युद्धसाहित्याचं ओतकाम की छपाईकाम?

0
3397

छपाई किंवा मुद्रण हे तंत्र मानवाला केव्हा अवगत झालं? आधुनिक संशोधकांच्या म्हणण्यानुसार, प्राचीन इजिप्शियन आणि बॅबिलोनियन लोकांना मुद्रणाची प्राथमिक माहिती होती. मात्र, चिनी लोकांनी इसवी सन पूर्व पहिल्या शतकात मुद्रण तंत्राचा प्रयोग केला होता, हे नक्की!
आधुनिक संशोधक हे साधारणपणे पाश्‍चिमात्य म्हणजे युरोपियन किंवा अमेरिकन असतात. कोणत्याही शोधाचं श्रेय ग्रीक किंवा रोमनांना द्यायचं; तसं नाहीच जमलं, तर मग इजिप्शियन, बॅबिलोनियन, असीरियन, सुमेरियन, खाल्डियन अशा कोणत्यातरी संपून गेलेल्या लोकांना द्यायचं. तेही जमलं नाही आणि कोणत्यातरी पौर्वात्य लोकांना ते श्रेय द्यावंच लागत असेल, तर मग ते चीनला द्यायचं किंवा अरबांना द्यायचं. पण… काय वाटेल ते झालं तरी प्राचीन भारतीयांना म्हणजेच हिंदूंना ते द्यायचं नाही, असा जणू त्यांचा अलिखित संकेतच आहे. यासाठी वाटेल तशी उलटसुलट बौद्धिक समर्थनं आणि वकिली युक्तिवाद करण्यात ते पटाईत आहेतच.
असो. तर आधुनिक शास्त्रीय मान्यतेनुसार इसवी सन पूर्व पहिल्या शतकत चीनने मुद्रण तंत्राचा प्रथम वापर केला. युरोपात योहान गुटेनबर्ग या संशोधकाने इसवी सन १४५० ते १४५५ या काळात, सर्वप्रथम एक पुस्तक छापलं. ते अर्थातच बायबल होतं. हे काम त्याने जर्मनीमध्ये मेंझ या शहरात केलं. गुटेनबर्गनंतर जॉन फॉस्ट याने त्याचा छापखाना पुढे चालवला. मात्र, छपाईची ही विद्या त्याने गुप्त ठेवली होती. साहजिकच आहे. फॉस्ट हा पक्का धंदेवाईक होता. तो आपलं ‘ट्रेड सीक्रेट’ गुप्तच ठेवणार.
पण, पुढे मेंझ शहरावर शत्रूचं आक्रमण झालं. फॉस्टच्या छापखान्यातले कुशल कारागीर इतस्तत: पळाले. काही काळानंतर त्या प्रत्येकाने आपापल्या गावी छापखाना उघडला आणि त्या शतकाच्या अखेरपर्यंत युरोपातल्या प्रत्येक मोठ्या शहरात किमान एक तरी छापखाना होता. पुढच्या पन्नास वर्षांत ही आधुनिक मुद्रणविद्या भारतात पोहोचली. इसवी सन १५५६ मध्ये पोर्तुगिजांनी गोव्यात पहिला छापखाना उघडला. त्यातून सेंट झेव्हियरने लिहिलेलं ‘दौत्रिना ख्रिस्ता’ हे पहिलं छापील पुस्तक १५५७ साली बाहेर पडलं.
