रविवारची पत्रे

0
130

संपूर्ण देशाच्या एकजुटीची गरज!
आपल्या देशाच्या सीमांवर संकट आहे. आपली संरक्षणव्यवस्था रात्रंदिवस पहारा करत आहे. जिवाची पर्वा न करता, घरादाराची काळजी न करता भारतीय सेना, सीमा सुरक्षा दल लढत आहे. दिवाळी आली व गेली, आम्ही सर्वांनी सहानुभूती दाखवली. पण, त्याने काय होणार? इथे मराठा आरक्षणाकरिता आंदोलने होत आहेत. जयललिताच्या स्वास्थ्याकरिता परमेश्‍वराला साकडं घातलंं जात आहे. तामिळनाडू व कर्नाटक पाण्यासाठी झगडत आहेत. आंबेडकरवादी वेगळेच मोर्चे काढत आहेत. रामदास आठवले ऍट्रॉसिटी ऍक्टबद्दल भाषणे देत आहेत. मराठा आरक्षणासाठी सर्वदूर मोर्चे निघत आहेत. सोने-चांदीच्या खरेदीसाठी गर्दी लोटते. पण, सीमेवरील लोकांसाठी खरं आम्ही काय करत आहोत? उगीचची भांडणे, जातीयवाद, मोर्चे, राजकारणातील घराणेशाहीसारख्या गोष्टी आम्ही बाद केल्या, तरच सैनिकांना आम्ही खरी सहानुभूती देऊ असे वाटते. कारण देश, संरक्षण व सैनिकांची सुरक्षा यापुढे वरील सर्व गोष्टी अत्यंत गौण आहेत. त्या सर्व संपवायला हव्यात. संपूर्ण देश जर एकजूट झाला, तरच पाकिस्तान कमकुवत होईल व हिंमत संपेल. संपूर्ण देशवासीयांनी याची दखल घ्यायलाच हवी.
जयश्री पेंढरकर, ९४२३६८३७६०

‘धर्म’ आंधळी गाय जणू!
जगतात वावरताना सुसंस्कृत म्हणवून घेण्याची गरज प्रत्येकालाच असते. परंतु, तशी ती न दाखवताच, आपल्याच संस्कृती स्रोतावर प्रहार करण्यात पाकिस्तान धन्यता मानतो. याप्रमाणेच आपल्या संस्कृती शास्त्रावर टीका करणारे भारतातही अनेक जण आहेत. त्यामुळेच आपले पुरोगामित्व सिद्ध होईल अशी त्यांची भ्रामक समजूत असते. विल ड्युरंट नामक इतिहासकाराने मत नोंदविलेले आहे की, संस्कृतीला सुव्यवस्थेने आकार येतो. ती स्वातंत्र्याने बहरते आणि अंदाधुंदीने तिचा विनाश होतो.
इंडोनेशियापासून अफगाणिस्तानपर्यंतच्या भरतखंडातील संस्कृती, परकी आक्रमणांमुळे अशीच गेली अनेक शतके अंदाधुंदीने गांजली आहे. या भरतखंडात आक्रस्ताळी परिस्थिती निर्माण झाली. येथे विविध संस्कृती आहेत अशी भ्रामक विधाने केली जातात. सांस्कृतिक वारशाचे ज्ञान असलेले वाङ्‌मय ग्रंथ, मुळात ते न वाचताच समस्त अभ्यासकांना गोंधळात टाकावे अशी बेबनावाची वक्तव्ये निष्काळजीपणाने केली जातात. यानंतर अशा भ्रामक विधानाची ‘री’ ओढणारे अनुयायी मिळून जातात. ही सांस्कृतिक अंदाधुंदीच!
येथील सांस्कृतिक ज्ञानाच्या भिन्न भाषेतील वाङ्‌मयास धार्मिक ग्रंथ मानले गेले. भारतीयत्व हे एकच मूल्य त्यात वाखाणलेले आहे. आधुनिक काळी ‘धर्म’ या शब्दाचा जो वापर केला जातो तो भारतातील शीख, बौद्ध, महानुभाव, लिंगायत आदी हे उपासना पंथ सूचित धर्म शब्दाच्या अन्य हिंदू धर्म – मुसलमान धर्म – ख्रिश्‍चन धर्म अशा काही संदिग्ध व्याख्या तयार केल्या. भारतीयत्वाची ओळख पुसण्यासाठी त्या पुरजोरपणे उपयोगी पडतात.
भारतीयत्वाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकांचा ओढा ‘धर्म’ महत्त्वाकडे नसावाच. तर तो भारतीय संस्कृतीकडे असला पाहिजे. आक्रमणानंतर, राजकर्ते झालेल्यांनी येथील भारतीय माणसांचा वेगळाला समुदाय निर्माण केला. त्यातून भारतीयत्वाचे संस्कार पुसले. माणसाचे हक्क तेवढे मागा अशी समज भरली. परिणामतः विभक्त समूहासाठी आरक्षित हक्क मिळविण्याची, वेगळा सवतासुभा मागण्याची जाणीव लोकांच्यात भिनलेली दिसून येते. त्यांना धर्माचे लोक मानणे हे चूक होय. भारतीयत्व शिकवा सर्वांना!
भारतीय संस्कार शास्त्राच्या अभ्यासाची मोडतोड केलेली विधाने, भारतीय वाङ्‌मय ग्रंथातील असल्याचे सांगून, ज्ञानाचा गाभा विकृत स्वरूपात सांगून, यावर अंधश्रद्धा, थोतांड आदी शिक्के लावले जातात. वास्तविक संस्कारहीन राहावे असे कुणासही वाटत नसते. परंतु, ते न दाखवता आपल्याच सांस्कृतिक बाबींवर टीका करण्यात, पुरोगामित्व आहे, अशी भ्रामक समजूत काहींची असते.
मनोहर येळणे, ९५२७३४०२३२

