भुंगा

0
166

कथा

निमाचं लग्न झाल्यापासून सुमाताईंना अगदी शांंत वाटायचं. जावई शशांक आणि निमा दोघेही पुण्यालाच स्थायिक झाले होते. मालकीची सदनिका, दिमाखदार कार, ऐटबाज पगार अशा या जोडप्याला आता ‘जे हवं वाटावं’ तेच नेमकं जुळूनही आलं होतं. कुकुल्या बाळाच्या आगमनाच्या जाणिवेने दोघेही हरकले होते. सुमाताई वसंतरावांच्या कृतकृत्यतेचं हेच प्रमुख इंगित होतं.
‘‘अहो ऐकलंत का? पोरीच्या बाळंतपणाला पुण्याला जायला हवं… पोरीनं काय आठवण करून द्यायची असते का? आपणच रीतभात सांभाळून आधीपासून जाऊ या…’’
‘‘खरंय सुमा, पण तू जा की आधी. मी येईन नंतर. माझे ज्येष्ठ नागरिक मंडळाचे काम… मंदिर जीर्णोद्धाराचे काम…’’
‘‘समजलं… सारं समजलं… पण, मी बाई एकटी कधीच राहिली नाही आजवर… तुमच्याशिवाय.’’ सुमाताईंची किंचित सलज्ज मुद्रा वसंतरावांच्या नजरेतून सुटली नाही.
‘‘एऽ वेडाबाई… कोणत्या युगात वावरतेस… नाऊ डिस्टन्स डझंट मॅटर… व्हिडीओ कॉलवर आपण प्रत्यक्ष भेटीसारखे बोलू शकतो की… तुला मस्त स्मार्टफोन देतो… असू दे जवळ… आता आवश्यकता निर्माण झालीय ना!’’
‘‘छे हो, मला कुठे ते मोबाईल हाताळणे जमतेय… अज्जीबात आवड नाही…. निमानं दिला होता मागे एकदा. मी परत करून टाकला… इंग्रजीत हाऊसवाईफ आणि मराठीत गृहकृत्यदक्ष या दोन पदव्या सांभाळण्यात हयात गेली… कुणाशी बोलायचं तर ते लँडलाईनवरच. त्यामुळे मोबाईल हवाच कशाला?’’
‘‘अगं, आयुष्यात भूमिकेनुरूप बदलावं माणसानं… आता आपल्या दूरत्वाला जवळ आणायचं साधन आहे ते… मी सांगेन तुला सोप्पं करून… कामाचं तेवढंच ध्यानात ठेवलं तरी जमेल तुलाही मोबाईल… काही त्यात हाथीघोडा काम नसतं…’’
आता पर्याय हाच उत्तम असल्याने सुमाताई राजी झाल्या. हातात आलेल्या मोबाईलला मागेपुढे निरखून पाहण्यातच त्यांचे दोन दिवस गेले… पण, जरा उघडून बघायचा हिय्या कसा तो झालाच नाही… तसाच तो पर्समध्ये पडून राहिला.
हळूहळू एक एक तयारी… अनेक आघाड्यांवर नियोजन करता करता पुण्याला जाण्याचा दिवस उजाडला. प्रवास म्हणजे गाडीत आरूढ होईस्तोवर कामे संपायची नाहीत, हाच सुमाताईंचा आजवरचा जो अनुभव होता… त्याचीच साक्ष दरवेळीप्रमाणे याही वेळी पटत होती.
‘‘अरेच्या विसरलोच की, सुमा तुझा मोबाईल कुठाय? दे इकडे… हे बघ माझा कॉल आला की हिरवा गोल दाबायचा आणि लाल बटन दाबले की बंद…. बस एवढेच पुरेसे आहे सध्या…’’
सुमाताईंना पुण्याला पोहोचवून, दोन दिवसांच्या पाहुणचारानंतर वसंतराव परत नागपूरला आले आणि आपल्या कार्यक्रमात निवांत मशगूल झाले.
निमाला आता कुठे सहावा महिना लागला होता. दोघेही ऑफिसला गेल्यावर सुमाताईंना घरात एकटेपणा जाणवत राही… टीव्ही बघण्याची फारशी सवय त्यांना कधीच नव्हती… नित्याप्रमाणे दुपारी त्या पहुडल्या होत्या. आजूबाजूला सर्वत्र चिडिचीप शांतता. पक्ष्यांचाही आवाज यायचा नाही.
‘‘सुमन, एऽऽ सुमन… सुमाऽऽ’’
ओऽऽ, नकळत सुमाताई या हाकेसरशी खडबडून उठल्या, खिडकीचा पडदा सारून त्यांनी कानोसा घेतला… वर खाली बघितले… दरवाजा उघडून बाल्कनीतून वाकून पाहिले, पण कुठे काय? कुणीच तर नव्हते!!
