भाजी विक्रेत्यांचे तीन वजनकाटे जप्त

*वैद्यमापन शास्त्र विभागाची कारवाई

    दिनांक :06-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
गिरड,
Vegetable vendor scales seized : भाजी व्यापारी व विक्रेते वजनकाट्यात दांडी मारून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार, वैद्यमापन शास्त्र विभागाने समुद्रपूर येथील आठवडी बाजारातील भाजी विक्रेते तसेच व्यापार्‍यांच्या दुकानात धाड टाकून पाहणी केली असता तीन वजनकाटे आक्षेपार्ह दिसून आल्याने वजनकाटे जप्त करून भाजी व्यापार्‍यांना काटे नूतनीकरण करण्याच्या सूचना दिल्या.
 
 
fSA
 
समुद्रपूर येथील आठवडी बाजार हा रविवारी भरत असतो. या आठवडी बाजारात भाजीपाला, फळ विक्रेते व व्यापारी हिंगणघाट तसेच परिसरातून येऊन स्पर्धात्मक भावात वजनात दांडी मारून कमी भाजीपाला व फळ विकतात. काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाने कमी वजन असल्यामुळे वजनाबद्दल व्यापार्‍याशी वाद घातला होता. त्याबद्दल तक्रारही झाली होती. दरम्यान, रविवार 5 रोजी वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक पी. डी. मेश्राम, निरीक्षक एन. बी. आष्टके, क्षेत्र सहायक जी. के. डेहने, प्र. श्रा. चव्हाण आणि पोलिस हवालदार एम. एस. कोसूरकर यांच्या चमूने बाजारात फिरून वजन काट्यांची तपासणी केली. दरम्यान, इलेक्ट्रिक काट्यात अ‍ॅडजेस्टमेंट केल्याचे लक्षात आल्याने तसेच नूतनीकरण न केलेले तीन काटे जप्त केले. व्यापार्‍यांना नुतनीकरणाची रशीद जवळ ठेवण्याचेही त्यांनी सांगितले. ग्राहकांनी भाजीपाला, फळ विकत घेताना सजग राहून खरेदी करावे, असे आवाहन अधिकार्‍यांनी केले.