फुसका बार….

0
154

सर्व माध्यमांतून आदळआपट करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा कशी दणदणीत हरणार आहे, असे घसा सुकेस्तोवर ओरडणारे पुरोगामी पार दातावर पडले की हो…! महाराष्ट्रात पूर्वी केवळ चार नगरपालिका ताब्यात असणारा हा पक्ष, यावेळी ३१ नगरपालिका खिशात टाकता झाला. शिवसेनेची प्रगतीसुद्धा चांगली होती. पण, हे सर्व मोकळेपणाने मान्य करतील तर ते पुरोगामी कसले? स्थानिक पातळीवरचे प्रश्‍न वेगळे असतात आणि त्या दृष्टीतून या निवडणुकांकडे पाहायला हवे, अशी त्यांची पोपटपंची आता चालू झाली. मग आधीपासून अन्य लोक काय वेगळे सांगत होते? त्या वेळी मात्र नोटबंदी भाजपाच्या अंगाशी येणार आणि लोक त्यांना नाकारणार, अशी हे लोक अक्कल पाजळत होते. काहीही झाले तरी आपले चुकले, अशी कबुली द्यायला मोठे मन लागते, ते यांच्याकडे नाही, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. त्यांची आधीची आणि आत्ताची बडबड मनावर घ्यायची नसते, हे लोकांनादेखील कळून चुकले आहे. पण, हे विचारजंत मात्र आपल्याच विश्‍वात दंग असतात. जणू आपल्याला जगातील सर्व ज्ञानाची मक्तेदारी दिली आहे आणि आपण म्हणू तेच घडेल, अशी यांची धारणा असते की काय, कोण जाणे!
मात्र, यांची एक हुशारी मानायला हवी की, हे सगळे माध्यममित्र आहेत. त्यामुळे माध्यमांनी यांना मोठे केले आणि अजूनही मोठे करीत आहेत. लांबलचक खरीखोटी आकडेवारी तोंडावर फेकत हे लोक जे काही बोलत असतात, त्यावर यांचा तरी विश्‍वास असतो की नाही, कुणास ठाऊक! तरीही वाहिन्यांवरील चर्चांमध्ये यांना सतत बोलावले जाते, हेच यांचे माध्यमचातुर्य आहे आणि ते मानायला हवे. तेच ते बोलत राहणे आणि कुणी त्यात त्यांना योग्य माहिती सांगितली, तर त्याला उडवून लावणे, इतकेच यांचे काम असते. सोशल माध्यमात तर यांना प्रश्‍न विचारणार्‍यांना सरळ ‘ब्लॉक’ केले जाते! असे लोक जेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गळा काढतात, तेव्हा हसावे की रडावे, हेच कळत नाही! मांजर कितीही डोळे मिटून दूध प्यायले, तरी अन्य बघणार्‍यांचे डोळे उघडे असतात ना! हां, आता मांजराला ते कळत नाही, ती गोष्ट वेगळी. एकदम पेकाटात लाथ बसली की कळते.
मोदींच्या नोटबंदीवर पुरोगामी नेत्यांना एकाएकी सामान्य लोकांचा पुळका आला आणि त्यांनी ‘आक्रोशदिन’ साजरा करायचे ठरवले. आधी भारत बंदची हाळी होती. मग लक्षात आले की, तसे होऊ शकणार नाही. नंतर सारवासारव करत ‘आक्रोशदिन’ करायचे ठरवले. इथेही सामान्य जनतेला कमी लेखण्यात आले. सामान्यांना थोडाफार त्रास झाला आणि होतो आहे, हे कुणी नाकारत नाही. तथापि, त्यांना पंतप्रधानांची धडपड कळते आहे. लोकांवर इतका विश्‍वास टाकून एक प्रकारे जुगार खेळणारा आणि त्यासाठी वेळप्रसंगी स्वत:चे पंतप्रधानपदही पणाला लावणारा माणूस पहिल्यांदाच दिसला! साहजिकपणे, जनता त्यांच्या मागे उभी राहिली. मात्र, जनतेचे नाव घेत आरडाओरडा करीत राज्यसभा आणि लोकसभा सातत्याने बंद करणारे हे विरोधक पाहून जनमत त्यांच्या विरोधात जात राहिले. ‘आप’ हा पक्ष तर भ्रष्टाचार समूळ नष्ट केला जावा, असे म्हणत राजकारणात आला आणि त्यांच्या नेत्यांवरच वेगवेगळ्या आरोपांखाली तुरुंगात जाण्याची वेळ आली, हे लोक पाहत आहेत. आज तो पक्ष बेछूट आरोप करीत नोटबंदीला विरोध करीत आहे, हे पाहून जनतेची करमणूक होते आहे. ज्याचा या नोटबंदीविरुद्ध जितका मोठा आवाज, तितका तो जास्त भ्रष्टाचारी, असे सोपे समीकरण या नेत्यांनी आपल्या करणीने लोकांना तयार करून दिले आहे. ‘आक्रोशदिना’च्या निमित्तानेसुद्धा यांना आपली एकजूट दाखवता आली नाही. तृणमूल, कॉंग्रेस आणि मार्क्सवादी यांनी आपला आक्रोश वेगवेगळा जाहीर केला. ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला म्हणून कॉंग्रेसवाले त्यांच्यासोबत राष्ट्रपतींकडे गेले नाहीत. म्हणजे इथे जनतेच्या काळजीपेक्षा श्रेय लाटण्याची चढाओढ दिसत होती. पंतप्रधानांनी केव्हा लोकसभेत यायचे आणि उत्तरं द्यायचे, त्याची काही निश्‍चित योजना असते, हे विरोधकांना ठाऊक आहे. पण, जनतेला मूर्ख बनवण्याचा एक प्रयत्न म्हणून लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज चालू दिले जात नाही. पण, ‘ये पब्लिक हैं, सब जानती हैं!’
या गदारोळात डाव्यांनी गोव्यातील निवडणुका लक्षात घेऊन तिथे आपली दक्षिणायन परिषद भरवली. नाव मुद्दाम हिंदू संस्कृतीतील निवडले. वर दक्षिणायनात दिवस मोठा असतो, म्हणजे प्रकाशाचे साम्राज्य अधिक काळ असते, म्हणून हे नाव निवडले, असे गोंडस कारण दिले. म्हणजे यांचा विचार तो प्रकाश आणि अन्यांचा तो अंधार, अशी सरळ मांडणी केली आहे. पण, ‘अयन’ या शब्दाचा एक अर्थ ‘मार्ग’ असाही होतो. दक्षिणेकडे जाणारा यांचा मार्ग म्हणजे विनाशाचा मार्ग नव्हे काय? कारण, हिंदू संस्कृतीत दक्षिण दिशा ही यमाची म्हणजे मृत्यूची दिशा आहे. बहुधा हे कुणाच्या लक्षात आले नसावे. तिथे जाऊन यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या संकोचाचे गळे काढले. मडगावला रवींद्रभवनाच्या वास्तूत ही परिषद भरली होती. त्या वास्तूवर गोवा सरकारचे नियंत्रण आहे. गोव्यात भाजपाचे सरकार आहे. तरीही, यांना परिषदेची परवानगी सरकारी भवनात मिळाली, याला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच म्हणायचे काय? तिथे जमलेल्या वक्त्यांनी आणि दाभोळकर-कलबुर्गी-पानसरे यांच्या हत्येशी ज्यांचा संबंध आहे, त्यांची घनिष्ठता असल्यामुळे हे स्थान निवडले, असे सांगितले. याला पुरोगामी नि:पक्षपातीपणा म्हणतात, बरे का! कायदा काहीही सांगो, पण पुरोगामी म्हणतात ते चूक कसे असेल? आणि त्यांच्या मंचावर असलेल्यावर, दाभोळकरी ट्रस्टमधील भ्रष्टाचाराचे आरोप होते त्याचे काय? असे प्रश्‍न विचारायचे नसतात. कारण, तो आरोप केवळ द्वेषाने प्रेरित होऊन केला असणार. या लोकांकडे सनातनविरुद्ध सज्जड पुरावे असणार, फक्त ते पोलिसांकडे द्यायचे राहून गेले असणार ना! पुढची २०१८ मधील परिषद तर नागपूरला घ्यायचे घाटते आहे. कारण, तिथे संघाचे मुख्यालय आहे. देश तिथून तर चालवला जातो. मोदी फक्त नाममात्र आहेत.
या सगळ्या हास्यास्पद मांडणीमुळे हे लोक जनतेच्या मनातून उतरले आहेत. पण, याची जाणीव करून देणार कोण आणि कुणाला? कारण, जे आपल्याला आवडते आणि पटते, तेच ते बोलणार. त्याला जनतेचा आवाज म्हणून नाव देणार. दातावर आपटले की, प्रतिगामी शक्तींनी जनमानसाला गुंगी आणली आहे, असे म्हणत लोकांच्या बुद्धीवर अविश्‍वास दाखवणार. एकीकडे सहिष्णू हिंदूंनाच सतत सहिष्णुतेचे डोस पाजणार. दुसरीकडे हिंदूंवर होणार्‍या हल्ल्यांकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणार. या देशात केवळ हिंदूच धार्मिक कट्‌टरतावाद आणत आहेत, अशी मांडणी करणार. नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ल्यांचा कधीही निषेध करणार नाहीत. केरळात शेकडो संघ स्वयंसेवक मारले गेले, त्यांचा चुकूनही उल्लेख करणार नाहीत. हा सर्व दुटप्पीपणा लोकांना कळतो, हेच यांना कळत नाही. एकूण सर्व ठिकाणचे यांचे बार फुसके ठरत आहेत.
असे नेपोलियन बोनापार्ट याने म्हटले होते, इतकेच!

डॉ. सच्चिदानंद शेवडे