रूढी परंपरा एक वेगळी वाट…

0
230

आशाच्या नातीचं लग्न दोन दिवसांपूर्वी झालं. अजून पाहुणे मंडळी होतीच. आलेले सर्व आहेर पाहून झाले. तोच आशाची नात आर्या म्हणाली, ‘‘आजी, तुझे जुने फोटो दाखव नं. ब्लॅक ऍण्ड व्हाईटमधले खूप सुंदर आहेत ते फोटो.’’ कपाटातून ५-६ फोटो आशाने काढले. ‘‘किती छान दिसता नाही तुम्ही दोघे जण या फोटोमध्ये. खूप भारी साड्या नाहीत की भरपूर दागिने, मेकअप नाही, तरी हा साधेपणा भावतो.’’ आशाची सून सविता म्हणाली. दोघांचा जोडीतील फोटो पाहून आशाचं मन तिच्याही नकळत ६० वर्षांपूर्वीच्या काळात गेलं. तेव्हा नवरा-बायकोच्या वयात १०-१२ वर्षांचं अंतर असायचं. अनंताचं स्थळ तसं पसंत पडण्याजोगं होतं. सरकारी नोकरी, घरी आई-वडील, पाठच्या दोन बहिणी अशा भरल्या घरात आशाला देण्यात आलं. संसारसुखाच्या वेलीवर दोन मुले, एक मुलगी, अशी फुलं उमलली. सर्वांचे शिक्षण चालू होते. त्या काळात मुलगी मॅट्रिक झाली की उजवली जायची. आशाच्या दोन्ही नणंदापण सुस्थळी पडल्या. त्यांचे वर्षभराचे सणवार, पहिलं बाळंतपण रीतीप्रमाणे केलं गेलं. त्यानंतर खर्‍या अर्थाने आशाचा संसार बहरला. दोन्ही मुलं चांगली शिकली. धाकटी प्रतिमापण शिकत असताना योग्यस्थळी उजवली गेली. मोठा मुलगा विश्‍वास पदवीधर झाला आणि सरकारी नोकरीला लागला. धाकटा विजय शिकत होता. विश्‍वासकरिता मुली सांगून येऊ लागल्या. अनंताच्या मित्राची मुलगी सविता सर्वांना पसंत होती. विश्‍वासलापण सविता आवडली. एका शुभ मुहूर्तावर विश्‍वास-सविता पतिपत्नीच्या नात्याने बांधले गेले.
हल्ली मात्र अनंताच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. घरात नवीन सून आली. तिचे सणवार सुरू होते. अनंताला पोटदुखीचा विकार जडला होता. बाकी प्रकृतीच्या काहीच तक्रारी नव्हत्या. पण, जेवण झालं की काही वेळाने पोटात दुखायचं. अनेक डॉक्टर, वैद्य झाले, पण गुण येईना. तेव्हा आताइतकं तंत्रज्ञान विकसित झालं नव्हतं. पोटाचा एक्स-रे काढून झाला. त्यावरून ऍपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं ठरलं. पण, दैवाला ते मंजूर नव्हतं आणि ऍपेंडिक्स पोटातच फुटूून त्याचं पॉयझन होऊन अनंता एकाएकी गेला. आशावर दुर्दैवाची कुर्‍हाड कोसळली. इतकी वर्षे साथ देणारा जीवनसाथी अचानक आयुष्यातून निघून गेला. विश्‍वासने वडिलांचे क्रियाकर्म केले. एक न भरून निघणारी पोकळी आशाच्या आयुष्यात निर्माण झाली. घरातील नातवंडांत थोडंफार मन रमे, पण एकान्तात मात्र अनंताची उणीव जाणवे. विजय याच वर्षी नोकरीला लागला, पण त्याचं लग्न अनंता पाहू शकला नाही. काळ कोणाकरिता थांबत नसतो. सुखाचे दिवस पंख लावून आनंदाने निघून जातात, पण दु:खाचे दिवस मात्र रेंगाळून आपल्या कटुस्मृती मागे ठेवून जातात. अनंताचे अकाली निधन आशाच्या मनाला चटका लावून गेले. जोडीदाराचा वियोग आणि तोही सहजीवनाच्या अर्ध्या टप्प्यावर होणं फारच जीवघेणं होतं. तिचं सर्व विश्‍व अनंताभोवती फिरत होतं. खूप वेळा गरगरा फिरून एकदम थांबल्यावर जसं चक्कर आल्यासारखं होतं आणि आपण एकदम स्तब्ध होतो, असं आशाचं झालं. पाहता पाहता वर्ष निघून गेलं.
