मेजर कुणाल यांचे या देशाशी नाते काय?

0
190

२९ नोव्हेंबरला पाकिस्तानच्या हल्ल्यात जे सात जवान शहीद झाले त्यात मेजर कुणाल यांचाही समावेश होता. जेव्हा हे सैनिक देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देत होते तेव्हा देशात नोटबंदीविरुद्ध बंदचे आवाहन करण्यात येत होते आणि संसदेचे कामकाज ठप्प पाडण्यात आले होते. जवानांच्या हौतात्म्याची खबर येऊनही कुणालाही हे विचारण्याची आवश्यकता वाटली नाही की मेजर कुणाल आणि त्यांच्या सहकारी जवानांचे या देशाच्या नागरिकांशी अखेर काय नाते होते? त्यांच्या मनात आले असते तर ते दुसरी कुठलीही नोकरी करू शकत होते. शिक्षक, डॉक्टर, आयएएस, आयपीएस देखील बनू शकले असते. जेव्हा त्यांनी लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना याची पूर्ण कल्पना होती की यात आपल्याला अचानक हौतात्म्यही प्राप्त होऊ शकते. पण, हे माहीत असूनही त्यांनी लष्करी सेवेचीच निवड का केली? आणि जेव्हा ते शहीद झाले तेव्हा ‘आता पाकिस्तानचा बदला घेतलाच पाहिजे आणि त्याचा निर्णायक पराभव केला पाहिजे’ या मागणीसाठी देशात गदारोळ झाला नाही, तर संसदेचे कामकाज होऊ देणार नाही आणि नोटबंदी होऊ देणार नाही, या मागणीसाठी गदारोळ करण्यात आला.
सैनिकांप्रती एवढा संवेदनशून्य विरोधी पक्ष दुसर्‍या कुठल्या देशात आढळतो काय? ज्या दिवशी काश्मीरची घटना घडली त्याची बातमी ज्या ज्या वर्तमानपत्रात छापून आली, त्या त्या वर्तमानपत्रांचा वेध घेऊन मी हे शोधण्याचा प्रयत्न केला की त्यात शहीद जवानांची नावे आणि त्यांची छायाचित्रे छापली आहेत काय? पण मी जी वर्तमानपत्रे पाहू शकलो त्यात असे काहीही आढळून आले नाही. या मोठ्या घटनेनंतर कुठलाही गोंधळ न करता संसदेच्या दोन्ही सभागृहात सर्व सदस्य पक्षांतर्गत मतभेद बाजूला सारून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतानाही दिसून आले नाहीत. सैनिक हे श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय आहेत अथवा शहिदांची छायाचित्रे आपल्या कार्यालयात लावली पाहिजेत याची राजकीय पक्षांना क्वचितच जाणीव असते. असे किती राजकीय पक्ष असतील की ज्यांच्या कार्यालयात त्यांच्या स्वत:च्या संघटनेच्या महापुरुषांव्यतिरिक्त राष्ट्ररक्षक महापुरुष वीरसैनिकांची छायाचित्रे लावण्याची परंपराच नाही.
देशातील मोठमोठे सरकारी अधिकारी, खासदार, आमदार, पत्रकारांना जर हा एकच प्रश्‍न विचारला की केवळ एक अथवा दोन परमवीरचक्र विजेत्यांची नावे सांगा तर यातील अनेकांची या प्रश्‍नाचे उत्तर देताना तारांबळ उडणार आहे. आमच्या सैनिकांकडे आम्ही कुठल्या भावनेने पाहतो हे यावरून सिद्ध होऊन जाते. ज्या समाजाच्या तोंडी चित्रपट अभिनेते, क्रिकेटपटू आणि विदेशी पॉप स्टारची नावे असतात आणि त्यांची छायाचित्रे आपल्या घरात, कार्यालयात, अथवा कॉलेजमधील हॉल अथवा वसतिगृहांच्या भिंतीवर लावण्यात ज्याला अभिमान वाटतो, तोच समाज देशासाठी प्राणाची आहुती देणार्‍या परमवीर चक्र विजेत्यांची नावे अथवा त्यांची छायाचित्रेही ओळखू शकत नाही. मी काही दिवसांपूर्वी कर्नाटक विद्यापीठ आणि राणी चेनम्मा विद्यापीठ या कर्नाटकातील दोन मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधायला गेलो होतो. मी त्यांच्यापुढे या शहीद जवानांचा विषय काढला तेव्हा ‘आम्ही आमच्या विद्यापीठात वीर सैनिकांची छायाचित्रे अवश्य लावू’ असे वचन त्यांनी मला दिले.
