एका सुनसान रस्त्यावर…

0
190

चौफेर
कुठल्याशा शहराची आधीच संपलेली सीमा, जणू अजून थोडी विस्तारण्याच्या इराद्याने शहराच्या वेशीवर स्थिरावलेली, हळूहळू विस्तारत गेलेली एक वस्ती. म्हटली तर अवस्थेने पाऽऽर बकाल. म्हटली तर माणसांनी गजबजलेली. शहरी भागात वावरणार्‍या माणसांची जगण्यासाठी चाललेली धावपळ बघून स्तब्ध झालेली. त्यासाठीच्या त्यांच्या जीवघेण्या स्पर्धेपुढे हतबल झालेली. याच वस्तीला वळसा घालत वाहणारा एक रस्ता. वस्तीसारखाच. नजर जाईल तिथवर दिसणारा. ओसाड. अरुंद. लांब पल्ल्याचा प्रवास करून दूर कुठेतरी कुठल्याशा हायवेला जाऊन मिळणारा. या रस्त्यावरची वाहतूक तशी तुरळकच. कडेला उभ्या असलेल्या एखाद्या वडाच्या, एखाद्या पिंपळाच्या किंवा मग कडुलिंबाच्या आल्हाददायक सावलीचा अपवाद सोडला, तर बहुतांशी उन्हात पहुडलेला. केव्हातरी एखादे वाहन वेगाने त्यावरून निघून गेले की, पुन्हा निपचित पडून राहणे, एवढेच ‘कर्तृत्व’ त्याच्या वाट्याला आलेले. या रस्त्याचे हे असले एकटेपण सलायचे मनाला. एरवी, हायवेला मिळाल्यानंतर बदलणार्‍या आपल्याच स्वरूपाशी, वाहनांच्या तिथल्या न झेपणार्‍या वर्दळीशी काहीएक घेणेदेणे नसल्यागत तुसडे वागणे त्याचे. कायम वाळीत टाकला गेलेला वाटायचा तो! बहुधा माणसांच्या गर्दीचेच वावडे असलेला…
काही दिवसांपूर्वी मात्र चमत्कार घडला. या रस्त्याच्या कडेला एक पानटपरी उभी राहिली. अचानक. कालपर्यंत थांगपत्ताही नसलेली अन् बघता बघता रस्त्याचे स्वरूपच बदलले. जणूकाय ही टपरी सुरू होण्याची वाटच बघत असल्यागत वस्तीतल्या लोकांची पावलं इकडे नको तितक्या वेगाने वळू लागली. सुरू झाल्याझाल्याच टपरीभोवतीची गर्दी डोळ्यांत भरावी इतकी जाणवू लागली. नोकर्‍यांच्या निमित्ताने, रोजगाराच्या शोधात घराबाहेर पडलेली तरुणाई आयुष्यातला महत्त्वाचा वेळ इथे दवडताना दिसू लागली. लोकांचा हा ‘उत्स्फूर्त प्रतिसाद’ बघून असेल कदाचित, पण हळूच टपरीच्या बाजूलाच बांबूचा एक छोटासा मंडप उभा राहिला. कुठल्याशा एका ओबडधोबड लाकडी पाटीचा ‘बेंच’ झाला. चार लोकांच्या बसण्याची सोय झाली. ठेल्याशी उभी राहणारी मंडळी आता तिथे विसावू लागली. काम असो वा नसो, टपरीवरून काही विकत घ्यायचे असो वा नसो, लोक तिकडे फिरकू लागले. उगाच. मग जमलेल्यांच्या गप्पांचा फड रंगू लागला. कामावर जाण्याचे, आपण कामाच्या शोधात बाहेर पडलो असल्याचे भान विसरून वस्तीतली पोरं चकाट्या पिटत इथे वेळ घालवू लागली. एव्हाना टपरीलगतच्या त्या मंडपात पत्त्यांचा जुगार केव्हा सुरू झाला कळलंच नाही! त्यात रमणार्‍यांची संख्याही दिवसागणिक वाढू लागली. सकाळचे आठ काय, दुपारचे तीन काय नि रात्रीचे नऊ काय, शेजारच्या रस्त्यावरच्या नेहमीच्या तुरळक वाहतुकीला लाजविणारी टपरीवरची ही गर्दी कमी होण्याचे नावच घेत नाहीय् आता! खिशाचा आवाका लक्षात घेत अन् शहरातील जीवघेणी स्पर्धा नाकारत या वस्तीत स्थिरावलेली माणसं… रोजगाराच्या अभावानं हतबल झाल्याची गार्‍हाणी मांडणारी, त्याचे रडगाणे गाणारी, अकारण या टपरीकडे फिरकणारी, तिथे फुकट वेळ दवडणारी… जुगारात रमणारी…
