खजिन्याचा नकाशा, नव्हे; नकाशांचा खजिना!

0
3103

प्रिय वाचक, मी अनेकदा आपल्याला अशी सूचना करीत असतो की, ‘विश्‍वसंचार’चा मजकूर वाचत असताना सोबत एखादा ऍटलास घेऊनच बसा. विषयमांडणीच्या संदर्भात कसलाही भौगोलिक संदर्भ आला की, लगेच ऍटलास उघडून पाहा. यामुळे तुमची त्या त्या विषयाची एकंदर समजूत वाढेल. अगदी ताजं उदाहरण घ्यायचं, तर अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत काही विशिष्ट प्रांतांनी हिलरी क्लिटंनला मतं दिली; काही विशिष्ट प्रांतांनी डोनाल्ड ट्रम्पला मतं दिली. काही विशिष्ट प्रांत परंपरेने डेमोक्रॅटिक पक्षाचे पाठीराखे आहेत, तर काही प्रांत रिपब्लिकन पक्षाचे पाठीराखे आहेत. कोणकोणते आहेत हे प्रांत? ते तसे का आहेत? हे आपण नकाशात पाहत जर निवडणूक विश्‍लेषण वाचत गेलो, तर अमेरिकेच्या भूगोलाबरोबर तिचा इतिहास आणि वर्तमान यांचीही आपली समजूत वाढते.
अगदी हेच टॉम हार्परही सांगतायत. ते म्हणायत, ‘‘नकाशा ही, ‘आहे आपली एक भिंतीवर टांगलेली वस्तू,’ असं नाही. नकाशा पाहण्यातून, समजावून घेण्यातून आपली समजूत वाढत असते.’’ टॉम हार्पर हे लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीच्या नकाशा विभागाचे प्रमुख आहेत.
आता प्रथम, ब्रिटिश लायब्ररी ही काय संस्था आहे, हे पाहू या. मध्य लंडनमध्ये ब्रिटिश म्युझियम हे जगद्विख्यात वस्तुसंग्रहालय आहे. ते सन १७५३ साली स्थापन झालं. त्यात इतर असंख्य मौल्यवान वस्तूंप्रमाणेच हजारो ग्रंथसुद्धा होते. १९७३ साली, म्हणजे तसं पाहता हल्लीच ४०-४२ वर्षांपूर्वी ही सगळी ग्रंथसंपदा वेगळी काढून ब्रिटिश लायब्ररीची स्थापना करण्यात आली. लंडनच्या यूस्टन रेाड रेल्वेस्थानकाजवळ हे राष्ट्रीय ग्रंथालय आहे. इथे एकंदर १७ कोटी वस्तू आहेत. त्यापैकी १ कोटी ३९ लक्ष ५० हजार पुस्तकं आहेत. ३ लाख ५१ हजार ११६ हस्तलिखितं आहेत. ४३ लक्ष ४७ हजार ५०५ नकाशे आहेत. ८२ लक्ष ६६ हजार २७० डाक तिकिटं म्हणजे स्टॅम्पस् आहेत. १६ लक्ष ७ हजार ८८५ संगीताच्या रेकॉर्डस् आहेत आणि ६० लाख रेकॉर्डिंग्ज, म्हणजे संगीत मैफली किंवा नामवंत व्यक्तींची भाषणे लाईव्ह रेकॉर्ड केलेली, अशी आहेत. ब्रिटिश लायब्ररी हे ब्रिटनचे राष्ट्रीय ग्रंथालय असल्यामुळे, ग्रंथालय कायद्यानुसार ब्रिटिश भूमीवर प्रकाशित होणारे प्रत्येक नवे पुस्तक आपोआपच इथे येते. त्यामुळे या संग्रहात सतत भर पडत असते.
