुळे बँकांकडे पहिल्या तीन दिवसातच तीन लक्ष कोटीहून अधिक रक्कम जमा झाली. याच रामनना ठेवावे म्हणून विरोधक झगडत होते, हे या निमित्ताने लक्षात घ्यावे.
मोदींची तुलना काही उत्साही विरोधकांनी लहरी तुघलकाशी केली आहे. साहजिक आहे. मोदींनी काहीच तयारी केली नाही, अशी त्यांची तक्रार आहे. खरे तर मोदींनी त्यांना तयारी करायला वेळ मिळू दिला नाही, ही खरी पोटदुखी आहे. हे दुखणे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, असे झाले असल्याने ते मोदींना दोष देत आहेत इतकेच. जो जोरात ओरडेल, त्याच्याकडे काळा पैसा अमाप आहे, हे कळण्याइतकी जनता सुज्ञ आहे.
मोदींची माता रांगेत उभी राहिली म्हणून केजरीवालना दुःख झाले. त्यांची माता त्यांच्या धरना आंदोलनात सामील झाल्याचे फोटो आहेत, त्याबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे, हे जाणून घ्यायला आवडेल. आज त्यांना जनतेचा खूप पुळका आला आहे. त्यांच्या सभेत त्यांच्या समोर एका शेतकर्‍याने झाडावर चढून आत्महत्या केली तेव्हा हा पुळका कोठे गेला होता? दिल्लीतील प्रदूषणाच्या बाबतीत न्यायालयाने कैक महिने आधी सूचित करूनही केजरीवालांनी काहीच हालचाल केली नाही. परिणामी तीन दिवस शाळा बंद ठेवाव्या लागल्या. काळ्या पैशाच्या विरोधातील उत्तम पाऊल सरकारने उचलले आहे, असे केजरीवाल म्हणाले असते, तर जनतेला अद्यापही त्यांच्यात दम आहे असे वाटले असते. पण, आता एकेका निवडणुकीतून त्यांचा पक्ष सन्माननीय माघार घेत आहे. याचे मुख्य कारण काळा पैसा निरुपयोगी झाला आहे हेच नव्हे काय?
सामान्य माणसाला मोदी या आपल्या पंतप्रधानांबद्दल नक्कीच अभिमान वाटतो आहे. त्यामुळे नेत्यांनी भडकवण्याचा प्रयत्न करूनही कुठे बँक वा एटीएम फोडण्याचा वगैरे प्रयत्न झाला नाही. लोकांना थोडा त्रास नक्कीच होतो आहे. तो सहन करूनही आज जनता मोदींना धन्यवाद देते आहे. कारण यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी जनतेवर विश्‍वास दाखवत असे पाऊल उचलले नव्हते.
रांगांची काळजी विरोधकांना का वाटते आहे? आम्हाला त्याची पूर्वीपासून सवय होती. फक्त तेव्हा मीडिया हा आजच्याइतका फोफावला नव्हता. रेशनच्या रांगेत, घासलेटच्या रांगेत, दूध केंद्रांवर रांगेत आम्ही रोजच उभे राहत होतो. तेव्हा कोणी आमची खबरबात घ्यायला येत नव्हते. तिथे हाणामार्‍यादेखील होत असत. बस, रेल्वे आरक्षण आणि रिक्षाच्या रांगेत आम्ही आजही उभे राहतो. मुंबईकरांना रांगेची इतकी सवय आहे की, आम्ही आधी रांग दिसली की उभे राहतो मग विचारतो, कोणती रांग आहे? अमेरिकेत डुकरांना खाऊ घातली जाणारी लाल ज्वारी म्हणजे मिलो हा आम्हाला कॉंग्रेस सरकारने रेशनवर खाऊ घातला आहे. म्युझिक कॉन्सर्टच्या रांगेत आजची तरुण पिढी तासन्‌तास उभी राहते. तेव्हा उगाच फालतू काळजी नका दाखवू.
मोदी हा माणूस आत्मकेंद्रित नसून राष्ट्रकेंद्रित आहे, इतके आम्हाला पुरेसे आहे.
डॉ. सच्चिदानंद शेवडे