रविवारची पत्रे

0
142

अभिनंदन, भाजपा!
सर्व समाजघटकांनी नगरपालिका/परिषद/पंचायत निवडणुकीत भाजपाला मतदान केले आहे. त्यामुळेच इतके मोठे यश भाजपा मिळवू शकली. गुजरातमध्ये तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला यापेक्षाही मोठे यश मिळाले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि जनतेचा मुख्यमंत्र्यांवरील विश्‍वास अधोरेखित करणारा निवडणूक निकाल!’ असेच वर्णन या यशाचे करणे सयुक्तिक ठरेल.
विशेषत: सर्वच समाजघटकातील तरुण मतदारांनी मोठ्या अपेक्षेने भाजपावर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्‍वास ठेवून भाजपाला निवडून दिले आहे.
तरुणवर्गाला जातिपातीच्या भिंती ओलांडून राष्ट्रीय विकासात योगदान द्यायचे आहे. त्यांचा खरा लढा हा प्रस्थापित वर्गाशी आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशी कार्यक्षेत्रे गाजवण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्याकडे आहे. केवळ आर्थिक परिस्थिती आणि आरक्षणाच्या अभावी कुणी शिक्षण, उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी भक्कम आणि प्रगल्भ व्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान मुख्यमंत्री महोदयांसमोर असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासू, निर्णयक्षम, विश्‍वसनीय प्रतिमा पाहता, उपरोक्त आव्हान ते पेलतील, अशी खात्री वाटते. तसे झाले, तर मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे सिद्धहस्त आणि आऊटपुट ओरिएंटेड नेतृत्व ठरणार आहे!
डॉ. चन्द्रहास सोनपेठकर, पुणे
जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणारी मालिका ‘तू माझा सांगाती’
संसार आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून पती आणि पत्नी ही दोघे संसाररथ चालविणारी दोन चाके आहेत. या दोन्ही चाकांवर संसाररथ कुठेही न अडखळता अविरत चालू राहातो. त्यामुळे पती-पत्नींना एकमेकांना समजून घेण्याकरिता विश्‍वासपूर्वक संसार आणि परमार्थाची सांगड घालून वाटचाल करावी लागते. ‘दोघांनी मिळून आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका’ या समर्थांच्या उक्तीप्रमाणे संसाराकडून परमार्थाकडे जाण्याची वाटचाल एकमेकांबरोबर राहून यशस्वीपणे पार पाडत असताना अनेक संकटे, खाचखळगे व घटनांना सामोरे जात जात जीवन जगण्याची कला आत्मसात करावी लागते. हेच सर्व सांगण्याचा प्रयत्न सध्या कलर्स (मराठी) वर सुरू असलेल्या ‘तू माझा सांगाती’ या संत तुकारामांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेल्या मालिकेमध्ये करण्यात आलेला आहे.
संत तुकारामांच्या जीवनात प्रत्यक्षरीत्या घडलेल्या घटना व छोटे छोटे प्रसंग यांचे चित्रण पाहताना मानवातील माणुसकी जागी होते, संवेदनशीलतेला पाझर फुटतो, सदसद्विवेक जागृत होतो, मानवी जीवनातील सत्यता पटू लागते, मानवी मन निर्भय व ईश्‍वराप्रती आश्‍वस्त होते. तसेच प्रयत्नांतून परमार्थ साधण्याकरिता प्रारब्धावर आणि ईश्‍वरावर अवलंबून राहावे लागते, याचे सुद्धा मनाला आकलन होते. जीवन जगण्याचे दिव्य तत्त्वज्ञान सांगणारी ही मालिका निव्वळ काल्पनिक नाही, तर या मालिकेत संत तुकारामांच्या जीवनात प्रत्यक्ष घडलले प्रसंग दाखविले असल्याने ती मालिका फक्त करमणूक व मनोरंजनाकरिता न पाहता त्यातून काहीतरी उद्बोध मिळण्याकरिता पाहावी. त्यामुळे मनात सत्य असल्याची जाणीव निर्माण होऊन सदसद्विवेक जागृत होईल. संत तुकारामांसारख्या थोर मनाच्या सत्‌पुरुषाचे निरागस व निष्पाप असलेले मन कुणामध्येही दोष पाहत नाही. सर्वत्र ईश्‍वरी अस्तित्वाचा भाव ठेवून राहाते, चराचरात फक्त ईश्‍वर आणि ईश्‍वरालाच पाहते, हीच तर खरी भक्ती आहे.
