आता ‘त्यांची’ सहिष्णुता गेली कुठे?

0
132

काहीही कारण नसताना कोणत्याही गोष्टींचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडून सहिष्णुतेचा शंख करणारे आता कुठे आहेत? असा प्रश्‍न पडला आहे. एकही जण आपल्या तोंडाचे सेक्युलर कुलूप आता का उघडायला तयार नाही? असा दुसरा प्रश्‍न त्या पाठोपाठ मनात येतो आहे. बातमी प्रसिद्ध होऊन आता कितीतरी तास उलटून गेले आहेत. मात्र, त्या बातमीवर सहिष्णुतेचा एरवी पुळका येणारे आणि एकामागोमाग पुरस्कार परत करणारे कुठे लपून बसले आहेत? बातमी अस्वस्थ करणारीच आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे वातावरण आता तापले आहे. या वातावरणात बागपत येथे समाजवादी पक्षाचा एक युवा नेता जो समाजवादी पक्षाच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणवतो त्याने विधान केले आहे की, ‘जो कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा शिरच्छेद करून त्यांची मुंडकी घेऊन येईल त्याला बक्षीस दिले जाईल.’ याबाबत मी असे म्हटले नव्हते असे म्हणायलाही या तरुणाला संधी नाही. कारण या भाषणाचा व्हिडीओच व्हायरल झाला आहे. देशात नोटाबंदीमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत हा माणूस त्याला जोडूनच गोध्राच्या घटनेनंतर झालेल्या दंगलीही उकरून काढून या दोघांची मुंडकी छाटण्याची भाषा करतो आणि छाटणार्‍याला बक्षीस जाहीर करतो.
नरेंद्र मोदी यांच्याबाबत सतत नकारात्मक असा प्रचार करत मोदीविरोधकांनी आणि तथाकथित सेक्युलॅरिस्ट मल्टिकम्युनल लोकांनी मोदी यांच्याबद्दल कसा द्वेष निर्माण केला आहे, त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. भारतातील जनतेने बहुमताने मोदी यांना निवडून दिल्यानंतर अमेरिकेसारख्या देशांचा आणि सगळ्या जगाचा मोदी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मोदी यांना व्हिसा नाकारणार्‍या व्हाईट हाऊसने मोदी यांच्या स्वागतासाठी मान तुकवली. व्हाईट हाऊसमधील शाही खाना असताना नवरात्राचे व्रत म्हणून गरम पाणी पीत मोदी यांनी भारतीय श्रद्धा कशी उच्च कोटीची असते, हे जसे जगाला दाखवून दिले, तसे आपल्या अनेक भाषणांनी जगातल्या लोकांना भारतीय सामान्यांच्या मनाच्या उदारतेचे आणि विचारांच्या उदात्ततेचे दर्शन घडविले. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा मोदी मोदींसोबत आपुलकीने दोस्ती करू लागले. जगाला या दोस्तीचे दर्शन घडवू लागले. मात्र, भारतातील विरोधी पक्ष आणि भारतातील कथित डावे मल्टिकम्युनल लोक मात्र मोदी यांचा द्वेष करण्यात एक पाऊलही मागे हटले नाहीत. लोकशाहीच्या नावाने रोज जप करणारी ही मंडळी भारतातील बहुसंख्य लोकांच्या मताचा सर्रास अपमान करत सुटली. गावगन्ना नेत्यापासून ते जागतिक पप्पू राहुल गांधींपर्यंत आणि टीव्हीतील चर्चेत भाग घेणार्‍या फुटकळ विचारवंतांपासून ते मोदी पंतप्रधान झाले, तर देश सोडून जाण्याची भाषा करणार्‍या बालिश साहित्यिकांपर्यंत, काहीही घडले तरी मोदी यांना शिव्याशाप देणार्‍या अरविंद केजरीवालपासून ते मित्रपक्षात असूनही मोदींवर ओढूनताणून टीका करण्याची एकही संधी न सोडणार्‍या उद्धव ठाकरेंपर्यंत कोणाचाही मोदीद्वेष कमी झाला नाही. उलट द्वेषाचा भडाग्नी वाढतच गेला.