दुसर्‍या महायुद्धापूर्वी जागतिक महासत्ताक असलेला ग्रेट ब्रिटन हा देश दुसर्‍या महायुद्धात जिंकला खरा; पण त्याचा इतका भीषण शक्तिपात झाला की, एकंदर जागतिक क्रमवारीत तो ‘थर्ड क्लास’ देश ठरला. उलटणार्‍या प्रत्येक दशकाबरोबर तो पुन्हा वर येण्याऐवजी आणखीन खालीखालीच चाललाय्, असं तज्ज्ञ लोक म्हणतात. दुसर्‍या महायुद्धात पराभूत झालेले नि बेचिराख झालेले जर्मनी-जपान कुठल्या कुठे पोचलेत, पण ब्रिटन मात्र चाललाय आपला कडेकडेनं! ते कसंही असो. पण, पुन्हा वर येण्याची इच्छा ब्रिटिशांच्या अंतर्मनात आहे, हे दाखवणारं चिन्ह म्हणजे ब्रिटिश लायब्ररीचा अर्थसंकल्प. नव्या युगात ज्ञानाला अतोनात महत्त्व आहे, किंबहुना ज्ञान आणि शक्ती यांच्या जोरावरच आपण पुन्हा वर येऊ, हे ब्रिटिशांनी नेमके जाणलेले आहे आणि म्हणूनच ब्रिटिश लायब्ररीचा वार्षिक अर्थसंकल्प आहे १४२ दक्षलक्ष स्टर्लिंग पौंड! असो. तर एवंगुणविशिष्ट ब्रिटिश लायब्ररीने आपल्या संग्रहातल्या साडेत्रेचाळीस लक्ष नकाशांपैकी निवडक अशा फक्त दोनशे नकाशांचं एक प्रदर्शन सध्या भरवलेलं आहे. अगोदर उल्लेख केलेले नकाशा विभागाचे प्रमुख टॉम हार्पर यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनीच हे दोनशे नकाशे निवडले आहेत. प्रदर्शन पाहणार्‍याची भूगोलाची, नकाशाशास्त्राची, इतिहासाची, त्यातही विशेषत: गतशतकाच्या इतिहासाची समजूत हे नकाशे पाहता-पाहता वाढावी, अशा अंदाजाने त्यांनी हे नकाशे निवडलेले आहेत. म्हणून त्यांनी प्रदर्शनाला नाव दिलंय् ‘मॅप्स ऍण्ड दि ट्‌वेंटिएथ सेंचुरी!
नकाशा बनवण्याचं शास्त्र कुणी शोधून काढलं, हा अर्थातच वादग्रस्त विषय आहे. पण, आधुनिक काळापुरतं बोलायचं, तर सध्या प्रचलित असलेल्या नकाशाशास्त्राची- कार्टोग्राफीची सुरुवात युरोपात झाली. गेरार्डस् मर्केटर या फ्लेमिश भूगोलतज्ज्ञाने सन १५६९ साली पहिला आधुनिक नकाशा रेखाटला, असं मानलं जातं.
पण, यानंतरही पुढची तीनशे-सव्वातीनशे वर्षे सर्वसामान्य माणसाला नकाशाचा फारसा उपयोग नव्हता. लष्करी सेनापती, अधिकारी, दर्यावर्दी, व्यापारी, संशोधक हेच मुख्यत: नकाशे काढून घ्यायचे नि त्यांचा उपयोग करायचे. सन १८९८ मध्ये अमेरिकेत हेन्री फोर्डने मोटार या नवीन वाहनाचा शुभारंभ केला. लोक अगोदरही घोड्यावरून आणि घोडागाडीतून प्रवास करीतच होते. पण, मोटारमुळे प्रवास करण्याचं प्रमाण वाढलं नि तिथपासून पुढे जगभर सतत वाढतच गेलं. त्यामुळे नकाशा या वस्तूची मागणी वाढली.
१९१४ साली युरोपात जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात युद्ध जुपलं. पाहता-पाहता या युद्धाने अत्यंत विक्राळ रूप धारण करून संपूर्ण जगालाच कवेत घेतलं. म्हणून त्याला महायुद्ध असं म्हणू लागले. महायुद्धामुळे विविध देशांच्या सेनादलांनी आपापल्या उपयोगानुसार लाखांनी नकाशे छापले. १९१८ साली संपलेल्या या महायुद्धाने खुद्द जगाचाच नकाशा बदलून टाकला! काही साम्राज्यं, काही देश नाहीसे झाले, तर काही देश नव्याने जन्मले. तशी साम्राज्यांची पतनं आणि उत्थानं इतिहासाच्या प्रत्येक वळणावर होतच आलेली आहेत. पण यावेळेस ही पतनं, नकाशांच्या माध्यमातून, जगभर सर्वत्र सर्वसामान्यांच्या हातात गेली.
