ममता बॅनर्जींचा आक्रस्ताळा थयथयाट!

0
116

खुट्‌ट वाजले तरी ‘मोदी… मोदी..’ असे किंचाळत सुटायचे, असा चंग भारतातील काही उथळ राजकारण्यांनी बांधला आहे. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी हे या खेळातले मानांकनप्राप्त खेळाडू आहेत! या स्पर्धेत अग्रमानांकन मिळविण्याची जणू यांच्यात स्पर्धा चालली आहे! कधीकधी या खेळाकडे आकर्षित होऊन शिवसेनेसारखे मित्रपक्षही यात सामील होत असतात. ममता बॅनर्जी यांनी तर आता ताळतंत्र आणि मर्यादा सोडून देशाच्या लष्करालाही या वादात ओढले आहे! गंभीर गोष्ट म्हणजे कॉंग्रेसपासून ते मायावतीपर्यंत विरोधी पक्षही ममता बॅनर्जी यांच्या सुरात सूर मिसळत, भारतीय सैन्याला राजकारणाच्या घाणेरड्या खेळात ओढू पाहत आहेत. आजवर जी काही बेईमानी, बदमाशी, धोकाबाजी राजकीय पक्षांमध्ये चालत होती ती लोक सहन करत होते; मात्र देशाच्या लष्करालाही यात ओढून बदनाम करण्याचे सवंग राजकारण कुणी करत असेल, तर भारतीय जनतेने ते सहन करता कामा नये. या घाणेरड्या राजकारण्यांना जनतेने लगेच बजावले पाहिजे.
‘अति झाले आणि हसू आले,’ या उक्तीनुसार आता भारतीय जनतेला या राजकारण्यांचे हसू येऊ लागले आहे. व्हॉटस् ऍपवर एक विनोद सध्या फिरतो आहे.
‘काटा रुते कुणाला’ या मराठी भावगीतातील ओळी, सध्या राजकीय नेत्यांना कशा लागू पडतात, हे दर्शविणारा हा मजकूर असा आहे-
नरेंद्र- काटा (नोटा) रुते कुणाला, आक्रंदतात कोणी…
उद्धव- मज फूलही (कमळ) रुतावे हा दैवयोग आहे…
अरविंद- सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची…?
राहुल, ममता- चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे…
अजित- काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे…
मनमोहन- माझे अबोलणेही विपरीत होत आहे…
छगन- हा स्नेह वंचना की काहीच आकळेना…
शरद- आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे…
(वि. सू.- गाण्याच्या ओळी काल्पनिक नावाशी जोडल्या आहेत. यातील नावांशी कुणा राजकीय व्यक्तीचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा).
भारतीय सामान्य माणूस हा किती सुज्ञ आहे, हे सांगणारा हा मजकूर आहे.
नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताच, सर्वात थयथयाट जर कुणी सुरू केला असेल तर तो पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी! भ्रष्टाचार निर्मूलनाचे निमित्त करून राजकारणात आलेले अरविंद केजरीवालही त्या थयथयाटात सामील झाले आहेत. भ्रष्टाचार, काळा पैसा हटविण्यापेक्षाही यांना ‘मोदी हटाओ’ची स्वप्ने जागेपणी, झोपेेतही पडत असतात! ममता बॅनर्जी यांचा थयथयाट पाहताच, सोशल मीडियावर- ‘शारदा चीटफंडमधील जमविलेल्या नोटा वाया जाणार म्हणून हा जळफळाट दिसतो आहे,’ अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्यक्त झाल्या आहेत.
