सावधान, रात्र वैर्‍याची आहे...

    दिनांक :14-Dec-2024
Total Views |
अग्रलेख...
PM Narendra Modi : भारत देश आपल्या शेजारी तुलनेत खूप सुखी, समृद्ध आणि प्रगतिशील आहे. त्यामुळे अस्वस्थ, अस्थिर आणि अविकसित अशा शेजारी देशांना नेहमीच भारताचा हेवा वाटत असतो. शेजारी देशांमध्ये पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव आणि अन्य देशांचा समावेश आहे. मात्र यापैकी एकाही देशातील वातावरण सुरळीत आणि सौहार्दाचे नाही. आपल्या बहुतांश शेजारी देशांची आंतरिक सुरक्षा धोक्यात आली आहे, शक्तींनी या सार्‍या देशांना ग्रासले आहे. तेथील सरकारेही अस्थिर आहेत. अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरही आनंदीआनंद आहे. त्या तुलनेत आपण आपल्या देशाचा विचार केला तर आपला देश खूपच सुखी आणि समृद्ध आहे. आपल्या अंतर्गत सुरक्षेला कोणताही धोका नाही, विघटनवादी शक्ती अधूनमधून डोके वर काढण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यात त्यांना अपेक्षित यश नाही. आपली अर्थव्यवस्थाही सुदृढ आहे.
 
modi dksl
 
आपल्या देशातील सरकारही शेजारी देशांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या स्थिर आहे. याचे कारण आपल्या देशाला लाभलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदृष्टीचे आणि विकासाभिमुख नेतृत्व. यामुळेच शेजारी देश आपल्यावर नेहमीच जळत असतात, दातओठ खाऊन असतात. ‘उसकी कमीज मेरे कमीज से सफेद क्यो’, असा त्यांना वाटत असते. यामुळेच देशात अस्थिरता आणि अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. याआधी देशविरोधी शक्तींनी आधी पंजाब आणि जम्मू-काश्मीरला हाताशी धरले. १९९० च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवादाने थैमान घातले होते. या दहशतवादाची झळ पंजाबमधील क्रीडा, आर्थिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राला बसली होती. पंजाबमधील एकही क्षेत्र सुटले नव्हते. यामुळे फक्त पंजाबचीच नाही तर संपूर्ण देशाची अपरिमित अशी हानी झाली. पंजाब विकासाच्या बाबतीत अनेक वर्ष मागे फेकला गेला. पंजाबमध्ये अनेक राजकीय नेत्यांची, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची दहशतवाद्यांनी हत्या केली. देशाबाहेरील विघटनवादी शक्तीचा पंजाबमधील दहशतवादी कारवायांना पाठिंबा होता. पंजाबमधील तरुणांची या विघटनवादी शक्तींनी दिशाभूल त्यांचे माथे भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांना देशाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवाहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पंजाबमधील त्यावेळची परिस्थिती हाताबाहेर गेली होती. याची परिणती ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये झाली होती, सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवावे लागले होते. याची किंमत भारताचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अरुण वैद्य यांना आपल्या निवृत्तीनंतर चुकवावी लागली होती. दहतवाद्यांनी पुण्यात हत्या केली. एवढेच नाही तर ऑपरेशन ब्ल्यू स्टारची किंमत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पदावर असताना चुकवावी लागली. सुरक्षारक्षक माथेफिरू लष्करी जवानांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यानंतर देशभर शीखविरोधी दंगली झाल्या. हजारो शिखांचे शिरकाण करण्यात आले. खूप लवकर म्हणता येणार नसले तरी कालांतराने पंजाबमधील दहशतवादाच्या या राक्षसाचे निर्दालन आपल्याला यश आले. हेही वाचा : सावधान, रात्र वैर्‍याची आहे...
 