याचा परिणाम असा झाला आहे की, मोदी यांच्या विरोधात भडक बोलणे म्हणजे महापराक्रम असा गैरसमज देशात तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून बागपतमधील हा तरुण देव यादव सरळ सरळ मोदी, शहांच्या शिरच्छेदाची भाषा करू लागला आहे. जो जो मोदी यांना शिव्या देईल त्याला प्रतिष्ठा देण्याची स्पर्धाच मोदीविरोधकांमध्ये लागली आहे. हे सगळे मोदीविरोधक भारतीय जनसामान्यांच्या मतापासून आणि मनाच्या भावनेपासून कितीतरी कोस दूर गेले आहेत. द्वेषाच्या ज्वरामुळे यांना काहीही दिसेनासे झाले आहे. महाराष्ट्रात तर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेेच्या नेत्यांना मोदी म्हणजे अफजलखान वाटत होते. जनतेने त्यांचे पानिपत केले, नगरपालिका निवडणुकीत भाजपा सेनेच्या पुढे निघून गेला, तरी सेना नेत्यांचा आविर्भाव ‘पडलो तरी नाक वर’ असाच आहे. मोदीविरोधाचा आवेश कायमच आहे.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना तर जनमत, लोकशाही, तत्त्वज्ञान या विषयातले किती कळत असेल याबाबत सगळ्यांनाच नेहमी शंका यावी अशी स्थिती ते वारंवार निर्माण करतात. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीत सरळ सरळ लाच घेतल्याचे प्रकरण अजून जिवंत आहे. माजी वायुसेनाप्रमुखांना अटक झाली आहे. याच प्रकरणात सोनिया गांधींचे नाव आले आहे. हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी जामिनावर आहेत. तरीही ऊठसूट मोदींवर बेछूट आरोप करण्याचे सत्र कमी झालेले नाही. मोदींच्या विरोधात संयम सोडून बेताल वक्तव्ये करण्याला कॉंग्रेसने तर प्रोत्साहनच दिले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत २०१४ साली सहारनपूर येथील कॉंग्रेसचा नेता इम्रान मसूद याने मोदी जर सहारनपूर येथे आले तर त्यांची बोटी बोटी करीन, अशी राक्षसी इच्छा व्यक्त करणारे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या विधानावरून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अटक होऊन काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागली होती. कॉंग्रेसने त्याची उमेदवारी त्यानंतरही त्यावेळी कायम ठेवलीच, पण अशा बेताल वक्तव्याचे बक्षीस म्हणून त्याला राज बब्बर यांनी उत्तर प्रदेश कॉंगे्रसच्या उपाध्यक्षपदी नेऊन बसविले. त्याने हे वादग्रस्त विधान केले तेव्हा तो समाजवादी पार्टीत होता, असे विचित्र स्पष्टीकरणही त्यावेळी कॉंग्रेसच्या लोकांनी दिले होते. यामुळे काळ सोकावतच गेला आहे. सहानरपूरजवळच पश्‍चिमी उत्तर प्रदेशात आता बागपतमधून समाजवादी पक्षाचा नेता तरुण देव यादव याने थेट मोदी आणि शाह यांचे मुंडके कापून आणणार्‍याला बक्षीस जाहीर केले आहे.
