नोटबंदी आणि प्रसवपीडा…

0
264

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली अन् देशभर खळबळ माजली. ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांना तर भूकंपाचे हादरे बसतात, तसे धक्के बसले. अनेकांनी रात्रीतून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला. नोटबंदीचा निर्णय लोकप्रियता वाढविणारा असल्याने, कॉंग्रेससह विराधी पक्षांनी गदारोळ सुरू केला. बाहेर केला तसा गोंधळ त्यांनी संसदेतही सुरू केला. हिवाळी अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. पण, विरोधी पक्षांनी नोटबंदीच्या मुद्यावर संसदेचे काम ठप्प पाडले आहे. नोटबंदीच्या मुद्यावर सरकार चर्चेला तयार असताना, विरोधी पक्ष मात्र गोंधळच घालत आहेत. त्यांना कामकाज नको आहे आणि आपले अपयश झाकण्यासाठी ते सरकारला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
जगात जे देश भ्रष्ट आहेत, त्यात भारताचा क्रमांक ९४ वा आहे. ९४ वा क्रमांक असतानाही आपल्या देशात भ्रष्टाचाराच्या कॅन्सरने देशवासीयांना कसे पोखरून काढले आहे, याचा अनुभव आपण सगळेच घेत आहोत. आपल्या पुढे असलेल्या ९३ देशांमध्ये काय स्थिती असेल, याची कल्पनाही न केलेली बरी! भ्रष्टाचार हा विश्‍वव्यापी झाला असल्याने, भारत सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे अनेक देशांनी स्वागत केले आहे. जगातील अनेक देशांमध्ये मोदींच्या निर्णयाचीच चर्चा होताना दिसते आहे. भ्रष्टाचाराला आळा घालणे, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांची आर्थिक रसद थांबवून त्यांचे कंबरडे मोडणे, आंतरिक सुरक्षेला असलेला धोका कमी करणे आणि पर्यायाने अर्थव्यवस्था रुळावर आणणे, हा मोदी सरकारचा प्रामाणिक उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी विरोधी पक्षांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, या निर्णयाचा राजकीय लाभ मोदी व पर्यायाने भारतीय जनता पार्टीला मिळू नये, या कारणाने विरोधी पक्ष संसदेत आणि संसदेबाहेरही गोंधळ घालत आहेत. परंतु, जनतेवर या गोंधळाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. महाराष्ट्रात २५ जिल्ह्यांत झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांचे जे निकाल हाती आले आहेत, ते लक्षात घेतले, तर जनतेने मोदींच्या निर्णयाचे समर्थनच केल्याचे दिसते. नोटबंदी ही प्रसवपीडेसारखी आहे. प्रसव कळा सोसल्यानंतर जन्माला घातलेल्या आपल्या गोंडस बाळाकडे पाहून मातेला जसा आनंद होतो, तसा आनंद नोटबंदीचे सकारात्मक परिणाम अनुभवास येऊन सामान्य जनतेला होईल, यात शंका नाही.
नोटबंदीच्या मुद्यावर कॉंग्रेससह सगळ्याच विरोधी पक्षांनी संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. पंतप्रधानांनी संसदेत उपस्थित राहावे, संपूर्ण चर्चा ऐकावी आणि उत्तर द्यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. पंतप्रधानांनी केलेली घोषणा म्हणजे नोटबंदीचा घोटाळा आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. गेल्या आठवड्यात पंतप्रधान संसदेत उपस्थित राहिले. ते फक्त लोकसभेतच नव्हे, तर राज्यसभेतही उपस्थित राहिले. इकडे राहुल गांधी यांनी आपली भूमिका बदलली. नोटबंदीच्या मुद्यावर चर्चा फक्त स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातूनच व्हावी, असा आग्रह त्यांनी धरला. हा आग्रह सभापतींनी फेटाळून लावला. नोटबंदीचे जे आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि आंतरिक सुरक्षेशी संबंधित पैलू आहेत, त्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी असताना ते सोडून, कॉंग्रेसला केवळ गोंधळ घालून संसदेचे कामकाज बंद पाडण्यातच रुची असल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे. चर्चा करण्याऐवजी कॉंग्रेस गोंधळ घालण्यासच प्राधान्य का देत आहे, हे समजण्यापलीकडचे अजीबात नाही. कॉंग्रेस चर्चेला घाबरते आहे. मोदींच्या उत्तराने आपण शब्दबंबाळ होऊ आणि जनतेपुढे आपले खरे रूप उघडे पडेल, याची भीती कॉंग्रेससह सगळ्याच विरोधकांना सतावते आहे.