 
PM Narendra Modi : पंजाब पूर्ववत् झाला, मात्र जम्मू-काश्मीरमधील विघटनवादी कारवाया कधी थांबल्याच नाही. त्या कालही सुरू होत्या, आजही सुरू आहेत. कदाचित उद्याही सुरूच राहतील. त्याची तीव्रता कमी-जास्त होत गेली. आज जम्मू-काश्मीरमधील घातपाती आणि विघटनवादी कारवायांचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्णपणे संपलेले नाही. याला जम्मू-काश्मीरची भौगालिक रचना आणि आपल्या आतापर्यंत होऊन गेलेले काँग्रेसी शासनकाळातील बुळे आणि कुचकामी नेतृत्व जबाबदार म्हणायला हरकत नाही. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू-काश्मीरला ३७० कलमाची जी भेट आणि देणगी दिली, त्यामुळे जम्मू-काश्मीर कधी मनापासून स्वत:ला भारताचा भाग समजतच नव्हता. जम्मू-काश्मीरला आतापर्यंत मिळालेल्या भारतद्वेषी आणि पाकधार्जिण्या नेतृत्वामुळेच फक्त जम्मू-काश्मीरचेच नाही तर देशाचेही भरून न निघणारे नुकसान झाले. जम्मू-काश्मीरमधील राजकीय नेतृत्वाचे वर्णन गळ्यात मंगळसूत्र एकाच्या नावाने घालायचे आणि फिरायचे दुसर्‍यासोबत, असे केले तरी ते चूक ठरणार नाही. जम्मू-काश्मीरमधील रोगाचे निदान देशातील आतापर्यंत एकाही पंतप्रधानाला करता आले नाही. वा दुसर्‍या शब्दात सांगायचे तर त्याने या रोगाचे निदान जाणीवपूर्वक केलेच नाही. कारण रोगाचे निदान केले तर पुढील उपचार करावे लागतात. जी करण्याची आपल्या देशातील राजकीय नेतृत्वाची हिंमत नव्हती. ती पहिल्यांदा दाखवली ती आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. जम्मू-काश्मीरला अनेक वर्षांपासून भेडसावणार्‍या राजकीय आजारावर मोदी यांनी जबरदस्त अशी शस्त्रक्रिया केली. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील विशेष कलम ३५ ए आणि ३७० निष्प्रभ करण्याची हिंमत यांनी दाखवली. मोदी यांच्या या हिमतीचे तसेच राजकीय धडाडीचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
 
 
PM Narendra Modi : जम्मू-काश्मीरला लाभलेला राजकीय अस्थिरतेचा शाप ३७० कलम निष्प्रभ झाल्यामुळे आपोआप संपुष्टात आला. मात्र यामुळे देशविघातक शक्तींचा प्रभाव कमी झाला असला तरी त्यांनी पूर्णपणे हार मानली नाही. भारताला अस्थिर करणार्‍या ज्या शक्ती आहेत, त्यात प्रामुख्याने मुस्लिम जास्त आहेत, नव्हे त्याच सक्रिय आहेत. वेगवेगळ्या मार्गाने भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न या सर्व संघटनांनी थांबवले नाही. याचे प्रत्यंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नुकत्याच देशातील पाच राज्यांत घातलेल्या १९ ठिकाणाच्या छाप्यावरून दिसून आले. यात जैश-ए-मोहम्मदच्या समर्थकांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे यातून महाराष्ट्रही सुटला नाही. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरपासून जवळ असणार्‍या अमरावती येथून पाकिस्तानशी संबंध असल्याच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. एनआयएने ज्यांना ताब्यात घेतले, ते सर्व मुस्लिम आहेत. कोणताही धर्म कधीच कोणाला चुकीचे शिकवत नाही, हे खरे असले तर धर्माच्या आडून काही लोक एका धर्माविरुद्ध दुसर्‍या धर्माच्या लोकांना भडकवत असतात, ही वस्तुस्थिती आहे. गुन्हेगाराला जात आणि धर्म नसतो, वाक्य सुविचार म्हणून चांगले वाटत असले तरी विशिष्ट प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया करणारे, विशेषत: दहशतवादी कारवायात गुंतलेले सर्व एकाच धर्माचे कसे असतात हे कोडे कधीच न उमगणारे नाही. यात संशयाची सुई मुस्लिम धर्मावरच का स्थिरावत असते. सर्व मुस्लिम अतिरेकी नसले तरी पडकलेले सर्व अतिरेकी हे मुस्लिमच असतात, याकडे कोणी दुर्लक्ष शकत नाही. एनआयएने आपल्या देशव्यापी छाप्यात पकडलेले लोक पाहिले तर याची खात्री पटते. त्यामुळेच हा अतिशय चिंतेचा विषय म्हटला पाहिजे. देशातील जी राज्ये सध्या शांत दिसतात, तेथील शांतता ही भविष्यातील धोका ठरणार नाही, याची काळजीही आपल्याला घ्यावी लागणार आहे. देशाला असलेला धोका आज वाढला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशाने सर्वच क्षेत्रांत केलेली नेत्रदीपक प्रगती डोळे दिपवणारी आहे. यामुळे या देशविघातक शक्तीचा मोदींच्या नेतृत्वावर तसेच त्यांच्या नेतृत्वातील चौफेर प्रगती करत असलेल्या देशावर राग असणे स्वाभाविक आहे. याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. देशाच्या अनेक भागांत घातपाती कारवाया जाणीवपूर्वक घडवल्या जात आहे. मणिपूर दीड-दोन वर्षापासून जळत आहे. कमी-जास्त असले तरी सर्व भागांत विघटनवादी शक्तींच्या अशा कारवाया सुरू आहेत. याचा वेळीच बीमोड करायला पाहिजे. देशाचा काही भाग शांत असला तरी तेथील शांतता ही वादळापूर्वीची शांतता ठरू नये. देशातील सुरक्षा यंत्रणा या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. ही समाधानाची बाब म्हणायला पाहिजे. मात्र रात्र वैर्‍याची आहे, याचा विसर आम्ही पडू देऊ .