आपल्याला भास झालाय नक्की… असे म्हणून किंचित हसून पुन्हा आपल्या कामाला लागल्या… पण, डोक्यातून विचार काही जात नव्हता… कसला भास…? आजवर कधी भास झाला नाही तो… आजच मला असे नावाने हाक मारणारे कोण बरे असेल? इथे तर कुणी ओळखीचेही नाही फारसे! निमाला, शशांकरावांना सांगावे का आल्यावर? छे! छे! हसतील ते मला. पुन्हा तसला काही आवाज आला तर बघू या… असे म्हणून सुमाताईंनी टीव्ही ऑन केला… चॅनेल स्कॅन करताना एका जागी त्या थबकल्या… टीव्हीवर एक मानसोपचारतज्ज्ञ मुलाखत देताना सांगत होते-
‘‘विविध प्रकारचे मानसिक रोग… कधी रुग्णाला भास होतात… आपल्या मागून कुणीतरी चालत आहे… कधी तर चक्क कुणीतरी आवाज देत आहे, असा भास होतो… पण, औषधोपचाराने हा आजार बरा होतो वगैरे.’’
सुमाताईंनी टीव्ही बंद केला खरा. पण, डॉक्टरांचे ते शब्द अजूनही कानी गुंजारव करत होते… संध्याकाळी विचारमग्न बघून निमा म्हणाली.
‘‘आई, कसला विचार करते आहेस?’’
‘‘तब्येत बरी वाटते ना?’’ शशांकनेही विचारपूस केली.
‘‘छे! छे! मी छान आहे… जरा प्रवासाचा शीण आहे. झोप झाली तर फ्रेश वाटेल बघ…’’
आज सकाळी मस्त ताजेतवाने वाटते होते… सोनेरी किरणे घेऊन येणारी ही सोनसकाळ नक्कीच नवजीवन घेऊन येते, असं सुमाताई नेहमी म्हणायच्या.
अचानक कालच्या विचारांचा भुंगा आठवून सुमाताईंना हसू आले… उगाच पराचा कावळा करतो आपण… मला आता या वयात कोण साद घालणार आहे?
निमा, शशांकराव ऑफिसला गेल्यावर पुन्हा तीच शांत-रूक्ष दुपार उगवली… भिंती चहूकडून जवळजवळ तर येत नाही ना? छत आणि जमीन एकत्र येऊन मी त्यात जखडून तर जाणार नाही ना? एक ना दोन… भयगंड…
‘‘सुमन, एऽऽ सुमना… सुमाऽऽ’’
पुन्हा तोच कालचा आवाज कर्णरंध्रात घुमला… पार मेंदूचा भुगा करणारा वाटला आज तो आवाज… अगदी तोच आवाज, तीच आर्त साद… तो स्वर… तोच निनाद!!
आज मात्र सुमाताईंच्या काळजात धस्स झाले… नगशिखान्त हादरल्या… कोण देतंय आवाज? ये म्हणावं समोर तरी! बरं कुणाला विचारावं तरी पंचाईत… नसती उठापटक, कुचाळक्या करतात लोकं.
तेवढ्यात कामवाली रखमा आली तशी सुमाताईंची विचारशृंखला भंगली… काही केल्या हा विचार मनातून जात नव्हता… रखमाला भांडी घासताना बघून वाटले, ‘‘रखमा त्रयस्थ आहे… हिला काही ठाऊक असेल… इथलीच राहणारी आहे ही….’’
‘‘रखमा… ए रखमा…’’ मऊसूत आवाजात सुमाताई बोलल्या. त्यांची कहाणी होत नाही तोच रखमा ताडकन उभी होत कानाशी लागत म्हणाली…
‘‘आवोऽ ह्यो तर भानामती दिसतुया… लोकं आवाजाच्या दिशेने पाण्याकडे जातात पागलावानी… मग खल्लास…’’
‘‘रखमेऽ, हे सारं का बरं होतं?’’
‘‘ती अतींद्रिय शक्ती हे सारं करते म्हणत्यात बाप्पा.’’ रखमा डोळे मोठे करून बोलत होती. तिच्या तोंडून अतींद्रिय हा शब्द ऐकून सुमाताईंना त्याही स्थितीत हसू आले.
‘‘रखमा, असं काही नसतं… मी गंमत केली बघ तुझी. तू कुठे बोलू नकोस…’’
रखमापुरता सुमाताईंनी विषय गुंडाळला, पण भुंगा डोक्यात गुंजारव करतच राहिला. आज पुन्हा तीच शांत दुपार… वामकुक्षीसाठी सुमाताई जरा लवंडल्या तोच आवाज… ‘‘सुमन… एऽऽ सुमन… सुमा!!’’
आता मात्र सुमाताईंची पाचावर धारण बसली… काहीतरी सोक्षमोक्ष लावायलाच हवाय… सुमाताईंनी त्यांच्या शेजारच्या समवयस्क सुधाला गाठलं… आधी थोडं प्रास्ताविक दळून झाल्यावर मूळ विषयाला हात घातला.
‘‘अगं सुधा… तिकडे नागपूरला आमच्या शेजारी एक बाई आहेत… त्यांना किनई रोज कुणीतरी आवाज देतंय… जाम घाबरल्या आहेत त्या….’’