ममता बॅनर्जी यांचा जळफळाट इतका शिगेला पोहोचला की त्यांनी, ‘‘आपण मेलो तरी बेहेत्तर, पण मोदी यांना पंतप्रधानपदावरून हटविणारच!’’ अशा प्रकारे वक्तव्य केले. मग निमित्त सापडले किंवा निमित्त करता येईल अशी थोडी जरी शक्यता वाटली, तरी त्या राईचा पर्वत करत थयथयाट करायचा चंगच जणू त्यांनी बांधला आहे. केंद्रीय नगरविकास खात्याने कोलकाता महानगरपालिकेमध्ये वसूल झालेल्या वर्षभरातील महसुलाबाबत एक माहिती मागविली, तर त्याचे निमित्त करत, केंद्र सरकार राज्याच्या सरकारकडे दुर्लक्ष करत थेट अधिकार्‍यांना माहिती विचारत आहे, असा आक्रस्ताळा थयथयाट केला. वास्तविक, पंचायत राजमध्ये तर केंद्र सरकारचा थेट ग्रामपंचायतीशी संपर्क आहे. महसूल वसूल किती झाला, याची आकडेवारी जर केंद्राच्या एका खात्याने मागविली असेल, तर इतका थयथयाट करण्याचे काहीच कारण नाही. मात्र, तोल सुटलेल्या ममता बॅनर्जी यांनी तर या मुद्यावरून केंद्र सरकारला ‘डाकू सरकार’ असे म्हणण्यापर्यंत मजल गाठली! छोट्या कारणावरून स्वतःच्या झिंज्या उपटून घ्यायच्या आणि इतरांच्या नावाने किंचाळत, ओरडत सुटायचे, असा हा उपद्व्याप आहे.
परवा तर कहरच झाला. बंगालच्या टोलनाक्यांवर भारतीय लष्कराने पोलिसांसोबत, वाहनांचे किती संख्येने येणे-जाणे होते, याची माहिती एकत्रित करण्यासाठी अभ्यास केला. हे पाहताच ममता बॅनर्जी यांना वाटले की, आता मोदी यांच्या नावाने थयथयाट करण्याला ही संधी चांगली आहे. लगेच त्यांनी, पश्‍चिम बंगालमध्ये भारतीय सैन्य कसे काय तैनात केले? हा संघराज्याला धोका आहे. आमच्या सरकारवर दबाव आणण्यासाठी केलेली ही चाल आहे. लष्करशाही आणण्याचा मोदी यांचा हा डाव आहे, अशा प्रकारचे अतिशय खालच्या पातळीवरचे आरोप करण्याला सुरुवात केली. रात्रभर सचिवालयात थांबून ठिय्या मांडला. चला, मोदी सापडले, अशा अविर्भावात कॉंग्रेस, मायावती अशा काही विरोधी पक्षांनीही ममता बॅनर्जी यांच्या सुरात सूर मिसळून ओरड सुरू केली. ममताचरणी लीन असलेल्या त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी संसदेत हा प्रश्‍न मांडला. मागचापुढचा विचार न करता, विरोधासाठी विरोध करणार्‍या विरोधी पक्षांनीही त्यांची री ओढली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या विषयात स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे की, ‘‘लष्कराकडून अगदी सहज आणि नियमितपणे केल्या जाणार्‍या कृतीचाच हा भाग होता. त्यात कसलेही राजकारण नव्हते. उलट, लष्कराला अशा प्रकारे राजकारणासाठी वादात ओढणे दुर्दैवी आहे.’’
विशेष म्हणजे पहिल्यांदा देशातील एखाद्या राजकारण्याच्या विधानाचा प्रतिवाद करण्याची वेळ देशाच्या लष्करी अधिकार्‍यांवर आली आहे! सेनेच्या बंगाल क्षेत्राचे मेजर जनरल सुनील यादव यांनी, ममता बॅनर्जी यांनी थयथयाट करत लष्करावर केलेल्या आरोपांचे उत्तर दिले आहे. सुनील यादव यांनी म्हटले आहे की, ‘‘राज्य सरकारला याची माहिती देण्यात आली होती. इतकेच नव्हे, तर बंगालच्या पोलिस अधिकार्‍यांसोबत समन्वय करूनच सैन्याने ही कारवाई केली होती. सैन्याचा हा अभ्यास २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी करण्याचे ठरले होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनीच आक्रस्ताळेपणाने २८ नोव्हेंबरला नोटाबंदीच्या विरोधात ‘भारत बंद’ची हाक दिली होती. त्यामुळे पश्‍चिम बंगालच्या पोलिसांनीच लष्करी अधिकार्‍यांकडे असा आग्रह धरला की, सैन्याची ही टोल नाक्यावरील कार्यवाही २७ आणि २८ नोव्हेंबर ऐवजी ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात करण्यात यावी. त्यावरून ही कारवाई या काळात करण्यात आली.’’ या संदर्भात पश्‍चिम बंगाल सरकारला लिहिलेले पत्रही त्यांनी पत्रकारांना दाखविले आहे. ‘‘या कारवाईचा उद्देश माहिती एकत्रित करण्याशिवाय दुसरा काहीही नाही,’’ असे सुनील यादव यांनी स्पष्ट केले आहे. आता ममता बॅनर्जी यांनी सपशेल माफी मागितली पाहिजे किंवा राजीनामा दिला पाहिजे. आपल्या संकुचित आणि क्षुद्र, आततायी राजकारणाकरिता त्यांनी भारतीय लष्कराला विनाकारण वादात ओढण्याचे घोर पाप केले आहे.