देशाला स्वातंत्र्यानंतर लगेच सप्टेंबर-ऑक्टोबर १९४७ मध्ये युद्धाला तोंड देणे भाग पडले, १९६२, १९६५, १९७१ आणि १९९९ (कारगिल) मध्ये देशाने युद्ध लढले, यात ६००० हून अधिक शूरवीरांना हौतात्म्य प्राप्त झाले. ज्या देशात खलिस्तानी दहशतवादापासून जिहादी, नक्षलवादी आणि माओवादी, ईशान्य भारतातील ३६ हून अधिक संघटनांनी (ज्यात उल्फा, व एनएससीएन (आयएम) सारख्या क्रूर संघटनाही आहेत) हजारो निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे, ज्यांच्याशी लढताना शेकडो सुरक्षा सैनिक शहीद झाले, त्या देशात सैनिकांप्रती गौरवाची भावना जागविण्यासाठी अभ्यासक्रमात क्वचितच एखादा धडा असेल. परमवीरचक्र विजेत्यांविषयी पहिले पुस्तक नरेंद्र मोदी सरकारने छापले. ७० वर्षांपर्यंत तर त्यांच्याविषयी एकत्र संकलित केलेली माहिती मिळणे शक्य नव्हते. शेवटी मोदी सरकारनेच ते काम केले.
जो देश आपल्या सैनिकांविषयी गौरव बाळगत नाही, त्यांना मानसन्मान देत नाही त्या देशाला कुठलेही भविष्य नसते. विदेशात जर सैनिक रस्त्यावरून जात असतील तर लोक अदबीने उभे राहून व मोठ्याने जयजयकार करून त्यांचा सन्मान करतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भावपूर्ण भाषणात सांगितले होते. असे दृश्य भारतात का दिसू शकत नाही? हे करून तर पाहा. लहान लहान गोष्टींनीदेखील मोठे परिवर्तन घडवून आणता येईल. ही गोष्ट आमच्या पंतप्रधानांना का सांगावी लागली, याचा विचार करा.
ज्या देशात सैनिकांचा सन्मान आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्‍नावर एकजूट नसेल, उलट सैनिकांच्या शौर्यावर विरोधी पक्ष शंका घेत असतील आणि त्यांच्या हौतात्म्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याऐवजी सरकारला घेरण्याचा एक मुद्दा म्हणून त्याकडे पाहत असतील तर त्या देशाच्या भवितव्याचे रक्षण करण्यासाठी कोण लष्करात भरती होण्यास तयार होईल? भारत जायबंदी झाल्यावर ज्याला वेदना होत नाहीत आणि भारताने प्रगती केली तर त्याला आनंद होत नाही, असा हा आजचा विरोधी पक्ष आहे.
अनेक अडचणी सहन करूनही परिवर्तनाचे विविध आयाम स्वीकारणारी या देशातील जनता धन्य आहे. परिवर्तनासाठी या देशातील जनेतेने नेहमीच सकारात्मक सहकार्य केले आहे. शतकांपासूनची राजे, महाराजांची परंपरा सोडून ती अचानक १९४७ मध्ये लोकशाहीवादी झाली. आणे, शेर, गज आणि मण तोलण्याची व मोजण्याची पद्धत रातोरात दशमान प्रणालीत परिवर्तित झाली, परंपरेच्या बोझ्याखाली दबलेल्या समाजात हिंदू कोड बिल आणले आणि आता त्रिवार तलाकला ‘तलाक’ देण्याची पूर्ण तयारी आहे.
निकोप परिवर्तनाचे या देशाने नेहमीच स्वागत केले आहे. सुरक्षा जवानांप्रती समाजात सर्वोच्च सन्मानाची भावना जागृत व्हावी आणि काळे धन नष्ट व्हावे. या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पाकिस्तानला धडा शिकविण्याबरोबरच सैनिकांविषयी प्रत्येक शहर, गाव तथा संस्थांमध्ये मग त्या खाजगी असोत वा सरकारी, आम्ही सर्वांनी सैनिकांची छायाचित्रे लावण्याची परंपरा सुरू केली पाहिजे तसेच, जिथे कुठे सैनिक दिसतील त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला पाहिजे. यामुळे आमचेही आत्मबल वाढेल आणि देशाचेही.

तरुण विजय