‘‘सुमे… आलं लक्षात… हे काही वात्रट आणि वाह्यात लोकांचे उद्योग असतात… हल्ली अशी बरीच रॅकेट्‌स निघाली आहेत म्हणे… स्त्रियांना जाळ्यात अडकवण्यासाठी फांस…’’
‘‘सुधा, पण ती महिला वयस्क आहे… कोण कशाला मागे लागेल?’’
‘‘अग ह्यांना वयाचे काही बंधन नसते… तू पोलिसात जा म्हणावं त्यांना… थोडी पाळत ठेव… अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नकोस…’’
सुमाताई परतत होत्या तेव्हा जिन्याने एक इसम वर जाताना बघून त्यांचा संशय बळावला… त्या निरखून पाळत ठेवू लागल्या, तेव्हा खाली उभ्या काही तरुणांसोबत तो बाईकने निघून गेला… आता तर दररोज दुपारी तोच इसम वर जाताना दिसायचा… आज तो इसम नित्याप्रमाणे वर जाताच थोड्याच वेळात आवाज आला
‘‘सुमन… एऽऽ सुमन… सुमाऽऽ’’
कोण असावं बरं… शिवाय माझं नाव त्या अनोळखी व्यक्तीला कसं ठाऊक असणार?
आज पुण्याला आल्यापासून प्रथमच सुमाताईंनी पर्स उघडली… तेथील मोबाईल सहज बघितला तर मिस्डकॉल्स दिसले… अरेच्च्या, कुणी बदमाश फोन करण्याचाही प्रयत्न करतोय… कोण असावा… कारण माझा हा मोबाईल नंबर मी कुणालाच दिलेला नाहीये… आता मात्र सुमाताईंना राहवेना.. आज निमा, शशांकरावांना सांगून पोलिसात तक्रार करायलाच हवी… असा निश्‍चय केला.
संध्याकाळी जेवणं सुरू असतानाही सुमाताई गप्पगप्पच होत्या. जेवण आटोपल्यावर त्यांनी विषयाला तोंड फोडले.
‘‘निमा, तुला सांगेन सांगेन म्हणतेय… शशांकराव तुम्हीही ऐका… मला रोज दुपारी कुणीतरी आवाज देतंय… आणि हो, मोबाईलवरही मिस्डकॉल्स येतात… फार भीती वाटतेय… हे कुणाचं काम असावं बरं?’’
‘‘बघू…’’ असे म्हणत शशांकरावांनी मोबाईल हातात घेतला.’’ कधी घेतला मोबाईल.. काही सांगितले नाही. म्हटले… पेढे हवेत अगोदर.’’ शशांकराव हसत म्हणाले. ‘‘अहो, असं काय करताय, ती बिचारी काळजीत- अन् तुम्हाला सुचतेय मस्करी.’’ निमा कृतककोपाने म्हणाली.
‘‘बघ निमा, सगळे मिल्ड कॉल्स एकाच नंबरचे आहेत… थांब जरा लावून बघतो.’’ असे म्हणत कॉल लावलादेखील…
‘‘हॅलो, कोण बोलतंय?’’
‘‘बोला शशांकराव, आज बरा वेळ मिळाला तुम्हाला! तुमच्या सासूबाईंना तर सवडच नाही आमच्याशी बोलायला… मी दुपारी फोन करतो, पण उचलतच नाही… अजून मोबाईलफ्रेंडली झाली नाहीये…’’
‘‘अगं निमा, तुझे बाबा बोलताहेत… त्यांचेच हे मिस्डकॉल्स… कुणी उचलतच नाही म्हणाले… मग मिस्डकॉल्स दिसणारच…! नाव का सेव्ह नाही केले?’’
‘‘अग्गो बाईऽऽ! ह्यांचे कॉल्स आहेत… अहो, मला काय कळतंय… यांनीच घाईत स्वत:चे नाव सेव्ह केले नाही वाटते.’’
आता एक निकाल लागल्याने थोडं मनावरचं मळभ निवळलं होतं, पण आवाज देणारं कोण?’’
‘‘हॅ हॅ हॅ… समझ गया माजरा क्या है.’’ शशांकराव पोट धरधरून हसत सुटले… त्यांनी सुमाताईंच्या नंबरवर कॉल केला. रिंगटोन वाजू लागली-
‘सुमन एऽऽ सुमन… सुमाऽऽ’’
आता सुमाताईंचा चेहरा गोरामोरा झाला. वसंतरावांनी खुलासा केला ‘‘अगं, तुझ्या मोबाईलवर माझ्याशिवाय कुणाचा कॉल येण्याची शक्यता नव्हती. म्हणून मीच माझ्या आवाजात साद घालण्याची रिंगटोन रेकॉर्ड करून सेट केली गंमत म्हणून!’’ ‘‘पण पर्समधून आलेला तुमचा आवाज मला कुणीतरी आवाज दिल्यासारखा भासला… खूप दृष्ट दुष्ट आहात तुम्ही…’’ मनावरचं मळभ आता पूर्ण दूर झाल्यानं सुमाताई सार्‍यांसोबतच खो खो हसू लागल्या…

मो. बा. देशपांडेे/९८५०७३३११८