काल सोमवारीही कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. एवढ्या गोंधळातही सरकारने काळा पैसाधारकांना धडा शिकविण्यासाठी आयकर दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले. पण, प्रश्‍न हा आहे की, नोटबंदीसारख्या महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा संसदेत करणार नाही तर करायची कुठे? आपला भारत देश हा विशालकाय आहे. १२५ कोटी लोकसंख्या आहे. भोगोलिक स्थिती भिन्न आहे. नोटबंदी लागू करताना काय काय समस्या येणार, याची सरकारलाही कल्पना होतीच. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांकडे ५० दिवस मागितले होते. आता तर केवळ वीसच दिवस झाले आहेत. एवढ्या विशाल देशात नोटबंदी लागू करताना काही अडचणी येणार, अनेकांची गैरसोय होणार, हे अपेक्षितच होते. म्हणूनच आततायीपणा न करता विरोधी पक्षांनी किमान ५० दिवस तरी मोदी सरकारला द्यायला हवे होते. पण, विरोधी पक्षांना त्यांच्या अस्तित्वाचा धोका सतावू लागला आहे. ‘कॉंग्रेसमुक्त भारता’चे स्वप्न मोदींनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे आणि त्या दिशेने यशस्वी वाटचालही सुरू आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे धाबे दणाणले आहे.
नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकांसमोर आणि एटीएमसमोर जशा लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तशा रांगा आता दिसत नाहीत. रांगा कमी झाल्या आहेत. लोकांच्या तीव्र प्रतिक्रियाही बंद झाल्या आहेत. मोदींनी केलेल्या सर्वेक्षणात ९२ टक्के लोकांनी निर्णयाचे समर्थन केले आहे. काल कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या आक्रोश दिवसाचा आणि भारत बंदचा फज्जा उडाल्याचे आपण सगळ्यांनीच पाहिले आहे. बँकांबाहेर ज्या लांब रांगा लागल्या होत्या, त्याचे रहस्यही उलगडू लागले आहे. आम आदमीपेक्षा ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांनी तो पांढरा करण्यासाठी भाडोत्री माणसे रांगेत उभी केली होती, हे एव्हाना सगळ्यांच्याच लक्षात आले आहे. मजुरांना तर काम न करताच केवळ रांगांमध्ये उभे राहून धनकुबेरांकडील काळा पैसा पांढरा करण्याचे चार-चारशे रुपये मिळत होते. हे वास्तव जेव्हा सरकारच्या लक्षात आले, तेव्हा सरकारनेही साडेचार हजारांऐवजी फक्त दोनच हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून मिळतील असे फर्मान काढले, पैसे बदलून घेणार्‍यांच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय घोषित केला अन् काळा पैसाधारकांना आणखी एक धक्का दिला. ‘झीरो बॅलन्स’ असलेल्या जनधन खात्यांमध्येही काळा पैसाधारकांनी मोठ्या रकमा भरल्याचे उघड झाल्याने सरकारने आणखी कठोर भूमिका घेतली. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, मायावती, मुलायमसिंह यादव, सीताराम येचुरी, ममता बॅनर्जी आदी मंडळी हवालदिल झाली. ती का हवालदिल झाली, याची कारणमीमांसा करण्याची गरजच नाही!
ज्यांच्याकडे काळा पैसा आहे असे सगळेच, मग ते कॉंग्रेसचे असोत की भाजपाचे, नोटबंदीचा निर्णय अयशस्वी कसा होईल, याचाच प्रयत्न ते करणार. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकशाहीत त्यांच्या भूमिकेला आणि निर्णयाला महत्त्व आहेच. त्यांच्या निर्णयाला नैतिकतेचे अधिष्ठान लाभले असल्याने कितीही विरोध झाला, तरी सामान्य जनता निर्णयाच्या बाजूने आहे. पुढल्या वर्षी होणार्‍या पंजाब, उत्तरप्रदेशच्या निवडणुकीचे निकाल काहीही लागोत, २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी आणि भारतीय जनता पार्टीला यश मिळणार अन् केंद्रात सत्ता येणार, हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय पंडिताची गरज नाही…!

गजानन निमदेव