१५ दिवसांवर तिथी आली. गुरुजींना बोलावण्यात आलं. ‘‘अगं आजी, किती वेळ हातात फोटो घेऊन बसली आहेस. चल, आई जेवायला बोलावते आहे.’’ आर्याच्या हलविण्याने ती भानावर आली. सर्वांची जेवणं झाली. सविताने मागील सर्व आवरले. हॉलमध्ये सर्वांची अंथरुणं घातली गेली. सर्वत्र निजानीज झाली. पण, आशाच्या डोळ्यांत झोप नव्हती. अनंताच्या मृत्यूनंतर नातीचं लग्न, हेच मोठं कार्य झालं. अनंताची आठवण तिला प्रत्येक क्षणाला येत होती. आतासुद्धा पहिल्या वर्षश्राद्धाचा प्रसंग तिच्या डोळ्यांपुढे स्पष्टपणे दिसत होता.
सकाळी ठीक ९ वाजता गुरुजी श्राद्धाच्या सर्व सामानाची यादी घेऊन आले. सर्व सूचना देऊन झाल्या. किती ब्राह्मण जेवायला येणार, पूजाविधी किती वाजता सुरू होणार, किती दक्षिणा लागेल, सर्व बोलणं झालं. आशा, विश्‍वास, सविता, सर्व काळजीपूर्वक ऐकत होते. श्राद्धाचा स्वयंपाक सोवळ्यात आणि सवाष्णीने करावा. शेवटचे शब्द सविताकडे पाहून गुरुजी बोलले. आशाचा चेहरा कसानुसा झाला. आपण एकदम निराधार, उपर्‍या झाल्यासारखं तिला वाटलं. सर्व तयारी आपण करायची, पैशाची सोय, दक्षिणा आपण द्यायची. कारण आपण तिथे भावनिकदृष्ट्या गुंतलेलो आहोत. पण, जो पितरांना आणि उद्या अनंतालासुद्धा वाढायचा तो स्वयंपाक मात्र आपण करायचा नाही. तिथे आपला जणू विटाळच होणार होता. आशाचं मन अस्वस्थ झालं. वरकरणी ती शांत होती, पण मनात मात्र खळबळ माजली होती. अस्वस्थता दाटून आली. चहा घेऊन गुरुजी निघून गेले. रात्रीची जेवणं झाली. नंतर विश्‍वास आणि सविताला समोर बसवून आशा सांगू लागली-
‘‘विश्‍वास, मला तुला काही सांगायचं आहे. माझं बोलणं कदाचित तुला पटणार नाही. पण, मी ते अत्यंत जाणीवपूर्वक आणि विचार करून तुझ्यासमोर मांडते. माझे बोलणे पूर्ण होईपर्यंत तुम्ही दोघे मध्ये बोलू नका. असं बघा…’’ आशाने स्वत:ला सावरत बोलण्यास सुरवात केली- ‘‘तुझ्या वडिलांसोबत माझा अत्यंत सुखाचा, समाधानाचा संसार झाला. तुझे बाबा अनंता यांना मी इतकी वर्षे स्वयंपाक करून जेवायला वाढले. पण, आता मात्र माझ्या हाताचं त्यांना चालणार नाही. हे मला पटत नाही. मी त्यांना घालवलं का? त्यांच्या मृत्यूला मी कारणीभूत आहे का? त्यांचं आधी जाणं, ही माझी इच्छा होती का? हा दुर्दैवी दैवयोग आहे. ज्याचे जितके श्‍वास असतात, तितकेच आयुष्य ती माणसं जगतात. ते गेल्यानंतर माझ्यात काय फरक झाला की, माझ्या हातचं चालणार नाही त्यांना? इतकी मी अपवित्र, अपशकुनी झाली का? मला या गोष्टी पटत नाहीत. श्राद्धाचा पूर्ण स्वयंपाक मी आणि मीच करणार.’’ एका ठाम निर्णयावर आशाचं बोलणं थांबलं. विश्‍वास-सविता शांतपणे आशाचं बोलणं ऐकत होते. त्यातील कणखरपणा, आग्रही भूमिका, निर्धार, स्वत:च्या मतावर ठाम असणं आणि नवर्‍याप्रतीचं प्रेम दोघांनाही स्पर्शून गेलं. विश्‍वास हलकेच आईला थोपटत- ‘‘काळजी करू नकोस. सर्व तुझ्या मनासारखं होईल. तुझ्या भावना माझ्या अगदी अंत:करणापर्यंत पोहोचल्या. तू निश्‍चिंत राहा. आणि पूर्ण स्वयंपाक तूच करणार आहेस आणि बाबांना तूच जेवू घालणार आहेस.’’ विश्‍वासच्या समजावण्याने आशा आश्‍वस्त झाली आणि शांत मनाने झोपायच्या खोलीत गेली. विचार करता करता आशाचा केव्हा डोळा लागला, हे तिलाही कळलं नाही.