या मालिकेतील संत तुकाराम व त्यांची मुले ही घराचे घरपण जपणारी, एकमेकांवर निरतिशय प्रेम करणारी, एकमेकांना आपुलकी व जीव लावणारी माणसे पाहताना नकळतपणे डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली जाते. त्या पात्रांचे एकमेकांवरील प्रेम, सदाचरणाची उत्कट भावना व संवेदनशीलता पाहून त्यांच्याविषयी कळवळा वाटून हृदयातील तरल संवेदना जागृत होतात. संत तुकारामांची मधुर बोलभाषा, आचार-विचारसंपन्नता, सात्त्विक, बुद्धिमत्ता व सद्वर्तन पाहून तसे वागण्याची मनाला प्रेरणा मिळते.
अशी मालिका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी नियमित आवर्जून पाहावी व त्यामधून जीवन जगण्याचे दिव्य तत्त्वज्ञान आत्मसात करून मानवी जीवनाला निर्मळ, निरागस व आनंदमय बनवावे, हीच मन:पूर्वक सदिच्छा व्यक्त करतो. जय जय रामकृष्ण हरि|
योगेश जोशी, एसबीआय कॉलनी, शेगाव
आधुनिक श्रावण बाळे…
धार्मिकतेची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या रामायण ग्रंथातील श्रावण बाळाची कथा, वर्षानुवर्षांपासून बालकांच्या मनावर सुसंस्कार करण्याच्या दृष्टीने घरोघरी सांगण्याचा संस्कार. आईवडिलांच्या उत्कट भावनेपोटी, पैसाअडका नसतानादेखील कृतज्ञता भावनिकतेतून कावडीच्या माध्यमातून अथक परिश्रम घेत, वृद्ध मातापित्याला तीर्थयात्रा घडवून आणली. या कथेचा भावार्थ, आजच्या स्पर्धेच्या युगातदेखील बघावयास मिळतो. जगाच्या कान्याकोपर्‍यात भारतीय युवक सहजतेने पोहोचलेला असून, त्यांची अंदाजे संख्या दोन कोटींपेक्षा अधिक. विद्याविभूषित युवावर्ग आपापल्या कसबी-कुशल-सक्षम कार्यातून चमकत असून, लौकिक कार्यातून जनसामान्यांत परदेशाच्या क्षितिजावर निर्माण केलेली ओळख हृदयस्पर्शी! अधिकांश युवावर्गाने तर स्वत:चा निवास नि दिमतीला असलेली अद्ययावत वाहने जणू समृद्धीचे देखणे चित्र! प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे मनाला प्रसन्नता नि सार्थ अभिमान वाटतो. या पार्श्‍वभूमीवरील विलोभनीय पैलू म्हणजे अनेक सुसंस्कारित मने, आपापल्या आईवडिलांना/सासू-सासर्‍यांनादेखील आग्रहाने, नीटनेटकी व्यवस्था करीत भावनिकतेतून बोलावितात. नात-नाती यांच्या बहरत असलेल्या कार्यात सहजतेने प्रेम-जिव्हाळा भावनेने सहभागी होऊन आनंद द्विगुणित करतात. परदेशात राहणारी नि स्थिरस्थावर झालेली ही पिढी बघितली की, असे मनापासून वाटते, ही कर्तव्यदक्ष युवा मंडळी आधुनिक युगातील श्रावण बाळेच ठरतात! आढावा घेतला असता हजारोंच्या संख्येने आईवडील मुला-मुलींकडे जातात. निसर्गसौंदर्याबरोबर आधुनिकतेचा स्पर्श असलेले समाजमन नि शहरे बघून स्तिमित होतात. शेवटी मात्र त्यांचे मन भारतातच गुंतलेले प्रकर्षाने दिसते.
वसंत पापडे
०७१२-२२५००६२
नात्यांतील गोड बदल
चंद्रपूरच्या सुनीता बलकी या सासूने सुनेला किडनी देऊन एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला. ‘सासू म्हणजे सतत सुनावणारी आणि सून म्हणजे सुनलेले न ऐकणारी,’ ही व्याख्या आता बदललेली आहे. शिक्षणामुळे स्त्रियांची मानसिकता बदललेली आहे. स्त्रीच स्त्रीची शत्रू नसून मैत्रीण, सखी, मुलगी, आई झालेली आहे. कित्येक स्त्रिया सासूच्या भरवशावर संसार ठेवून घराबाहेर पडतात, तर सासू त्यांच्या प्रगतीला प्रोत्साहन देते. कित्येक सुनांनी सासूच्या नकळत त्यांच्या मैत्रिणींना बोलावून त्यांचे वाढदिवस साजरे केले आहेत. हे बदल कुटुंबाच्या दृष्टीने सुखद आहेत. सासूने सुनेला किडनी देऊन मुलाचा संसार वाचविला. ‘लक्ष्मी तू या घरची’ हे ब्रीद प्रत्यक्षात आणले. दोघींचे अभिनंदन!