काहीच दिवसांत या टपरीवाल्याचा एक स्पर्धक उभा राहिला. दुसरा टपरीवाला. जराशा अंतरावर. तोही याच वस्तीतला. पुन्हा तीच परिपाठी… सुरुवातीला एक छोटीशी टपरी. मग वर बांबूच्या मंडपाचे आच्छादन. शेजारी दोन ओंडक्यांवर उभा राहिलेला तसाच एक लाकडी बेंच. आधीच्या ओबडधोबड आकाराशी स्पर्धा करत जरा बर्‍यापैकी रंग-रूप ल्यालेला. बरा म्हणावा असा आकार लाभलेला. शेजारी झाला तसाच इथेही विजेचा बंदोबस्त वरून वाहणार्‍या तारांवर आकोडा टाकून झालेला. बरं, माणसांचा तुटवडा इथेही नाहीच. आधीच्या टपरीवरची गर्दी तसूभरही कमी झालेली नसताना या नव्या टपरीवरही लोकांच्या वर्दळीची कुठे वानवा जाणवत नाही. सिगारेटी फुंकत उभे राहिलेले तरुण अन् आलेच पोलिस तर लागलीच पळ काढता यावा अशा तयारीत पत्ते खेळत बसलेले लोक… हे लोक कालपर्यंत, या टपर्‍या सुरू झाल्या नव्हत्या तेव्हा काय करायचे, तेव्हा वेळ कसा घालवायचे, असा प्रश्‍न पडतो. कामधंदा नाही म्हणून रिकामपण घालवायला इथे आलेली ही मंडळी. मग गुटखा विकत घ्यायला अन् जुगार खेळायला कुठून पैसे येतात यांच्या खिशात? अन् तो टपरीवाला? त्याला कळत नाही का, आपण लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून, त्यांच्या जिवाचा खेळ करून पैसा कमावतोय् म्हणून? अर्थात, त्याला तरी काय दोष द्यायचा म्हणा! इथे लोकच स्वत:चा बाजार मांडून बसलेले. कौटुंबिक जबाबदार्‍या भिंतीवरच्या खुंटीवर टांगून बिनधास्तपणे गप्पांच्या मैफलीत रंगलेले. बेरोजगारीचे तर काय, कारणच गवसलेय् इथे प्रत्येकाला. त्याच्या आडून समर्थन चाललेय् प्रत्येकाचे. स्वत:च्या बेजबाबदार वागण्याचे.
मुंबईच्या धारावीची एक झोपडपट्‌टी आहे. गर्दी तर तिथेही हजारो लोकांची आहे. भेडसावणार्‍या समस्यांचा पसारा सभोवताल तसाच विखुरला आहे. पण, म्हणून त्याचा बाऊ करून बसलेले नाही कोणी. निदान पाच हजार प्रकारचे उद्योग चालतात धारावीच्या या वस्तीतून. शिवणकामापासून तर वीणकामापर्यंत, इडल्यांपासून तर लोणची-पापडापर्यंत, कपड्यापासून रबरापर्यंत… सर्व प्रकारचे उद्योग, त्यात गुंतून राहणे ही इथल्या माणसांची ओळख आहे. विवंचना तर त्यांच्याही वाट्याला आहेतच. नाइलाजानेही असेल कदाचित, पण मुंबईची ओळख ठरलेली धावपळ, इथे जगण्याठी करावी लागणारी धडपड आणि स्पर्धा, यातील कशाचाच बागुलवोवा नाही, तक्रार नाही की कांगावा नाही. कामाची गरज लक्षात घेत सकाळपासूनच घराबाहेर पडण्याची, पळापळ करण्याची, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची, लोकलमधले धक्के खाण्याची तयारी आहे त्यांची. सरकारी नोकरी तर दूर, खाजगी नोकर्‍याही नाहीत कित्येकांकडे. पण, म्हणून जगायचं थांबलं नाही इथे कुणी. हातात काम नसलं तरी पानठेल्यांवर दवडायला वेळ नाही तिथे कुणाकडे. कारण नसलेलं काम शोेधण्यासाठीची धडपड थांबलेली नसते. मिळाली नोकरी तर ठीक अन्यथा स्वत:च्या जिवावर काहीतरी करून तग धरण्याची जिद्द असते मनात. मग गाव-खेड्यातल्या, इतर शहरांतल्या वस्त्यांमधल्या लोकांमध्येच का जाणवतो त्या स्पिरीटचा अभाव? जिथे विकत मिळणारी एकही गोष्ट मानवी आरोग्याच्या हिताची नाही, त्या पानटपर्‍यांवर मानवी जीवनातला महत्त्वाचा वेळ वाया घालवत का उभी राहतात गावाकडची माणसं? तेही खिशात पैसे नसल्याचे वास्तव ठावुक असताना? विनाश हाच अंतिम परिणाम हाताशी लागणार असल्याची पूर्ण खात्री असताना, का भावतो त्यांना जुगाराचा खेळ? तंबाखू उत्पादनात भारत हा जगात चौथ्या क्रमांकाचा देश आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेत तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीतून प्राप्त होणारे योगदान खूप मोठे आहे, या बाबी शंभर टक्के खर्‍या असल्या, तरीही इथल्या बेरोजगार म्हणवणार्‍या तरुणांच्या खात्यावर नोंदवल्या जाणार्‍या पानटपर्‍यांवरच्या उधारीचे आकडे बघून तरी ग्रामीण भागातल्या या समस्येच्या गांभीर्याची कल्पना यावी…
या रस्त्याचे हे बदललेले स्वरूप बघितल्यानंतर, माणसांची हवीहवीशी वाटणारी वर्दळ असूनही, पानटपरी सुरू होण्यापूर्वीचा तो सुनसान रस्ताच बरा होता, असे वाटू लागले आहे आताशा…!
– सुनील कुहीकर
९८८१७१७८३३