इसवी सन १६६३ या वर्षी शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या सुरत शहरावर हल्ला केला. यावेळी शिवरायांनी सुरतेच्या एका पोर्तुगीज व्यापार्‍याकडून एक छापखाना विकत घेतला होता. पण, तो राजगडावर आणून कार्यान्वित करणं त्यांना शक्य न झाल्यामुळे, त्यांनी तो भीमजी पारेख नावाच्या एका गुजराती व्यापार्‍याला विकून टाकला होता, असा वृत्तान्त सांगितला जातो. परंतु, याबद्दल पक्का पुरावा मिळत नाही. स्वराज्याच्या अखेरच्या कालखंडात मात्र नाना फडणीसांनी पुण्यात मुद्रणाची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता. तांब्याच्या पत्र्यावर भगवद्गीतेचे श्‍लोक कोरून त्याचे कागदावर छाप उमटवून, गीतेच्या छापील प्रती बनवण्याची नानांची योजना होती. पण, सन १८०० मध्ये नाना फडणीस वारले. दुसर्‍या बाजीरावाची नादान कारकीर्द अगोदरच सुरू झालेली होती. त्यामुळे इतर सर्वच गोष्टी मागे पडून फक्त जेवणावळी नि नाच-गाणी सुरू झाली. अखेर १८१८ साली हिंदवी स्वराज्य बुडालं. पण, तत्पूर्वीच म्हणजे १८१२ साली अमेरिकन मिशनर्‍यांनी मुंबईला छापखाना सुरू केला. महाराष्ट्रातला हा पहिला छापखाना!
तिथपासून तो आजच्या संगणक युगातल्या अत्याधुनिक छापखान्यापर्यंत जगाने फार मोठी मजल मारलेली आहे. आता तर ज्या कोणाला इच्छा असेल तो स्वत:च्या घरात, स्वत:च्या टेबलावरच छापखाना आणू शकतो. तुमच्या टेबलावरचा, संगणकाला जोडलेला प्रिंटर हा एक छोटा छापखानाच नव्हे का! तुम्ही तुम्हाला हवा तो मजकूर, हव्या त्या भाषेत, हव्या त्या फॉंटमध्ये, हव्या त्या ले-आऊट, पेज सेट अपमध्ये टाकून, तो छापून, घरच्या घरी त्याचं पुस्तकसुद्धा बनवू शकता.
पण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची झेप आता एवढ्यावरही थांबायला तयार नाही. तिची क्षितिजं विस्तारतच चाललीत. साध्या प्रिंटरनंतर आता थ्री डायमेन्शन प्रिंटर-थ्री डी प्रिंटर आला आहे. साध्या प्रिंटरमध्ये, मजकूर छापला जातो, म्हणजे काय होतं? तर प्रिंटरच्या कार्टरिजमधली पावडर कागदावर अक्षरांच्या आकारात पसरवली जाते. म्हणजेच पावडरचा सूक्ष्म असा थर कागदावर उमटतो.
थ्री डी प्रिंटर संगणकाच्या आदेशानुसार पावडरचे थरावर थर रचत जातो. म्हणजे पाहा, कुंभार आपल्या चक्रावर ओली माती घालतो आणि त्या चक्राला गती देतो. चक्राची गती आणि कुंभाराचे हात यातून त्या मातीला आकार येतो. थ्री डी प्रिंटरमध्ये हे काम कार्टरिज करतं. संगणकाच्या आदेशानुसार कार्टरिजमधून विशिष्ट रचनेचे थरावर थर वेगाने सोडले जातात आणि कुंभ, भांडं, माठ, वाटी अशी कोणतीही वस्तू निर्माण होते. कागदावर मजकूर छपाई करण्यासाठी साध्या कार्टरिजमध्ये इंक पावडर वापरली जाते; तर हवी ती छोटी-मोठी वस्तू तयार करण्यासाठी थ्री डी प्रिंटरच्या कार्टरिजमध्ये प्लास्टिकची पावडर वापरली जाते.
अमेरिका आणि गन हे एक अतूट नातं आहे. अमेरिका इतर कसलाही त्याग करेल, पण आपल्या गनचा त्याग करणार नाही. अमेरिकेत दरसाल किमान ३० हजार लोक बंदुकीच्या गोळ्यांमुळे मरतात. यातल्या दोनतृतीयांश आत्महत्या आणि एकतृतीयांश खून असतात. बंदुका-पिस्तुलांच्या उत्पादन आणि खरेदी-विक्रीवर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे हे घडतं. कुणीही माथेफिरू उठतो आणि शाळा, कॉलेज किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बेछूट गोळीबार करून अनेक निरपराध लोकांचे मुडदे पाडतो. असं वरचेवर घडत असतं. पण, अमेरिका शस्त्रास्त्रबंदीचा कायदा करायला तयार नाही.
