यवतमाळातही अनधिकृत ‘होर्डिंग्ज’

    दिनांक :15-May-2024
Total Views |
- प्रशासनाचे सर्वेक्षण आदेश : घाटकोपरच्या दुर्घटनेने आली जाग

यवतमाळ, 
Ghatkopar tragedy : शहरात अनधिकृत होर्डिंग्ज लावू नये, असे प्रशासनाचे आदेश आहेत. तरीदेखील यवतमाळात मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज आहेत. मुंबई घाटकोपर येथे वादळात होर्डिंग पडून 80 च्या वर वाहने क्षतिग्रस्त झाली. 8 जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षण केले जात आहे. जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींच्या मुख्याधिकार्‍यांना होर्डिंग्जबाबत अहवाल मागितला आहे. अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. बुधवार संध्याकाळपर्यंत यवतमाळ शहरात 25 होर्डिंग्ज अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
y15May-Hording
 
Ghatkopar tragedy : जाहिरातीचे फलक लावणे हा एक मोठा व्यवसाय बनला आहे. यात अनेकांची गुंतवणूक आहे. जाड लोखंडी अँगल आणि पत्रे वापरून हे होर्डिंग तयार केले जातात. वर्दळीच्या ठिकाणी ते लावण्याचा अट्टाहास असतो. फूटपाथ, रस्त्याच्या बाजूला, प्रमुख चौकामध्ये विशेष करून बसस्थानक परिसरात सर्वाधिक होर्डिंग्ज लागलेले दिसतात. एकदा गुंतवणूक केली की, यातून भरमसाट पैसा मिळत असतो. या अनाधिकृत बॅनरवर कारवाई करण्यासंदर्भात तरतूदसुद्धा आहे. तरीदेखील स्थानिक प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नाही. मुंबई येथील घटनेमुळे प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
 
 
 
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी होर्डिंग्जबाबत सर्व्हे करून त्याचा अहवाल सर्व पालिका, नगर पंचायत मुख्याधिकार्‍यांना मागितला आहे. या निर्देशांनंतर आता बाजार विभागातील कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. पहिल्याच दिवशी यवतमाळ शहरात तब्बल 25 होर्डिंग्ज अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. यवतमाळ शहरातील विविध भागांत पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. पालिकेची परवानगी असलेले शहरात 46 होर्डिंग्ज आहेत. इतर सर्व अनधिकृत असून या होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
 
 
Ghatkopar tragedy : सध्या जागा दिसेल तिथे होर्डिंग लावण्याची स्पर्धा सुरू आहे. जाहिरात एजन्सीकडून असे होर्डिंग भाडेतत्त्वावर दिले जातात. होर्डिंगमधून चांगली मिळकत मिळत असल्याने अनेकांनी आपल्या घराच्या छतावर, दुकानावर, व्यापारी संकुलावर होर्डिंग बसविले आहेत. हे होर्डिंग लावताना मात्र स्थानिक नगर परिषद, नगर पंचायत प्रशासनाकडून कोणतीच परवानगी घेतलेली नाही, शिवाय होर्डिंग लावताना सुरक्षेचाही विचार केलेला नाही. यातून अपघात होण्याचा धोका कायमच आहे. मुंबईतील घाटकोपरसारखी घटना कुठेही होऊ शकते, अशी स्थिती आहे. अवाढव्य आकाराचे होर्डिंग्ज लावले जात आहेत. त्यावर कोणतेच नियंत्रण नाही. मुळात पालिकेच्या बाजार विभागाकडून याचे सर्वेक्षण करून अशा अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करणे अपेक्षित आहे. याचा आढावाच गेल्या काही वर्षांत घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता परिस्थिती गंभीर बनली आहे.