निर्मला गांधी
९४२१७८०२९०
हेल्मेटचा वापर ऐच्छिक असावा
काही महिन्यांपासून नागपुरात गाडी चालविताना हेल्मेट घालणे अनिवार्य झालेले आहे. कारण असे सांगितले जाते की, हेल्मेटच्या वापरामुळे अपघातात डोक्याला मार बसत नाही; परंतु अपघातात डोक्याला इजा न होता माणसं दगावत नाही का? प्रत्येकाला आपल्या जिवाची काळजी असते. नागपुरातील अत्यंत खराब रस्त्यांमुळे बरेचसे अपघात होत आहेत. हेल्मेटचा वापर नव्हता तेव्हाही अपघात होत होते. आता हेल्मेटचा काटेकोरपणे वापर होतो आहे म्हणून अपघात टळलेले आहेत असे थोडेच आहे.
महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना हेल्मेटचा वापर अडचणीचा आहे. हेल्मेट घातल्यानंतर नीट ऐकायला येत नाही, मागून येणारी वाहनं दृष्टीस पडत नाहीत, डोक्यावर विनाकारण भार होतो. नागपुरातील ऑटोचे दर अख्ख्या भारतामध्ये अतिशय महागडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बाहेरगावी एक-दोन दिवसांकरिता जायचं आहे. ती व्यक्ती बसस्टॅण्डवर किंवा रेल्वेस्टेशनवर आपल्या दुचाकीने गेली, तर हे हेल्मेटचं लोढणं कसं वागवायचं, हाही एक अवघड प्रश्‍न आहे. उन्हाळ्यात हेल्मेट तापल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. याची दखल कोण घेणार?
नागपुरात बरेचसे ऑटो रॉकेलवर चालतात. मागील वाहनचालकांना त्या विषारी धुराचा त्रास होतो. पोलिस यंत्रणेने याकडे जातीने लक्ष द्यावे.
दादा हांडेकर
९०९६३८२११२
नोटाबंदी : विरोधकांना लोकशाहीची चपराक!
नोटाबंदीफेम विरोधक आवळ्या-भोवळ्यांची मोट बांधून व पदर खोचून ‘आक्रोश’ करायला निघाले होते. नेमके त्याच दिवशी महाराष्ट्रातील नगरपालिकांचे व नगरपंचायतींचे निकाल लागले आणि नोटाबंदीविरोधी फुग्यातील सारी हवाच लोकशाहीच्या रट्ट्याने काढून घेतली! १४७ पैकी ५५ अध्यक्ष व चक्क ८५१ नगरसेवक निवडून देऊन नोटाबंदीविरोधकांना सामान्य जनतेने वोेटबंदी करून चांगलीच चपराक लगावली आहे. त्या खालोखाल नं. २ राहून शिवसेनेचे २५ अध्यक्ष व ५१४ नगरसेवक निवडून दिले आहेत. तोही युतीतीलच पक्ष आहे आणि यावेळी अध्यक्ष थेट प्रत्यक्ष मतदानाने आले आहेत, हे विसरता येणार नाही. मात्र, त्यांचे सर्वेसर्वा मध्येमध्ये झटके आल्यासारखे वागतात, हा भाग वेगळा. गुजरातमध्येही भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. नोटाबंदीच्या पृष्ठभागावर या निवडणुका झाल्यामुळे भाजपाला डोक्यावर घेऊन व इतर विरोधी पक्षांना आपटी देऊन सामान्य नागरिकांनी नोटाबंदी निर्णयाचे एक प्रकारे समर्थन केले आहे, हे नाकारता येणार नाही.
