महाराजसाहेब शहाजी राजे

0
266

जगाच्या इतिहासातल्या पहिल्या दहा प्रतिभासंपन्न सेनापतींत शहाजी राजांचे नाव अगत्याने घेतले जाते. जयराम पिंड्ये या कवीनेे तर म्हटले होते की, ‘‘इत साहजु है; उत साहजहॉं’’ (पृथ्वीचे रक्षण दक्षिणेत शहाजी आणि उत्तरेत शहाजहान करीत आहे.)
वेरुळपासून पुण्यापर्यंत केवढा तरी मोठा निझामशाहीचा मुलूख, चोवीस वर्षांच्या, शहाजी राजांच्या अखत्यारीत होता. हेडक्वार्टर होते, अहमदनगरचा किल्ला. मोगल शहेनशहा जहांगीर बादशहाला संशय होता की, याच किल्ल्यात शहाजी राजांनी शहजादा शहाजहानला लपवून ठेवले आहे. अहमदनगरचा किल्ला भुईकोट; पण, बेलाग आहे. त्यावेळी शहाजहान हा जहांगिराविरुद्ध बंड करून, आश्रयाला आला होता. जहांगीरच्या फौजेला तोंड देण्याची ताकद, अलम दुनियेत, फक्त महाराज साहेबांपाशीच होती. शहाजी राजे खुळे नव्हते, शहाजहानला किल्ल्यात दडवून ठेवायला. उद्या कोणी किल्ल्यासह शहाजीचा पाडाव केलाच, तर शहाजहान धरलाच जायचा! जहांगीरचा सरसेनापती लष्करखान हा एक लाख वीस हजार फौज घेऊन आला. जहांगीरनेे इब्राहिम आदिलशहाला धमकी दिली होती की, ‘मदत करा, नाही तर शहाजीनंतर तुमचा नंबर लावू.’ आदिलशहाने घाबरून त्याचा सरसेनापती मुल्ला महंमद लारी ऊर्फ महम्मदखान ऊर्फ मुल्लाबाबा याला ऐंशी हजार फौज देऊन लष्करखानाच्या दिमतीस दिले. शहाजीपाशी केवळ दहा हजार सेना होती. पण, त्या सेनेला शहाजीचे आणि शहाजीला त्या सेनेचे ‘व्यसन’ होते. दोन लाख विरुद्ध दहा हजार असा तो सामना होता. शहाजी राजांनी त्या फौजेचा सडकून पराभव करून, शत्रूचे पंचेवीस सेनापती गिरफ्तार तर केलेच, पण शत्रूस दाती तृण धरावयास लावले. हा गनिमीकाव्याचा पहिला ठसठशीत आविष्कार होय!
अहमदनगर जिल्ह्यात कायम पाण्याची टंचाई राहिलेली आहे. त्यामुळे भिंत घालून मेहेकरी नदीला बांध घातला होता. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. तिच्या धरणातून सोडलेल्या पाण्याच्या आश्रयाने मोगलशाही व आदिलशाही यांची दोन लाख फौज छावणीत निवांत होती. बादशहाचा शहाजादा आश्रयाला अहमदनगरच्या किल्ल्यात असेल, म्हणून आक्रमण करता येत नव्हते. शहाजी विजयादशमीलाच सीमोेल्लंघन करील, तेव्हा पाहू; या खुळ्या कल्पनेने शत्रूसैन्य गाफीलपणे होते. एका अपरात्री शहाजी राजांनी धरण उडवून दिले. पाण्याची भिंतच्या भिंत चाल करून आली. गाढ झोपलेल्यांपैकी एक लाख फौज एका फटकार्‍यात वाहून गेली. पाण्यावर हत्तींचा ‘तवंग’ उठला होता. सेनापती वरल्या अंगाला होते. पाण्याच्या महाकाय भिंतीपासून ते आणखी उंच टेकड्यांवर पळाले. ते तसेच धरले गेले. जे लोक वाचवायला आलेत, वाटले ते शहाजी राजांचे सैनिक होते!
