एक शरीफ गेले, दुसरे बचावले!

0
199

”When you go home,
Tell them of us and say,
For your tomorrow,
We gave our today…”

‘‘जेव्हा तुम्ही घरी जाल, आपल्या आप्तमित्रांना सांगा, त्यांच्या भवितव्यासाठी, आम्ही आमचे वर्तमान समर्पित केले…’’
कोहिमाच्या युद्धस्मारकावर लिहिलेल्या या चार ओळी भारतीय लष्कराच्या महान परंपरेची गाथा आणि कथा सांगण्यास पुरेशा आहेत. पण, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नोटबंदीचा मानसिक धक्का एवढा बसला असावा की, त्या त्यातून अद्याप सावरलेल्या नाहीत! आपले सरकार उलथून पाडण्यासाठी केंद्र सरकारने कोलकात्यात लष्कराची तैनाती केली आहे, असा आरोप त्यांनी केला, जो किती खोडसाळ होता, हे नंतर सिद्ध झाले.
महान पत्रकार
युपीए सरकार असताना, राजधानीतील एका वृत्तपत्राने, जनरल व्ही. पी. सिंग यांनी मनमोहन सरकारविरुद्ध उठाव करण्यासाठी मथुरा व हिस्सार येथे तैनात लष्कराच्या तुकड्यांना नवी दिल्लीकडे कूच करण्याचा आदेश दिला होता, असे सनसनाटी वृत्त दिले होते. ‘जर्नलिझम् ऑफ करेज’ असे ब्रीदवाक्य मिरविणार्‍या व राजधानीत सर्वात कमी खपाच्या या वृत्तपत्राने काही तास देशात भूकंप घडविला होता. नंतर उघडकीस आलेली माहिती म्हणजे, लष्करी तुकड्यांची ती सामान्य कवायत होती. आणि हेच ताज्या घटनेतही समोर आले आहे.
श्रेय लष्कराला
पाकिस्तानातील लष्कराला सत्तेची चटक लागली. तेथे लोकशाहीचे रोपटे मूळ धरू शकले नाही, याचे मुख्य कारण होते पाकिस्तानी लष्कराची सत्ता गाजवण्याची मानसिकता; आणि भारतात लोकशाहीचे रोपटे, वृक्ष झाले याचे एक कारण होते, भारतीय लष्कराची शिस्त व आपल्या मर्यादा ओळखण्याची प्रगल्भता! अशा लष्करावर एक माथेफिरू मुख्यमंत्री आणि एक सुपारी पत्रकार जेव्हा उठावाचे आरोप लावतो, त्या वेळी सीमेवर तैनात जवानांना किती वेदना होत असतील? विशेेष म्हणजे पाकिस्तानात लष्कराला वेसण घालण्याचे प्रयत्न होत असताना, भारतात एक मुख्यमंत्री लष्करावर उठावाचे आरोप करीत आहे.
एक शरीफ गेले
एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे पाकिस्तानाच एकाच वेळी दोन शरीफ राहू शकत नव्हते. यातील एक शरीफ जनरल राहिल शरीफ सेवानिवृत्त झाल्याने दुसरे शरीफ, पंतप्रधान शरीफ यांनी सुटकेचा श्‍वास घेतला असावा. मात्र, याचा परिणाम सीमेवरील स्थितीत होणार नाही.
‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर पाकिस्तानच्या कारवाया वाढतील, असे स्पष्ट विधान भारत सरकारच्या एका अति उच्चपदस्थाने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केले होते. आणि भारत सरकार यासाठी तयार असेल, असेही या अति उच्चपदस्थाने सांगितले होते. या उच्चपदस्थाचा हा अंदाज खरा ठरत आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांनी नागरोटा स्थित कोअर मुख्यालयावर केलेला हल्ला त्याचे ताजे उदाहरण आहे. नागरोटा हे भारतीय लष्करातील सर्वात मोठे आर्मी फॉर्मेशन मानले जाते. त्यामुळे हा हल्ला गंभीर असला, तरी त्याने फार हादरून जाण्याचे कारण नाही.
सेनाप्रमुखांना सलामी
पाक लष्कराने आपल्या मावळत्या व नव्या सेनाप्रमुखांना सलामी देण्यासाठी २९ तारखेला नागरोटा कोअर मुख्यालयावर हल्ला करविला, असे समजते. या सार्‍या घटनाक्रमात एक बाब मात्र फार चांगली होत आहे. भारत सरकार आता, पूर्वीप्रमाणे अशा हल्ल्यांमागे पाकचा हात असल्याचे सिद्ध करण्याच्या फार भानगडीत पडत नाही. अतिरेक्यांजवळ सापडलेली औषधे, शस्त्रे, मोबाईल, खाण्याचे पदार्थ यावर ‘मेड इन पाकिस्तान’ आहे, असे जगाला सांगण्यातच भारत सरकारचा वेळ जात असे. आता तसे न करता, पाकच्या कारवायांना योग्य ते उत्तर देण्याची सूट- मोकळीक स्थानिक अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. त्यामुळे नागरोटात जे झाले त्याचाही बदला भारतीय लष्कर घेईल आणि उत्तर-प्रत्युत्तराचे हे युद्ध काही काळ चालणार आहे. भारत सरकार व भारतीय लष्कर यांनी हे गृहीत धरले आहे.