नोटाबंदीला विरोध करताना ममताबाईंनी तर वैयक्तिक विरोध असल्यासारखे, मोदींना कायम राजकारणातून हाकलून देण्याचीच अशोभनीय भाषा वापरली आहे. त्यांचे गुरुस्थानी जर, ‘नोट नाही पंतप्रधान बदला’ म्हणणारे केजरीवाल असतील, तर दुसरे काय होणार? त्यांनी एक लक्षात ठेवावे की, बेडूक कितीही फुगला तरी त्याला हत्ती होता येत नाही. आता आमचे आंतरराष्ट्रीय पप्पू, नोटाबंदी विषयावर चर्चेसाठी मोदींच्या भेटीचा हट्‌ट धरून बसले आहेत. हे बिरबलाच्या मुलाच्या हट्‌टासारखेच आहे. बिरबलाच्या लहान मुलाने काचेच्या पेल्यात हत्ती बसवून देण्याचा हट्‌ट केला. बिरबलाने खेळण्यातला हत्ती बसवून मुलाचा हट्‌ट पूर्ण केला. यांचा हट्‌ट पूर्ण कसा करता येईल, हाही एक प्रश्‍नच आहे. यावर भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी ‘ते फार उच्च पद आहे,’ असे सांगून त्यांची समजूत काढून शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही एक सामान्य नागरिक आहात, बरोबरीचे नाहीत, अशी अप्रत्यक्ष रीत्या जाणीव करून दिली आहे. लोकांच्या त्रासाच्या तुणतुण्याशिवाय यांच्याजवळ दुसरा मुद्दाही नाही. या सर्वांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत. यांचेसमोर गोदामातील नोटांचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळेच आरडाओरड, आक्रोेशाची नौटंकी सुरू आहे. संसदेचे कामकाज बंद पाडण्याचा एकमेव कार्यक्रम सध्या सुरू आहे.
गुजरातमध्येही अशीच विरोधकांची स्थिती झालेली आहे. गुजरातमधील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने १२५ पैकी १०९ अध्यक्षांच्या जागा जिंकून विरोधी पक्षांचा धुव्वा उडविला आहे. येथेही सामान्य नागरिकांनी त्रासाकडे दुर्लक्ष करून, नोटाबंदी निर्णयाचे जोरदार समर्थनच केले आहे. संपूर्ण देशातूनच समर्थन मिळत आहे. तेव्हा अशा विरोधकांच्या कोल्हेकुईकडे लक्ष न देता काळा पैसा बाहेर काढण्याच्या व काळा पैसा निर्मितीवर रोख लावण्याच्या आपण करणार असलेल्या उपायाला नागरिकांचे समर्थनच राहणार आहे. तुमच्याच हातात देश सुरक्षित राहील, याचा जनतेला विश्‍वास आहे. तेव्हा मोदीजी, बेधडक आगे बढो, जनता तुम्हारे साथ है!
शशिकांत माळीचकर
९४२०३६९९७३
खरंच का आम्ही सुशिक्षित आहोत?
रस्त्याने फिरताना आपल्या आजूबाजूला ज्या प्रकारे लोकं थुंकतात, त्याने बेजार होऊन आणि अतिशय किळसवाणा प्रकार असह्य होऊन पहिल्यांदाच हे लिखाण करीत आहे. दोन वर्षांपासून सरकार स्वच्छता अभियानातून या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करीत आहे. त्यात अनेक नागरिक, संस्था, शाळा इत्यादी आपापल्या परीने सहभागी होऊन ‘स्वच्छ भारत’ निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्नरत आहेत. त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते.
परंतु, दुसरी बाजू अशी आहे की, अनेक लोक, ‘मला काय त्याचे?’ किंवा ‘मी एकट्याने थुंकल्याने काय फरक पडणार?’ या थाटात थुंकत असतात. ‘निर्लज्जं सदा सुखी’ असेच या लोकांच्या बाबतीत म्हणता येईल. अनेक लोक चालत्या वाहनावरून सर्रास थुंकताना दिसतात. अनेक कारचालकसुद्धा सिग्नलवर उभे असताना दार उघडून अत्यंत निर्लज्जपणे थुंकतात. हे सर्व बघितल्यावर मनात एक स्वाभाविक प्रश्‍न निर्माण होतो की, खरंच का आम्ही सुशिक्षित आहोत? केवळ मोठमोठ्या पदव्या घेऊन आणि भरपूर पैसा कमावला म्हणजे सुशिक्षित होणे नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
आज या स्वच्छता अभियानावर फार मोठा निधी सरकारला खर्च करावा लागतो आहे. जर प्रत्येक नागरिकाने, मी माझे घर जसे स्वच्छ ठेवतो तसेच मी माझ्या देशालाही स्वच्छ ठेवील, असा मनापासून प्रयत्न केला, तर देश आपोआपच स्वच्छ होईल व या अभियानावर होणारा खर्च अन्य देशहिताच्या कामावर खर्च करता येईल. बघा, विचार करा. देवाने बुद्धी दिली आहे, त्याचा सदुपयोग करण्याचीही बुद्धी देव अशा सर्व लोकांना देवो, अशी परमेश्‍वरचरणी प्रार्थना!
विनय शंकरराव पंडे, सुर्वेनगर, नागपूर