श्रीखंड्या

0
245

मी जे आत्ता सांगत निघालो आहे त्याचे, कृपा करून, मला पुरावे मागू नका. कदाचित तो एखाद्या सिनेमाचासुद्धा ऐवज़ असेल. ‘गोट्या’ सिरियलमध्ये, गोट्याच्या मानलेल्या वडिलांची, भूमिका करायला भय्या उपासनीला जळगाववरून बोलावले होते. माझ्या मनांत त्यांज़बद्दल आदराचे स्थान होते त्याचे कारण फारच वेगळे आहे. त्याच्या पूर्वजांनी साक्षात श्रीकृष्णाला, याची देही याची डोळा, पाहिले आहे, हे मला माहीत होते!! पण, आपल्या कलेक्टिव्ह अनकॉन्शसमध्ये श्रीकृष्णदर्शन आहे, हे कदाचित भय्यालाच माहीत नसावे. जिने श्रीकृष्णदर्शन घेतले आहे ती व्यक्ती संत एकनाथांची समकालीन असून कीर्तनसार्वभौम मुरलीधरबुवा उपासनी (निझामपूरकर) हेही त्यांच्याच वंशातले आहेत. नागपूर प्रांत संघचालक विनायकराव फाटक यांनी जसा संघस्थानावर, ध्वजाला प्रणाम करताना देह ठेवला तसाच कीर्तनाच्या गादीला साष्टांग नमस्कार घातला आणि उठलेच नाहीत, असे लक्ष्मणबुवा निझामपूरकर, हेही वंशजच.
हट्टाने द्वारकेत अनुष्ठान मांडून बसले होते पूर्वज़ बुवा, ‘‘देवा, मला दर्शन दे!’’ थोडीथोडकी नाही; चांगली बारा वर्षे तपश्‍चर्या झाली. तरीही दर्शन देईना कृष्ण. मग बुवांनी अन्न वर्ज्य केले. त्याचा काहीच असर झाला नाही देवावर. त्यामुळे, बुवांनी प्रायोपवेशनाला प्रारंभ केला. म्हणजे पाणी पिणेही थांबवले. बुवा आता आठ दिवसांत देहत्याग करणार हे स्पष्ट झाले. दुसरे तिसरे रात्री बुवांना स्वप्नदृष्टांत झाला. स्वप्नांत श्रीकृष्ण आला. त्याने बुवांना जरासे दरडावूनच म्हटले, ‘‘काय त्रास देतोयस् मला इथं एकसारखा! किती दूरातून मला इथवर यावं लागलं आहे. काही दुसर्‍याचा विचार करतोस की बस्स; आपलाच!!’’
दंडवतांमागून दंडवत घालीत राहिले बुवा; स्वप्नात. ‘‘आपण इथं द्वारकेत नाही?’’
‘‘नाही.’’ श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘मी गेल्या बारा वर्षांपासून इथं नाही. मी पैठणक्षेत्री नाथाघरी आहे. आता तू आपलं उपोषण सोड आणि मला पाहायचं असेल तर तिथं ये!…’’
स्वप्न मोडले. बुवांनी उपोषण सोडले. प्रकृती ताळ्यावर येण्यापूर्वी गाव सोडले. ते मजल दरमजल करीत तसेच पैठणला पोहोचले. श्रीदर्शनासाठी ते वेडेपिसे झाले होते. पण, अवलियापणाने त्यांनी भान घालवले नव्हते की आपल्या जीवाला लागलेली उत्कट आस कोणाला कळू दिली होती. त्यांनी बभ्रा मुळीच केला नव्हता. त्यांच्यातली आणि कृष्णातली ती खाजगी गोष्ट होती.
बुवा पैठणला पोहोचले. गोदावरीच्या तीरावर गेले. तोंडावर पाण्याचे शिपकावे मारले. फ्रेश झाले. पंचाने तोंड पुसले. बाजूला एक जण कावड भरत होता. बुवांनी त्याला विचारले, ‘‘पैठणमध्ये एकनाथ नावाचे सत्पुरुष राहातात, त्यांचे घर मला दाखवतोस का?’’
त्या कावडवाहूने बुवांकडे पाहिले मात्र आणि बुवांवर अशी काही मोहिनी रचली गेली की, याचे नाव ते!! कावडवाहू तसाच झापकावत निघाला. बुवा त्याच्या मागे धावले. गावातल्या पथांत तो कुठे दिसेनासा झाला ते कळलेच नाही! बुवांना जाणवले होते की, हा कावडवाहू चाकर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात गोपाळकृष्णच आहे. त्याचा तो तेज:पुंज सावळा रंग. त्याचे ते चमकून गेलेले गडद निळेशार डोहमायेचे डोळे. हा पाणक्या नाही. भगवंतच आहे. आपल्याला भ्रम होणे शक्य नाही. भ्रमिष्ट गावकरीच असतील. हा माझा श्रीहरीमुकुंदच आहे. बुवांनी एका वाटसरूला विचारले, ‘‘एकनाथ कुठे राहातात?’’वाटसरूने तुच्छपणाने घराचा पत्ता सांगितला. तुच्छ का बोलणार नाही? साक्षात एकनाथांचा पुत्र देखील एकनाथांबद्दल तुच्छच बोलत असे. तो केवळ संस्कृतातूनच संभाषित असे. आपला बाप हा एका प्रादेशिक भाषेतून बोलतो, याचा त्याला संताप होता. मराठीसारख्या एका ‘भिकार’ प्राकृत भाषेतून ग्रंथरचना करतो. काशीतल्या महामूर्ख ब्रह्मवृंदाने आपल्या बापाच्या ग्रंथाची, गवगवा करून, पालखीतून मिरवणूक काढली, याचा तो उपहास करीत असे.