रांगेशी पहिला परिचय!
तभाच्या, १९ नोव्हें.च्या अंकातील ‘रांगेत कधी नव्हतो आम्ही!’ या शीर्षकाचे, सुनील कुहीकर लिखित संपादकीय वाचले. अतिशय सोप्या भाषेत आणि सरळसरळ लिहिण्यामुळे ते उत्कृष्ट वाटले.
आजमितीला कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आणि कुठल्याही प्रकारचे वितरण होत असल्यास, आम जनतेने तसेच आमंत्रितांनीदेखील रांगेत उभे राहणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे रांग, कतार, लाईन इत्यादी शब्द आम्हाला परिचित झाले आहेत. आणि आपसूकच रांगेत उभे राहण्याची सवय आता आमच्या अंगवळणी पडली आहे.
अशा या रांगेशी माझा पहिला परिचय १९४४ साली झाला होता. त्या वेळी मला आठवते, दुसरे महायुद्ध सुरू होते. त्यामुळे बर्‍याचशा दैनंदिन जीवनोपयोगी वस्तूंवर सरकारने निर्बंध लादले होते. त्यातील एक जिन्नस म्हणजे साखर!
प्रत्येक इसमाला चार आण्याची एक पाव (त्या वेळी प्रचलित असलेले मोजमाप) साखर दररोज मिळत असे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने सकाळच्या वेळी हिंडतफिरत आम्ही मित्रमंडळी साखर आणायच्या निमित्ताने त्या दुकानाशी पोहोचलो होतो. त्या वेळी आम्हा ८-१० मुलांना एकदम आल्याचे बघून, रांगेत या- ‘‘लाईनसे आईये,’’ असे तिथल्या शेठने म्हटल्याचे आठवते.
पण, रांगेत म्हणजे काय, हे त्या वेळी आम्हाला माहिती नव्हते, म्हणून त्या शेठने आमच्या प्रत्येकाचे दोन्ही खांदे धरून आम्हाला एका मागोमाग उभे केले. ‘‘और इसको अब लाईन बोलते,’’ असे तो म्हणाला.
तोपर्यंत लाईनमध्येे उभे राहण्याची पद्धत फक्त पोलिसांमध्ये आणि संघात असावी, असा माझा समज होता. आता हे सारे हास्यास्पद वाटते. पण त्या काळी कुठेही लाईन, कतार आढळत नसे म्हणजे लोक बेशिस्त होते, असा त्याचा अर्थ नसून, तेवढी गर्दी कुठेही नसायची. नाही म्हणायला डॉक्टरकडे पेशंटची गर्दी असायची. पण, तिथेही सगळे पेशंट शांतपणे बसलेले असायचे आणि कम्पाऊंडर एकेका पेशंटचे नाव घेऊन त्याला डॉक्टरकडे आत पाठवायचा. म्हणजे तिथेही रांग अशी कधीच मला दिसली नाही.
पण, एक काळ असाही होता की, त्या वेळी रांग, कतार, क्यू, लाईन म्हणजे काय त्याचे सहजासहजी आकलन होत नसे. म्हणून कुहीकरांना सांगावेसे वाटते की, रांगा नसलेला काळही मी बघितलेला आहे.
अरविंद भावे,९८९०४५१९७३