फायदा
‘सर्जिकल स्ट्राईक’ व नोटबंदी याचा फायदा सीमेवर दिसल नसला, तरी तो काश्मीर खोर्‍यात दिसत आहे. काश्मीर खोर्‍यातील जनजीवन झपाट्याने सामान्य झाले आहे. काश्मीरच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाकिस्तानी झेंडे लावण्यात आले होते. ठिकठिकाणी मोठमोठी झाडे रस्त्यावर आडवी करण्यात आली होती. काश्मीरच्या अनेक भागात राज्य सरकारचा हुकूम चालत नाही, असे दिसत होते. ती सारी स्थिती आता बदलली आहे. काश्मीरच्या ग्रामीण भागावर भारतीय लष्कराचा ताबा स्थापित झाला आहे, सीमेवरील तापलेल्या वातावरणाची धग काश्मिरी फुटीर नेत्यांना बसू लागली असल्याने, पाकिस्तानी झेंडे बर्‍याच प्रमाणात गायब झालेले आहेत. चार महिन्यांपासून बंद असलेली काश्मीर रेेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर होणारा तमाशा थांबला आहे आणि याने अस्वस्थ झालेला पाकिस्तान भारतीय लष्करी छावण्यांना लक्ष्य करीत आहे. नागरोटा छावणीवर झालेला हल्ला त्या मालिकेचा एक भाग मानला जातो.
नवे प्रमुख
पाकिस्तानात नवे लष्करप्रमुख आल्यानंतर त्यांचे धोरण काय असेल, असा एक प्रश्‍न विचारला जात असला, तरी पाकिस्तानच्या धोरणात कोणताही बदल होणार नाही, असे मानले जाते. पाकिस्तान सरकारची सूत्रे रावळपिंडीच्या लष्करी मुख्यालयाकडे असतात आणि लष्करी मुख्यालयाची सूत्रे बीजिंगमध्ये बसणार्‍या चिनी नेत्यांच्या हाती असतात!
अमेरिका आता निर्णायकपणे भारताच्या बाजूने झुकल्याने, पाकिस्तान-चीन युती मजबूत होत आहे. यात रशियाला ओढण्याचा प्रयत्न पाक लष्कराकडून केला जात आहे. नवे लष्करप्रमुख जनरल बाजवा यात पुढाकार घेण्याची चिन्हे आहेत. बाजवा यांच्या नियुक्तीचा एकच परिणाम सांगितला जातो व तो म्हणजे, पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सरकार सुरक्षित झाले आहे! पाकिस्तानातील मुलकी सरकारे लष्करी सेनापतींनी उलथून टाकली आहेत, जनरल राहिल शरीफ यांच्यात ती क्षमता होती. त्याचीच धास्ती पंतप्रधान शरीफ यांना वाटत होती. नवाझ शरीफ यांना भारतासोबत संबध सुधारण्याची इच्छा असूनही त्यांना ते करता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अचानक भेट दिली, शरीफ यांच्याशी चर्चा केली. भारत-पाक संबधात नवा अध्याय सुरू होणार असे वाटत असतानाच ‘पठाणकोट’ घडविण्यात आले. हे जनरल शरीफ यांचे कारस्थान होते. म्हणजे एका शरीफला भारताशी संबंध सुधारावयाचे होते, तर दुसर्‍या शरीफला ते नको होते. पाकिस्तानी जनमानसात दुसर्‍या शरीफची म्हणजे जनरल राहिल शरीफ यांची प्रतिमा चांगली होती. पंतप्रधान नवाज शरीफ स्वत: ‘पनामा पेपर्स’ प्रकरणात अडकले आहेत. शरीफ कुटुंबाने पनामात मोठ्या प्रमाणावर पैसा ठेवला असल्याचे पुरावे समोर आले आहेत. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या पनामा पेपर्सचे निमित्त करून जनरल राहिल शरीफ काहीतरी गडबड करतील, अशी धास्ती पंतप्रधान शरीफ यांना वाटत होती आणि त्यांची इच्छा नसूनही त्यांना भारताविरुद्ध ठाम भूमिका घ्यावी लागली.
जैसे थे
जनरल शरीफ निवृत्त झाल्याने पंतप्रधान शरीफ यांच्यावरील ओझे कमी झाले आहे. नवे प्रमुख जनरल बाजवा यांचा कार्यकाळ फक्त ९ महिन्यांचा म्हणजे ऑगस्टपर्यंत राहणार आहे. ते शरीफ सरकारला आव्हान देण्याच्या स्थितीत राहणार नाहीत. त्यांनी मुलकी सरकारशी जुळवून घेतल्यास, त्यांना मुदतवाढ देण्याचा विचारही शरीफ करू शकतात. नवे लष्करप्रमुख पाकिस्तान लष्कराचा काश्मीर अजेंडा चालू ठेवतील. पाकिस्तान लष्कराचे अस्तित्व काश्मीरवर अवलंबून आहे. भारताशी संबंध सुधारताच पाक लष्कराचे महत्त्व संपुष्टात येते आणि हे पाकचा कोणताही सेनापती होऊ देणार नाही!

रवींद्र दाणी