परंंतु, भूतकाळाने अद्याप आशाची पाठ सोडली नव्हती. पहिलं वर्षश्राद्ध म्हणून मुलगी, जावई, नातवंडं, पुतणे, भाचे आणि त्यांचा परिवार दोन दिवसांपूर्वीच आला होता. सर्वांच्या बोलण्यात अनंताचा विषय होता. गुरुजी आले. त्यांचे चहा-पाणी झाले. ठीक १२ वाजता पूजेला सुरुवात झाली. विश्‍वास पूजेला बसला. त्याचा लहान भाऊ विजय, पूजेचं साहित्य वगैरे सर्व आहे की नाही पाहत होता. पूजा पूर्ण झाली. सर्वांनी नमस्कार केला. गुरुजी जेवायला बसले. सविता आणि तिची नणंद नऊवारी पातळं नेसून गुरुजींना वाढत होत्या. विश्‍वास त्यांना हवे-नको पाहत होता. समोर जणू बाबाच जेवायला बसले आहेत, ही भावना त्याच्या मनात होती. गुरुजींना तो आग्रहाने वाढत होता. गुरुजी स्वयंपाकाची तारीफ करीत होते. भरपेट जेवण झाले. हातावर पाणी पडले. पानसुपारी, विडा, दक्षिणा घेऊन सर्व जण बैठकीच्या खोलीत ऐसपैस बसले. गुरुजींसोबत विश्‍वास, विजय व सर्व जण बोलत बसले होते. तेवढ्यात मंदपणे पावलं टाकत आशा दिवाणखान्यात आली. ‘‘जेवण व्यवस्थित झालं का, स्वयंपाक कसा झाला होता, आवडला का, पोटभर जेवलात की संकोच वाटला… आशाने सर्वांची विचारपूस केली.
‘‘स्वयंपाक छान झाला होता. आम्हाला तुमचं घर काही परकं नाही. तेव्हा नि:संकोचपणे अगदी पोटभर जेवलो. पूजापण छान झाली. सर्व भरून पावलो. सर्व पितर तृप्त झालेत.’’ घेरदार पोटावरून हात फिरवत गुरुजी म्हणाले. ‘‘तुम्हाला स्वयंपाकात किंवा जेवतानाच्या अन्नात काही फरक जाणवला का?’’ ‘‘कशाचा हा प्रश्‍न? छे! सर्व कसं सुंदर, चविष्ट, रुचकर, सात्त्विक भोजन होतं. त्यात फरक तो कोणता असणार?’’ ‘‘मग एक सांगू?’’ आता गुरुजींची प्रश्‍नार्थक नजर आशावर खिळली. ‘‘सर्व स्वयंपाक मी स्वत:ने एकटीने केला आहे. अहो! आमच्या लग्नापासून शेवटपर्यंत ते माझ्याच हातचं जेवण जेवले. म्हणून आज वर्षश्राद्धाचासुद्धा मीच सोवळ्यात स्वयंपाक केला आणि त्यांना जेवू घातलं.’’ अंगावर वीज कोसळावी तसे आशाचे शब्द गुरुजींच्या अंगावर कोसळले. कानातून तप्तरस थेट मेंदूपर्यंत गेला. डोळे विस्फारले गेले. चेहरा, शरीर कासावीस झाले. तोंडात असलेला विडा थुंकताही येईना की गिळताही येईना. पोटात गेलेलं अन्न बाहेर काढताही येईना. त्यांचे शब्दच खुंटले. घशाला कोरड पडली. या सर्व धक्क्यातून सावरून बाहेर यायला काही मिनिटांचा अवधी लागला. आशा मात्र थेट नजरेने त्यांच्याकडे पाहत होती. जणू नजरेने तिने त्यांच्या अंतरंगात प्रवेश केला होता. ‘‘असो! पण, तुमच्या हातचं- विधवेच्या हातचं- जेवण कसं चालेल त्यांना?’’ सर्व शक्ती एकवटून गुरुजी म्हणाले. ‘‘का? त्यांच्या मृत्यूला मी कारणीभूत आहे? प्रत्येक जण आपले निश्‍चित श्‍वास घेऊन जन्माला येतो. नेमके तेवढे श्‍वास घेतले की, त्याचा श्‍वास थांंबतो, ज्याला आपण व्यवहारी भाषेत मृत्यू म्हणतो. त्यांच्या आधी मी गेले असते, तर त्यांनी सर्व पूजाविधी माझ्याशिवाय एकट्याने केले असते. ते तुम्हाला चाललं असतं. मग हे नाही म्हणून मी श्राद्धाचा स्वयंपाक करू नये, असं का? मला एक स्त्री म्हणून न पाहता एक व्यक्ती म्हणून पाहिलं, तर माझा मुद्दा तुमच्या लक्षात येईल. अगदी शेवटच्या श्‍वासापर्यंत ते माझ्याजवळ होते. दवाखान्यात जाईपर्यंत माझ्या हातचं सर्व खाल्लं. मग आताच कोणता असा मोठा फरक झाला की, मी केलेला स्वयंपाक त्यांना चालणार नाही?’’ आशाच्या या युक्तिवादाला गुरुजींकडे उत्तर नव्हते. आशापण फार बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हती. कारण आज अनंंताचं वर्षश्राद्ध होतं. अनंताची उणीव तिला आज प्रकर्षाने जाणवून गेली. गुरुजींना निरुत्तर करून ती आतल्या खोलीत निघून गेली. तिच्याही नकळत दोन आसवं तिच्या हातावर टपकन पडली. गुरुजी निघून गेले. त्या रात्री आशाला बर्‍यापैकी झोप लागली. अनंताला जेवू घालून ती स्वत:पण तृप्त झाली होती.
