महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने २७ ते २९
जानेवारीपर्यंत राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय, धरमपेठ येथे नागपूर
ग्रंथोत्सव-२०१२ चे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती नागपूर-अमरावती
विभागाचे माहिती व जनसंपर्क संचालक भि. म. कौसल यांनी पत्रपरिषदेत दिली.
ग्रंथ व साहित्य संपदा लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा ग्रंथोत्सव
आयोजिण्यात आला आहे. ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते २७ जानेवारीला दुपारी १२ वाजता
ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होईल. ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी राहणार असून प्रमुख अतिथी नागपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी
प्रमोद भुसारी उपस्थित राहतील.
उद्घाटनंतर दुपारी १२ ते ४ विद्याथ्र्यांची ग्रंथ सहल, दुपारी १ वाजता चंद्रकांत
वानखडे यांच्या अध्यक्षतेत कथाकथन होईल. ३ वाजता लोककला महोत्सव व
सायं. ५ वाजता लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रम होईल. दुपारी १ ते रात्री ८
पर्यंत पुस्तक प्रदर्शन व विक्री सुरू राहील. २८ जानेवारीला सकाळी ११ ते रात्री ९
पर्यंत पुस्तक प्रदर्शन व विक्रीसह १२ ते ४ विद्याथ्र्यांचा ग्रंथसहल, १ वाजता
कविसंमेलन, सायं. ५ वाजता माझे आवडते ग्रंथ या विषयावर चर्चासत्र, रात्री ८
वाजता लोककला महोत्सव होईल.
२९ ला सायं. ५ वाजता विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव ई.
झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेत ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. वनराईचे विश्वस्त
गिरीश गांधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
ग्रंथप्रेमींना या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौसल यांनी केले.
पत्रपरिषदेला जिल्हा माहिती अधिकारी मुकेश खाडे, अनिल ठाकरे, नरेश मेश्राम,
विनोद नांगिया, विनोद लोकरे, शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या ग्रंथपाल कविता
महाजन, प्रा. इंद्रजित ओरके उपस्थित होते.
तभा वृत्तसेवा
नागपूर, २४ जानेवारी
२७ पासून नागपूर
ग्रंथोत्सव-२०१२