जयललितांच्या निधनाचा राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम

0
193

दिल्लीचे वार्तापत्र
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तामिळनाडूच्याच नाही, तर संपूर्ण देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे. तामिळनाडू हे देशातील असे राज्य आहे, जेथे गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रीय नाही, तर प्रादेशिक पक्षांचा प्रभाव आहे. तेथील राजकारण हे द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांभोवतीच केंद्रित झाले आहे. राज्यातील सत्तेचा लंबक कधी द्रमुककडे, तर कधी अण्णाद्रमुककडे जात होता.
द्रमुकची धुरा करुणानिधी यांच्याकडे, तर अण्णाद्रमुकची धुरा आधी एमजी रामचंद्रन आणि त्यांच्या निधनानंतर जयललितांकडे आली. करुणानिधी आणि जयललिता फुलफॉर्ममध्ये असताना कॉंग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांची डाळ कधीच तामिळनाडूत शिजली नाही. या दोन्ही पक्षांना कधी द्रमुक, तर कधी अण्णाद्रमुकचा पदर पकडून आपले दुय्यम दर्जाचे राजकारण करावे लागले. आता जयललिता यांचे निधन झाले आहे, तर द्रमुकचे करुणानिधी वयाच्या नव्वदीत आहे, त्यामुळे त्यांचीही आता राज्याच्या राजकारणावर आणि द्रमुक पक्षावर पाहिजे तशी पकड राहिली नाही, त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणाचे दरवाजे कॉंग्रेस आणि भाजपासाठी उघडतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जयललिता यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाले, अनेक वेळा आपल्या वागण्याने त्या वादग्रस्तही ठरल्या, पण त्याचा त्यांच्या राजकारणावर आणि लोकप्रियतेवर फारसा परिणाम झाला नाही. सामान्यपणे तामिळनाडूतील मतदार सलग दुसर्‍यांदा कोणाला सत्तेवर येऊ देत नाही. द्रमुक सत्तेवर असताना निवडणूक झाली तर मतदार अण्णाद्रमुकला आपला कौल देतो आणि अण्णाद्रमुक सत्तेवर असताना निवडणूक झाली तर मतदारांचा कौल द्रमुकला मिळतो. मात्र, ही परंपरा जयललिता यांनी खंडित केली. २०११ मध्ये राज्यात झालेल्या निवडणुकीत द्रमुकचा पराभव करत अण्णाद्रमुक सत्तेवर आला होता, त्यामुळे २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत द्रमुक सत्तेवर येईल, असा सर्वांचाच अंदाज होता. पण जयललिता यांनी आपल्या नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने हा अंदाज खोटा ठरवला. राज्यातील मतदारांनी जयललिता यांना सलग दुसर्‍यांदा सत्तेवर बसवले.
विशेष म्हणजे २०१४ मध्ये संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना तामिळनाडूत भाजपाला आपले खातेही उघडता आले नाही. अण्णाद्रमुकचे ३७ खासदार लोकसभेत विजयी झाले. भाजपा आणि कॉंग्रेसनंतर अण्णाद्रमुक हा लोकसभेतील तिसरा सर्वांत मोठा पक्ष आहे. याचे श्रेय निर्विवादपणे जयललिता यांना आणि त्यांनी राज्यातील गोरगरिबांसाठी राबवलेल्या विविध प्रकारच्या अम्मा योजनांना द्यावे लागेल. या योजनांनीच त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली, त्यांना राज्यातील लोकांची अम्मा बनवले.
जयललिता यांच्या निधनानंतर त्यांचे निकटवर्ती ओ. पन्नीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली असली तरी ते ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील का, अण्णाद्रमुक पक्षाला एकसंध ठेवू शकतील का मोठा प्रश्‍न आहे. पन्नीरसेल्वम यांच्याकडे दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली आहे. मध्यंतरी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जयललिता यांना तुरुंगात जावे लागले, तेव्हाही जयललिता यांनी पन्नीरसेल्वम यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद सोपवले होते. मात्र, त्यावेळी तुरुंगात असल्या तरी जयललिता यांची सरकारवर आणि पक्षावर पूर्ण पकड होती, त्यामुळे काळजीवाहू सरकार चालवणे पन्नीरसेल्वम यांना कठीण गेले नाही. यावेळी मात्र तशी स्थिती नाही, जयललिता या जगात नाहीत.