दुसर्‍या दिवशी दुपारचा चहा झाला. हॉलमध्ये सर्व जण बसले होते. ‘‘आजी! तू तर कमाल केलीस. सर्वांना निरुत्तर केलेस.’’ आर्या म्हणाली. ‘‘अगं, मला त्यांना निरुत्तर करून त्यांचा अपमान करायचा नव्हता. पण, अनेक वर्षं समाजात जे पाहत होते, त्याची पुनरावृत्ती आपल्या घरात नको होती. फक्त नवर्‍याच्या मृत्यूने त्याची बायको अपवित्र होते काय? कुठल्याही शुभकार्यात तिची सावलीसुद्धा पडणं अपशकुनी वाटलं जातं. आजपर्यंत सर्व मंगलप्रसंगी समोर समोर पुढे असणारी स्त्री एकाएकी माजघरात ढकलली जाते. कोणत्याही न केलेल्या गुन्ह्याची ती शिक्षा भोगते. तिला हळदीकुंकवापासून दूर केले जाते. हे म्हणजे तिच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखंच आहे. आणि आता तुझा नवरा जिवंत नाही, हे प्रत्येक कृतीतून समाज तिला पटवून देत असतो. पुन:पुन्हा तेच दु:ख तिला भोगण्यास लावतो. ती विधवा आहे हे तिला समाज विसरू देत नाही. यातून मला बाहरे पडायचं होतं. ती घुसमट मला संपवायची होती. छाती भरभरून मोकळा श्‍वास घ्यायचा होता. त्याकरिता थोडा मानसिक त्रास झाला. तो विचार कृतीत आणणं सोपं नव्हतं. त्यासाठी आधी काही गोष्टींना नाही म्हणणं भाग होतं. थोडं प्रवाहाविरुद्ध पोहावं लागलं. स्वत:ला स्वत:विरुद्ध लढावं लागलं. त्याचा शारीरिक आणि मानसिक त्रास जास्त झालाच. पण, पुढच्या पिढीकरिता दरवाजा उघडा करायचा होता. त्याकरिता ही बंडखोरी म्हणा हवं तर. पण, ही सशक्त बंडखोरी आत्मसन्मानाकरिता आहे. यात कोणाचं अहित नसेल, तर पुढे जायलाच हवं, हेच ही बंडखोरी दाखवून देते.’’ विश्‍वास, त्याची बायको, लहान मुलगा विजय, मुलगी, जावई, नातवंडं, भाचे, पुतणे… सर्व जण आशाचं नवं रूप पाहून चकित झाले. प्रत्येकाच्या मनातील प्रश्‍नाचं समर्पक उत्तर होतं ते. त्यामुळे सर्व अवाक् झालेत. बैठकीत शांतता पसरली. ‘‘ब्रेव्हो आजी! अगं किती प्रगत विचार आहेत तुझे. ते आमच्या आणि पुढील पिढीला नक्कीच मागदर्शक ठरतील.’’ आर्याच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सर्वच भानावर आलेत. आर्याला जवळ बसवत आशा म्हणाली, ‘‘हे बघ, नीट डोळे उघडे ठेवून आणि बुद्धी जागृत ठेवूनच योग्य निर्णय घ्यावे. आपल्या निर्णयाने कोणावर अन्याय होत नाही ना, कोणी दुखावल्या जात नाही ना, याची मात्र काळजी घ्यावी आणि मार्गक्रमण करावे.’’ आजीचं म्हणणं पटल्याने आर्याने मान हलविली आणि आशाला ती अधिकच बिलगली.
दुसर्‍या दिवशी सर्व पाहुणे गावाला गेले आणि सर्वांचंच रुटीन लाईफ सुरळीपणे पूर्वीसारखं सुरू झालं- नेहमीप्रमाणे…

सुनीता गोखले/९८२३१७०२४६