एखाद्या सवंग हिंदुत्ववादी कोणत्याही फुटकळ संघटनेच्या नेत्याने असे विधान हिंदुत्वविरोधकांबाबत केले असते, तर प्रसारमाध्यमे आणि सेक्युलॅरिस्टांनी प्रचंड गदारोळ केला असता. असहिष्णुता वाढल्याची बोंब ठोकत शिमगा करत पुरस्कार परत केले असते. थेट मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली असती. हिंदुत्ववादी अशा अनेक संघटना आहेत की ज्या ना रा. स्व. संघाशी संबंधित आहेत ना हिंदुत्वाच्या भूमिकेशी त्यांचे काही देणे घेणे आहे. ते जेव्हा सवंग लोकप्रियतेपोटी भडक विधाने करतात तेव्हा दाही दिशांनी तुटून पडत जणू संघ, भाजपा, मोदी, विहिंप यांनीच भयंकर गुन्हा केला असल्यासारखे सगळे गहजब माजवतात. गोरक्षणाच्या नावाखाली कोणी मारहाण केली की त्यांचा संघ, भाजपा, मोदी, गोरक्षण याच्याशी काही संबंध आहे की नाही हे न पाहता सगळ्या दिशेने संघ, भाजपा, विहिंप, मोदी यांच्यावरच सगळे किंचाळत उठतात. मात्र, मोदी, शाह यांचा शिरच्छेद करण्याची भाषा करणार्‍या नराधमाबाबत निषेधाचा एक ब्र उच्चारण्याची यांची तयारी नसते. हे यांचे लोकशाहीचे, मानवतावादाचे, सहिष्णुतेचे दुहेरी मापदंड आहेत. जो हिंदुत्वाचा विरोध करतो, जो मोदी यांच्या विरोधात उभा राहातो त्याने कितीही मोठा गुन्हा केला तरी त्याला सगळे फक्त माफच असते असे नाही, तर त्याला बक्षिसी, शाबासकी देत त्याचे उदात्तीकरण करण्याची या नतद्रष्ट मल्टिकम्युनल लोकांची तयारी असते.
मोदी यांची बोटी बोटी करण्याची भाषा करणार्‍याला कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपद मिळते, देशाच्या विरोधात घोषणा देण्याचे दुःसाहस करणार्‍या कन्हय्याला तर जणू देशात आता एकमेव हाच विद्यार्थी नेता असल्यासारखे मिरवले जाते. सुदैवाने या देशातील सामान्य जनता खूप सुज्ञ आहे. ती असल्या कसल्याही सोंगांना फसत नाही. प्रसार माध्यमांमधून, मल्टिकम्युनल नेत्यांच्या आक्रस्ताळेपणातून कितीही थयथयाट केला, तरी या देशातील सुज्ञ लोक जाणतात की कोणत्या विषयातले मर्म काय आहे. प्रत्यक्ष अनुभवाने ते मत बनवितात. देशाचे हित कशात आहे हे त्यांना चांगले कळते. त्यामुळे नोटाबंदीनंतर कितीही त्रास झाला, तरी ते टीव्हीच्या पत्रकारांना ‘त्रास आहे पण आम्ही देशासाठी तो सहन करू’, ‘नरेंद्र मोदी यांनी जे केले आहे ते देशासाठी चांगलेच आहे’, अशा आशयाची विधाने करत मुलाखती देतात. मोदींच्या विरोधात आणि नोटाबंदीच्या विरोधात जनतेत असंतोष आहे, असे भासविणार्‍यांची पंचाईत करून टाकतात.
या सुज्ञ जनतेला कोणाची बोटी बोटी करण्याची भाषा करणे नामंजूर आहे. कोणाचा विनाकारण शिरच्छेद करण्याची भाषा करणे अमान्य आहे. जरी राजकीय मोदीविरोधक मूग गिळून सोयीस्करपणे गप्प बसले असले, तरी लोक वेडे नाहीत. जरी मोदीविरोधक विचारवंत सहिष्णुतेच्या या ऐशीतैशीवर मनात गुदगुल्या झाल्यासारखे मौन पाळून असले, तरी लोकांना त्यांची ही बदमाषी चांगली कळते. ही बेईमानी, ही बदमाषी हेच भारतीय जनतेच्या मनातील देशभक्तीचे, मोदीप्रेमाचे इंधन बनणार आहे, हा इशारा या दुहेरी मापदंडवाल्या भोंदू लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे.

बाळ अगस्ती