ग्रामसभेतल्या वीज आराखड्यास स्वतंत्र मंजुरी

0
139

•ऊर्जा मंत्र्यांची घोषणा
•आ. हर्षवर्धन सपकाळ यांचा तारांकित प्रश्‍न
तभा वृत्तसेवा
बुलढाणा, ८ डिसेंबर
लोकसहभागातून विद्युत विकास या ग्रामसभा अभियानाच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या १४९ कोटी ५१ लाख रुपयांच्या सर्वंकष कृती प्रकल्पास शासन पातळीवरून स्वतंत्र रीत्या मंजुरी प्रदान करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच त्यासाठी मंत्रालय स्तरावर महावितरणची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल व त्यासाठीच्या कालबद्ध कृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्‍नाच्या अनुषंगाने ही घोषणा करण्यात आली.
आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मौजे रूईखेड टेकाळे (ता. बुलडाणा) येथील बंद पडलेल्या वीज रोहित्रांच्या पृष्ठभूमीवर रब्बी हंगामात शेतकर्‍यांना कृषिसिंचनासाठी करावी लागणारी कसरत, येणार्‍या अडचणी व होणारा त्रास या अनुषंगाने तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता.
रूईखेड टेकाळे येथील रोहित्र हे ६३ के. व्ही. क्षमतेचे असून ते वीज वाहिन्या व खांबासह तब्बल आठ महिन्यापासून नादुरूस्त आहे. एवढेच नव्हे तर पाडळी, हतेडी व अन्य ग्रामीण व संपूर्ण मोताळा तालुक्यातील उपकेंद्रातून कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने अघोषित भार नियमनास शेतकर्‍यांना सामोरे जावे लागते. मोताळा तालुक्यातील सावरगाव उपकेंद्रावर नेहमीच क्षमतेपेक्षा अधिक भार येत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. ग्रामीण भागातील वीजतंत्रीची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे वीज रोहित्र नादुरूस्त झाल्यास पंधरा दिवसांपर्यंत ते मिळत नाही. एवढेच नव्हे तर त्या परिसरातील शेतकर्‍यांनाच नादुरुस्त असलेले वीज रोहित्र स्वखर्चाने घेऊन जावे लागते व नवीन रोहित्र आणण्यासाठी सुद्धा वाहतुकीचा खर्च करावा लागतो. सोबतच ते बसविण्यासाठी आवश्यक असलेले इतर किरकोळ साहित्यसुद्धा शेतकर्‍यांना विकत आणावे लागते. त्यामुळे शेतकर्‍यांना बारा तास वीज देण्याच्या शासनाच्या घोषणेचा फज्जा उडाल्याचे सांगून शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे राज्यात १०० ग्रामसभांच्या माध्यमातून विद्युत विकासाचा आराखडा तयार करणारा बुलढाणा विधानसभा मतदार संघ एकमेव असून या आराखड्यास स्वतंत्र रीत्या मंजुरी देणार काय, असा उपप्रश्‍न आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.
या प्रश्‍नाच्या उत्तरात बोलतांना ऊर्जामंत्री म्हणाले की, बुलडाणा उपविभागांतर्गत मौजे रूईखेड टेकाळे व आसपासच्या परिसरातील नऊ रोहित्र, वीज वाहिन्या व खांब चक्रीवादळात नादुरूस्त झाले होते. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तथापि सदर काम पूर्ण करण्यात आले असून नवीन ४१ खांब उभे करून कृषिपंपांना विद्युतपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी उच्चदाब वाहिनीच्या १२ व लघुदाब वाहिनीच्या ८६ गाळ्यांमधील तुटलेल्या तारा जोडण्यात आल्या असून ९ रोहित्र आजमितीस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत. आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मागणीप्रमाणे रूईखेड टेकाळे येथील ६३ के.व्ही. च्या रोहित्रांची क्षमता वाढवून १०० के.व्ही. करण्यात आलेली आहे. तसेच दोन ६३ के.व्ही. चे अतिरिक्त रोहित्र व खांब मंजूर करण्यात आले असून त्यांचे काम प्रगतिपथावर असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.
या चर्चेदरम्यान आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलेल्या उपप्रश्‍नांच्या अनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बुलढाणा विधान सभा मतदार संघात १०० ग्रामसभांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विद्युत विकास आराखड्यास सर्वंकष कृती आराखडा म्हणून स्वतंत्ररीत्या मंजुरी देण्यात येत असून त्याच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.