मातांनो, सावधान!
खारघर सेक्टर १० मध्ये १० महिन्यांच्या मुलीचा निर्दयपणे छळ केला. तिला जमिनीवर आपटले. खूप संताप, राग आला. पूर्वीसुद्धा जीवनात अशा घटना घडत होत्या. सावत्र भाऊ, चुलत भाऊ वगैरेंमध्ये स्वार्थासाठी छळ व्हायचा. आनंदीबाईने ‘ध’ चा ‘मा’ केला होता. परंतु, आता पाळणाघर रजिस्टर असावे त्याचप्रमाणे त्यातील दाया ट्रेन असाव्यात, असा कायदा आहे. आई-वडील मुलांना प्ले स्कूल किंवा नर्सरीत टाकताना हे बघत नाहीत काय? आज प्रत्येक स्त्री कुठल्या ना कुठल्या कारणाने घराबाहेर पडते. घरात मुलांसाठी बाई किंवा मुलांना पाळणाघरात ठेवतात.
मातांनो, तुमच्या मुलातील बदल तुम्हाला कळत नाही? अंगावरून प्रेमाने हात फिरविताना अंगावरील जखमा किंवा बाळाचे विव्हळणे तुम्हाला समजत नाही? मध्यंतरी पाळणाघरात एका मुलाचे रक्त काढत होते. जखम आईला दिसली. परंतु, काहीतरी चावले असेल म्हणून दुर्लक्ष. रोजच कसे चावते, हा विचार मनात आला नाही. आजकाल मुलाला कपड्यात गुंडाळून झोपवितात. मातेच्या कुशीची ऊब वेगळीच. मूल शाळेत जाताना का रडते, झोपेत एकदम दचकणे, मुलाचे घाबरणे हे लक्षात घेणे पालकांचे कर्तव्य आहे. पैसा दिला म्हणजे जबाबदारी संपली असे नाही. शक्य असेल तर आजी-आजोबांना जवळ ठेवा. ‘दोघांत तिसरे डोळ्यांत खुपले’ असे न समजता, ‘दोघांत तिसरे अपत्याला जपले’ ही भावना मनात ठेवा. काही माता लेकराच्या भविष्यासाठी नोकरी करतात. परंतु, आज जिथे आमची मुलेच सुरक्षित नाही तेथे भविष्य काय? पुन्हा नोकरी मिळणार नाही म्हणून लहान बाळाला दुसर्‍याच्या स्वाधीन करून स्त्रिया घराबाहेर पडतात. आजचे बघा. आज बाळाला प्रेम, माया, अंगावरील दूध द्या. तो निरोगी राहील. भविष्य नक्कीच उज्ज्वल ठरेल!
निर्मला गांधी, ९४२१७८०२९०