त्यानंतर १९३९ ते १९४५ या कालखंडात अधिक संहारक, अधिक भीषण असं दुसरं महायुद्ध झालं. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या महासत्ता संपल्या; तर अमेरिका आणि सोवियत रशिया या नवीन महासत्ता उदयाला आल्या. म्हणजे नेमकं काय घडलं, हे शब्दांप्रमाणेच नकाशाच्या रेषांमधून जगभरच्या सर्वसामान्यांपर्यंत पोचलं.
दुसर्‍या महायुद्धाने वैज्ञानिक संशोधनाचा वेग प्रचंड वाढवला. तशी नकाशाशास्त्रातही भर पडली. समुद्रतळाचे नकाशे यापूर्वीही काढले गेले होते. पण, त्याचं उद्दिष्ट समुद्री वनस्पती, जलचर प्राणी, प्रवाळ बेटं इत्यादींचं शास्त्रीय संशोधन एवढंच होतं. महायुद्धानंतर अमेरिकन नौदलाने, युरोप खंड आणि अमेरिका खंड यांच्या दरम्यान पसरलेल्या अटलांटिक महासागराच्या तळाचा, अतिशय तपशीलवार नकाशा बनवला. कशासाठी; तर आपल्या अत्याधुनिक आण्विक पाणबुड्या कुठेकुठे लपवून ठेवता येतील, हे पाहण्यासाठी. अमेरिकन नौदलाने बनवलेला हा अत्यंत सुंदर नकाशा या प्रदर्शनात मुद्दाम मांडलेला आहे.
अलीकडे वेगवेगळे विषय पटकन समजून देण्यासाठी जे तक्ते किंवा चार्टस् वापरले जातात, तेही मुळात नकाशेच होत. नुकताच दिल्लीमध्ये धुक्यामुळे वाहतुकीचा प्रचंड घोळ झाला. हे धुकं नैसर्गिक नसून, प्रदूषणामुळे निर्माण झालेलं होतं. त्यानिमित्ताने भारतातल्या आणि एकंदरच जगातल्या कोणकोणत्या प्रगत शहरांमध्ये किती नि कसं प्रदूषण आहे, हे दाखवणारे अनेक तक्ते प्रसिद्ध झाले होते. हे सगळे एक प्रकारचे नकाशेच होत.
नकाशांचा उपयोग प्रचारासाठीही करण्यात आलेला आहे. उदा. व्हिएतनाम युद्धात सततच्या संघर्षामुळे नि अमेरिकेने वापरलेल्या ‘नापाम बॉंब’ नावाच्या अतिशय बदनाम अस्त्रामुळे लोकजीवन कसं उद्ध्वस्त झालंय्, हे नकाशाद्वारे दाखवून युद्धविरोधी प्रचार करण्यात आला होता. दुसर्‍या महायुद्धात प्रारंभी, हिटलरच्या झंजावाती चढायांनी जवळजवळ सगळा युरोप पादाक्रांत केला होता. पण, १९४२ नंतर दोस्त राष्ट्रांनी हळूहळू जर्मनीला मागे रेटायला सुरुवात केली. हे सगळं त्या वेळी वृत्तपत्रांमधून नकाशांद्वारे दाखवून एक प्रकारे प्रचारच करण्यात आला होता. जनतेचं मनोबल वाढवण्यासाठी असा प्रचार आवश्यकच असतो.
आत्ताचंच पाहा ना. आपल्या सेनेने पाकिस्तानवर प्रत्याघात करताना पाकव्याप्त काश्मीरमधल्या कोणकोणत्या अतिरेकी छावण्यंावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला, हे आपण शब्दांमध्ये वाचण्याबरोबरच जेव्हा नकाशात पाहतो, तेव्हा आपलं मन उत्साहाने भरून जातं.
तर नकाशा या वस्तूची ही शक्ती आहे नि उपयुक्तता आहे. तेव्हा यापुढे तीही शक्ती मिळवू या. आपल्याकडे असं नकाशा प्रदर्शन जेव्हा केव्हा भरेल तेव्हा भरेल; पण ज्यांना शक्य असेल त्यांनी लंडनला चक्कर टाकून या. निदान आपल्या प्रवासी मित्रांना तसा आग्रह करा. प्रदर्शन मार्च २०१७ पर्यंत चालू राहणार आहे.
-मल्हार कृष्ण गोखले