अशा प्रकारे सैन्याने बंगालमध्ये याच ठिकाणी नोव्हेंबर २०१५ मध्ये अभ्यास केला होता. तेव्हा ममता बॅनर्जी गाढ झोपेत होत्या की काय? आता कोणत्याही कारणाने थयथयाट करण्याचे त्यांनी ठरविले असल्यामुळे, त्यांनी हा थयथयाट केला असेल, तर त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांना पाठिंबा देत विरोधासाठी विरोध करत, आपला बालिशपणा प्रकट करणार्‍या विरोधी पक्षांनीही देशाची आणि लष्कराची माफी मागितली पाहिजे. त्यांच्या सगळ्या आक्षेपांची उत्तरे सरकारने नव्हे, तर लष्करी अधिकार्‍यांनी दिली आहेत. तशी वेळ लष्करावर आणली याची, या लोकांना लाज वाटली पाहिजे.
अशा प्रकारचे लष्करी अभ्यास नागरी भागात कशाकरिता केले जातात? या प्रकारे सैन्याला देशात तैनात करण्यात जनतेला घाबरविण्याचा उद्देश असतो काय? याचीही चर्चा केली पाहिजे. याबाबत लष्कराच्या प्रवक्त्यानेच अधिकृत खुलासा केला आहे. त्यानुसार, सैन्याकडून देशभरात दोन वर्षांत एकदा अशा प्रकारे माहिती एकत्रित केली जाते. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या आदेशानेच ही कृती केली जाते. देशाच्या विशिष्ट भागातून किती वाहने जातात, याची माहिती एकत्रित केली जाते, ती सैन्याच्या एखाद्या अभियानात या वाहनांची मदत घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकते.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा देशावर शत्रूने आक्रमण केल्याप्रसंगी भारतीय लष्कराने देशांतर्गत जनतेचे रक्षण करण्यासाठी आजवर प्राणपणाने संघर्ष केला आहे. त्यामुळे भारतीय जनतेला आपल्या शूर सैन्याबद्दल प्रचंड आदर आहे. शहीद सैनिकाला अंतिम निरोप द्यायला सर्वत्र लाखो लोकांनी त्या भावनेनेच उपस्थिती दर्शविली आहे. पूर, वादळ, धरणफुटी, त्सुनामी, भूकंप अशा आपत्तीच्या वेळी सैन्याने ज्या पद्धतीने मदतकार्य केले आहे, त्याच्या कहाण्या अजूनही अभिमानाने लोक एकमेकांना सांगतात. भारतीय जनतेला आपल्या सैन्याबाबत प्रचंड प्रेम आणि अभिमान आहे. असे असताना जणू भारतीय सैन्य हे जाच करण्यासाठी किंवा अधिकार हिसकावण्यासाठी किंवा दबाव निर्माण करण्यासाठी बंगालच्या टोल नाक्यावर उभे होते, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी करणे, ही अकलेची दिवाळखोरी आहे! आपल्या संकुचित, आक्रस्ताळ्या आणि घाणेरड्या राजकीय डावपेचासाठी लष्कराला वादात ओढून ममता बॅनर्जी यांनी मोठा गुन्हा केला आहे. अशा प्रकारचा गुन्हा यापुढे देशात कुणीही राजकीय शक्ती करण्याला धजावणार नाही असा धडा याबाबत ममता बॅनर्जी यांना जनतेने शिकविला पाहिजे.
देशहिताला आपल्या राजकीय स्वार्थासाठी चूड लावण्यात ममता बॅनर्जी यांनी आता कम्युनिस्टांनाही मागे टाकले आहे! यांनाही आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे!

बाळ अगस्ती