तीन मजले जमिनीखाली!
१ डिसेंबरला कित्येक वाहिन्यांवरून फ्लॅश बातमी दाखविली गेली. त्यानुसार ठाण्यातील उपवन तलाव विभागात एका लॉजखाली भूगर्भात तीन मजली बांधकाम आढळून आले. इतकेच नव्हे तर तेथे वीज, पाणी, मोरी, बेड अशा सुविधांसह २९० पक्क्या खोल्या आढळल्या. या जागेला तेथील सक्षम अधिकार्‍यांनी भेटही दिली असे दाखविले.
प्रिंट मीडियाने मात्र यावर चुप्पी साधलेली दिसते. काहींनी आतल्या पानावर फोटो शिवाय छोटीशी बातमी दिली आहे. एवढं होऊनसुद्धा या बांधकामाच्या मागचा सूत्रधार कोण हे हुशार पत्रकारांना कळले नाही की जनतेला सांगायचे नाही? हे बांधकाम होत असताना बाहेर निघणारी माती कोठे टाकली? वीजबिल कोण भरते ? काहीच तपशील नाही, वाहिन्यांवर आरडाओरडा नाही, नक्कीच…निश्‍चितच… अशी आवर्तने नाहीत. शोधपत्रकारिता इथे थंडावलेली दिसते.
दरम्यान हे १६ खोल्यांचे दर्शनी लॉज पाडण्यात आले.
वास्तविक अशी बांधकामे सरकारने काही अल्प मोबदला देऊन आपल्या ताब्यात घ्यावीत. त्या जागेची कागदपत्रेही सरकारच्या नावावर करून घ्यावीत. अर्थात ते बांधकाम दोषयुक्त, असुरक्षित, किंवा अडथळ्याचे असल्यास जरूर पाडावे आणि सोईचे नवीन बांधकाम करून घ्यावे.
आता या जमिनीखालच्या २९० खोल्यांची तपासणी करून त्या ताब्यात घेऊन त्यांचा सुयोग्य उपयोग-उदा. जुनी कागदपत्रे, रेकॉर्ड, निवडणूक मतदान यंत्रे म्हणजेच इव्हीएम वगैरे साठविण्यासाठी करावा.
पूर्ण मालकी मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी असल्यास ९९ वर्षाच्या भाडे कराराने ताब्यात घ्यायला हव्यात. इतर सर्व बेकायदा बांधकामांबाबत ही अशीच आदर्श भूमिका घ्यायला हवी असे मला वाटते.
प्रमोद बापट, ९८२३२७७४३९

केजरीवाल धूर्त आहेत की…?
राजस्व सनदी अधिकारी म्हणून कार्यरत होते, तरी केजरीवाल यांना काळ्या पैशाच्या व्यवहाराचे अगदी सोपे, सरळ अर्थशास्त्र समजले नाही. याला काय म्हणायचे, हेच कळत नाही. एक मात्र निश्‍चित की, केजरीवाल धूर्त मुळीच नाही, तर…
आतापर्यंत बँकेत एकही काळा पैसा जमा झाला नाही, असे उटपटांग विधान त्यांनी केले, तेव्हा खरंच हे सनदी अधिकारी होते की नव्हते, यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे! मोदींना विरोध करावयाला हरकत नाही, परंतु तर्कशुद्धतेचे आयामच जर समजत नसेल, तर कशाला या फंदात पडून आपले हसे करून घ्यावे, एवढेही या मुख्यमंत्री असणार्‍या केजरीवालांना कळू नये, हेचं आमचं दुर्दैव!
दिल्लीच्या जनतेला वार्‍यावर सोडून, केवळ मोदींच्या भाजपाला विरोध म्हणून त्यांनी, उत्तरप्रदेशात- जिथे आप पार्टी निवडणूकच लढविणार नाही तिथे- सभा घेण्याचा सपाटा लावला. पंजाब, गोवा जिथे आप पार्टी निवडणूक लढवणार तिथे सभा घेत फिरत राहिले, तर ते समजले असते. तेव्हा सुज्ञ जनतेनेच ठरवावे की, केजरीवाल हे धूर्त आहेत की…
किशोर पोहेकर, हनुमाननगर, नागपूर