जयललिता यांच्या घनिष्ट सहयोगी शशिकला नटराजन यांचा पक्षसंघटनेवर प्रभाव राहाणार आहे. आतापर्यंत त्यांचा प्रभाव पडद्याआडून राहात होता, आता तो खुला होणार आहे. शशिकला आणि पन्नीरसेल्वम यांनी काही मर्यादा आपल्यावर घालून घेतल्या, तर सरकार आणि पक्षसंघटना यांच्यात योग्य तो समन्वय राहू शकतो. मात्र, शशिकला यांनी सरकारच्या कामात सातत्याने हस्तक्षेप केला आणि हा हस्तक्षेप सहन करण्याची पन्नीरसेल्वम यांची तयारी नसेल, तर दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. त्याचा परिणाम सरकार आणि संघटना या दोन्हीवर होऊ शकतो. नेतृत्व आणि कर्तृत्व या दोन्ही बाबतीत आपण जयललिता यांच्या पासंगालाही पुरत नाही याचे भान शशिकला आणि पन्नीरसेल्वम या दोघांनीही ठेवले पाहिजे. मात्र, तसे झाले नाही तर अण्णाद्रमुक पक्षात फूट पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुळात पन्नीरसेल्वम यांनाही पक्षात पूर्ण मान्यता नाही, तसेच शशिकला यांच्या विरोधकांची संख्याही कमी नाही. आतापर्यंत जयललिता यांच्यामुळे शशिकला यांच्या विरोधकांचा आवाज दबला होता, आपल्या वागणुकीत त्यांनी सुधारणा केली नाही, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका घेतली नाही, तर भविष्यात त्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, यात शंका नाही. परिस्थितीने आपल्यावर ही जबाबदारी आली, आपल्या कर्तृत्वाने नाही, याची जाणीव या दोघांनी ठेवली पाहिजे.
२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २३४ सदस्यांच्या विधानसभेत अण्णाद्रमुकला १३६ जागा मिळाल्या होत्या. द्रमुक आणि कॉंग्रेस आघाडीला ९८ जागा मिळाल्या होत्या. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी ११८ आमदारांची गरज आहे. म्हणजे द्रमूक आणि कॉंग्रेस आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी फक्त २० आमदारांची गरज आहे. जयललितांच्या अनुपस्थितीत २० आमदार फोडणे फारसे कठीण नाही. त्यामुळे आपले आमदार फुटणार नाही, याचे भान मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम आणि शशिकला या दोघांनीही ठेवणे आवश्यक आहे.
जयललिता असताना त्यांचे भाजपाशी विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अतिशय चांगले संबंध होते. त्यामुळेच अण्णाद्रमुकचे थंबीदुराई यांची लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. नवीन मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनीही केंद्र सरकारशी जुळवून घेणे त्यांच्या राजकीय फायद्याचे राहाणार आहे. कारण येत्या काळात द्रमुक आणि कॉंग्रेस त्यांचे सरकार अस्थिर करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भाजपाचे विधानसभेत सदस्य नसल्यामुळे भाजपा प्रत्यक्ष मदत करू शकत नसला, तरी अप्रत्यक्ष मदत मात्र करू शकतो. पन्नीरसेल्वम यांना गरज पडली तर केंद्र सरकारची मदत मिळू शकते. संसदेच्या दोन्ही सभागृहात मिळून अण्णाद्रमुकचे ५० सदस्य आहेत. यात लोकसभेतील ३७ आणि राज्यसभेतील १३ सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेत तर सरकारला तेवढी गरज नाही, पण राज्यसभेतील अण्णाद्रमुकचे १३ सदस्य भाजपासाठी फायद्याचे ठरू शकतात, भाजपाला बहुमत देऊ शकतात.
प्रादेशिक पक्ष आज आपल्या देशाच्या राजकारणातील अपरिहार्यता झाली असली, तरी प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने फारसा चांगला नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना रालोआ सरकारच्या काळात याचा अनुभव देशाने घेतला होता. प्रादेशिक पक्षांच्या राजकारणात राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांचा विचार होत नाही, तर तात्कालिक फायद्यासाठी प्रादेशिक महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे देशात राष्ट्रीय पातळीवरील पक्षांचा प्रभाव वाढणे काळाची गरज आहे. देशातून प्रादेशिक पक्ष पूर्णपणे संपवणे शक्य नसले, तरी त्यांचा प्रभाव कमी करणे शक्य आहे. राष्ट्रीय पातळीवरील पक्षांनी प्रादेशिक पातळीवरील पक्षांच्या मागे फरफटत जाणे योग्य नाही. मात्र, प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पातळीवरील पक्षांच्या मागे येत असतील, तर ते समजण्यासारखे आहे. यानिमित्ताने तामिळनाडूतून प्रादेशिक पक्षांचा प्रभाव कमी होण्याच्या दृष्टीने सुरुवात होत असेल, तर तो एक चांगला संकेत म्हटला पाहिजे.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७