नित्य नूतन देखिजे गीतातत्त्व!

    दिनांक :27-Dec-2023
Total Views |
धर्म-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
SrimadBhagavadgita श्रीमद्भगवद्गीता हा भारतीय संस्कृतीचा पाया असलेला ग्रंथ आहे. जवळजवळ 5125 वर्षांपूर्वी मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला भगवान योगेश्वर कृष्णानी मोहग्रस्त अर्जुनाला जो कर्तव्यभाव सांगितला त्या तत्त्वज्ञानाला श्रीमद्भगवद्गीता म्हणतात. महाभारत या भगवान वेदव्यासांनी रचिलेल्या नितांत सुंदर अशा महाकाव्याची एक लक्ष दहा हजार श्लोकसंख्या आहे. महाभारताचे एकूण अठरा पर्व असून यातील भीष्म पर्वात सातशे श्लोकांची श्रीमद्भगवद्गीता आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे एकूण अठरा अध्याय असून, भगवान श्रीकृष्ण आणि धनुर्धर अर्जुनाचा हा संवाद ग्रंथ आहे.
 
 
bhagvat gita
 
या ग्रंथाची सुरुवातच महाभारताचे प्रयोजन सांगते. खरं तर भगवद्गीता हे भगवंताचे अमृतवचन म्हणून सर्वश्रुत आहे. पण गंमत बघा की गीतेची सुरुवात भगवंतांनी आपण स्वतः केलेली नाही. तर ती सुरुवात ‘धृतराष्ट्र उवाच’ने होते. म्हणजे SrimadBhagavadgita भगवद्गीतेची सुरुवात धृतराष्ट्रानी केलेली आहे. धृतराष्ट्र हा काही आदर्श पुरुष नाही उलट आयुष्यभर तो पुत्रमोह आणि मी माझं या अंध प्रवृत्तीने वागला. थोडक्यात ज्याचे नावही मुखी घेऊ नये असा धृतराष्ट्र पण श्रीमद्भगवद्गीता त्याच्या प्रश्नाने व्हावी यालाही भगवान वेदव्यासांचे निश्चित प्रयोजन आहे.
 
धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे समवेता युयुत्सवः।
मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय
यातच महाभारत का घडले? हे लक्षात येईल.
 
 
इथे मामकाः आणि पांडवाः असे शब्द धृतराष्ट्राच्या तोंडी आहेत. मामकाः म्हणजे माझे पुत्र आणि पांडवाः म्हणजे पंडूचे पुत्र. आपल्यातच असा भेद करणे ही धृतराष्ट्र वृत्ती आहे. त्याने पांडवांना आपलं म्हटले नाही. धर्मराज युधिष्ठिराने नेहमीच वयं पंचाधिकशतम म्हटले म्हणजे आम्ही एकशे पाच आहोत असेच सांगितले पण धृतराष्ट्र दुष्टात्मा असल्याने त्याला ते शक्यच नाही.
धृतराष्ट्र ही प्रवृत्ती आहे. धृतराष्ट्र या प्रवृत्तीतच आपण आयुष्यभर मोहग्रस्त होऊन जगत असतो. त्याप्रवृतीचे दमन करून उन्नयन करता यावं म्हणून गीतेची सुरुवात त्याच्या तोंडून आहे.
श्रीमद्भगवद्गीतेचा शेवटही गोड आहे. सुरुवात जशी भगवंतांनी केली नाही तसा श्रीमद्भगवद्गीतेचा शेवटही भगवंतांच्या तोंडून नाही.
 
शेवट आहे संजय उवाच.
यत्र योगेश्वरः कृष्णो,
यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो
भूतिर्धृवा नीतिर्मतिर्मम
संजय ही देखील प्रवृत्ती आहे. तो धृतराष्ट्राला समजावून सांगतो की जिथे योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर पार्थ आहे तिथे विजय निश्चित आहे. अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही हे थांबवू शकता. परंतु दुष्टात्मा नैव भिद्यते हेच खरं.
यापेक्षा सकारात्मक आणि यशस्वी उन्नयन म्हणजे काय हे श्रीमद्भगवद्गीतेतून पाहायला मिळेल. ते उन्नयन सव्यसाची धनंजयाचे आहे. गीतेवरील भाष्य असलेल्या ज्ञानेश्वरीत त्याचं यथार्थ वर्णन करणारी ओवी आहे.
 
