अमरावती जिल्ह्यात सात नगरपरिषदांमध्ये भाजपा

0
179

शिवसेना व कॉंग्रेसचा प्रत्येकी एक नगराध्यक्ष विजयी
तभा वृत्तसेवा
अमरावती, २८ नोव्हेंबर
जिल्ह्यातल्या ९ नगरपरिषदांपैकी ७ मध्ये भाजपाचे, तर अचलपूर नगरपरिषदेवर शिवसेनेचा आणि चांदूर रेल्वे नगरपरिषदेत कॉंग्रेसचा नगराध्यक्ष विजयी झाला. तसेच नगरसेवक पदांवरही भाजपाच आघाडीवर असून कॉंग्रेस दुसर्‍या स्थानावर आहे.
जिल्ह्यातल्या दर्यापूर, चांदूरबाजार, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, शेंदुरजनाघाट, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, अचलपूर या नऊ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी २७ नोव्हेंबरला मतदान झाले. २८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता झालेल्या मतदानाची मोजणी सुरू झाली. दुपारपर्यंत सर्वच नगरपरिषदांमधले चित्र समोर आले.
धामणगाव नगरपरिषदेत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमदेवार प्रताप अडसड ७९०१ मते घेऊन विजयी झाले. दर्यापूर नगरपरिषदेत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नलिनी भारसाकळे ५७९२ मते घेऊन विजयी झाल्या. भाजपाच्याच स्वाती आंडे वरुड नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या. त्यांना ९६०५ मते मिळाली. अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत भाजपाचे कमलकांत लाडोळे १२२४२ मते घेऊन नगराध्यक्षपदी विराजमान झाले. शेंदुरजनाघाट नगरपरिषदेत भाजपाचे रूपेश मांडवे ५५५१ मते घेऊन नगराध्यक्षपदी विजयी झाले. चांदूरबाजार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे रवींद्र पवार ५७७९ मते घेऊन विजयी झाले. अचलपूर नगरपरिषदेत शिवसेनेच्या सुनीता फिस्के यांनी २२०४७ मते घेऊन नगराध्यक्षपद काबीज केले.
मोर्शी नगरपरिषदेत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीला रोडे विजयी झाल्या. त्यांना ५३४६ मते मिळाली. चांदूर रेल्वे नगरपरिषदेत कॉंग्रेसचे नितेश सूर्यवंशी ३१६१ मते घेऊन विजयी झाले. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत ९ नगरपरिषदांमध्ये भाजपाचे एकूण ९७ उमेदवार व १० समर्थित उमेदवार विजयी झाले आहे. शिवसेनेचे ६, कॉंग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे १२, अन्य पक्ष व अपक्षांचे ३५ उमेदवार विजयी झाले आहे.