याचा परिणाम म्हणजे तिथले अनेक उत्साही लोक नवनवीन प्रकारच्या बंदुका शोधून काढत असतात. अलीकडेच, कोडी विल्सन नावाच्या तिशीतल्या तरुणाने, थ्री डी प्रिंटरचा वापर करून एक प्लास्टिकची बंदूक छापली. बंदूक छापली? बंदूक छापली? म्हणजे काय?
बंदूक, पिस्तुल, रिव्हॉल्व्हर इत्यादी हत्यारं कशी बनवतात? आपण फार किचकट तांत्रिक तपशिलात न जाता अगदी प्राथमिक भाषेत माहिती घेऊ. पिस्तुल, रिव्हॉल्व्हर ही धातूची बनवतात. बंदुकीची नळी आणि इतर भाग धातूचे, पण दस्ता मात्र लाकडी असतो. अर्थातच धातूचे सगळे भाग हे साच्यात ओतून बनवले जातात. पण, आता अत्याधुनिक तंत्रामध्ये या सगळ्या प्रक्रियेत धातूबरोबरच प्लास्टिक, रबर, फायबर यांचाही वापर होतो. कोडी विल्सनने संगणकाद्वारे संपूर्ण प्लास्टिकच्या पिस्तुलाचा आराखडा बनवला आणि थ्री डी प्रिंटरद्वारे तसं पिस्तुल छापलं. प्रिंटरच्या कार्टरिजमधून प्लास्टिक पावडरचे थरावर थर विशिष्ट रचनेत पडत गेले आणि झालं घरच्या घरी पिस्तुल तयार!
आता जे कोडी विल्सन करू शकतो, ते अमेरिकन लष्कर, नौदल, वायुदल केल्याशिवाय कसं राहील? त्यांनी शस्त्रं बनवण्यापेक्षा त्या शस्त्रांना आणि इतर साधनांना, वाहनांना लागणारे सुटे भाग थ्री डी प्रिंटरद्वारे छापण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी केला. एक उदाहरण पाहा. यू एस एस हॅरी ट्रुमन ही अमेरिकन विमानवाहू नौका भूमध्य समुद्र आणि पर्शियन आखात या ठिकाणी निघाली. तिने तीन थ्री डी प्रिंटर सोबत घेतले. नोव्हेंबर २०१५ ते जुलै २०१६ या तिच्या प्रवास कार्यक्रमात तिला जे जे सुटे भाग लागले ते त्या त्या विभागाच्या इंजिनीअर्सनी या थ्री डी प्रिंटर्सवर छापले आणि वापरले. यातून अक्षरश: लाखो डॉलर्स बचावले.
आता हे तंत्रज्ञान अमेरिकेपुरतं राहिलेलं नाही. कॅनडा, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीनसुद्धा ते वापरू लागला आहे. पण, अमेरिकन लष्करी शास्त्रज्ञ आणखी पुढचा विचार करतायत. प्लास्टिकच्या पावडरमधून आपण हवं ते बनवू शकतोय; तर हेच धातूच्या पावडरमधून का करता येऊ नये? लोखंड किंवा पोलाद तापवून त्याचा रस बनवून, तो साच्यात ओतून बंदुकीची नळी बनते. त्याऐवजी लोखंडाची पावडर बनवून, ती थ्री डी प्रिंटरच्या कार्टरिजमधून हव्या त्या आकारात का ओतता येऊ नये?
तूर्त या तंत्रज्ञानाचा वापर युद्धआघाडीवर शस्त्रं, साधनं, वाहनं यांचे सुटे भाग बनवण्यासाठी करण्यात येणार आहे. यातून रणांगणावर उद्ध्वस्त होऊन पडलेल्या वाहनांच्या भंगार- स्क्रॅपचा प्रश्‍नही सुटणार आहे. धातूचा भंगार धातूच्या पावडरमध्ये रूपांतरित करा आणि त्यापासून हवं ते बनवा. म्हणजे आगामी काळात तोफा-बंदुका, रणगाडे ‘ओतले’ न जाता ‘छापले’ जाणार.

मल्हार कृष्ण गोखले