गुंतलो होतो अर्जुन गुणे, तृप्त जाहलो तुझिया गुणे।
आता सांगणे पुसणे, दोन्ही नये॥
SrimadBhagavadgita श्रीमद्भगवद्गीतेत अर्जुन नावाचीही एक प्रवृत्ती आहे आणि भगवान श्रीकृष्ण ही पण एक प्रवृत्ती आहे.
आपण आपल्याच मोहात लिप्त असतो. असा स्व शी गुंतलेले याला माउली ज्ञानेश्वरांनी अर्जुन गुण म्हटले आहे.
योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर अर्जुन गुणातून तुझिया गुणे म्हणजे श्रीकृष्ण गुण म्हणजे कर्तव्यतत्परतेत रूपांतरित होणे. हाच गीतेचा उद्देश आहे. अख्ख्या गीतेत धृतराष्ट्र एकदाच बोलला पण त्याचे अनिष्ट परिणाम आपण घडलेल्या संपूर्ण महाभारताच्या रूपाने पाहतो.
संजय केवळ सहा वेळा बोलला पण त्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला दिसतो.
धनुर्धर अर्जुन साधारणतः तेरा वेळा बोलला त्याची बदलण्याची धडपड दिसते. आणि भगवान अठरा वेळा प्रतिपादन करतात तेव्हा त्यांचा प्रभाव दिसतो.
 
आपल्याला धृतराष्ट्र वृत्तीकडून संजयवृत्तीकडे, अर्जुनवृत्तीकडून भगवानवृत्तीकडे जाण्याचा प्रामाणिक आणि अचूक प्रयत्न श्रीमद्भगवद्गीता सांगते. त्यासाठी गीता नित्य वाचावी. ज्ञानेश्वरीत वर्णन आहे.
येथ हरू म्हणे नेणिजे, देवी जैसे का रूप तुझे।
तैसे नित्य नूतन देखिजे गीतातत्त्व॥
साक्षात भगवान शंकर त्रिगुणात्मिका पार्वतीला सांगतात की देवी जसे तुझे रूप नित्यनूतन आहे तसेच हे गीतातत्त्व नित्यनूतन आहे.
श्रीमद्भगवद्गीता रोज वाचा. आपल्याला रोज नवा अर्थ कळतो. म्हणून तर नित्यनूतन देखिजे गीतातत्त्व हे महावैष्णव ज्ञानदेव म्हणतात. कारणही तसेच आहे.
 
हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू।
तो स्वये सर्वेश्वरू, प्रत्यक्ष अनुवादला
हा वेदाचा सागर आहे पण त्याचा अर्क प्रत्यक्ष सर्वेश्वर श्रीकृष्ण परमात्म्याने सर्वांना गीता रूपात दिला म्हणून तो नित्यनूतन आहे.
 
या गीतार्थाची थोरी, स्वये शंभु विवरी।
जेथ भवानी प्रश्नु करी, चमत्कारौनि॥
प्रत्यक्ष भगवान शंकर आणि महाशक्ती भवानी यांनी ज्यावर चर्चा करावी ते गीतातत्त्व सामान्य नाही. म्हणून ते नित्यनूतन.
आपल्या सर्वांचाही हाच अनुभव आहे की आपण जितके वेळा गीता पठन करतो तितके वेळा नवीन अर्थ आपणास लक्षात येतो. भागवत पंथामध्ये गीता आणि भागवत यांचे श्रवण आणि विठोबाचे अखंड चिंतन याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यात SrimadBhagavadgita श्रीमद्भगवद्गीता हा भारतीय संस्कृतीचा जाहीरनामाच म्हणावा लागेल. श्रीमद्भगवद्गीता हा स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णू असल्यामुळे त्यातील विचारदर्शन नित्यनूतन आहे. हृदयाच्या गर्भितार्थाने गीता पठन केली तर नवी दिशा, नवा विचार आणि नवीन बोध प्राप्त होतो. 
 
- 9822262735