बुवा एकनाथांचे घर धुंडीत पोहोचले. दार एकनाथांनीच उघडले. नाथांच्या पायांवर डोके ठेवीत बुवा म्हणाले, ‘‘मी धुळे जिल्ह्यातल्या निझामपूरचा मदनराय शर्मा! भगवंताच्या दर्शनास्तव, सारी दुनिया धुंडून, इथवर आलो, महाराज! साक्षात श्रीकृष्ण भगवान आपल्या घरात निवासाला आहेत, हे कळलं होतं. कुठं आहेत ते? आज त्यांनाच पाहिलं आहे मी पाणक्याच्या रूपात!!…’’
‘‘काय म्हणता काय!’’ चकित होत एकनाथ म्हणाले, ‘‘माझा श्रीखंड्या हा भगवंत आहे?’’
श्रीखंड्याकडे एकनाथ धाव घेणार तोच बुवांना देवघरात फिका निळा उजेड दिसला. बुवा तसेच तिकडे धावले. एकनाथ म्हणतच आहेत की, ‘‘अहो, बुवा! पाय धुतल्याखेरीज़ देवघरात पाऊल टाकाल तर हाहाक्कार होईल!!’’
-खरेच हाहाक्कार झाला!! तशाच बरबटल्या पायांनी बुवा देवघरात गेले तर श्रीखंड्या सहाणेवर गंध उगाळीत बसला होता. तोंड लपवीत होता. बुवांपाठोपाठ एकनाथ आले. श्रीखंड्या उभा झाला. म्हणाला, ‘‘नाथा, माझी पोल खुलली आहे. आता इथे राहाणे शक्य नाही. तुमच्या अपरंपार भक्तीच्या ऋणातून मला मुक्त व्हायचे होते. त्याला मार्ग एकच; भक्ताची सेवा करणे!! बुवांच्या अगतिकतेचा निरास करून त्यांनाही, सगुणसाकार रूपांत, भेटायचे होतेच.’’
असे म्हणून श्रीखंड्या अंतर्धान पावला. बारा वर्षे देवाधिदेव परमात्मा आपल्या घरी पाणी भरीत होता आणि ते आपल्याला मुळीच कळले नाही. आपण संतत्वाच्या सुप्त घमेंडीत नम्रपणाचा विनयशील बुरखाच परिधान केला होता की काय! तो या अनोळखी बुवामुळे टराटरा फाडून निघाला. आता एकनाथ पाया पडू गेले बुवांच्या. बुवाही नाथांच्या पाया पडत राहिले. ‘तत् त्वम् असि’, असे दुसर्‍यात परमात्मा पाहणार्‍या वारकरी समुदायाचीच जणू वाट धरली होती दोघांनी. -नाथांच्या भक्तीचा अधिकारसुद्धा अलम दुनियेला कळून आला. आता एक दिवस सगळे पाणी भरतात तरी; कितीही पाणी भरा, तळघरासारखी नांद काही भरत नाही. अजूनही त्या दिवशी श्रीखंड्या वेगळ्यााच रूपात येऊन पाणी टाकतो आणि टाके अचानक भरभरून तृप्त होते.
साक्षात परब्रह्म आपल्या घरात होते. पण, आपल्याला कळले नाही. कळले तेव्हा ते ठहरले नाही. निदान कळले तरी आपल्याला. कित्येक असे अभागी असतील ना की, साक्षात ‘क्ष’ रूपात परमात्मा आपल्या चौभोवती वावरत असतो आणि आपल्याला कधीच कळत नाही की, तो ‘ते’ आहे!!
श्रीखंड्या कोणत्या रूपात वावरत असतो ते तुम्हांला कळतच नाही.
प्रतिक्रियांसाठी… आजच्या आसमंत पुरवणीतील मजकुरासंबंधी काही प्रतिक्रिया व्यक्त करावयाची असल्यास संपर्कासाठी भ्रमणध्वनी :८८८८८७९८५४ तसेच तुमचे साहित्य ीशीिेपीश.रीारपींऽसारळश्र.लेा या ई-मेलवर पाठवू शकता.
डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे/८४५०९६४४३३