शहाजी राजांचे वडील मालोजी राजे यांनी आपल्यापाशी पाच हजार फौज बाळगली होती. मानधन घेऊन ते ती फौज देत असत. पण, निझामशाहीच्या मलिक अंबरने वर आणखी सात हजार फौज देऊन त्यांना सरदारकीची वस्त्रे पांघरली. मालोजींच्या पत्नी उमाबाईसाहेब यांचे बंधू राजा वणंगपाळ (बारा वझिरांचा काळ) दबंगपणे स्वायत्तच होते. सबब, शहाजी राजांना वडिलांकडून व मामाकडून स्वायत्ततेचेच बाळकडू मिळाले होते. त्यात शहाजी राजे संवेदनशील होते. स्वायत्ततेच्या पुढे असणारी स्वातंत्र्याची जाणीव त्यांना आली होती. त्यांनी पहिला प्रयत्न केला. सहा महिन्यांत तो फसला. त्यांनी दुसरा प्रयत्न केला. तो चांगला साडेचार वर्षे टिकला. शहाजी राजांना रणांगणात कोणीच हरवू शकले नव्हते. पण, कूटनीतीत त्यांना माघार घ्यावी लागे. स्वातंत्र्याचा त्यांचा पुढला प्रयत्न मात्र कमालीचा यशस्वी झाला.
आपल्याला दहा महिने बापापासून लपवून ठेवले शहाजी राजांनी, म्हणून शहाजहान कृतज्ञ भावनेने वागेल, असे नव्हते. स्वातंत्र्याचा प्रयोग त्याला नामंजूूरच होता. दुश्मनी निभवण्याचा वकूब नसेल, तर दोस्तीचा हात पुढे करावा. महाराजसाहेब त्याचे तसे दुश्मन नव्हते. शहाजहानने आदिलशहाला शहाजीच्या अंगास हात लावू दिला नाही. उलटपक्षी, त्याला आपला नोकर करून घेण्याचे फर्मावले. पण, हेही बजावले की, याला महाराष्ट्रात मुळीच ठेवू नका. इथली ‘माती’ शहाजीला धार्जिणी आहे. याला हद्दपार करा. दक्षिणेत पाठवले, तर तो समुद्रापर्यंतची भूमी तुम्हांस जिंकून देईल. शहाजीसारख्या मातब्बर माणसाचा मुलाहिजा बाळगणे भाग होते आदिलशहाला.
शहाजी राजांची रवानगी बंगलोरला करण्यात आली. महाराष्ट्रात लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध माणसे तेवढी राहिली. शहाजी राजांनी हत्तीचे वजन जगात पहिल्यांदा करून दाखवलेे; त्यामुळे ते अत्यंत बुद्धिमान आहेत, हे कळत होते; मात्र आदिलशहालाच काय; शहाजहानलासुद्धा महाराज साहेबांचा बिलंदरपणा अजिबातच ठावे नव्हता. थोरल्यास यावेच लागले. पण, धाकट्या बालकास इथेच ठेवत त्यांनी त्याला गनिमी काव्याचे धडे दिले. ध्वज दिला. श्‍लोकबद्ध राजमुद्रा करून दिली-
‘‘प्रतिपश्‍चंद्र लेखेव वर्धिष्णुर्विश्‍ववंदिता
शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते’’
नंतर धाकल्याच्या लष्करी हालचालींंकडे आदिलशहाला कानाडोळा करावा लागत होता. कारण, शहाजी राजे! आपल्या सख्यांना, सोबत्यांना ठार मारणारी आदिलशाही सत्ता शहाजी राजांची धिंड काढते. पण, त्यांना मारत नाही. दिल्लीपती शहाजहानने अट घालून ठेवली होती, ‘शहाजीचे काय वाट्टेल ते करा, पण त्याला मारायचे नाही.’
एकदा काय झाले, महाराजसाहेब महाराष्ट्रात असतानाची गोष्ट. जगज्जेता लाजेल, असा पराक्रम करून ते परतले होते. जिजाबाईंनी त्यांचे स्वागतबिगत केले. पण, महाराज साहेबांना जे राहून गेलेसे वाटले, ते त्यांनी एकांती बोलून दाखवले, ‘‘आम्ही एवढे विश्‍वविजयी होऊन आलो; आणि आपण आम्हांस साधे ओवाळलेही नाही!’’
जिजाबाईंची मुद्रा बदलली. त्या म्हणाल्या, ‘‘शत्रूच्या सेनापतीस आम्ही ओवाळू, असे आपल्यांस वाटले तरी कसे!!’’
डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे/८४५०९६४४३३